Thursday, February 21, 2019

नामवरसिंह गेले . मराठीत बेडेकर आणि हिंदीत नामवर हे दोन मार्क्सवादी समीक्षक असे होते ज्यांच्याबद्दल भय , आदर आणि हे काय म्हणतात/ किंवा म्हणून गेलेत म्हणून  उत्सुकता असायची /होती बेडेकर आधीच्या पिढीचे असल्याने फार आधी गेले(१९७३)  खुद्द मार्क्सवाद्यांनीच त्यांची पत्रास फारशी ठेवली नाही मग नॉन मार्क्सवादी काय पत्रास ठेवणार त्यामुळं त्यांचा मार्क्सवादी वारसा कोणी मराठीत नीट चालवला नाही अपवाद कदाचित शरद नावरे असावेत पण त्यांनी चौफेर लिखाण न केल्याने ते कोल्हापूरच्या वर्तुळापुरते सीमित आहेत शिरवाडकर वैग्रे ठीकठाक त्यामुळे मार्क्सवाद्यांचा साहित्यातला आवाज ऐकायला नामवारांच्याशिवाय पर्याय राहिला नाही

नामवरांच्या सुदैवाने  त्यांच्यावेळी  नेमका गजानन माधव मुक्तिबोध हा अद्भुत प्रतिभाशाली कवी चक्क मार्क्सवादी होता आणि त्याच्यामुळे हिंदीतला देशीवाद अधिक सशक्तपणे व काहीसा बिनधास्तपणे डावा झाला मराठीतला डावेपणा मात्र कायमच काँग्रेसवादी(गांधीवादी ) आणि आंबेडकरवादी परिघाच्या आत घुटमळत राहिला त्यामुळे नारायण सुर्वेंच्या नंतर मराठीत सशक्त डावी कविता झाली नाही अपवाद माझा मित्र दिलीप धोंडो कुलकर्णी सुहास एकसंबेकर किरण खेबुडकर गणेश विसपुते व अर्थात सतीश काळसेकर त्याउलट डाव्या आंबेडकरवादाने नामदेव ढसाळसारखा अभूतपूर्व कवी जन्माला घातल्याने आणि त्याला पूरक केशव मेश्राम , यशवंत मनोहर , प्रकाश जाधव त्र्यंबक सपकाळे अरुण काळे महेंद्र भवरे भुजंग मेश्राम असे एकापेक्षा एक कवी निर्माण झाल्याने आणि पुढे दया पवारांच्या दलित आत्मकथनाने सारे वळणच बदलल्याने मराठी डावेपणा हा हळूहळू आंबेडकरवादीच झाला  ह्यात भर पडली ती शरद पाटलांच्या माफुआवादाने ! मार्क्स फुले आंबेडकर ह्यांना एकत्र कसे घेऊन जायचे ह्याचे उत्कृष्ट मॉडेलच शरद पाटलांनी सादर केल्याने मराठीत शुद्ध मार्क्सवाद्यांची गरजच सम्पली . पुढे कांचा  इल्लय्याने मार्क्स आणि आंबेडकर ह्यांना एकत्र न्हेण्याची गरज मांडली तेव्हा ती नॉनमराठी लोकांना थोर वाटली तरी मराठी लोकांना ती शरद पाटलांच्यामुळे आधीच माहिती होती हिंदीत मात्र आंबेडकरवादाचा प्रभाव फार उशिरा पडायला लागल्याने तिथली साठोत्तरी डावी कविता अधिक सशक्त निपजली आणि नामवरांनी तिला आवश्यक असलेली समीक्षिय बॅकग्राउंड व्यवस्थित पुरवली डिकलोनायझेशनचे मार्क्सवादी आर्थिक विश्लेषण त्यांना उत्कृष्ट जमले पण त्यांच्या परखडपणामुळे आणि ते ज्या जेएनयू त शिकवत होते त्याच्या डाव्या वर्तुळामुळे त्यांना हळूहळू मठाधीशाचे स्वरूप प्राप्त झाले काँग्रेस त्यांच्यामागे उभी राहिली कारण शेवटी ती जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी होती आणि डाव्याना उत्तेजन देण्याची आणि त्याचबरोबर मॅनेजही करण्याची ती उत्कृष्ट सोय होती

गजानन माधव मुक्तिबोधांना हिंदी कवितेच्या केंद्रस्थानी आणण्यात त्यांचा प्रचंड वाटा होता आणि निर्मल वर्माच्या कथेलाही त्यांनीच महत्व प्राप्त करून दिले आपल्याकडे विंदा करंदीकर हे डावे पण प्रभावी कवी होते पण नेहरूंचे मॉडेल प्रमोट करणारे असल्याने काँग्रेसचा प्रभाव वाढला त्यातच सुर्वे चांगले कवी असले तरी त्यांच्याकडे गजानन मुक्तिबोधांच्या टोलेजन्ग प्रतिभेची वानवा होती त्यामुळे मराठीत नामवरांना कोणी समांतर समीक्षक दिसत नाही

नामवरांचा  जन्म बनारसला झाला होता आणि काशीच्या पांडित्यगिरीचे अवशेष त्यांच्यात जोरदारपणे शाबूत होते   राहुल सांकृत्यायन हे डावे ऋषी वाटायचे आणि ते डावे पंडित ! साहजिकच ते कालिदासाचा टीकाकार मल्लिनाथ आपला कुळपुरुष असल्यासारखे बोलायचे आणि शास्त्रार्थ मनापासून करायचे आणि त्यासाठी आवश्यक असणारी तल्लख बुद्धी , धाडस , वादविवादपटुता आणि एन्सायक्लोपीडिक डाटा त्यांच्याजवळ भरपूर होता शेवटी ते हजारीप्रसाद व्दिवेदींचें शिष्य होते अमर्त्य सेनांची शब्दावली वापरायची तर आर्गुमॅन्टिव्ह इंडियन !

कविताके नये प्रतिमान (१९६८)ह्या ग्रंथाने त्यांची ही डावी पंडितीगिरी चालू झाली मूल्यकेंद्री साहित्याचा आग्रह त्यांनी जोरदारपणे लावून धरला जे जे अस्तित्वात आहे त्याची टीका झाली पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि साहित्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना मान्य होते आणि वेळ आली तेव्हा साहित्याची स्वायत्तता त्यांनी लावून धरली  मार्क्स आणि साहित्याची स्वायत्तता ह्या दोन गोष्टी थेरॉटिकली एकत्र जात नसल्या तरी भांडवलशाही अर्थव्यवस्थेत स्वतःचे म्हणणे मांडण्यासाठी कलेची स्वायत्तता आवश्यक असल्याने तिचा पुरस्कार केल्याशिवाय पर्याय राहात नाही असे मला वाटते हे तसेच आहे जसे मुस्लिम एखाद्या  राष्ट्रात अल्पसंख्याक असले कि सेक्युलर असतात . त्यामुळे मार्क्सवाद्यांना समजली नाही तरी मी नामवरांची अडचण ओळखून होतो

मी कोल्हापुरात असतांना त्यांच्या समीक्षिय विधानांना कधी निरमा कधी निर्मला (हा कोल्हापूरचा वॊशिंग पॉवडरचा स्थानिक ब्रँड होता जिथे मी बालपणी प्लास्टिक पॅकिंग शिकलो होतो  ) म्हणायचो माझा मित्र राजकुमार यादव हा हिंदीचा विद्यार्थी असल्याने आमच्यात नामवरांना धरून काही वादही होत त्यांचे चांगले विधान असले कि निरमा व खराब विधान असले कि निर्मला असे आमचे चाले नामवरांनी दोन्ही प्रकारची विधाने करत स्वतःकडे लक्ष्य राहील ह्याची काळजी घेतली

दुसरी परंपराकी खोज नंतर नामवरांनी लिखित असं काही काम केलं नाही बहुधा ओरलचा शोध घेता घेता तेच ओरलच्या इतक्या प्रेमात पडले कि त्यांनी लिखिताकडे पाठ फिरवली बहुतांशी पंडित भारतात  शेवटी व्याख्याते होतात त्यांचेही असेच काहीतरी झाले असावे .

कम्म्युनिस्ट असल्याची किंमत त्यांनी आयुष्यभर चुकवली प्राध्यापकीय दोन जॉब त्यांना सोडावे लागले (एकदा बनारस तर एकदा सागर ) सीपीआय च्या जनयुगाचे ते काही काळ संपादकही होते आणि कम्युनिस्ट पक्षातर्फे एक निवडणूक लढून ते हरले होते टेन्शनला नव्या कवितेचे प्रमुख लक्षण मानणारी त्यांची समीक्षा स्वतःच्या जीवनातही नानाविध टेन्शनस  पाळून होती बहुदा त्यांनीच संरचनावाद साहित्याच्या अभ्यासक्रमात प्रथम आणला


मार्क्सवाद्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्यांच्या वैचारिकतेत अनलिमिटेड हृदय नाही आणि आत्मा तर बिलकुलच नाही परिणामी एक रुक्ष पण शास्त्र व शस्त्र हातात धरणारी IDEOLOGY असे त्याचे स्वरूप राहते
आंबेडकरांनी बुद्ध स्वीकारून त्याला अनलिमिटेड हृदय देण्याचा प्रयत्न केला अनेक मार्क्सवाद्यांना आजही हे कळलेलं नाही नामवरांची गोची हीच होती कि संवेदनशीलतेमुळे त्यांच्याकडे हृदय होते आणि मार्क्सवादाच्या चौकटीत ह्या हृदयाचे काय करायचे हे त्यांना शेवटपर्यंत कळले नाही मला वाटते ही केवळ त्यांचीच नाही तर त्यांच्या अख्ख्या पिढीचीच शोकांतिका आहे

नामवरांच्या बरोबर ही पिढीही गेली . नामवरांचे जाणे हा त्या पिढीचा अस्त आहे .
त्यांच्या स्मृतीला माझा सलाम !

श्रीधर तिळवे नाईक














No comments: