Sunday, January 31, 2016

काही महनीय लोकांनी मला एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार आणि डेकॅथलॉन  सिरीजमधल्या कविता संग्रहरुपात आणण्याची सूचना केली आहे . त्यांच्या आस्थेबद्दल आभार . ह्या कविता जुन्या असल्याने ( १९८२ ते १९८७ )आणि त्या कालबाह्य झालेत अशी माझी धारणा असल्याने त्या काढाव्यात कि नाही ह्याची मला कायमच शंका वाटत असते . ह्या सर्व कविता देशीवादी नसल्या तरी निश्चितपणे देशी आणि पोटी आहेत . काहींना तर postmodern ह्या कॅटेगरीत सहज टाकता येईल . काही poststructuralism ह्या कॅटेगरीत सहज बसतील . मी स्वत : चौथ्या नवतेची संकल्पना मांडून ह्या प्रकारची कविता outdated झालीये अशी मांडणी करत आलोय . त्या पार्श्वभूमीवर ह्या कविता प्रकाशित कराव्यात  कि नाही हा प्रश्न मला कायमच पडत आलाय . तरीही मग ह्या कविता मी  नेटवर   का प्रकाशित / जालीत करतोय ? कारणे अनेक आहेत त्यातील तीन पुढीलप्रमाणे
१ लेखकाचे सर्वच लिखित प्रकाशित/ जालीत  झाले पाहिजे अशी माझी धारणा आहे त्यावरून त्याचा प्रवास कसा झाला ते कळते
२ ह्या कविता १९८२  ते १९८७  ह्या काळातील कोल्हापूर शहराचे आणि गावाचे  प्रोजेक्शन करतात असे मला वाटते .  आणि समाजशास्त्रीय पातळीवर हे महत्वाचे आहे
३ त्या काळातील श्रीधर तिळवेचेही हे प्रोजेक्शन आहे .

ह्या शिवायचे सर्वात महत्वाचे पण वाङ्मयबाह्य कारण माझ्या वडिलांना " मी माझे सर्व क्रिएटिव काम प्रकाशित करेन  " असे मी दिलेले वचन !ते सांगावे कि न सांगावे ह्याबाबत कायमच मी संभ्रमात असायचो पण आता सर्वच फिटल्याने सांगतो आहे

 माझे स्वत :चे एक मत असेही आहे कि योग्यता ही अंगभूत असते पण पात्रता मात्र समाज ठरवतो . त्यामुळे  ह्या कविता चांगल्या आहेत कि वाईट हे मराठी संस्कृतीने आणि समाजाने ठरवायचे आहे . कवींनी आणि कलावंतांनी आपल्या योग्यतेची फिकीर करावी ती वाढवावी पात्रतेच्या सांस्कृतिक ठेकेदारांना शरण जाऊ नये वेळप्रसंगी फाट्यावर मारावे . पात्रतेची फिकीर मी आयुष्यात कधीच केली नाही योग्यता मात्र कायमच वाढवत राहण्याची फिकीर केली ह्याही कवितात ती आहेच .
श्रीधर तिळवे - नाईक  

Monday, January 18, 2016

माधुरी  पटवर्धन गेली !श्रीधर तिळवे नाईक

 माधुरी  पटवर्धन गेली !एका अत्यंत सॉफ्ट  नजाकतिचा अंत झाला . ती वाढली एका मध्यमवर्गीय संस्कारात आणि मी आझाद चौकाच्या शिव्याबाज मारामारीप्रविण वातावरणात  जन्मलेलो आणि वाढलेलो  ! त्यामुळे आमच्या पहिल्या भेटीत थोडा ताण होता पण हा ताण नंतर निवळला .  मी , भूषण गगराणी , सुनील मोदी आणि संगीता कुलकर्णी अशा आम्हा चौघांची कोल्हापूरकर  महाविद्यालयीन वक्त्यांविद्यार्थ्यांची एक गैंग होती . ह्या चौघांच्यात सर्वात वाईट वक्ता मी होतो पण कधीकधी मटका लागून मला पारितोषिक मिळायचे . ह्यात माधुरी उशिरा आली . अत्यंत शुद्ध मराठी बोलणे आणि किणकिणारा असा तिचा स्वर आणि अत्यंत सोज्वळ असा तिचा चेहरा कायम एवरग्रीन राहणार असा वाटायचा . तिचे डोळे अतिशय सुंदर आणि मातृळू होते . मी तिला एकदा म्हणालो होतो तू फार चांगली आई होणार . तिच्या  हालचालीत एक शालीन सोंदर्य होते .  ती फार सेन्सिटिव होती त्यामुळे माझ्या एका मित्राने तिच्याशी कमी बोल उगाच तुझा बेधडक दे धडक कार्यक्रम राबवू नकोस असा सल्ला दिल्याने मी तिच्याशी कमी आणि अंगात नसलेला आब राखून  बोलायचो . ती बुद्धिमान होती पण कारण नसताना तिला आपण आवश्यक तेवढे बुद्धिमान नाही आहोत असे वाटायचे . ती मनाने एकदम उमदी होती आणि त्या काळात उदासही . तिचे कसे होणार असा प्रश्न मला पडायचा आणि मग माझा शाळासोबती सचिन भानुशाली तिच्या आयुष्यात आला आणि सगळ्या काळज्या संपल्या . त्यानंतर तिच्याविषयीच्या फक्त बातम्या येत राहिल्या . मी कोल्हापुरात ह्या काळात पत्रा - साधना म्हणजे तापलेल्या पत्र्यावर शवासन घालून  प्राणायाम आणि ध्यान करणे सुरु केल्याने ह्या गॅंगपासून हळूहळू  दूर सरकत गेलो त्यात माधुरी सह सर्वच दूर गेले
आणि अचानक आता बातमी आली ती तिच्या जाण्याची ! तिचे हे आकस्मिक जाणे हेलावणारे आहे . तिच्या जाण्याने कोल्हापूरशी असलेला माझा एक  सॉफ्ट धागा कायमचा  निखळला .

श्रीधर तिळवे नाईक 

Sunday, January 17, 2016

चपराक : श्रीधर तिळवे नाईक 
मी चपराकचा एकही अंक वाचलेला नाही ही माझी मर्यादा प्रथम कबूल करतो . मात्र तरीही चपराकबाबत जे काही झाले ते निषेधार्ह आहे . एखाद्या अंकातील मते तुम्हाला मान्य नसतील तर त्याचा प्रतिवाद तुम्ही विचारांनीच केला पाहिजे अंक दादागिरीने उचलून न्हवे . त्यामुळे ह्या घटनेचा मी जाहीररीत्या तीव्र निषेध करतो आहे . 

Sunday, January 10, 2016

Sunday, January 3, 2016

सहा बुद्धिमान आणि एक मेडीओकर -श्रीधर तिळवे 
लोकशाहीत प्रमुख लागतात कारण बहुतांशी लोकांना स्वत :निर्णय घ्यायचे नसतात . त्यांना कुणीतरी निर्णय घेणारा लागतोच . ह्याही वेळी असेच झाले आणि प्रमुख पदासाठी निवडणूक जाहीर झाली . सहा बुद्धिमान आणि एक मेडीओकर उभे राहिले . बुद्धिमान माणसांचे सर्वात मोठे अहंकाराला दुखवू शकेल असे भय म्हणजे त्याला दुसरा बुद्धिमान आपल्याला टर्म्स आणि कंडीशन्स डीक्टेट करेल हे इनसल्टिंग  वाटते . सहाही बुद्धिमान लोकांना असेच वाटायला लागले .प्रत्येकाला दुसरा निवडून येईल अशी पोटदुखी सुरु झाली . मग प्रत्येकजण दुसऱ्या बुद्धिमानाला पाडायला धडपडू लागला आणि प्रत्येकाला मी पडलो तर कोण असा प्रश्न पडायला लागला . शेवटी प्रत्येक बुध्दीमानाला सेकंड चोईस म्हणून मेडीओकर बरा वाटायला लागला . निदान तो आपल्या बुद्धीने चालेल अशी खात्री वाटायला लागली . सहापैकी चौघांचा आपण निवडून येवू हा विश्वास तुटला . त्यांनी    मेडीओकरला पाठींबा दिला . पुढे एक बुद्धिमान इलेक्शनच्या टेन्शनने आजारी पडला आणि फाईट एक बुद्धिमान आणि एक मेडीओकर ह्यांच्यात झाली आणि पाच बुद्धिमान लोकांच्या पाठीम्ब्याने मेडीओकर विजयी झाला . सगळे बुद्धिमान असं कसं झालं ह्याची आपापसात चर्चा करू लागले . चळवळीचे नेतृत्व मेडीओकरच्या ताब्यात गेले . निवडणुकीला उभे राहिलेले पांचजण आम्ही दिलेला पाठींबा कसा योग्य होता त्याचे बौद्धिक समर्थन करू लागले . काहीजण तर मेडीओकर कसा महान प्रज्ञावंत आहे तेही सांगू लागले . मेडीओकरही अधूनमधून पांच बुद्धिमान लोकांना पाठींब्याच्या बदल्यात चार तुकडे टाकू लागला आणि आणखी काही मेडीओकर गोळा करून नेतृत्व चालवू लागला . त्याला अनुभवाने कळू लागले बुद्धीमानाना कसे झुलवायचे आणि मेडीओकरना कसे खेळवायचे . एक कुशल नेतृत्व  अध्यक्ष म्हणून उदयाला आले आणि सारे बुद्धिमान त्याला सलाम करायला लागले .

थोडक्यात काय बुद्धिमान लोक भयग्रस्त झाले कि मेडीओकर डोक्यावर नेतृत्व म्हणून बसतात आणि मग ते पचकले तरी त्यांच्या थुंकिला अर्धवट शहाण्या मिडियाकडून प्रचंड कवरेज मिळते . तर बोंबलू नका ही तुमच्याच कर्माची फळे आहेत . आणि हे कर्म तुम्ही सर्वच क्षेत्रात करत असता आणि हा देश , ह्या देशातले प्रत्येक क्षेत्र मेडीओकर लोकांच्या हातात देता . मेडीओकर लोकांच्या हातातून मारल्या जाणाऱ्या बुद्धिमान लोकांनो , एक हात ढुंगणावर ठेवून दुसऱ्या हाताने तुम्हाला सलाम !

श्रीधर तिळवे -नाईक