Monday, January 28, 2019

जॉर्ज फर्नांडिस गेले . बिगरकाँग्रेसवादाचा लोहियानंतरचा मुख्य चेहरा गेला . काँग्रेसचं काय करायचं हे न कळलेला एक रशरशीत समाजवाद गेला .
एका ब्रिटिशसमर्थक सरंजामवादी ख्रिश्चन फॅमिलीत जन्मलेले  आणि पंचम जॉर्जच्या प्रेमापोटी आईनं ठेवलेल्या जॉर्ज ह्या नावाला पूर्ण विसंगत आचरण करणारे हे वादळ जन्मजातच समाजवादी होतं . त्यामुळेच प्रीस्टचं प्रशिक्षण घ्यायला गेलेल्या कुमारवयीन जॉर्जला सर्वात प्रथम खटकली ती चर्चमधील आचरणातील विषमता ! भोजनाच्या विषम वागणुकीला विरोध करून जॉर्ज बाहेर पडले ते थेट मुंबईत दाखल व्हायला वकील झालो तर वडिलांचे खटले लढवायला लागतील म्हणून त्याला नकार देत ! घराला नकार , चर्चला नकार ही जॉर्जियन नकारवादाची घंटा पुढे काँग्रेसला नकार , आणीबाणीला नकार अशी व्यापक होत गेली काही माणसे ही कायम विरोधी बाकावर बसलेली असतात जॉर्ज फर्नांडिस हे त्यातील एक !

लोहियांनी बिगरकाँग्रेसवाद मांडला पण त्याचा तात्विक पाया कच्चा होता मुळात काँग्रेसचं समाजवादी असेल तर तुम्ही तिला समाजवादाच्या आधारे विरोध करणार कसा ? असे विरोधासाठी विरोध फार काळ टिकत नाहीत आणि ते टिकलेही नाहीत काँग्रेसला हरवण्याची क्षमता फक्त दोनच आईडियालॉजीत होती

१ साम्यवाद कारण त्यांच्याकडे एकपक्षीय राजवटीचा विकल्प होता आणि तो लोकशाही नाकारू शकत होता
२ हिंदुत्ववाद  कारण त्याचा राष्ट्रवादच पूर्णपणे वेगळा होता शिवाय तो भांडवलवादी होता

ह्यात बिगरकाँग्रेसवादी समाजवाद्यांची गोची होणं अटळ होतं ती लोहियांची झाली तशी जॉर्ज फर्नांडिसांचीही झाली अशावेळी आमचा शर्ट तुमच्या शर्टापेक्षा अधिक स्वच्छ आहे हे सर्फ एक्सल स्टायलीत पटवावे लागते आणि भ्रष्टाचारविरोधी लढे अधिक तीव्र करून समोरच्याला हरवावे लागते अण्णा हजारेंनी हे पुढे करून दाखवले पण त्याआधी ते जयप्रकाश नारायणांनी आणिबाणीविरोधी आंदोलनात करून दाखवले स्वच्छतावादी आंदोलनाची मक्तेदारी भारतीय जनतेनं ही गांधीवाद्यांना दिलेली असल्याने अशा स्टायलीतल्या समाजवादी आंदोलनांना भारतीय जनता पाठिंबा देत नाही परिणामी विनोबा भावेचें सर्वोदयवादी भूदान जेपींचे सर्वोदयवादी आणिबाणीविरोधी आणि अण्णा हजारेंचे सर्वोदयवादी लोकपालवादी अशी गांधीवादी आंदोलने  काहीकाळ स्वच्छतेने चमकतात आणि पुन्हा भारतीय राजकारणात येऊन मळतात  भारतात अशा आंदोलनांचा अंतिम फायदा हा कायमच जनसंघाला  व हिंदुत्ववादाला झाला आहे .


भारतात गांधीवादाला यशस्वी व्हायचं असेल तर गांधीवादाने हिंदुत्ववादाला ठाम नकार दिला पाहिजे अशी माझी मांडणी १९८५ पासून मी मांडत आलो आहे पण तिला प्रतिसाद नाही हिंदुत्ववाद हा प्रथम गांधीवाद्यांचा फायदा घेतो आणि मग त्या त्या गांधीवाद्याचं करेक्टर अस्ससिनॅशन करून त्या त्या आंदोलनाने निर्माण केलेली बिगरकाँग्रेसी व्याप्ती व्यापतो गांधी , विनोबा भावे , जयप्रकाश नारायण आणि अलीकडे अण्णा हजारे ह्या सर्वांच्या बाबत हे घडलं आहे जॉर्ज फर्नांडिसांनी आणिबाणीविरोधात भाग घेतला तेव्हा हेच घडलं आणि अलीकडे किरण बेदी जश्या भाजप मध्ये जाऊन बसल्या तसे जॉर्ज फर्नांडिस भाजपच्या झोळीत जाऊन बसले जेपींच्या संपूर्ण क्रांतीने लालूप्रसाद यादव व मुलायमसिंग यादव  जन्माला घातले अण्णांच्या आंदोलनाने केजरीवाल !


जॉर्ज फर्नांडिसांचे असे भाजपबरोबर  जाऊन बसणे अनेकांना आवडले नाही पण  बिगरकाँग्रेसवादी राजकारणाची ही अटळ परिणीती होती व आहे . माझं स्वतःचं स्पष्ट मत असं आहे कि लोहियांनी काँग्रेसमध्ये जाऊन बसायला हवं होतं जे काही किरकोळ मतभेद होते ते काँग्रेसांतर्गत मांडता आले असते निदान लालू प्रसाद यादवांच्या सारखी सरंजामी भ्रष्टाचारी भूतं तरी भारतीय जनतेला झेलावी लागली नसती आणि समाजवादी कोटाची अशी व्ही आय पी अंडरवेअर झाली नसती . ज्याला काँग्रेसबरोबर जायाचे नाही तो अंतिमतः भाजपच्या झोळीत जाऊन बसतो किंवा फुटकळ युत्यांचे आणि प्रतियुत्यांचे राजकारण करत बसतो . फर्नांडिस हे उत्तरार्धात असे झाले . ही अपरिहार्यता होती कि अगतिकता होती हे सांगणे कठीण आहे .


ह्याचा अर्थ फर्नांडिसांचे आयुष्य वाया गेले का ? तर नाही त्यांच्यामुळे पाच मौलिक गोष्टी भारताला मिळाल्या

१ मुंबई म्युनसिपालटीत मराठीची सक्ती ही फर्नांडिसांच्या मुळेच झाली कन्नड लोकांनी कायमच देशी भाषांचा आग्रह लावून धरला आहे तमिळमध्ये पेरीयारनी तामिळ लोकांना तामिळ भाषेचा आग्रह शिकवला होता फर्नांडिसांनी मराठी लोकांना मराठीचा आग्रह कसा लावून धरायचा ते शिकवलं हा आग्रह लोहियांच्या समाजवादी देशीवादातून आला होता

 २ कोंकण रेल्वे पूर्ण करणे कोकण रेल्वेची कल्पना मधू दंडवतेँच्या नंतर कुणी लावून धरली असेल तर ती  जॉर्ज फर्नांडिसांनी ! त्यांच्यामुळेच कोकण रेल्वेची योजना तडीला गेली

३ कारगिल युद्ध जिंकणे

४ चायना हा भारताचा मुख्य शत्रू आहे पाकिस्तान न्हवे ही डिफेन्स लाईन मांडणाऱ्यात फर्नांडिस अग्रभागी होते आम्हा साउथवाल्यांना हा धोखा सतत जाणवतो कारण हिंद महासागर आणि बंगालच्या उपसागरात हिंडणारी चायनीज जहाज त्यामुळं फर्नांडिसांच्या ह्या डिफेन्स लाइनचं मला आश्चर्य वाटत नाही 

५ आय बी एम आणि कोला सारख्या मल्टिनॅशनल कम्पन्यांना तुम्ही राष्ट्रीय कायद्याच्या वर नाही हे आपल्या कृतीतून दाखवून देणारे फर्नांडिस हे कदाचित पहिले समाजवादी असावेत  त्यांच्यामुळेच ह्या दबावाची सुरवात झाली आणि आजही तो टिकून आहे

फर्नांडिस हे हिंदुत्ववाद्यांच्या बरोबर राहिले असले तरी हिंदुत्ववादी झाले नाहीत रशियाच्या कोलॅप्समुळे जगभरातील समाजवादी चळवळ सैरभैर झाली फर्नांडिस त्याला अपवाद न्हवते

त्यांच्यामुळे एक समाजवादी अंकुश  जन्माला आला ज्यामुळे त्यांना सुरवातीला बंदसम्राट ही पदवीही मिळाली आज त्या समाजवादी अंकुशाचा अस्त झाला मला ज्या काही मोजक्या समाजवाद्यांच्या बद्दल प्रेम आहे त्यातील ते एक होते त्यांना माझा कडक शेवटचा सॅल्यूट !

श्रीधर तिळवे नाईक 



















No comments: