Wednesday, February 27, 2019

माझ्या वैचारिक लिखाणाबाबत आत्ताचा श्रीधर तिळवे काय विचार करतोय असा प्रश्न सारखा येतोय एका अर्थानं तो जिवन्त नाहीये शरीर आहे हे शरीर जे लिहितंय ते अध्यात्मिक आहे मी ते येऊ देतो 

Tuesday, February 26, 2019

मी युद्धाचा कट्टर विरोधक असलो तरी जर समोरचा प्रचंड हिंसक असेल तर
१ सुरक्षणासाठी केलेले संरक्षण
२ आक्रमण झाल्यावर अधिक आक्रमण होऊ नये म्हणून दक्षतेसाठी केलेले अधिकचे आक्रमण
हे नैतिक मानतो
भारतीय सेनेचे म्हणूनच अभिनंदन 

Thursday, February 21, 2019

नामवरसिंह गेले . मराठीत बेडेकर आणि हिंदीत नामवर हे दोन मार्क्सवादी समीक्षक असे होते ज्यांच्याबद्दल भय , आदर आणि हे काय म्हणतात/ किंवा म्हणून गेलेत म्हणून  उत्सुकता असायची /होती बेडेकर आधीच्या पिढीचे असल्याने फार आधी गेले(१९७३)  खुद्द मार्क्सवाद्यांनीच त्यांची पत्रास फारशी ठेवली नाही मग नॉन मार्क्सवादी काय पत्रास ठेवणार त्यामुळं त्यांचा मार्क्सवादी वारसा कोणी मराठीत नीट चालवला नाही अपवाद कदाचित शरद नावरे असावेत पण त्यांनी चौफेर लिखाण न केल्याने ते कोल्हापूरच्या वर्तुळापुरते सीमित आहेत शिरवाडकर वैग्रे ठीकठाक त्यामुळे मार्क्सवाद्यांचा साहित्यातला आवाज ऐकायला नामवारांच्याशिवाय पर्याय राहिला नाही

नामवरांच्या सुदैवाने  त्यांच्यावेळी  नेमका गजानन माधव मुक्तिबोध हा अद्भुत प्रतिभाशाली कवी चक्क मार्क्सवादी होता आणि त्याच्यामुळे हिंदीतला देशीवाद अधिक सशक्तपणे व काहीसा बिनधास्तपणे डावा झाला मराठीतला डावेपणा मात्र कायमच काँग्रेसवादी(गांधीवादी ) आणि आंबेडकरवादी परिघाच्या आत घुटमळत राहिला त्यामुळे नारायण सुर्वेंच्या नंतर मराठीत सशक्त डावी कविता झाली नाही अपवाद माझा मित्र दिलीप धोंडो कुलकर्णी सुहास एकसंबेकर किरण खेबुडकर गणेश विसपुते व अर्थात सतीश काळसेकर त्याउलट डाव्या आंबेडकरवादाने नामदेव ढसाळसारखा अभूतपूर्व कवी जन्माला घातल्याने आणि त्याला पूरक केशव मेश्राम , यशवंत मनोहर , प्रकाश जाधव त्र्यंबक सपकाळे अरुण काळे महेंद्र भवरे भुजंग मेश्राम असे एकापेक्षा एक कवी निर्माण झाल्याने आणि पुढे दया पवारांच्या दलित आत्मकथनाने सारे वळणच बदलल्याने मराठी डावेपणा हा हळूहळू आंबेडकरवादीच झाला  ह्यात भर पडली ती शरद पाटलांच्या माफुआवादाने ! मार्क्स फुले आंबेडकर ह्यांना एकत्र कसे घेऊन जायचे ह्याचे उत्कृष्ट मॉडेलच शरद पाटलांनी सादर केल्याने मराठीत शुद्ध मार्क्सवाद्यांची गरजच सम्पली . पुढे कांचा  इल्लय्याने मार्क्स आणि आंबेडकर ह्यांना एकत्र न्हेण्याची गरज मांडली तेव्हा ती नॉनमराठी लोकांना थोर वाटली तरी मराठी लोकांना ती शरद पाटलांच्यामुळे आधीच माहिती होती हिंदीत मात्र आंबेडकरवादाचा प्रभाव फार उशिरा पडायला लागल्याने तिथली साठोत्तरी डावी कविता अधिक सशक्त निपजली आणि नामवरांनी तिला आवश्यक असलेली समीक्षिय बॅकग्राउंड व्यवस्थित पुरवली डिकलोनायझेशनचे मार्क्सवादी आर्थिक विश्लेषण त्यांना उत्कृष्ट जमले पण त्यांच्या परखडपणामुळे आणि ते ज्या जेएनयू त शिकवत होते त्याच्या डाव्या वर्तुळामुळे त्यांना हळूहळू मठाधीशाचे स्वरूप प्राप्त झाले काँग्रेस त्यांच्यामागे उभी राहिली कारण शेवटी ती जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी होती आणि डाव्याना उत्तेजन देण्याची आणि त्याचबरोबर मॅनेजही करण्याची ती उत्कृष्ट सोय होती

गजानन माधव मुक्तिबोधांना हिंदी कवितेच्या केंद्रस्थानी आणण्यात त्यांचा प्रचंड वाटा होता आणि निर्मल वर्माच्या कथेलाही त्यांनीच महत्व प्राप्त करून दिले आपल्याकडे विंदा करंदीकर हे डावे पण प्रभावी कवी होते पण नेहरूंचे मॉडेल प्रमोट करणारे असल्याने काँग्रेसचा प्रभाव वाढला त्यातच सुर्वे चांगले कवी असले तरी त्यांच्याकडे गजानन मुक्तिबोधांच्या टोलेजन्ग प्रतिभेची वानवा होती त्यामुळे मराठीत नामवरांना कोणी समांतर समीक्षक दिसत नाही

नामवरांचा  जन्म बनारसला झाला होता आणि काशीच्या पांडित्यगिरीचे अवशेष त्यांच्यात जोरदारपणे शाबूत होते   राहुल सांकृत्यायन हे डावे ऋषी वाटायचे आणि ते डावे पंडित ! साहजिकच ते कालिदासाचा टीकाकार मल्लिनाथ आपला कुळपुरुष असल्यासारखे बोलायचे आणि शास्त्रार्थ मनापासून करायचे आणि त्यासाठी आवश्यक असणारी तल्लख बुद्धी , धाडस , वादविवादपटुता आणि एन्सायक्लोपीडिक डाटा त्यांच्याजवळ भरपूर होता शेवटी ते हजारीप्रसाद व्दिवेदींचें शिष्य होते अमर्त्य सेनांची शब्दावली वापरायची तर आर्गुमॅन्टिव्ह इंडियन !

कविताके नये प्रतिमान (१९६८)ह्या ग्रंथाने त्यांची ही डावी पंडितीगिरी चालू झाली मूल्यकेंद्री साहित्याचा आग्रह त्यांनी जोरदारपणे लावून धरला जे जे अस्तित्वात आहे त्याची टीका झाली पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि साहित्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना मान्य होते आणि वेळ आली तेव्हा साहित्याची स्वायत्तता त्यांनी लावून धरली  मार्क्स आणि साहित्याची स्वायत्तता ह्या दोन गोष्टी थेरॉटिकली एकत्र जात नसल्या तरी भांडवलशाही अर्थव्यवस्थेत स्वतःचे म्हणणे मांडण्यासाठी कलेची स्वायत्तता आवश्यक असल्याने तिचा पुरस्कार केल्याशिवाय पर्याय राहात नाही असे मला वाटते हे तसेच आहे जसे मुस्लिम एखाद्या  राष्ट्रात अल्पसंख्याक असले कि सेक्युलर असतात . त्यामुळे मार्क्सवाद्यांना समजली नाही तरी मी नामवरांची अडचण ओळखून होतो

मी कोल्हापुरात असतांना त्यांच्या समीक्षिय विधानांना कधी निरमा कधी निर्मला (हा कोल्हापूरचा वॊशिंग पॉवडरचा स्थानिक ब्रँड होता जिथे मी बालपणी प्लास्टिक पॅकिंग शिकलो होतो  ) म्हणायचो माझा मित्र राजकुमार यादव हा हिंदीचा विद्यार्थी असल्याने आमच्यात नामवरांना धरून काही वादही होत त्यांचे चांगले विधान असले कि निरमा व खराब विधान असले कि निर्मला असे आमचे चाले नामवरांनी दोन्ही प्रकारची विधाने करत स्वतःकडे लक्ष्य राहील ह्याची काळजी घेतली

दुसरी परंपराकी खोज नंतर नामवरांनी लिखित असं काही काम केलं नाही बहुधा ओरलचा शोध घेता घेता तेच ओरलच्या इतक्या प्रेमात पडले कि त्यांनी लिखिताकडे पाठ फिरवली बहुतांशी पंडित भारतात  शेवटी व्याख्याते होतात त्यांचेही असेच काहीतरी झाले असावे .

कम्म्युनिस्ट असल्याची किंमत त्यांनी आयुष्यभर चुकवली प्राध्यापकीय दोन जॉब त्यांना सोडावे लागले (एकदा बनारस तर एकदा सागर ) सीपीआय च्या जनयुगाचे ते काही काळ संपादकही होते आणि कम्युनिस्ट पक्षातर्फे एक निवडणूक लढून ते हरले होते टेन्शनला नव्या कवितेचे प्रमुख लक्षण मानणारी त्यांची समीक्षा स्वतःच्या जीवनातही नानाविध टेन्शनस  पाळून होती बहुदा त्यांनीच संरचनावाद साहित्याच्या अभ्यासक्रमात प्रथम आणला


मार्क्सवाद्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्यांच्या वैचारिकतेत अनलिमिटेड हृदय नाही आणि आत्मा तर बिलकुलच नाही परिणामी एक रुक्ष पण शास्त्र व शस्त्र हातात धरणारी IDEOLOGY असे त्याचे स्वरूप राहते
आंबेडकरांनी बुद्ध स्वीकारून त्याला अनलिमिटेड हृदय देण्याचा प्रयत्न केला अनेक मार्क्सवाद्यांना आजही हे कळलेलं नाही नामवरांची गोची हीच होती कि संवेदनशीलतेमुळे त्यांच्याकडे हृदय होते आणि मार्क्सवादाच्या चौकटीत ह्या हृदयाचे काय करायचे हे त्यांना शेवटपर्यंत कळले नाही मला वाटते ही केवळ त्यांचीच नाही तर त्यांच्या अख्ख्या पिढीचीच शोकांतिका आहे

नामवरांच्या बरोबर ही पिढीही गेली . नामवरांचे जाणे हा त्या पिढीचा अस्त आहे .
त्यांच्या स्मृतीला माझा सलाम !

श्रीधर तिळवे नाईक














Wednesday, February 20, 2019

रुडॉल्फ रुडी गेला त्याच्या माझ्या कॉमन मित्रांनी मला किंवा इतर कुणाला कळवायचीही तसदी घेतली नाही कारण तो झीच्या त्या टॉप पोझिशनवर न्हवता ज्यासाठी लोक त्याच्याभवती गोळा होत . तो लवकर जाणार ह्याची कल्पना सर्वच जवळच्या मित्रांना होती पण इतक्या लवकर असेही वाटले न्हवते

रुडीची माझी ओळख माझ्या कन्नड मित्रांनी करून दिली होती मराठी साहित्यात मी जरी मराठी माणूस असलो तरी बॉलिवूडमध्ये माझी ओळख एक तुळु  कन्नडीग अशी असल्याने रुडी माझ्या जवळ चटकन आला रुडी कन्नड ख्रिश्चन असल्याने त्याची जीवनशैली ही ख्रिश्चन आणि साऊथ इंडियन कन्नड अशा दोन संस्कृतींनी युक्त होती आणि दोन्ही संस्कृतींचा तो अभिमानी होता त्यातच त्याचे काही नातेवाईक आस्ट्रेलियात सेटल झाल्याने ऑस्ट्रेलियन ख्रिश्चनिटी हा त्याच्या आस्थेचा विषय होता त्याचा धार्मिक गुरुही ऑस्ट्रेलियन ख्रिश्चन परंपरेतून आलेला होता ऑस्ट्रेलियात एक वेगळी ख्रिश्चनिटी जन्माला येत आहे ह्याविषयी आमच्यात एकमत होते

प्रत्यक्ष व्यवहारात मात्र तो प्रॅक्टिकल होता किंबहुना "श्रीधरअण्णा थोडा प्रॅक्टिकल बनना  "अशी भुणभुण माझ्यामागे लावणारे जे लोक होते त्यात तो एक होता मोक्षावर विश्वास नसल्याने माझा संन्यास त्याला अनाकलनीय होता त्याच्या दृष्टीने कयामत सत्य होती त्यामुळे मी मोक्ष नावाच्या भ्रमाच्या मागे न लागता करियरच्या मागे लागावे अशी त्याची इच्छा होती

त्याने स्वतःचे करिअर झी पासून सुरु केले होते आणि झीच्या आरंभीच्या लोकांपैकी तो एक पायोनियर होता झी नेटवर्क्स नेमके कसे उभे होत गेले ह्याचा तो चालता बोलता इतिहास होता आपल्या बॉसवर त्याचे गाढ प्रेम होते आणि भारतातलं पहिलं खाजगी चॅनेल उभं करण्यात आपलाही खारीचा वाटा आहे ह्याचा त्याला सार्थ अभिमान होता . खाजगी चॅनेल्सच्या मालिकांचे प्रॉडक्शन डिझाईन करण्याची भारतीय पद्धत त्याने तयार केली ज्यात भारतीयांचा आळस , भ्रष्टाचार आणि कामचुकारपणा गृहीत धरण्यात आला होता झीचा पहिला ग्रेट सेलिब्रिटी प्रोड्युसर जो एकेकाळी एकता कपूर एव्हढाच प्रसिद्ध होता तो माझा एकेकाळचा  दोस्त असल्याने मला दुसरी बाजूही समजत होती पण पहिली कम्पनी ही अशीच उभी राहत असल्याने ह्याला पर्याय नाही हेही कळत होते पुढे होम टीव्हीने अत्यंत निर्माताकेंद्री दयाळू स्ट्रक्चर आणले तर त्याचा एका वर्षात कचरा झाला . त्यामुळे रूडीला नावं ठेवणारे लोक सरळ झाले .

पैसा त्याचा वीक पॉईंट होता पण तो कसा हाताळावा हे मात्र त्याला कळत न्हवते पुढे जेव्हा मला तो हे सगळं आपल्या फॅमिलीच्या सुरक्षिततेसाठी करतोय हे लक्ष्यात आलं तेव्हा त्याच्या ह्या वीक पॉइंटला मी माफ केलं त्याला जन्मापासून डायबेटीस होता आणि तो अतिउच्च होता त्यामुळे आपण कधीही मरू शकतो अशी त्याला भीती होती आपल्यामागे आपल्या कुटुंबाचं सगळं नीट व्हावं म्हणून तो धडपडत होता त्याचं  आपल्या बायकोवर प्रेम होतं आणि ते शेवटपर्यंत होतं तिच्यासाठी त्यानं काही गोष्टी सोडल्या किंबहुना शेवटची काही वर्षे तो फॅमिलीसाठीच जिवन्त राहण्याची धडपड करत होता साहजिकच तो बायकोला बिझनेस शिकवत होता जे आमच्या मित्रांना खटकायला लागलं . मी भांडणात उभा रहात नाही सरळ बाहेर पडतो . मोक्ष मिळालेला नसतांना लोकांना तृष्णांचा अंत कर असं कोणत्या तोंडानं सांगणार बरं सगळी भांडणं ही तृष्णांची आसक्त्यांची भांडणं असतात त्यामुळे दोन्ही पार्ट्यांच्या तृष्णा मला साफ दिसत होत्या

आणि मग मला अपघात झाला मी बेडरिडन तो हायर डायबेटिक त्यामुळं भेटी दुर्मिळ झाल्या आणि  तो डायबेटिसमुळं अकस्मात गेला त्याच्या बायकोचा ३० दिवसाचा शोक हा त्यांच्यातल्या नात्याविषयी बरंच काही सांगणारा होता . परवा ती पहिल्यांदा नीट झोपली आणि मित्र निवांत झाले

रुडीला मी नेहमी म्हणायचो ," रुडी ,   तुझी वाट कयामतीची  माझी मोक्षाची त्यामुळे आपण मरण्यापूर्वी भेटणं शक्य नाही "    त्यावर तो हसायचा .

नियतीनं हे बोलणं खरं केलं . आमची शेवटची भेट झालीच नाही .     

श्रीधर तिळवे नाईक




Wednesday, February 13, 2019

विष्णू सूर्या वाघ गेला . तो विष्णू होता सूर्य होता आणि वाघही होता . विष्णू होता कारण गोवन परम्परा रोमँटिक आणि सुमधुर भाषेत कशी मांडायची हे त्याला नीट माहित होते आणि तिचा वापर स्वतःच्या भल्यासाठी कसा करायचा हेही त्याला पॉलिटिकली नीट माहित होते तो सूर्य होता कारण सगळ्या काव्यग्रहांना स्वतःभोवती कसे फिरवायचे हे त्याला माहित होते त्याच्या भाषेचा प्रकाश त्याला नीट माहित होता गोव्याचा माहोलच असा आहे कि तुम्ही रोमँटिक आपसूकच होता मात्र हा रोमँटिक माहोल सामाजिक करणारे जे काही कवी होते त्यातील तो एक होता माझे दोन मित्र दैनिक गोमंतकाचे  संपादक झाले श्रीराम पचिंद्रे आणि विष्णू . विष्णूने गोमंतकाला एक चेहरा दिला  त्याचे अमोघ वक्तृत्व त्याला शेवटी राजकारणात घेऊन आले तिथेही   तो गोव्यातील बहुजनवादाचा वाघ म्हणून वावरला  .

तो माझा वैचारिक शत्रू होता आणि आम्हा उभयतांना हे प्रेमळ शत्रुत्व मान्य होते त्याचे मगोप सोडणे मला कधीच आवडले नाही पण त्याच्याकडे त्याची कारणे होती पुढे त्याने भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिथे तो इलेक्शन जिंकलाही पण त्या जिंकण्यातही एक अस्वस्थता होती किंबहुना अस्वस्थता आणि चंचलता त्याचा स्थायीभाव होती कि काय असे वाटावे इतक्या वेगाने त्याचे स्टान्स काहीवेळा बदलत त्यामुळेच मगोप , शिवसेना , काँग्रेस आणि भाजप अशा चारही पक्षात त्याची फेरी झाली

रोमँटिक माणसाचे सारे गुणदोष त्याच्यात होते आणि विलक्षण आवेगात जगण्याचा झेलझपाटाही त्याच्या तुकारामावरच्या तुका अभंग अभंग नाटकाने जो त्याकाळी वाद निर्माण झाला होता तेव्हा मी सौष्ठवमधून संपादकीय लिहून त्याला जाहीर पाठिंबा दिला होता मात्र तसाच पाठिंबा मी त्याच्या कवितेला द्यावा ही त्याची अपेक्षा मी कधीच पूर्ण केली नाही त्याने गोव्यात भरवलेल्या काव्यहोत्राला  मी ठाम भाषेत नकार दिल्याने तो माझ्यावर चांगलाच उखडला होता पण माझा नाईलाज होता आमच्यातल्या वैचारिक मतभेदांनी आमच्या मैत्रीचा बळी घेऊ नये म्हणून मी जागरूक असे आणि गोव्यात गेलो कि शक्यतो कॉन्टक्ट करी पण त्याच्या दृष्टीने मी च्यू असल्याने हळूहळू आमचे नाते विरत गेले

त्याच्या सुदिरसुक्तातील फरक ह्या कवितेवरून  झालेला वाद तर अनावश्यक होता शूद्रांच्या पॉईंट ऑफ व्हू ने मांडलेली ही कविता एव्हढी वादग्रस्त होईल असे कुणालाच वाटले न्हवते गोव्याच्या बदलत चाललेल्या चेहऱ्याची ती नांदी आहे

आज तो गेलाय तर याज्ञवल्कावरून आम्ही दोघांनी घातलेले वाद आठवतायत त्याचा बोलण्याचा धबधबा आठवतोय त्याच्या स्वभावातील राजकारणात राहूनही त्याने जपलेली आर्तता आठवतीये त्याचा बिनधास्त पणा आठवतोय तो गेले काही महिने आजारी होता मात्र त्यातूनही वाचून परतला होता त्यामुळे सर्व काही कदाचित ठीक होईल असं वाटत असतानाच तो अनपेक्षितपणे गेला

एका तडफेचा अंत असा व्हायला नको होता

गुड बाय विष्णू

श्रीधर तिळवे नाईक