Saturday, July 28, 2018

माधव ज्यूलियन आणि  गझल

केशवसुत हे मराठी रोमँटिसिझमचे ज्ञानेश्वर असतील तर बालकवी नामदेव आहेत ह्या पार्श्वभूमीवर मराठी रोमँटिसिझमला एकनाथासारख्या प्रयोग करणाऱ्या कवीची गरज होती ही गरज  माधव ज्यूलियनांनी भागवली आणि मग रोमँटिसिझमचे तुकाराम म्हणावेत असे ना घ देशपांडे पु शि रेगे चि त्र्यं खानोलकर उर्फ आरती प्रभू ,ना धो महानोर  असे अनेक कवी अवतरले मात्र पंडिती कविंनी जशी उथळ कविता आणली तशी कविता रोमँटिसिझमने आणली नाही ग्रेससारखा अत्यंत ताकदीचा पंडिती कवी आपली दर्जेदार कविता घेऊन अवतरला आणि त्याने पंडिती कविताही कशी दर्जेदार बनू शकते ते दाखवले पंडिती कविंच्यात मोरोपंतासारखा वृतांवर प्रभुत्व असलेला जसा कवी होता तसा श्रीधर सारखा घरोघरी मातीच्या चुली असं रसाळ लिहिणारा पंडिती कवीही होता ग्रेसमध्ये हे दोघे एकवटलेच पण त्याचबरोबर तुकारामाची भावनाशीलताही एकवटली त्यामुळेच  मराठीत पंडिती कवीची जी चेष्टा साठोत्तरी पिढीने चालवली होती तिचा नव्याने विचार करण्याची वेळ आमच्या ऐंशोत्तरी पिढीवर आली

पु शि रेगे , आरती प्रभू , ग्रेस आणि ना धो महानोर ह्यांनी माधव ज्यूलियनांचा विसर पाडायला भाग पाडले असले तरी गझल ह्या काव्यप्रकारात त्यांनी केलेल्या कामामुळे गझलवाल्यांना त्यांचा विसर पडत नाही ह्याची कारणे दोन

१ एकतर विंदा करंदीकर , मंगेश पाडगांवकर ह्या प्रभुतींनी लिहिलेल्या एकविषयी गझला
२ आणि दुसरे सुरेश भटांनी बहुविषयी गझलांची बाजू मांडतांना माधव ज्यूलियन  व त्यांच्या अनुयायांनी लिहिलेल्या गझला ह्या गझला नसून कविता आहेत अशी केलेली खरमरीत टीका ! तिच्यात सत्याचा अंश असल्याने तिचा प्रतिवाद करण्याच्या भानगडीत फारसे कुणी पडले नाही अगदी मीही ! मात्र त्यांच्या सर्वच गझला अशा होत्या का असा प्रश्न मी निश्चितच उपस्थित केला होता आणि विंदांच्या काही गझला कशा गझला राहतात ते सिद्ध करायचा प्रयत्न केला होता

ह्या सगळ्या गदारोळात एकविषयी गझलेची जी चर्चा व्हायला हवी होती ती झाली नाही आणि एकविषयी गझलांना कविता म्हणून मोडीत काढण्याचा उद्योग भटवादी लोकांनी चालवला आणि तो सामूहिक समीक्षेच्या शक्तीवर यशस्वीही करून दाखवला हे लोक भटवादी गझलेच्या इतके आहारी गेले कि मुक्त गझलेसारखा उर्दूने गझल म्हणून मान्य केलेला प्रयोगही ह्यांनी मान्य करायला नकार दिला जणू गझल फक्त आम्हांलाच कळलीये आणि बाकी गझलेत प्रयोग करणारे च्यू आहेत असा ह्यांचा कावा ! गझलेची मक्तेदारी ह्यांना  कोणी दिली ? आणि गझलेबाबत फतवे काढणारे हे  कोण ? ह्यांनी  काय गझलेची पार्टी काढलीये काय ? गझल ही काय दगड आहे काय जो अपरिवर्तनीय आहे ? जगातले सगळे काव्यप्रकार लवचिक झाले पार अभंग ओवीपासून सुनितापर्यंत पण गझलेच्या छातीवरचा पारंपारिक धोंडा कुणी काढायला गेला कि हे सगळे आलेच काठ्या घेऊन ! वृत्ती वैग्रे सगळ्या बोलायच्या गोष्टी प्रत्यक्षात आग्रह वृत्ताचाच ! अगदी भले भले आधुनिक लोक गझल आली की परंपरावादी ! जणू जे जे मुस्लिम ते ते परंपरावादी आणि कट्टर राहिलेच पाहिजे असा पुरोगामी आग्रह !

ह्याचा परिणाम असा झाला कि एकविषयी गझल ही मूळ गझल आहे ह्याचाही अनेकांना विसर पडला वास्तविक अट आहे ती प्रत्येक शेर स्वतंत्र वाटायला हवी ही आणि ही अटच गझलेचा प्राण आहे जर ही अट पाळून कुणी एकविषयी गझल लिहीत असेल तर तिला गझल म्हणून मान्यता द्यायला हवी आणि मग ह्या अनुषंगाने माधव ज्युलियन , विंदा करंदीकर , मंगेश पाडगावकर ह्यांच्या गझलेची चर्चा व्हायला हवी तसे झाले तरच ह्या कविंना न्याय मिळेल . यदाकदाचित ह्यांना त्यात अपयश आले असेल तर हे अपयश का मिळाले ह्याचीही खोलात जाऊन चर्चा होणे आवश्यक आहे ज्यादिवशी हे घडेल तो सुदिन !

श्रीधर तिळवे नाईक









No comments: