Monday, January 28, 2019

जॉर्ज फर्नांडिस गेले . बिगरकाँग्रेसवादाचा लोहियानंतरचा मुख्य चेहरा गेला . काँग्रेसचं काय करायचं हे न कळलेला एक रशरशीत समाजवाद गेला .
एका ब्रिटिशसमर्थक सरंजामवादी ख्रिश्चन फॅमिलीत जन्मलेले  आणि पंचम जॉर्जच्या प्रेमापोटी आईनं ठेवलेल्या जॉर्ज ह्या नावाला पूर्ण विसंगत आचरण करणारे हे वादळ जन्मजातच समाजवादी होतं . त्यामुळेच प्रीस्टचं प्रशिक्षण घ्यायला गेलेल्या कुमारवयीन जॉर्जला सर्वात प्रथम खटकली ती चर्चमधील आचरणातील विषमता ! भोजनाच्या विषम वागणुकीला विरोध करून जॉर्ज बाहेर पडले ते थेट मुंबईत दाखल व्हायला वकील झालो तर वडिलांचे खटले लढवायला लागतील म्हणून त्याला नकार देत ! घराला नकार , चर्चला नकार ही जॉर्जियन नकारवादाची घंटा पुढे काँग्रेसला नकार , आणीबाणीला नकार अशी व्यापक होत गेली काही माणसे ही कायम विरोधी बाकावर बसलेली असतात जॉर्ज फर्नांडिस हे त्यातील एक !

लोहियांनी बिगरकाँग्रेसवाद मांडला पण त्याचा तात्विक पाया कच्चा होता मुळात काँग्रेसचं समाजवादी असेल तर तुम्ही तिला समाजवादाच्या आधारे विरोध करणार कसा ? असे विरोधासाठी विरोध फार काळ टिकत नाहीत आणि ते टिकलेही नाहीत काँग्रेसला हरवण्याची क्षमता फक्त दोनच आईडियालॉजीत होती

१ साम्यवाद कारण त्यांच्याकडे एकपक्षीय राजवटीचा विकल्प होता आणि तो लोकशाही नाकारू शकत होता
२ हिंदुत्ववाद  कारण त्याचा राष्ट्रवादच पूर्णपणे वेगळा होता शिवाय तो भांडवलवादी होता

ह्यात बिगरकाँग्रेसवादी समाजवाद्यांची गोची होणं अटळ होतं ती लोहियांची झाली तशी जॉर्ज फर्नांडिसांचीही झाली अशावेळी आमचा शर्ट तुमच्या शर्टापेक्षा अधिक स्वच्छ आहे हे सर्फ एक्सल स्टायलीत पटवावे लागते आणि भ्रष्टाचारविरोधी लढे अधिक तीव्र करून समोरच्याला हरवावे लागते अण्णा हजारेंनी हे पुढे करून दाखवले पण त्याआधी ते जयप्रकाश नारायणांनी आणिबाणीविरोधी आंदोलनात करून दाखवले स्वच्छतावादी आंदोलनाची मक्तेदारी भारतीय जनतेनं ही गांधीवाद्यांना दिलेली असल्याने अशा स्टायलीतल्या समाजवादी आंदोलनांना भारतीय जनता पाठिंबा देत नाही परिणामी विनोबा भावेचें सर्वोदयवादी भूदान जेपींचे सर्वोदयवादी आणिबाणीविरोधी आणि अण्णा हजारेंचे सर्वोदयवादी लोकपालवादी अशी गांधीवादी आंदोलने  काहीकाळ स्वच्छतेने चमकतात आणि पुन्हा भारतीय राजकारणात येऊन मळतात  भारतात अशा आंदोलनांचा अंतिम फायदा हा कायमच जनसंघाला  व हिंदुत्ववादाला झाला आहे .


भारतात गांधीवादाला यशस्वी व्हायचं असेल तर गांधीवादाने हिंदुत्ववादाला ठाम नकार दिला पाहिजे अशी माझी मांडणी १९८५ पासून मी मांडत आलो आहे पण तिला प्रतिसाद नाही हिंदुत्ववाद हा प्रथम गांधीवाद्यांचा फायदा घेतो आणि मग त्या त्या गांधीवाद्याचं करेक्टर अस्ससिनॅशन करून त्या त्या आंदोलनाने निर्माण केलेली बिगरकाँग्रेसी व्याप्ती व्यापतो गांधी , विनोबा भावे , जयप्रकाश नारायण आणि अलीकडे अण्णा हजारे ह्या सर्वांच्या बाबत हे घडलं आहे जॉर्ज फर्नांडिसांनी आणिबाणीविरोधात भाग घेतला तेव्हा हेच घडलं आणि अलीकडे किरण बेदी जश्या भाजप मध्ये जाऊन बसल्या तसे जॉर्ज फर्नांडिस भाजपच्या झोळीत जाऊन बसले जेपींच्या संपूर्ण क्रांतीने लालूप्रसाद यादव व मुलायमसिंग यादव  जन्माला घातले अण्णांच्या आंदोलनाने केजरीवाल !


जॉर्ज फर्नांडिसांचे असे भाजपबरोबर  जाऊन बसणे अनेकांना आवडले नाही पण  बिगरकाँग्रेसवादी राजकारणाची ही अटळ परिणीती होती व आहे . माझं स्वतःचं स्पष्ट मत असं आहे कि लोहियांनी काँग्रेसमध्ये जाऊन बसायला हवं होतं जे काही किरकोळ मतभेद होते ते काँग्रेसांतर्गत मांडता आले असते निदान लालू प्रसाद यादवांच्या सारखी सरंजामी भ्रष्टाचारी भूतं तरी भारतीय जनतेला झेलावी लागली नसती आणि समाजवादी कोटाची अशी व्ही आय पी अंडरवेअर झाली नसती . ज्याला काँग्रेसबरोबर जायाचे नाही तो अंतिमतः भाजपच्या झोळीत जाऊन बसतो किंवा फुटकळ युत्यांचे आणि प्रतियुत्यांचे राजकारण करत बसतो . फर्नांडिस हे उत्तरार्धात असे झाले . ही अपरिहार्यता होती कि अगतिकता होती हे सांगणे कठीण आहे .


ह्याचा अर्थ फर्नांडिसांचे आयुष्य वाया गेले का ? तर नाही त्यांच्यामुळे पाच मौलिक गोष्टी भारताला मिळाल्या

१ मुंबई म्युनसिपालटीत मराठीची सक्ती ही फर्नांडिसांच्या मुळेच झाली कन्नड लोकांनी कायमच देशी भाषांचा आग्रह लावून धरला आहे तमिळमध्ये पेरीयारनी तामिळ लोकांना तामिळ भाषेचा आग्रह शिकवला होता फर्नांडिसांनी मराठी लोकांना मराठीचा आग्रह कसा लावून धरायचा ते शिकवलं हा आग्रह लोहियांच्या समाजवादी देशीवादातून आला होता

 २ कोंकण रेल्वे पूर्ण करणे कोकण रेल्वेची कल्पना मधू दंडवतेँच्या नंतर कुणी लावून धरली असेल तर ती  जॉर्ज फर्नांडिसांनी ! त्यांच्यामुळेच कोकण रेल्वेची योजना तडीला गेली

३ कारगिल युद्ध जिंकणे

४ चायना हा भारताचा मुख्य शत्रू आहे पाकिस्तान न्हवे ही डिफेन्स लाईन मांडणाऱ्यात फर्नांडिस अग्रभागी होते आम्हा साउथवाल्यांना हा धोखा सतत जाणवतो कारण हिंद महासागर आणि बंगालच्या उपसागरात हिंडणारी चायनीज जहाज त्यामुळं फर्नांडिसांच्या ह्या डिफेन्स लाइनचं मला आश्चर्य वाटत नाही 

५ आय बी एम आणि कोला सारख्या मल्टिनॅशनल कम्पन्यांना तुम्ही राष्ट्रीय कायद्याच्या वर नाही हे आपल्या कृतीतून दाखवून देणारे फर्नांडिस हे कदाचित पहिले समाजवादी असावेत  त्यांच्यामुळेच ह्या दबावाची सुरवात झाली आणि आजही तो टिकून आहे

फर्नांडिस हे हिंदुत्ववाद्यांच्या बरोबर राहिले असले तरी हिंदुत्ववादी झाले नाहीत रशियाच्या कोलॅप्समुळे जगभरातील समाजवादी चळवळ सैरभैर झाली फर्नांडिस त्याला अपवाद न्हवते

त्यांच्यामुळे एक समाजवादी अंकुश  जन्माला आला ज्यामुळे त्यांना सुरवातीला बंदसम्राट ही पदवीही मिळाली आज त्या समाजवादी अंकुशाचा अस्त झाला मला ज्या काही मोजक्या समाजवाद्यांच्या बद्दल प्रेम आहे त्यातील ते एक होते त्यांना माझा कडक शेवटचा सॅल्यूट !

श्रीधर तिळवे नाईक 



















Sunday, January 27, 2019

चिन्हकी प्रास्ताविक

नितीन वाघ हा आमचा मित्र फार आग्रह करू लागल्याने बासनात गुंडाळून ठेवलेली चिन्हकी बाहेर काढतोय १९८९ ला नाटकावर पीचडी करायला मुंबई विद्यापीठात ऍडमिशन घेतलं आणि माझ्या गाईडनी सर्वात पहिले जे काही प्रश्न निवडले त्यात मेथोडॉलॉजी कोणती असा प्रश्न होता आणि मी दिलेले उत्तर होतं संरचनावाद आणि उत्तरसंरचनावाद ! साहजिकच त्या अंगाने नोट्स काढणं सुरु झालं त्याचच एक पुस्तक होईल असा ऐवज झाला दुर्दैवानं माझ्यावर जी केस झाली त्याने सगळी चक्र उलटी फिरली असो पण जे काम केले होते त्याचा एक फायदा झाला तो म्हणजे थिएटर अकादमीत व्याख्यान देण्यासाठी मला मेहनत करावी लागली नाही कारण थिसीस डोक्यात पक्का होता चिन्हमीमांसेच्या नोट्स मात्र बऱ्यापैकी शाबूत होत्या त्याच दुरुस्त करून इथं देतोय खरेतर ह्या काढायच्या होत्या छापील स्वरूपात अडाहॉकाबानासुना नंतर आगामी म्हणून तशी त्या पुस्तकात  नोंदही होती पण अडाहॉकाबानासुनात घातलेले पैसेही निघाले नाहीत आणि प्लॅन बारगळला माझे सर्वच साहित्य पडून राहिले आणि मराठीतील एक अनावश्यक लेखक हे बिरुद माथी लागले असो

खरेतर ह्या चिन्हकीचा उपयोग काय असाच प्रश्न मला पडलेला असतो जिथे गंगाधर पाटलांचीच पत्रास मराठीनं ठेवली नाही तिथं माझ्यासारख्या ह्या क्षेत्रात अकादमीक बैठक नसलेल्या भुरट्या असणाऱ्या माणसाची लायकी ते काय ?

चिन्हे ही आपली त्वचा आहे कि मेंदू हा आजच्या युगाचा खरा सवाल आहे मिडीयम मेसेज देतं कि मेसेज मिडीयम निर्माण करतो ? चिन्ह आपण बनवतो कि चिन्ह आपल्याला बनवतात ? आपण चिन्हांचा फक्त बनाव आहोत काय ? अस्तित्व नावाची गोष्ट खरोखर असते का कि ती चिन्हांनी तयार केलेली थाप आहे ? चिन्ह सत्यात असतात कि सत्य चिन्हात असतात ? चिन्ह विचलित झाल्यावर सत्य  विचलित होते काय ? आपण आपल्या आयुष्यातील सर्वच सत्ये मीडियाकडून भाड्याने घेतो काय ? पृथ्वी ही फक्त लोकेशन असून आपण तिचे फक्त युनिट मेंबर आहोत का ? राष्ट्रे म्हणजे शेवटी प्रॉडक्शन हाउसेस का ?भारत राजश्री प्रॉडक्शन हाऊस आहे काय ? श्रीमंताकडची चिन्हेही श्रीमंत असतात काय आणि गरिबाघरची गरीब ? बाळासाहेब ठाकरे चिन्ह कि माणूस कि एखादी व्यक्ती हयात असे तोवर माणूस आणि नंतर चिन्ह ? बॉम्बेचे नाव मुंबई ठेवले तर खरोखर काय होणार ? नामांतराच्या चळवळी ह्या फक्त चिन्हांतराच्या चळवळी आहेत का ? मोक्ष हा मीडियाच्याविरुद्धचा शेवटचा डिफेन्स आहे का ? सिविल डिसॉबिडियन्सच्या धर्तीवर मीडिया डिसोबिनियन्स चळवळ उभा करता येणे शक्य आहे का ? ज्यांना टेकनॉलॉजी कळत नाही तेच नैतिकतेच्या आणि धर्माच्या चर्चा अधिक करतात काय ? चिन्ह हे बैलगाडीचे चाक आहे कि अख्खी बैलगाडी आहे कि बैल आहे ? रहस्यांचा काळाबाजार गॉसीप्स निर्माण करतो काय ? मीडियापासून जो आपली रहस्य वाचवतो तो पॉलिटिशियन अशी व्याख्या करता येईल का ? न्यायव्यवस्था चिन्हव्यवस्था वाचते काय ? गरजा इन्व्हेन्शन्स स्पॉन्सर करतात कि इन्व्हेन्शन्स गरजा तयार करतात ? कार ही गॉसिप्सची बेडरूम असेल तर बेडरूम शरीरातल्या सेक्सकारची ड्रायवर आहे का ? मेंदू टीव्हीत सकाळी अंघोळ का करतो ? जाहिरात कंपन्या जाहिरातीसाठी रोज नवा प्रोडक्ट शोधतात कि प्रोडक्ट स्वतःसाठी जाहिरात कम्पन्या शोधतात ? संस्कृतीत घर महत्वाचे कि रस्ते ? धर्माचे सांस्कृतिक योगदान हा फुगा कोणी सोडला कसा सोडला आणि उडणारे त्या फुग्याला घट्ट कसे धरून ठेवतात ? फुगे फुटू न देता त्यांना घट्ट धरून ठेवण्याची युक्ती भारतीयांना नेमकी कशी साधते ? अर्थशास्त्र आज असते तर राजकारण का मग कालचे असते आणि कधी कधी प्राचीन काळचे ? इतिहास दंतकथा रिप्ले करत असेल तर परंपरा कशी फॉरवर्ड होणार ? इनपुट आणि आउटपुट ह्यांच्यात फरक का पडतो ? मी बोलतो तेव्हा माणूस असतो कि चिन्ह असतो कि चिन्हमाणूस असतो ? चिन्हमाणूस किंगडम ऍनिमेलियात मोडतो कि नाही कि त्याच्यासाठी प्राणिशास्त्रात वेगळे किंग्डम निर्माण करावे लागेल ?

हे माझ्या युगाचे प्रश्न आहेत आणि त्यांची चर्चा ही चिन्ह ह्या मूलभूत गोष्टीवर अवलंबून आहे आणि ह्या चिन्हांची सांगोपांग मीमांसा आणि चर्चा म्हणजे चिन्हकी

गर्रमागरमी भडका निर्माण करण्यासाठी नसते तर बॅटरी रिचार्ज करण्यासाठी असते

दोन चिन्हांच्या दरम्यान नेहमीच एक मिस्सीन्ग लिंक असते म्हणूनच संहिता खुल्या राहतात हीही संहिता अपवाद नसणारच त्यामुळे तिने निर्माण केलेले प्रश्न महत्वाचे ! तुम्ही विचाराल कि उत्तरे माहित नसतांना पुस्तक लिहायचेच कशाला ? तर मी प्रश्न विचारतो

मी प्रश्न विचारतो कारण फक्त प्रश्नच कन्विन्सिंगली विचारता येतात उत्तरे नेहमी चाचरत येत असतात आणि जी उत्तरे चाचरत येत नाहीत ती चुकीची असतात 

असो वाघांच्या आग्रहाखातर ही अत्यंत क्लिष्ट असलेली गोष्ट बाहेर काढतोय . ह्याचे पुस्तक निघाले तर ते कोणाला अर्पण करायचे हे मला स्पष्ट होते पुस्तक निघणे  आता शक्य नाही म्हणून अर्पणपत्रिका इथेच देतोय

प्रिय गंगाधर पाटील सर
मराठीत तुम्ही सुरु केलेलं चिन्हमीमांसेचं  मार्गीवादी बांधकाम
आजही माझ्या प्रेमाचा विषय आहे

मी तुमचा विध्यार्थी नाही ह्याची मला कायमच हळहळ वाटली
पण कधीकधी प्रत्यक्ष द्रोणाचार्यांपेक्षा
चिन्हीय मातीचा द्रोणाचार्य हा अधिक परवडतो
कारण त्याला जात नसते वर्ण नसतो
आणि मुख्य म्हणजे तो अंगठा मागत नाही

सआदर तुम्हालाच
अंगठा शाबूत ठेऊन

श्रीधर

(क्रमशः )