Sunday, January 31, 2016

काही महनीय लोकांनी मला एका भारतीय विध्यार्थ्याचे उद्गार आणि डेकॅथलॉन  सिरीजमधल्या कविता संग्रहरुपात आणण्याची सूचना केली आहे . त्यांच्या आस्थेबद्दल आभार . ह्या कविता जुन्या असल्याने ( १९८२ ते १९८७ )आणि त्या कालबाह्य झालेत अशी माझी धारणा असल्याने त्या काढाव्यात कि नाही ह्याची मला कायमच शंका वाटत असते . ह्या सर्व कविता देशीवादी नसल्या तरी निश्चितपणे देशी आणि पोटी आहेत . काहींना तर postmodern ह्या कॅटेगरीत सहज टाकता येईल . काही poststructuralism ह्या कॅटेगरीत सहज बसतील . मी स्वत : चौथ्या नवतेची संकल्पना मांडून ह्या प्रकारची कविता outdated झालीये अशी मांडणी करत आलोय . त्या पार्श्वभूमीवर ह्या कविता प्रकाशित कराव्यात  कि नाही हा प्रश्न मला कायमच पडत आलाय . तरीही मग ह्या कविता मी  नेटवर   का प्रकाशित / जालीत करतोय ? कारणे अनेक आहेत त्यातील तीन पुढीलप्रमाणे
१ लेखकाचे सर्वच लिखित प्रकाशित/ जालीत  झाले पाहिजे अशी माझी धारणा आहे त्यावरून त्याचा प्रवास कसा झाला ते कळते
२ ह्या कविता १९८२  ते १९८७  ह्या काळातील कोल्हापूर शहराचे आणि गावाचे  प्रोजेक्शन करतात असे मला वाटते .  आणि समाजशास्त्रीय पातळीवर हे महत्वाचे आहे
३ त्या काळातील श्रीधर तिळवेचेही हे प्रोजेक्शन आहे .

ह्या शिवायचे सर्वात महत्वाचे पण वाङ्मयबाह्य कारण माझ्या वडिलांना " मी माझे सर्व क्रिएटिव काम प्रकाशित करेन  " असे मी दिलेले वचन !ते सांगावे कि न सांगावे ह्याबाबत कायमच मी संभ्रमात असायचो पण आता सर्वच फिटल्याने सांगतो आहे

 माझे स्वत :चे एक मत असेही आहे कि योग्यता ही अंगभूत असते पण पात्रता मात्र समाज ठरवतो . त्यामुळे  ह्या कविता चांगल्या आहेत कि वाईट हे मराठी संस्कृतीने आणि समाजाने ठरवायचे आहे . कवींनी आणि कलावंतांनी आपल्या योग्यतेची फिकीर करावी ती वाढवावी पात्रतेच्या सांस्कृतिक ठेकेदारांना शरण जाऊ नये वेळप्रसंगी फाट्यावर मारावे . पात्रतेची फिकीर मी आयुष्यात कधीच केली नाही योग्यता मात्र कायमच वाढवत राहण्याची फिकीर केली ह्याही कवितात ती आहेच .
श्रीधर तिळवे - नाईक  

No comments: