Saturday, April 18, 2015



विलास सारंगांचा चौथा  व्यक्तिवाद 
श्रीधर तिळवे 
विलास सारंग गेले . त्यांची तब्येत तशी काही वर्षे खराब होती आणि त्यांच्या मृत्यूची कुणकुण तशी लागलेली होती त्यामुळे धक्का न्हवता पण उदासी आलीच . 

विलास सारंग माझ्यासाठी नेहमीच '' सत्यकथेच्या पलीकडे गेलेले सत्यकथावादी कवी '' राहिले आणि त्यांच्या समीक्षेवर मी ''अभिधानन्तर''मध्ये ''अक्षरांचा श्रम केला :सत्यकथेचा आधुनिकवाद ''  असा एक प्रदीर्घ लेख लिहला होता आणि त्यांची मते खोडून काढण्याचा माझ्या परीने त्यात प्रयत्न केला होता. मराठीत साठोत्तरीतील  ज्यांच्याशी वाद घालावा असे वाटणारे जे काही मोजके प्रज्ञावंत लोक झाले त्यात विलास सारंग हे फार महत्वाचे प्रज्ञावंत लेखक होते . 

विलास सारंग मराठीत नेमका कोणता रोल पार पाडत होते ?

जगात विश्वीय युगात धर्माला आव्हान देणारे जे साहित्य जन्मले  त्यातून जगातला पहिला व्यक्तिवाद जन्मला . त्याचे स्वरूप हे प्रामुख्याने अध्यात्मिक होते.  एका अर्थाने हा अध्यात्मिक व्यक्तिवाद होता . त्याने प्रस्थापित धर्माला गदागदा हलवले . मराठीत ह्या व्यक्तिवादाची स्थापना ज्ञानेश्वर  चक्रधर आणि नामदेव  ह्या त्रयीने  केली .  ह्यातील ज्ञानेश्वरांना मराठी संस्कृतीने  बहिष्कृत केले होते  आणि पुढे त्यांना समाधी  घ्यायला लावली . चक्रधरांचा बहुधा दाभोळकर-पान्सरेन्च्याप्रमाणे खून झाला आणि नामदेवांना त्यांच्या घराण्याचा विठ्ठल मंदिरावरचा हक्क सोडायला लावून  शेवटी घुमान मध्ये सेटल  व्हायला भाग पाडले . ह्या व्यक्तिवादाचा कळस होता तुकाराम ! हा एक अफलातून कवी होता आणि त्याच्या हयातीत मराठी लोकांनी  त्याला जितका त्रास देता येईल तितका दिला . मराठी हि प्रतिगामी संस्कृती असल्यानेच मराठीत कायमच विचार करण्याऱ्या प्रतिभावंत माणसाला तो हयात असताना दाबायचे ,त्याच्या आसपासच्या  मिडीओकर लोकांना प्रोत्साहन द्यायचे मग तो मेल्यानंतर त्याच्या नावाने गळा काढून त्याला डोक्यावर घेवून नाचायचे आणि आमची मराठी संस्कृती कशी पुरोगामी आहे ते गळा फाडून सांगायचे अशी एक  मेल्यानंतर मानसन्मान देण्याची मर्तीकी परंपरा आहे .  ज्ञानेश्वर  चक्रधर आणि नामदेव  ह्या त्रयीबाबत  ती मराठीने पार पाडली आणि ह्यातील प्रत्येक लेखक मेल्यानंतर मराठी लोकांनी त्यांला मराठी संस्कृतीत  सेटल करून घेतले . 

पुढे इंग्रज लोकांच्या राज्यात सृष्टीय युग पुन्हा आले.  त्यातून ज्योतिबा फुलेंनी समाजप्रधान  प्रबोधनवाद आणि वास्तववादाची पायाभरणी केली . मराठीत त्यानंतर  दुसरा व्यक्तिवाद जन्मला तो सौंदर्यवादाच्या रूपाने . केशवसुतांच्यात प्रथम त्याचे पडसाद उमटले पण त्याची पायाभरणी बालकवींनी केली . ज्ञानेश्वर  चक्रधर आणि नामदेव  ह्या त्रयीबाबत जे केले तेच मराठी संस्कृतीने केशवसुत व बालकवींच्या बाबत केले.  हे लेखक मेल्यानंतर मराठी संस्कृतीत मराठी लोकांनी त्यांना सेटल करून घेतले .ह्या सेटलमेन्टचे सर्वात प्रतिमा वादी उथळ रूप  होते  सत्य कथेचा  रोमांटिक  प्रतीमावाद ! पुढे  हा दुसरा व्यक्तिवाद -सौंदर्यवाद चांगल्या अर्थाने कळसाला पोहचला तो पु शी रेगे , ग्रेस आणि ना धो महानोर ह्यांच्या कवितेत !

१९४० नंतर भारतात प्रतीसृष्टीयता स्थिरावली . मर्ढेकर आणि विंदा करंदीकर ह्यांनी तिसरा व्यक्तिवाद आणला तो आधुनिक व्यक्तिवादाच्या रूपाने . ह्या व्यक्तीवादाला छेद देणारा चौथा  व्यक्तिवाद जन्मला तो अस्तित्व वादाच्या रूपाने . मराठीत ह्या अस्तित्व वादी व्यक्तिवादाची अत्यंत सखोल पायाभरणी केली चार  लेखकांनी दिलीप पु चित्रे , कोसलातील नेमाडे , भाऊ पाध्ये  आणि विलास सारंग ह्यांनी ! ह्यातील दिलीप पु चित्रे , कोसलातील नेमाडे हे दोघेही देशी वादाच्या अंगाने  अस्तित्व वादी व्यक्तिवादाची वाट त्यागून गेले तर भाऊ पाध्ये वास्तव वादाला जाऊन मिळाले परिणामी  अस्तित्व वादी व्यक्तिवादाला एकमेव साठोत्तरी समर्थक उरला तो म्हणजे विलास सारंग . स्वतः च्या  ह्या एकटे पडण्याला विलास सारंग कधीच घाबरले नाहीत उलट यु टर्न घेण्याऱ्या नेमाडेशी व त्यांच्या देशीवादाशी ते तात्त्विक पातळी वर लढत राहिले.  विलास सारंगाना पुढे घेवून जाणारे सतीश तांबे , मेघनाद कुलकर्णी असे काही मराठी कथाकार झाले पण त्यांच्याकडे जितके लक्ष्य द्यायला हवे होते तितके मराठीने दिले नाही . त्यामुळे सारंगांच्या वाटेने जाऊन उपेक्षित राहण्यापेक्षा लवकरच प्रस्थापित करायला सोपी अशी देशीवादी किंवा दलित साहित्याची वाट पकडणे हे अनेक करीअरीस्ट लेखकांना आकर्षक वाटू लागले . शिवाय कल्पनाशक्तीला ताण द्यायला भाग पाडणारी प्रतिभा असणे हे थोडे अवघडच बांधकाम होते . परिणामी कल्पनाशक्ती आणि अस्तित्वाचे प्रश्न ह्यांची सांगड घालून अस्तित्वाचा पाठलाग करणारा हा लेखक पुढेही मराठीने कायमच परीघावर ठेवला . त्याला न्याय द्यायला शेवटी मंगेश काळेला खेळचा एक विशेषांक काढावा लागला . 



वास्तविक सारंगाचा अस्तित्ववादी व्यक्तिवाद हा फक्त कविता आणि कथेत दिसतो . त्यांच्या कादम्बरीत मात्र व्यक्तिवाद आणि समष्टीवाद ह्यांच्यातील द्वंद पकडणारा द्वन्दवाद दिसतो आणि त्यातून कादंबरी हा फॉर्म व्यक्तिवादी होऊच शकत नाही कि काय अशी शंका येवू लागते . मात्र तरीही जो प्रभाव  कोसलाचा पडला तो एन्कीच्या  राज्याचा पडला नाही ह्याचे काय कारण असावे. वस्तुस्थिती अशी आहे कि कोसला ही एक आधुनिक प्रतिगामी कादंबरी आहे आणि मराठी संस्कृती ही प्रतिगामी असल्याने आधुनिकतेची कोसलात उडवली गेलेली टवाळी मराठी माणसाला भावली. मृत्युंजय स्वामी  आणि कोसला ह्या तीनही कादंबऱयाना दाद देणारी मानसिकता एकच आहे.शिवाय मराठी वाचक कॉलेजनंतर काही वाचत नाही त्यामुळे मराठी बहुतांशी वाचकाचे वय कायमच २१ असते त्यामुळे कॉलेजवयात वाचलेल्या कॉलेजच्या भावविश्वाशी निगडीत कोसला दुनियादारी ह्या कादंबऱ्या (ज्याला सारंग  नोस्तालजीयाचा रोग म्हणतात )त्याला आयुष्यभर आवडत राहतात. ह्या वयाच्या पुढील विकास दर्शवणाऱ्या एन्कीच्या  राज्यासारख्या कादंबऱ्या त्याला भावत नाहीत त्यात  एन्कीच्या  राज्यात परदेश आहे जन्मता देशी बनलेल्या मराठी वाचकांना हे विश्व काय भावणार ? ह्या कारणानं सारंग कायम परदेशी लेखक राहिले. 
         खुद्द सारंगाना हे जाणवले असावे आणि त्यातूनच भारतीय वास्तवाकडे ते परतले . हि पीछेहाट होती . दलित विचारवंतांनी आधीच मांडलेले मॉडेल त्यांनी आधिक चकाचक भाषेत मांडून आपण काहीतरी नवे मांडतोय असा आव आणला . पण अनुष्टुभमधल्या त्यांच्या ह्या लेखांनी दलित साहित्य शास्त्राने पुढे आणलेला साहित्यातील जातीयतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आणला  मात्र त्याचे स्वरूप देशीवादी न्हवते तर अस्तित्व प्रमाण मानून जगण्याऱ्या व्यक्तीला जातींचा होणारा त्रास असे होते . हा खरेतर जातिव्यवस्थेविरुद्धचा अस्तित्ववादी त्रागा होता आणि त्यानी तो नोंदवला ते बरेच झाले . 

सारंगांचे खरे योगदान काय  आहे ?  त्यांनी अस्तित्ववादी व्यक्तिवादाचा झेंडा फडकावत ठेवला . जेव्हा वास्तव वादाच्या नावाखाली कल्पनाशक्तीची कोंडी केली जात होती तेव्हा त्यांनी ही कोंडी फोडण्याची अथक कोशिश केली आणि कल्पनाशक्तीचे जागरण जिवंत ठेवले . ते एक हाडाचे प्रतिभावंत लेखक होते . सत्यकथा ही त्यांच्या पायातील बेडी होती कि त्यांनी प्रकाशनासाठी वापरलेला तो एक अस्तित्ववादी टेकू होता हे एक कोडे होते आणि ते आता सुटेल असे वाटत नाही .नेहमी प्रमाणे आता मेल्यानंतर विलास सारंगानाही मानसन्मान देण्याची आणि त्यांना मराठी संस्कृतीत सेटल करून घेण्याची मर्तीकी परंपरा मराठी संस्कृती पार पाडेलच . 

साठोत्तरी हि आमची बाप पिढी ! त्यांच्या अंगाखान्द्यावर आम्ही खेळलो आणि बाप फारच कर्मठ आहे हे लक्षात येताच त्यांचे साठोत्तरी साहित्याचे घर सोडून नवे चौथ्या नवतेचे घर आम्ही बांधले पण तरीही बाप कायमचा दूर गेल्यावर दु :ख होतेच. कोल्हटकर , ग्रेस ,चित्रे , ढसाळ आणि  आता विलास सारंग ! अस्तित्व संपल्यावर उठण्याऱ्या अस्तित्वाच्या आठवणींचे काय करायचे ?

No comments: