Sunday, August 29, 2021

मितभाषी श्रीधर तिळवे नाईक 

जयंत पवार गेला अत्यंत कमी पण नेहमी खरं बोलणारा मितभाषी आणि सोशिक जयंत गेला आमच्या शेवटच्या भेटीत आम्ही फक्त एकमेकांच्या आजारावर बोललो होतो आणि हम होंगे कामयाब ची हिडन धून आळवत वेगळे झालो होतो 

जयंत लालबाग परळच्या मिल कामगारांच्यात जन्मला वाढला साहजिकच त्याची मानसिकता पूर्ण अरबन कधीच झाली नाही मी ह्या ठिकाणी काही महिने राहिलो होतो त्यामुळे एकंदर जयंत काय वातावरणात वाढला असेल ह्याचा मला अंदाज होता  त्याने मुंबई डोक्यावर ठेवली पण लालबाग परळ काळजात ! सुरवातीला चौथ्या नवतेच्या पूर्ण विरोधात आणि नंतर बाजूने असा आमचा नातेप्रवास होता 

त्याचे पहिले नाटक फुल मेलोड्रॅमॅटिक पण दुसरे अंधांतर त्याच्या स्वतःच्या आयुष्याचा तुकडा सादर करणारे जणू वास्तवाची एक स्लाइस कापून रंगमंचावर ठेवलेली ! त्याच्या एकांकिकाही अशाच ! 

त्याला सिनेसृष्टीत लेखक दिग्दर्शक व्हायचे होते पण सर्व जबाबदाऱ्या सांभाळून ! त्यातील सिनेलेखक तो झाला ब्रेकिंग न्यूज ह्या फिल्ममुळे पण बॉलिवूडमधील सारा खेळ हिट फ्लॉपचा फिल्म फ्लॉप झाली आणि रोध निर्माण झाला सज्जनता ही बॉलिवूडमध्ये डीसक्वालिफिकेशन आहे ह्याविषयी आमच्यात सहमती होती 

त्याचे कथालेखन हे मराठीत फार महत्वाचे ! खरेतर मी त्यावर सविस्तर लिहिणार होतो किंबहुना ऐंशोत्तरी  पिढीचे कथालेखन हा एक प्रबंधाचा विषय आहे असं माझं मत आहे कथालेखनाची एव्हढी विविधता दाखवणारी पिढी ही फक्त गाडगीळ माडगूळकर प्रभाकर पाध्ये गोखले ह्यांच्या काळात होती जयंत हा आमच्या पिढीचा एक बिनीचा कथालेखक होता सुदैवाने साहित्य अकादमी मिळाल्याने त्याची दखलही घेतली गेली 

आणि आता तो गेला तो एक हरणारी लढाई लढतोय असं वाटत होतं . शेवटी हरला !

कमी शब्दात अस्तित्व दरवळत ठेवणारा एक मोठा लेखक गेला . अलविदा दोस्त !

श्रीधर तिळवे नाईक 

गतवर्षाचा धडा श्रीधर तिळवे नाईक 

एप्रिल २०२० ते मे २०२१ हा कालखंड कलात्मक पातळीवर फार विचित्र गेला १ कोव्हीड २ विषघटना आणि ३ आईचा मृत्यू अशा लागोपाठच्या घटनांनी वर्ष वेगवान केले आणि कवितेत त्यांची अभिव्यक्तीही झाली कवितेत वर्तमान ओतण्याची माझी कलाशैली आहे त्यातून कोव्हीडवर महाकाव्य विषघटनेवर बृहदकाव्य आणि आईच्या मृत्यूवर खंडकाव्य अशी तीन काव्ये झाली ह्यापूर्वी एकाच वर्षात तीन प्रकारची मोठी काव्ये कधी झाली न्हवती ती ह्यावर्षी झाली 

विचित्र गोष्ट अशी कि ह्या वर्तमानकालीन कविता फेसबुकवर टाकत असतांना डेकॅथलॉन एल्सट्रातल्या १९८३ -१९८७ ह्या दरम्यानच्या कविता मी टाकत होतो तर त्या काहींना आत्ताच्या काळाला रिलेव्हन्ट वाटायला लागल्या वास्तविक राजीव गांधींचा कालखंड आणि मोदींचा कालखंड ह्यांच्यात फरक आहे हा फरक टिपणाऱ्या राजकीय कविता फारश्या लिहिल्या जात नाहीयेत लोक अजूनही आधुनिक किंवा साठोत्तरी कवींच्या संवेदनशीलतेनं हा कालखंड बघतायत त्यातूनच जुन्या कविता वर्तमानकालीन वाटतायत राजीव गांधी आणि नरसिंहराव ह्यांनी ज्या कार्पोरेट जगताला वसवायला सुरवात केलीये ते मोदींनी पूर्णपणे एस्टॅब्लिश केलेलं आहे अगदी भाजपसारखा राजकीय पक्ष ही कार्पोरेट म्हणून सेटल झालाय भाजप हे कार्पोरेट प्लेयर म्हणून पोलिटिकल फ़ंक्शनिंग करतंय त्याच्या सत्ताकारणाचे अनेक लोचे आहेत आपण आता ते पकडतो आहोत का ? आमच्या पिढीची संवेदनशीलता आता पुरेशी नाहीये आणि साठोत्तरी संवेदनशीलता तर पूर्ण आऊटडेटेड आहे शारीरिक तारुण्यता जर जीर्ण वृद्ध संवेदनशीलतेनं काम करणार असेल तर तिला दाद काय देणार ? जगभर देशीवाद आणि उत्तराधुनिकवाद सर्वच वर्तमानाला जखडून टाकतो आहे मराठी कला ह्याला अपवाद नाहीत खरेतर सार्वजनिक जीवनात धर्माचा वाढलेला हस्तक्षेप हा नेमका कशाचा द्योतक आहे ? आधुनिक शासनयंत्रणेचं डेड फ़ंक्शनिंग ह्याला जबाबदार आहे उत्तराधुनिक शासनयंत्रणा तर मुलखाच्या वाचाळ निघाल्या आहेत घटलेल्या कार्यक्षमता नीट ऍक्टिव्हेट करण्याऐवजी कार्पोरेट जगताने धार्मिक राजवटी स्पॉन्सर करण्याचा जो मूर्ख उत्तराधुनिक खेळ रचला त्याने सर्वत्र हा अनाचाराचा हाहाकार माजवला आहे तालिबान ह्या हाहाकाराचे एक मूर्ख स्वरूप आहे ते राज्य करता न आल्याने कोसळेलंच पण अफगाण जनतेची त्यात आणखी वीस वर्षे वाया जातील ह्याचं वाईट वाटतं धार्मिक राजवटींनी कितीही आव आणला तरी त्यांना नवीन जगतासाठी आवश्यक शासनयंत्रणा उभा करता येणं शक्य नाही त्यांना एकतर आपलं तत्वज्ञान त्यागावं लागेल किंवा स्वतःच्या कर्माने नष्ट व्हावे लागेल शेवटी लोक एक आल्टरनेटिव्ह म्हणून त्यांच्याकडे बघतायत तो नीट फंक्शन झाला तर लोक हा पर्याय टिकवतील नाहीतर फेकतील औरंगजेबाची राजवट अशीच आतल्या फोफशेपणामुळं कोसळली होती मराठ्यांनी फक्त तिला ठोसे मारणे पुरेसं ठरलं 

कॅव्हिडनं आपल्या सर्वच शासनयंत्रणा ह्यात युरोपियन अमेरिकन शासनयंत्रणाही आल्या उघड्या पाडल्या प्रश्न त्या बदलायच्या कशा हा आहे 

पर्यावरणीय हाराकिरी ह्या वर्षी केंद्रस्थानी आली खरी पण ती फक्त चर्चेत राहिली 

 पैसा बिनडोक असतो त्याला नजीकचे स्वार्थ दिसतात पण भविष्यातले विनाश दिसत नाहीत मानवी जीवन पैशाच्या हाती सोपवणे ही आत्महत्या होती आणि ही आत्महत्या पूर्णत्वास पोहचली आहे . प्रश्न आहे अर्थधनशैली हा मानवी जीवनशैलीचा मुख्य आधार म्हणून फेल गेली असेल तर पर्याय काय ?


श्रीधर तिळवे नाईक 









Saturday, July 24, 2021

 सतीश काळसेकर मार्क्सवादाची पॅशन गेली 

महेश म्हात्रे ह्या परममित्राच्या लेखनानं कळलं कि सतीश काळसेकर गेले हल्ली कवी गेले कि हवा जडच होते पण काळसेकरांच्या मृत्यूने श्वासही जड झाला 

मुंबईला जे एस हॉल (हॉस्टेल ) ला आल्यावर साठोत्तरीपैकी ज्यांची पहिली भेट झाली त्यात काळसेकर फर्स्ट ! कदाचित त्या काळात ज्यांच्याशी माझा इमोशनल बॉण्ड निर्माण झाला अशा दोघांपैकी एक (दुसरे केशव मेश्राम ) गावातून मुंबईत आलेल्या प्रत्येक कवीसाठी काळसेकर थोरल्या भावासारखे असत डोळ्यातल्या डोळ्यात हसत ते जेव्हा बोलायचे तेव्हा त्यात तर्क आणि काळजी दोन्ही असायची त्यांचं सावळं आणि रुबाबदार व्यक्तिमत्व पहिल्याच भेटीत इम्प्रेशनचं दही जमवायचं 

त्यांची माझी पहिली भेट पीपल्स बुक हाऊसमध्ये झाली दुकानदाराचा मुलगा असल्याने मला पुस्तकांच्या दुकानात जाऊन पुस्तक खरेदी करायला आजही आवडतं त्यावेळीही आवडे माहीत नाही कशी पण पॉप्युलरनं माझा पहिला संग्रह स्वीकारला आहे ह्याची न्यूज त्यांच्याकडे होती पहिल्याच भेटीनंतर त्यांनी मला " बुद्धिमान आहेस पण भोळसट आहेस तेव्हा ह्या शहरात सावध रहा " अशी वॉर्निंग दिली होती 

पुढे ऋत्विज हा माझा मित्र आशुतोष आपटे ह्याचा मित्र असल्याने भेटायला आला तेव्हा मला माहीतच न्हवतं कि तो काळसेकरांचा मुलगा आहे ऋत्विज आमच्या हॉस्टेल ग्रुपमध्ये लगेच विरघळला मी मंगेश बनसोड आल्हाद भावसार महेश म्हात्रे राजेश बेहरे के श्यामसुंदर अशी एक हॉस्टेल टोळी बनत गेली आणि वाढतही गेली पुढे पोस्टर पोएट्रीचा उपक्रम राबवतांना मी त्यांची मला अतिशय आवडलेली पुस्तकांच्या संग्रहाविषयी ही कविता पोस्टर साठी घेतली ही कविता म्हणजे प्रत्येक पुस्तकप्रेमींची सॉलिलुकी होती आणि आम्हा सर्वांनाच ती आवडली होती आम्ही इथूनच चौथ्या नवतेचे रणशिंग फुंकले आणि ते साठोत्तरीविरुद्ध असूनही साठोत्तरीपैकी काहींनी त्याला पाठिंबा दिला सतीश काळसेकर पाठिंबा देणाऱ्यांपैकी होते काळसेकर फक्त पाठिंबा देऊन थांबले नाहीत त्यांनी नवीन पोरांच्या कविता ऐका म्हणून एक काव्यवाचनाचा प्रोग्रॅमही पीपल्सला ठेवला त्यात मी , ज्ञानदा व इतरांनी  कविता वाचल्या पुढे ह्यातूनच लोकवाङ्मयने काढलेली आठ कवींची काव्यसंग्रह मालिका फळाला आली माझा काव्यसंग्रह पॉप्युलरने १९९२ सालीच काढला होता त्यामुळे मला ह्यात घेता येणार नाही असं काळसेकरांनी सांगितलं तेव्हा मी आनंदाने अहो हे बरोबरच आहे असं म्हणालो ह्या संग्रहांच्यावर लिहायला नंतर समीक्षक मिळेना तेव्हा काळसेकरांनी आणि आल्हाद भावसार ह्यांनी मला विनंती केली आणि मी महानगरमध्ये बहुदा लेख टाकला 

मी मार्क्सशी सहमत नसलो तरी त्याचा शत्रूही न्हवतो ह्याकाळात साहजिकच वैचारिक टकराव अटळ होते सोविएत युनिअन कोलॅप्स झाल्यानंतर जी अभूतपूर्व परिस्थिती उद्भवली होती त्याचे प्रेशर त्यांच्यावरही होते सर्वच एकनिष्ठ कॉम्रेडप्रमाणे तेही क्रांतिक्षणाची वाट पहात होते मी त्यांना सरळच म्हणायचो कि हे वाट पहाणे वांझोटे आहे ते फक्त एकदाच मला म्हणाले कि तू भेटलास कि पेसिमीझम येतो मी म्हणालो मी तुम्हाला रियालिटी दाखवतोय मार्क्सवादाला ह्या देशात भवितव्य नाही आणि असलेच तर शरद पाटील ह्यांच्यासारखं काहीतरी काम सध्याच्या काळात व्हायला हवं मार्क्स भारतीय वाटत नाही हा मार्क्सवादाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांना हे पटणं शक्यच न्हवतं हळूहळू आमचे संबंध ढिले पडायला लागले एकदा तर श्रीधरनं सगळी पोरं बिघडवली म्हणाले मी रिएक्ट झालो नाही 

मग पुन्हा एकदा भेटले तेव्हा पूर्वीचाच जिव्हाळा आवाजात होता सौष्ठव का बंद केलेस वैग्रे सगळ्याच साठोत्तरीप्रमाणे त्यांचाही मी प्रिंटिंगमध्ये अधिकाधिक संग्रह काढायला हवेत  असा आग्रह होता त्याउलट मला त्यांच्या समग्र कविता एकत्र हव्या होत्या 

नंतर मग एकदा फोनवर बोलणे झाले तेव्हा दिवस काढून निवांत ये मला तुझ्याशी निवांत बोलायचं आहे म्हणाले पण मला शक्य झालं नाही 

आणि आता ते गेले 

मला खात्री आहे नव्वदोत्तर पिढीतला प्रत्येक कवी ह्या बातमीने थोडा का होईना हलला असेल आमच्या पिढीला भरभरून स्नेह आणि प्लॅटफॉर्म त्यांनी दिला मतभेदांना जागा दिली आणि नातं मोठं मानलं ते मार्क्सवादी साहित्याचा मोठाच आधार होते 

त्यांच्या कवितेवर मला जे म्हणायचं आहे ते मी टिकाहरणमध्ये म्हंटलं आहेच त्यांच्या रूपाने एका मार्क्सवादी पिढीची पॅशनच गेली म्हणायला हरकत नाही 

गुड बाय कॉम्रेड !


श्रीधर तिळवे नाईक 





Thursday, July 8, 2021

 पॅशन दाय नेम इज दिलीपकुमार श्रीधर तिळवे नाईक 

दिलीपकुमार माझ्या बालपणात मला कधीच आवडले नाहीत माझे वडील त्याचे डायहार्ड फॅन त्यामुळे लहानपणी त्याचे काही चित्रपट मला नाईलाजाने पाहायला लागत वडील दर सोमवारी मला शक्य असेल तर एक चित्रपट दाखवत आणि तो बहुतांशी इंग्लिश असे तरीही काही मॅटिनीज दिलीपकुमारचे होते पण लहानपणी मनोजकुमारने दिग्दर्शित केलेला क्रांती पाहिला आणि मला वाटलं कि हा चांगला अभिनेता आहे मी मग दिलीपकुमार रिटेक सुरु केला आणि केदार शर्माचा जोगन पाहिला मला दिलीपकुमारचा अभिनय मोकाट आवडलेला हा पहिला चित्रपट !

ह्या वेळीच  रमेश सिप्पी सलीम जावेदचा शक्ती , यश चोप्राचा मशाल  पाहताना वाटलं कि दम आहे त्यानंतर मग बिमल रॉयचा देवदास फिरून पाहिला आणि फिरून फिरून गंगावेश तसा पाहत राहिलो हा एक अद्भुत चित्रपट होता खऱ्याअर्थाने रोमँटिक चित्रपटाचा कळस !देवदासमधली पॅशन हा एक ग्रंथाचा विषय आहे 

मात्र त्याला दिलेले वास्तववादी अभिनयाचा टॅग मला कधीच पटला नाही राज कपूर दिलीपकुमार आणि देव आनंद हे तिघेही रोमँटिक अभिनेतेच ! अगदी मुघल ए आझम मधेही दिलीपकुमार मला दिलीपकुमार विथ पॅशनच वाटला . आणि तो तसा होता म्हणूनच पृथ्वीराज कपूरच्या क्लासिकल स्कूलच्या सर्वोच्च अभिनयापुढे व मधुबालाच्या क्लासिकल सौंदर्यापुढे तोडीसतोड पॅशन घेऊन टिकला त्याउलट त्याला समांतर असलेले बलराज साहनी व मोतीलाल हे जास्त व खरे वास्तववादी होते दिलीप कुमारकडे असलेली पॅशन राज व देव दोघांच्यातही मिसिंग होती आणि तिची कसर हे लोक स्टाईलने भरून काढण्याचा हे दोघे केविलवाणा प्रयत्न करत ही पॅशन नेमकी कुठून येत होती हे कोडे खुद्द दिलीपकुमारलाही सुटले असेल कि नाही कुणास ठाऊक ?

मग पुन्हा कधीतरी गंगा जमुना (ह्यावरूनच पुढे सलीम जावेदचा दिवार आला ) पाहिला आणि मग मधुमती दोघेही अभिनयात ढग होते अंदाज न येणारे पण पाऊसगच्च  ! नया दौर , राम और श्याम , लीडर ! माझी दिलीपकुमारची यादी इथे संपते बैराग वैग्रे पाहिले पण पॅशन मिसिंग वाटली . 

१९९२ ला अडा हॉ का बा ना सु ना लिहिताना कामत्रिकोणासाठी दिलीपकुमार ,  सायरा व अस्मा हा त्रिकोण निवडला आणि डोकं गरगरवणारे अनेक तपशील उपलब्ध झाले मग मी दिलीपकुमार एक व्यक्ती म्हणून विचार करणे सोडून दिले जो माणूस आपल्या मित्राच्या बायकोशी रोमान्स करतो आणि नंतर तिला वाऱ्यावर सोडतो त्याला माझ्या एथिक्समध्ये जागा नाही साहजिकच व्यक्ती म्हणून दिलीपकुमारला जागा मिळणे बंद झाले मात्र एक अभिनेता म्हणून असलेला त्यांच्याविषयीचा आदर कधीच कमी झाला नाही पॅशनेट ऍक्टिंग कशी करायची ह्याची दिलीपकुमार म्हणजे चालतेबोलते विद्यापीठ होते दुर्देवाने ह्या विद्यापीठाचे धर्मेंद्र , राजेंद्रकुमार , मनोजकुमार असे अनेक विद्यार्थी सुपरस्टार झाले तरी दिलीपकुमारची पॅशन ह्या सर्वांच्यात मिसिंग होती आणि नकलेत ती मग कितीही चांगली असो पॅशन ओतता येत नाही हे सिद्ध झाले सुदैवाने ह्यापैकी धर्मेंद्रने आपली अभिनयशैली बदलून हीमॅन केली आणि तो वाचला नाहीतर राजेंद्रकुमारसारखा तोही अशोभनीय झाला असता 

पुढे ह्या विद्यापीठाला समांतर रोमँटिक विद्यापीठ राजेश खन्नाने उभे केले आणि दिलीपकुमार स्कूल काही काळ मागे पडले पण पुढे अभिताभ बच्चनच्या रूपाने दिलीपकुमार विथ पॅशन विद्यापीठ पुन्हा नूतनीकरणासकट उगवले आणि त्याने दिलीपकुमारची दुसरी इनिंग प्रमोट केली पुढे शाहरुख खानने दिलीपकुमार विथ राजेश खन्ना ह्यांचा समतोल साधून ऍक्टिंगमधला तिसरा रोमँटिसिझम आणला जो आजच्या पिढीत रणवीरसिंग पुढे न्हेतोय 

माझा ना अल्ल्हाहवर  विश्वास आहे ना जन्नतवर ! त्यामुळे अलविदा ऍक्टर ऑफ पॅशन ! जहाँ रहो पॅशनमे रहो ! 

श्रीधर तिळवे नाईक 



Friday, June 4, 2021

 माझी पर्सनल होमिओपॅथी गेली श्रीधर तिळवे नाईक 

मिलिंद पोतदार ह्या माझ्या जिवलग मित्रांच्यापैकी एक ! त्याने माझ्या आयुष्यात अनेक गोष्टीबाबत कि रोल पार पाडला . कोल्हापुरात त्याच्या जेव्हढ्या ओळखी होत्या तेव्हढ्या क्वचित कुणाच्या असतील एक दिवस त्यानेच त्याला माहित असलेल्या एका डॉक्टर विषयी बोलायला सुरवात केली डॉक्टरचे नाव होते डॉ अविनाश देसाई ! मिलिन्दनेच आमची मिटिंग घडवली . त्यांचा दवाखाना हुतात्मा पार्कच्या उजव्या साईडला उद्यमनगरात होता मी गेलो तेव्हाही पेशन्ट होते 

माझी वेळ येताच  मी डॉक्टरांना भेटलो . पाऊणे सहा फूट उंची सावळा रंग डोक्याचे केस थोडे उडालेले , धारदार नाक असलेले व्यक्तिमत्व पण एकदम साधे आपण डॉक्टर असल्याचा कसलाही आव नाही . एक भविष्यातज्ञ आणि एक डॉक्टर ह्यांची ही भेट होती आणि आश्चर्यकारकरित्या त्यांना फ्यूचरॉलॉजीविषयी माहिती होती मी माझ्या आजोबांच्याप्रमाणे कुंडली किंवा हात फक्त कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी वापरतो बाकी सगळा अध्यात्मिक कारभार हे मी त्यांना पहिल्या भेटीतच सांगून टाकले मात्र हे जमले नाही तर फ्यूचरॉलॉजीच्या सर्व तंत्रांना वापरतो हेही बोलून गेलो त्यांनीही डॉक्टरांसाठी अंतःप्रेरणा फार महत्वाची असते असं सांगितलं पुढे मग होमिओपॅथी आणि फ्यूचरॉलॉजी ह्यावर जुजबी चर्चा झाली मी उठलो मात्र आम्हा दोघांच्यात पहिल्याच भेटीत बॉण्ड तयार झाला 

मी जिच्यासाठी भेटलो होतो त्या माझ्या बहिणीचे (उजूचे )प्रॉब्लेम त्यांनी अक्षरश : महिनाभरात सोडवले पुढेही माझ्या घरातल्या अनेकांचे आजार त्यांनी ठीक केले ते उपचारांच्या इंटिग्रेटेड असण्यावर विश्वास ठेवणारे होते आणि त्यांची बायको आयुर्वेद कॉलेजात गोल्ड मेडलिस्ट होती साहजिकच कधीकधी आयुर्वेदाचा वापरही ते करत त्यांचे काही ऍलोपॅथिक डॉक्टर चांगले मित्र होते आणि ऍलोपॅथिक ट्रीटमेंट गरजेची असली कि ते त्यांच्याकडे पाठवत तर ऍलोपॅथीला ठीक करायला न जमलेले काही पेशंट त्यांनी होमिओपॅथीद्वारा ठीक केले होते होमिओपॅथी तळव्यातल्या वाहीन्यांच्यावर उत्कृष्ट उपचार करते हे मी त्यांच्याकडे अनेकदा साक्षात पाहिले स्त्रियांच्या एमसी नीट करण्यात तर ते मास्टर होते मात्र ताप वैग्रे आला कि ते स्वतःच क्रोसीन घ्या म्हणायचे आमच्या उपचारांनी ताप लगेच बरा होत नाही असे ते स्वतःच म्हणत मात्र दीर्घकाळ सर्दी किंवा कायमस्वरूपी सर्दी किंवा सायनसचा आजार बरा करण्यात त्यांना महारत होती डॉक्टरांनी कधीही पैश्याचा पाठलाग केला नाही एकतर ते श्रीमंत घरातून आले होते आणि आतून ते कुठेतरी कलन्दर होते त्यामुळेच एखाद्या पेशन्टकडे पैसे नसले तरी ते उपचार करत पैसे दुय्यम असल्याने त्यांनी कधीही आपला कट ठेवला नाही त्यांची प्रॅक्टिस ही एक शुद्ध प्रॅक्टिस होती त्यांच्याकडे स्वतःचे आजार बरे करू न शकलेल्या काही ऍलोपॅथिक डॉक्टरांचीही उठबस असे पण त्यांनाही ते फार चार्ज करत नसत 

माझ्यामुळे पुढे मिलिंद गुर्जर व मग नंतर अशी एक चेन जी मिलिंद पोतदारमुळे सुरु झाली होती त्यांच्याकडे कार्यान्वित झाली आमच्यातल्या अनेकांचे आजार त्यांनी ठीक केले माझ्या कवितेवर त्यांचे प्रेम होते आणि माझी एक कविता त्यांनी काहीकाळ आपल्या क्लिनिकच्या भिंतीवर लावली होती

देसाईंचं होमिओपॅथीवर निष्ठावान प्रेम होतं आणि तिच्यातल्या अद्ययावत अपडेट्स ते ठेवत तिच्या एलिमेंट थेरीविषयी त्यांची स्वतःची मते होती माझी मुंबईतील एक डॉक्टर मैत्रीण प्रफुल्ल विजयकरांनी मांडलेल्या नव्या सिद्धांताचा त्यावेळी हिरिरीने पुरस्कार करी डॉक्टर त्या सिद्धांतांना काही बाबतीत सपोर्ट करत तर काहीवेळा विरोध मात्र युरोपात अडकून पडलेल्या होमिओपॅथीला  विजयकरांनी दिलेल्या भारतीयत्वावर त्यांचाही विश्वास होता माझी मैत्रीण विजयकारांना क्रांतिकारी माने ते मात्र त्यांना मान्य न्हवते 

व्यक्तिगत पातळीवर त्यांना डॉक्टर असूनही आपल्या मराठा जातीचा सॉलिड अभिमान होता बायकोबाबत ते पारंपारीक होते तिला स्वतंत्र प्रॅक्टिस करायला त्यांनी अधिक वाव द्यायला होता आणि त्यावरून त्यांच्याशी माझा एकदा कडक वाद झाला होता वहिनी उत्कृष्ट डॉकटर होत्याच पण अव्वल दर्जाच्या कुक होत्या मी मुंबईतून कोल्हापुरात गेलो कि डॉक्टरांच्या घरी किमान एकदा तरी जाणे कम्पल्सरी होते आणि प्रत्येकवेळी किमान एकदा तरी डॉक्टरांच्या घरी जेवायला थांबायला लागे 

अपवादात्मकवेळा मी त्याच्या मुंबईतील पेशण्टना औषधेही पोचवत असे डॉक्टरांचे माझ्या घरावर प्रेम इतके कि कधीकधी स्वतः औषधे घेऊन स्वारी घरी येई त्यांची एक स्कुटर होती त्यावरून ते कोल्हापुरभर फिरत पुढे केवळ स्टेट्स म्हणून त्यांनी फोर व्हिलर घेतली खरी पण स्कुटर हेच त्यांचे पहिले प्रेम होते 

त्यांच्याबाबतीत माझे बरोबर न ठरावे असे प्रेडिक्शन म्हणजे तुमचा मुलगा विश्रांत परदेशात सेटल होणार खुद्द माझाही ह्यावर विश्वास न्हवता पण जे दिसले ते बोलणे भाग होते कारण विक्रांत देसाई चक्क कर्नल होता दुर्देवाने माझा फ्लॅश खरा झाला आणि डॉक्टरांची परवड सुरु झाली ते वरून कितीही कठोर वागत असले तरी मुलांबाबत ते हळवे होते म्हातारपणी तो जवळ नसणे त्यांना व्याकुळ करणारे होते . 

आमच्या दोघांच्या एकमेकांवरच्या विश्वासाची कसोटी पाहणारा प्रसंग आला तो माझ्या आईच्याबाबतीत्त ! मी मनाई करूनही उजू गावाला आईकडे रहायला गेली आणि पूर्ण वॉर्निंग देऊनही उजूने चायनीज टाईल्स केवळ छान चकाचक दिसतात म्हणून घराला घातल्या आणि मग जे अपेक्षित होते तेच घडले ह्या टाईल्स फक्त दिसायला बऱ्या पण चालायला घसरगुंडी ! आई त्या टाइल्सवरून घसरून पडली आणि पुढे गोव्यातल्या एका डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे तिच्या पायाला प्रॉब्लेम झाला मी देसाई डॉक्टरांशी बोललो डॉक्टर म्हणाले आईला कोल्हापुरात पाठव पुढचं सगळं मी बघतो आई कोल्हापूरला आली चेकप झाला आणि ऍलोपॅथिक डॉक्टरांनी गँगरीन झाल्याचे कन्फर्म केले फक्त देसाई डॉक्टरच असे होते जे ठामपणे सांगत होते हे गँगरीन नाहीये आणि ऍलोपॅथिक डॉक्टर्स  हे गँगरीन आहे आपण पाय कापूया नाहीतर हे शरीरभर पसरेल म्हणत होते प्रश्न होता निर्णय कुणी घ्यायचा ? डॉक्टर म्हणाले राजा काढा तुमचा इंतजाम आणि बघा काय फ्लॅश येतो का ? माझ्या संपूर्ण आयुष्यात मी फ्लॅशची इतकी डेस्परेट होऊन कधीच वाट पाहिली नसेल सुदैवाने तो आला आणि मी आईचं ऑपरेशन करायचं नाही असा निर्णय घेतला हा एक वादग्रस्त निर्णय होता आणि माझ्या ऍलोपॅथिक डॉक्टरमित्रांच्या मते मी आईला मृत्यूकडे ढकलत होतो माझा देसाई डॉक्टरांच्यावर व स्वतःच्या निर्णयावर विश्वास होता तर डॉक्टरांचा माझ्यावर मी आईला पुन्हा गावी न्हेले देसाईंची ट्रीटमेंट सुरु झाली आणि काही महिन्यांनी पायाचा हा भाग आपोआपच गळून पडला 

काही वर्षांपूर्वी आमच्या नात्याची परीक्षा खुद्द डॉक्टारांच्याबाबतच झाली मृत्यू समोर होता आणि ऑपेरेशन यशस्वी होण्याचे ५० टक्के चान्स होते साहजिकच देसाईंचा फोन आला कोल्हापुरात ये तू निर्णय घेईस्तोवर मी ऑपरेशन टेबलवर जाणार नाही मी गेलो आणि निर्णय घेतला म्हणालो ,"जावा बिनधास्त ! ओप्रेशननंतरही तुम्ही काही वर्षे जगणार"

डॉक्टर ७५ वर्षे जगले 

माझ्या ह्या डॉक्टर कम मित्राला माझी आदरांजली 

हज़ारों साल नर्गिस अपनी बे-नूरी पे रोती है 

बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदा-वर पैदा ( इक्बाल )


डॉक्टर अविनाश आनंदराव देसाई होमिओपॅथीतील नर्गिस होते 

.

श्रीधर तिळवे नाईक