Saturday, July 28, 2018

माधव ज्यूलियन आणि  गझल

केशवसुत हे मराठी रोमँटिसिझमचे ज्ञानेश्वर असतील तर बालकवी नामदेव आहेत ह्या पार्श्वभूमीवर मराठी रोमँटिसिझमला एकनाथासारख्या प्रयोग करणाऱ्या कवीची गरज होती ही गरज  माधव ज्यूलियनांनी भागवली आणि मग रोमँटिसिझमचे तुकाराम म्हणावेत असे ना घ देशपांडे पु शि रेगे चि त्र्यं खानोलकर उर्फ आरती प्रभू ,ना धो महानोर  असे अनेक कवी अवतरले मात्र पंडिती कविंनी जशी उथळ कविता आणली तशी कविता रोमँटिसिझमने आणली नाही ग्रेससारखा अत्यंत ताकदीचा पंडिती कवी आपली दर्जेदार कविता घेऊन अवतरला आणि त्याने पंडिती कविताही कशी दर्जेदार बनू शकते ते दाखवले पंडिती कविंच्यात मोरोपंतासारखा वृतांवर प्रभुत्व असलेला जसा कवी होता तसा श्रीधर सारखा घरोघरी मातीच्या चुली असं रसाळ लिहिणारा पंडिती कवीही होता ग्रेसमध्ये हे दोघे एकवटलेच पण त्याचबरोबर तुकारामाची भावनाशीलताही एकवटली त्यामुळेच  मराठीत पंडिती कवीची जी चेष्टा साठोत्तरी पिढीने चालवली होती तिचा नव्याने विचार करण्याची वेळ आमच्या ऐंशोत्तरी पिढीवर आली

पु शि रेगे , आरती प्रभू , ग्रेस आणि ना धो महानोर ह्यांनी माधव ज्यूलियनांचा विसर पाडायला भाग पाडले असले तरी गझल ह्या काव्यप्रकारात त्यांनी केलेल्या कामामुळे गझलवाल्यांना त्यांचा विसर पडत नाही ह्याची कारणे दोन

१ एकतर विंदा करंदीकर , मंगेश पाडगांवकर ह्या प्रभुतींनी लिहिलेल्या एकविषयी गझला
२ आणि दुसरे सुरेश भटांनी बहुविषयी गझलांची बाजू मांडतांना माधव ज्यूलियन  व त्यांच्या अनुयायांनी लिहिलेल्या गझला ह्या गझला नसून कविता आहेत अशी केलेली खरमरीत टीका ! तिच्यात सत्याचा अंश असल्याने तिचा प्रतिवाद करण्याच्या भानगडीत फारसे कुणी पडले नाही अगदी मीही ! मात्र त्यांच्या सर्वच गझला अशा होत्या का असा प्रश्न मी निश्चितच उपस्थित केला होता आणि विंदांच्या काही गझला कशा गझला राहतात ते सिद्ध करायचा प्रयत्न केला होता

ह्या सगळ्या गदारोळात एकविषयी गझलेची जी चर्चा व्हायला हवी होती ती झाली नाही आणि एकविषयी गझलांना कविता म्हणून मोडीत काढण्याचा उद्योग भटवादी लोकांनी चालवला आणि तो सामूहिक समीक्षेच्या शक्तीवर यशस्वीही करून दाखवला हे लोक भटवादी गझलेच्या इतके आहारी गेले कि मुक्त गझलेसारखा उर्दूने गझल म्हणून मान्य केलेला प्रयोगही ह्यांनी मान्य करायला नकार दिला जणू गझल फक्त आम्हांलाच कळलीये आणि बाकी गझलेत प्रयोग करणारे च्यू आहेत असा ह्यांचा कावा ! गझलेची मक्तेदारी ह्यांना  कोणी दिली ? आणि गझलेबाबत फतवे काढणारे हे  कोण ? ह्यांनी  काय गझलेची पार्टी काढलीये काय ? गझल ही काय दगड आहे काय जो अपरिवर्तनीय आहे ? जगातले सगळे काव्यप्रकार लवचिक झाले पार अभंग ओवीपासून सुनितापर्यंत पण गझलेच्या छातीवरचा पारंपारिक धोंडा कुणी काढायला गेला कि हे सगळे आलेच काठ्या घेऊन ! वृत्ती वैग्रे सगळ्या बोलायच्या गोष्टी प्रत्यक्षात आग्रह वृत्ताचाच ! अगदी भले भले आधुनिक लोक गझल आली की परंपरावादी ! जणू जे जे मुस्लिम ते ते परंपरावादी आणि कट्टर राहिलेच पाहिजे असा पुरोगामी आग्रह !

ह्याचा परिणाम असा झाला कि एकविषयी गझल ही मूळ गझल आहे ह्याचाही अनेकांना विसर पडला वास्तविक अट आहे ती प्रत्येक शेर स्वतंत्र वाटायला हवी ही आणि ही अटच गझलेचा प्राण आहे जर ही अट पाळून कुणी एकविषयी गझल लिहीत असेल तर तिला गझल म्हणून मान्यता द्यायला हवी आणि मग ह्या अनुषंगाने माधव ज्युलियन , विंदा करंदीकर , मंगेश पाडगावकर ह्यांच्या गझलेची चर्चा व्हायला हवी तसे झाले तरच ह्या कविंना न्याय मिळेल . यदाकदाचित ह्यांना त्यात अपयश आले असेल तर हे अपयश का मिळाले ह्याचीही खोलात जाऊन चर्चा होणे आवश्यक आहे ज्यादिवशी हे घडेल तो सुदिन !

श्रीधर तिळवे नाईक









Monday, July 23, 2018

 नीरज ह्यांच्या मृत्यूनंतरची दोन टिपणे  श्रीधर तिळवे नाईक 

टिपण १
गोपालदास सक्सेना नीरज गेले हिंदीत आधुनिक गझलेची पायाभरणी करणारा गझलकार गेला विंदा करंदीकर आणि सुरेश भट ह्यांच्या कालखंडाच्या दरम्यान त्यांचा जन्म झाला होता (१९२५) आणि त्याचा त्यांना आणि पर्यायाने हिंदी गझलेला प्रचंड फायदा झाला विंदा करंदीकरांची  आधुनिकता त्यांच्या ठायी होतीच पण त्याच बरोबर प्रत्येक शेर स्वतंत्र असला/वाटला  पाहिजे हा गझलेच्या काव्यशास्त्रातला मूलभूत सौन्दर्यधाकही त्यांच्या ठायी होता त्यामुळे त्यांच्या गझला कधीच कविता वाटल्या नाहीत त्यांनी गिरवलेली गझलेची बाराखडी नंतर सुरेश भटांनी मराठीत आणली आणि पुढे हिंदीत दुष्यन्तकुमार सारखा गझलकार त्यांच्या खांद्यावर सहज उभा राहू शकला जे दुष्यन्तकुमारला साधलं नाही ते त्यांच्याच समवयस्क सुरेश भटांना साधले नाही आणि मराठी गझलेला चंद्रशेखर सानेकर येण्याची वाट बघावी लागली हिंदी आणि मराठी गझलेत हा जो एक पिढीचा फरक पडला आणि हिंदी गझल जी एक पिढी पुढं निघून गेली त्याचे कारण गोपालदास सक्सेना नीरज होते 
सक्सेना हे विंदा करंदीकरांच्या प्रमाणे मध्यमवर्गीय ब्राह्मण होते आणि त्यामुळे त्यांच्या गझलेवर सुरवातीला विंदाच्याप्रमाणे वेदान्तदर्शनाचा पगडा होता हिंदी आणि उर्दू ह्यांना प्रभावीपणे एकत्रित वापरण्याची त्यांची शैली पुढे हिंदी गझलेचा ट्रेडमार्क बनली उदाहरणार्थ 
 दिल जवाँ सपने जवाँ मौसम जवाँ शबभी जवाँ 
तुझको मुझसे इस समय सूनेमे मिलना चाहिए 
ह्यातील पहिली ओळ उर्दू तर दुसरी थेट हिंदी आहे किंवा 
दाग़ मुझ में है कि तुझमें ये पता तब होगा
मौत जब आएगी कपड़े लिए धोबन की तरह
ह्यातील धोबन चा वापर अप्रतिम आहे जो हिंदीचा फील देतो .
किंवा 
जब चले जाएँगे हम लौट के सावन की तरह
याद आएँगे प्रथम प्यार के चुम्बन की तरह
ह्यातील चुंबन ही असाच हिंदी फील देतो
नीरजनी हिंदी गझलेला हिंदी व्यक्तिमत्व दिले आणि तिचे उर्दूत्व शाबूतही ठेवले विंदांनी जसे गझलेचे माधव ज्यूलियनत्व शाबूत
शाबूत ठेवले आणि तरीही तिला आधुनिक मध्यमवर्गीय चेहरा दिला तसे काहीसे हे काम आहे .
मी स्वतः नीरज प्रथम वाचले होते आणि मग दुष्यन्तकुमार त्यामुळे दुष्यन्तकुमार कुणाच्या खांद्यावर उभा आहे
ह्याची मला नीट जाणीव होती आणि आहे
नीरज ह्यांच्या फिल्मी गीतांवर काय लिहावे आनंद बक्षी ह्यांच्या ला री ला री जुळवणाऱ्या प्रतिभेवर ते आणि
इंदीवर उत्तम डोस होते बॉलीवूडने हे डोस अंगी लावून घेतले नाहीत हे नीरज ह्यांचे न्हवे तर बॉलीवूडचे दुर्देव आहे
नीरज गेले पण ते कधीही
गीत उन्मन है ग़ज़ल चुप है रुबाई है दुखी
ऐसे माहौल में 'नीरज' को बुलाया जाए
असं म्हणत महफिलीत दाखल होऊ शकतात
श्रीधर तिळवे  नाईक

टिपण २ 

फेसबुकवरील गझल दुष्यन्तकुमार ह्यांच्या वळणाने चालली आहे का ?

नीरज ह्यांच्या निधनाने हिंदीतील सुरेश भटीय पिढीचा एका अर्थाने युगास्त झाला आहे पण मग प्रश्न असा येतो कि दुष्यन्तकुमारीय पिढीच्या लोकमान्यतेची ही सुरवात आहे का ? फेसबुकवरील चंद्रशेखर सानेकर , रुपेश देशमुख , अनंत ढवळे ह्या नव्या पिढीच्या लोकमान्यतेची ही सुरवात आहे का ? हे तिघेही सध्या फेसबुकवर प्रचंड ऍक्टिव्ह आहेत आणि हळूहळू का होईना त्यांना मिळणारी मान्यता वाढत आहे ह्यामुळे सुरेश भटीय पिढीचा मराठीत  अस्त होत आहे का ? आणि हा अस्त सहन न झाल्याने विश्वास वसेकर ह्यांच्यासारखे सुरेश भटीय लोक आत्यंतिक प्रतिगामी होत ह्यांच्यावर हल्ला बोल करतायत का ?

मराठी गझलेत  कायमच माधव ज्यूलियनांचे कोल्हापुरी स्कूल हे आद्य मानले जाईल आणि ह्या कुळातील सर्व लोक कवितेसारखी गझल लिहीत होते अशी टीका केली जाईल किंबहुना सुरेश भटांनी ही मांडणी कायमच केली आहे प्रत्येक शेर स्वतंत्र असला पाहिजे ही नीरज व भटांची मांडणी नीरज कधी देशीवादी झाले नाहीत आधुनिकच राहिले उर्दूच्या प्रभावातून आपली गझल मुक्त असावी असे त्यांना कधीही वाटले नाही पण भटांचे उर्दूवर प्रेम असले तरी त्यांनी गझल ही मराठी असली पाहिजे असा कट्टर देशीवादी आग्रह कायमच धरला एका अर्थाने हा रोमँटिक देशीवाद होता आणि त्याची मुळे आपणाला थेट ना घ देशपांडे बहिणाबाई चौधरी पु शि रेग्यांच्या पर्यंत भिडवता येतात पण भटांची गझल ही पुरेशी आधुनिक होती का ? तर न्हवती . त्यामुळेच मराठी गझलेतील आधुनिकतेचा अभाव हा कायमच मराठी समीक्षकांना बोचत राहिला आहे आणि आधुनिक समीक्षक गझलेकडे पाठ फिरवत राहिले आहेत त्यांच्या मनात "मराठी गझल ही कायमच रोमँटिक आवर्तात सापडलेली फिल्मी बाई " ही प्रतिमा कायमच राहिली आहे कारण सुरेश भट कायमच रोमँटिक गिरमिटात फिरत राहिले आणि त्यांचे अनुयायीही ! देशी रोमँटिसिझम कडून देशी आधुनिकतेकडे सरकण्यात ती पूर्ण अपयशी झाली वास्तविक विंदा करंदीकरांनी आधुनिक गझल लिहून ह्याची पार्श्वभूमी तयार केली होती पण विंदांच्या आधुनिकतेला पूर्ण देशी आधुनिकतेचे स्वरूप देणे अशक्य न्हवते हे घडले नाही आणि हे घडवण्याची जबाबदारी आमच्या पिढीवर पडली 
हे घडवण्यासाठी माझ्यासारखा एखादा मुक्त गझलेच्या दिशेने गेला तरी चंद्रशेखर सानेकर , रुपेश देशमुख , अनंत ढवळे ह्यांच्यासारख्या गझलकारांनी वृत्तमात्राछंदयुक्त गझलेला दुष्यन्तकुमारी टच देत स्वतःची गझल विकसित करायला सुरवात केली मी पुढे जरी चिन्हगझलेच्या दिशेनें गेलो असलो तरी वृत्तमात्राछंदयुक्त गझलेविषयीचे माझे प्रेम कधीही कमी झाले नाही . हे गझलकार नेमके काय नवीन करतायत हे तपासण्याची साधी तसदीही कुठल्या समीक्षकाने घेतलेली दिसत नाही काहींनी तर ह्यांच्या गझला  न वाचताच समीक्षेचे निरोधफुगे आणि विरोधफुगे हवेत उडवलेले दिसतात 

जर तुम्हाला दुष्यन्तकुमार महत्वाचा कवी वाटतो तर हे गझलकार का वाटत नाहीत ? हे कमी पडतात असे वाटत असेल तर ते नेमके कुठे कमी पडतात ? मी अनेकदा म्हंटले आहे कि गझल ही लोकांच्यापर्यंत कविता पोहचवण्याचे फार महत्वाचे काम करते तुम्हाला तिचा हा पूलबांधणीचा सांस्कृतिक रोलच अमान्य करायचा आहे का ? उर्दूतील फालतू गझलकार तुम्हाला श्रेष्ठ वाटतो आणि मराठीतील एखादा दर्जेदार गझलकार भंपक हा तुमचा न्यूनगंड आहे का ? मराठी गझल ही मराठी असू नये असं तुम्हाला वाटतं ?

मुक्त गझलेवरून आणि चिन्ह गझलेवरून माझे ह्या लोकांशी टोकाचे मतभेद आहेत आणि ते फेसबुकवर नोंदवलेही गेले आहेत पण डुकरे वैग्रे म्हणणें हे सभ्यतेला धरून नाही . ह्या लोकांच्या गझलेची नीट समीक्षा होणे हे गरजेचे आहे माझ्या मते प्रदीप निफाडकर , नीता भिसे , म भा चव्हाण , संगीता जोशी , श्रीराम पचिंद्रे ह्या सारख्या गझलकारांनी देशी रोमँटिक गझलेचा अतिशय चांगला विस्तार केला आहे तर चंद्रशेखर सानेकर , रुपेश देशमुख , अनंत ढवळे वैगरे हे देशी आधुनिक गझलेला अतिशय समर्थपणे पेलत आहेत तिचे तत्त्वज्ञानही मांडत आहेत . 


दुष्यन्तकुमारच्या गझलेचे पृथकत्व कशात आहे ? तर ते आहे त्याच्या अस्तित्ववादी संवेदनशीलतेत . ही संवेदनशीलता गझलेच्या स्थापत्यात ओतण्याची अद्भुत किमया त्याला साधली जवळ जवळ अशीच पण दुष्यंतकुमारपेक्षा सर्वस्वी वेगळी अशी हातोटी आपल्याला सानेकरांच्या गझलेत आढळते आणि पुढे रुपेश देशमुख , अनंत ढवळे , सतीश दराडे सारख्यांच्या गझलेत !आधुनिकतेचा कोरडेपणा नाकारत रोमँटिक भावविवशतेला ठाम नकार देत सानेकर आणि देशमुख एका वेगळ्या अस्तित्वजन्य भावनाशीलतेला केंद्रस्थानी आणतात . ही भावनाशीलता संयमी आहे आणि तिच्यात एक तन्मयताही आढळते . आधुनिक जीवनशैलीचे अनेक तणाव ते अधोरेखित करतात पण हे करताना ते कोरडे रहात नाहीत . गझलेचा भावनाशील आयाम कायम राखत ते सुरेश भटीय गझलतेतून स्वतंत्र होतात . त्यांचे हे स्वतंत्र होणेच काही भटवादी लोकांना मानवलेले दिसत नाही . भालचंद्र नेमाडेंच्याप्रमाणे सुरेश भटांचाही मठ स्थापन झाल्याचे हे लक्षण आहे आपण  ह्यावर काय म्हणणार भटांच्याच शेरात बदल करून म्हणून 

मठोमठी मंबाजींना कीर्तन करू द्या 
गझल काय कर्मठ मठांना पावणार आहे ?

श्रीधर तिळवे नाईक