Sunday, August 7, 2022

 पुन्हा एकदा सौष्ठव पण डिजटल श्रीधर तिळवे नाईक 

माणूस मरणाच्या दारात असताना त्याला स्वतःची उरलेली कर्तव्ये दिसत असतात ह्याला मी अपवाद न्हवतो  साहजिकच इतर क्षेत्रांप्रमाणे साहित्याच्या क्षेत्रात बाकी असलेली माझी कामे मला दिसायला लागली साहित्याच्या क्षेत्रात दशखंडी तिळवे हा नितीन वाघ व विनायक येवले ह्यांनी डिझाईन केलेला प्रकल्प टाईप व  प्रकाशित करणे धर्म व अर्थ ह्या कादंबऱ्या टाईप व प्रकाशित करणे चौथ्या नवतेच्या मांडणीच्या उरलेल्या जागा भरणे आणि सौष्ठवचे अंक इंटरनेट अर्काइव्जवर डिजीटाईझ करणे वैग्रे 

अनियतकालिकांनी आपली  साईझ व नियमितता नियतकालिकासारखी नियमित ठेवू नये छोटा धमाका करावा व गायब व्हावे हे माझे अनियतकालिकांच्याबद्दल तत्व ! साहजिकच मी जेव्हा असे काही लेखन माझ्या कडे आले तेव्हाच अंक काढला अंक नियमित काढायला गेलात कि साहित्यही पाट्या टाकल्यासारखं वाट्याला येते  म्हणजे मन्या जोशींच्या मला आवडलेल्या २४ कविताच मी घेतल्या त्यावेळी तो फारसा माहीतच न्हवता भुजंगची स्वातंत्र्याचं गाणं हीच कविता मी घेतली अभिजित देशपांडेचे नव्वदनंतरच्या साहित्यव्यवहारावर प्रकाश टाकणारे लेख घेतले ज्ञानदाच्या रोमँटिसिझममधून बाहेर पडलेल्या कविताच मी घेतल्या मंगेश काळेला शक्तिपाताचे सूत्र मध्ये आवाज सापडला असं वाटलं तेव्हाच तो सौष्ठवमध्ये आला हेमंत दिवटे हा तर माझा सहकारी पण त्याच्याही कविता आणि इंटरव्यू थांबताच येत नाही ही त्याचा आवाज अधोरेखित करणारी कविता आल्यावरच सौष्ठव मध्ये आला 

साठोत्तरीचे साहित्य घ्यायचे नाही ह्यावर मी ठाम होतो आणि मला अनेकदा वचन देऊनही नव्या लोकांनी साहित्य दिलं नाही मग रिकाम्या जागा भराव्यात तसा मी अंक माझ्या समीक्षेने भरला मला महत्वाच्या वाटणाऱ्या समकालीनांच्यापैकी सलील वाघ , हेमंत दिवटे , मंगेश काळे , सचिन केतकर ह्यांचे इंटरव्यू आले अभिजीत देशपांडे ,मन्या जोशी व नितीन रिंढे ह्यांचे राहून गेले पण सौष्ठवचा पॅटर्न नंतर हेमंत दिवटेने अभिधानानंतरमध्ये अधिक व्यापक करून इंटरव्यू घेतले आणि एका अर्थाने हे मिशन पुरे झाले नवीन पिढीत संतोष पवार , नितीन वाघ ,  प्रणव सखदेव , ओंकार कुलकर्णी , स्वप्नील वैग्रेंचे असे इंटरव्यू आले पाहिजेत असं वाटतं भुजंग व अरुण काळेला सुरवातीला  चौथी नवता अमान्य होती पण नंतर विचार करावा लागेल असं त्यांना वाटायला लागलं भुजंग आणि मी तो माझ्या हॉस्टलवर आला कि हमखास भेटायचो जगभरच्या आदिवासी साहित्यावर आमच्यात चर्चा व्हायच्या आदिवासी मौखिक साहित्याचे तालन हा आम्हा दोघांच्याही आस्थेचा विषय त्या अंगाने हा इंटरव्यू घ्यायचा वैग्रे खूप चालायचं पण ते घडलं नाही 

मंगेश बनसोड आल्हाद भावसार हे मित्र कायमच सोबत होते मंगेश सहसंपादक होता माझे जे एस हॉलचे महेश म्हात्रें के  श्यामसुंदर ह्यांच्यासारखे हॉस्टेलमेट्स सौष्ठवच्या कायमच मागे होते के श्यामसुंदरचे लेबर्स व लेबर ऍक्ट वरचे काम त्यावेळी सुरु झाले होते जे मला महत्वाचे वाटत होते त्यावर सौष्ठवचा एक इंग्रजी अंक काढायचा प्लॅन होता 

सौष्ठवचा लोगो हा आशुतोष आपटेने तयार केला होता अविनाश धर्माधिकारी ह्यांनी सौष्ठवला जी जागा दिली त्याबद्दल मी कायमच ऋणी राहीन त्याकाळात ते पंतप्रधान किमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे वाटायचे एव्हढी त्यांची पात्रता आहे असं वाटायचं आणि आजही वाटते त्यांना किमान केंद्रात मोदींनी घ्यायला हवं होतं त्यांच्या कित्येक सहकाऱ्यांच्यापेक्षा धर्माधिकारी उजवे आहेत असो भाजपमध्ये टॅलेंट अडवण्याची आणि हलक्या दर्जाची माणसे उंच उडवण्याची एक नवी रीत १९९७ नंतर उदयाला आली आहे धर्माधिकारी त्याचे बळी ठरले पुन्हा असो 

ह्या काळात धर्माधिकारींची  राईट टू इन्फर्मेशन ऍक्टवरची चळवळ सुरु झाली होती जी चौथ्या नवतेच्या दृष्टीने मला फार  महत्वाची वाटत होती  त्यांच्याप्रमाणे आम्हा सर्वांनाच त्यावेळी अण्णा हजारे काही करतील (१९९९ चा काळ )असं वाटत होतं पुढं त्यांनी आंदोलन राष्ट्रीय पातळीवर न्हेलंही पण ते ज्या तऱ्हेने विस्कळीत होत गेलं ते हादरवणारं होतं त्यांचं आंदोलन भाजप स्पॉन्सर्ड होतं वैग्रे बकवास आहे भाजपने ह्या आंदोलनाचा वापर काँग्रेसची सत्ता  संपवण्यासाठी केला एव्हढंच 

धर्माधिकारांच्यामुळेच कीर्तीकुमार  शिंदे , मंदार फणसे , अद्वैत मेहता , राहुल सरवटे असे सुरवातीला सहकारी पण नंतर उत्तम मित्र झालेले लोक ह्याकाळात मिळाले तेराव्या अंकात चक्क राहुल सरवटे व मंदार फणसेची कविता होती हे आता इंटरेस्टिंग वाटते मंदारने नोबल पारितोषिक विजेत्या विस्साव शिंबोस्कीचे भाषणही एका अंकासाठी भाषांतरित केले होते  

माझी विद्यार्थिनी पूजा मून हिच्या सहकार्याने सौष्ठवचे डिजिटाइझ्ड करण्याचे काम पूर्ण झाले हे काम करताना जाणवलेल्या काही गोष्टी विचित्र होत्या म्हणजे मन्या जोशीवरचा अंक हा फक्त त्याच्यावरच आहे हे आता कळलं ह्या अंकाला अभिजित देशपांडेची समीक्षा मिळती तर मजा आली असती  दोन अंक तर कुठं गायब झाले  कुणास ठाऊक ? साहित्यात हिशेब ठेवणे माझ्या बेबंद स्वभावात नाही त्यामुळे माझ्या हजारो  कविता जशा माझ्याकडे चालून आल्या तशे हे अंकही चालून येतील असं म्हणायचं 

सौष्ठवचं काम चौथ्या नवतेचा धमाका करणं हे होतं ते झालं शंकर सारडांनी दैनिक पुढारीमधील एका लेखात प्रस्थापितांच्यात ह्या अंकाने काय झालं होतं ते सांगितलं आहे महेश म्हात्रेने सकाळमध्ये माझा त्यामुळेच इंटरव्यू घेतला होता व आश्चर्यकारकरित्या अरुण म्हात्रे ह्याने प्रस्थापित लोकांची बाजू घेऊन सकाळमध्ये माझा प्रतिवाद केला होता ह्या धमाक्यामुळेच मला शोधत हेमंत दिवटे होस्टेलवर आला मी सौष्ठवचा पहिला अंक ९ फेब्रुवारी १९९३ ला काढला त्याच्यानंतर त्याने अभिधाचा गझल विशेषांक काढला होता पण सौष्ठवचा धमाका झाला आणि हा आला त्या काळात तो गझल विशेषांक काढण्याइतपत रोमँटिक होता पण नंतर बदलला त्याने संपादकपदाची ऑफर दिली मी ती स्वीकारली व  अभिधात गेलो खरेतर त्याने नाव बदलूया असं सांगितलं होतं मी ते ऐकायला हवं होतं असो आम्ही मग दिलीप चित्रे विशेषांक चौथी नवता विशेषांक काढले मात्र एका अंकानंतर जे काही झालं ते अनपेक्षित होतं त्यावर पुढे कधीतरी 

कुठल्याही नवतेचा सहसंवेदनशीलतेमुळे एक गोतावळा तयार होतोच त्यातून वाचायचे कसे हा एक फार मोठा प्रश्न असतो मी दुरावा ठेवण्याचे धोरण स्वीकारून सौष्ठवचा गोतावळा होणार नाही ह्याची काळजी घेतली आणि ती यशस्वीही झाली मात्र इमोशनल बॉण्ड्स आजही ताजे आहेत 

मागच्या नवतेतले लोक तुम्ही आमच्याशी जुळवून घ्या असे सांगतच असतात मलाही नारायण सुर्वे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा परिसंवादात बोलावले गेले एका बाजूला राजन गवस व दुसऱ्या बाजूला मी होतो राजनने देशीवादाचा कट्टर पुरस्कार केला आणि मीही त्याला अनुमोदन द्यावी अशी अपेक्षा असताना मी देशीवाद्यांच्या साहित्य संमेलनात देशीवादावर हल्ला बोल केला परिणामी देशीवादी भडकले व मला शंका आहे कि पॉप्युलर प्रकाशनातील माझ्या पुस्तकांचे प्रकाशन लांबले जे काही पुस्तकांबाबत अजूनही लांबलेलेच आहे. पुढे हेमंत दिवटेमुळे आमच्या पिढीचे अभिधानानंतर प्रकाशनच सुरु झाले  

काहीवेळा आरोप होणे अटळ असते ते माझ्यावरही झाले म्हणजे किशोर कदम मला तू साहित्य क्षेत्रातील शरद पवार आहे असं म्हणायचा (अलीकडे तो मला साहित्यक्षेत्रातील अमित शहा म्हणतो ) मंगेश बनसोडच्या संपादनाखाली आम्ही दलित ह्या शब्दाची व्याप्ती वाढवणाऱ्या अंकाची निर्मिती केली तेव्हाही ही व्याप्ती वाढवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला असा प्रश्न केला गेला सर्वात जास्त आरोप भुजंग मेश्राम करायचा मी कधी अशा आरोपांच्याकडे लक्ष दिलं नाही माझा आग्रह कुणी डावलला नाही अगदी भुजंग मेश्रामसारखा नाठाळही मी समोर असल्यावर मला विचारल्याशिवाय दारू स्वतःच्या ग्लासात ओतायचा नाही (एकदा त्याची मी दोन तास अडवून चांगलीच पंचाईत केली होती )मात्र मीही फालतू दुराग्रह धरले नाहीत आपण आपलं काम करत रहावं आज ना उद्या तुमचं काम बोलेलच अशी माझी धारणा होती 

सौष्ठवचं बंद पडणं अपरिहार्य होतं मी राहुल सरवटेकडे संपादन दिल्यावर त्याला कोलंबिया विद्यापीठाची ऑफर आली मला जोशी कि कांबळेची ऑफर आली मंगेश बनसोड स्वतःच्या परिस्थितीला मॅनेज करण्यात दंग होता आल्हाद भावसारने मुंबई सोडली होती आणि कीर्ती शिंदेला स्वतःची आयडेंटिटी मेंटेन करायची होती त्यामुळे संपादन चालवणार कोण ? शिवाय कीर्तीने अंक काढण्यापेक्षा पुस्तकप्रकाशन व पुस्तक दुकान चालवणे हे महत्वाचे आहे असा युक्तिवाद केला व तो मला पटला हा युक्तिवाद प्रमाण मानून कीर्तीने नवता प्रकाशन चालू केले व दहिसरमध्ये  ग्रंथदालनही !त्यातून नितीन वाघ सारखे काही लेखक पुढे आणले गेले आता तर सौष्ठव अभिधाची पहिली पिढी थेट अभ्यासक्रमात दाखल झाली त्यामुळे बंड करणे न्हवे तर आपल्याविरुद्ध बंड करणाऱ्या लोकांची वाट पाहणे अपरिहार्य झाले आहे  

प्रत्येक संपादकाला संपादकीय लिहायला लागतात तशी मीही लिहिली त्यातली काही आजही रिलेव्हन्ट वाटतात 

मेडीटेशनची हुक्की आली कि पळ काढणाऱ्या व त्यामुळं झक्की वाटणाऱ्या पण वचन व वेळ पाळण्याबाबत आग्रही व बुद्धी पक्की असणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला इतक्या साऱ्या लोकांनी झेललं कसं असाच प्रश्न आता पडतो . एकंदरच भारतीय संस्कृती झक्की माणसांना व चक्कीत जाळ असणाऱ्या व करणाऱ्या माणसांना पेलण्यात व पचवण्यात निपुण आहे असं म्हणायचं . पुन्हा तिसऱ्यांदा असो . (चिन्हकीत असो म्हणजे पूर्णविराम नाही पण पूर्णविराम दाखवावा लागतो अशी पॉलिटिकली करेक्टनेस  प्रोजेक्ट करणारी स्थिती )

श्रीधर तिळवे नाईक 


 




Saturday, June 18, 2022

 पंचांग श्रीधर तिळवे 

काल अकस्मातपणे शैव पुरोहितांच्या प्रतिनिधींचा फोन आला गेली कित्येक दशके मी शैव कॅलेंडरची व पंचांगाची संकल्पना मांडतोय आणि मान्सून गेल्या काही वर्षात केरळात १० ते १५ जून व महाराष्ट्रात १५ जून ते २१ जून ह्या दरम्यान येतोय हे सांगतोय व शेतकऱ्यांनी आपले हिशेब ह्या अंगाने करावेत असं सांगतोय किमान ह्या दिशेने विचार व्हावा अशी मांडणी करतोय 

पूर्वी वळवाचा पाऊस १५ मेच्या आसपास यायचा तो आता २८ मे ते ६ जून दरम्यान येतोय आणि त्यालाच मान्सून समजण्याची चूक होतीये त्या अंगाने गेली दोन वर्षे निरीक्षणे करून झाल्यावर आता तुमच्या संकल्पनेवर काम करूया अशी सूचना आलीये जर ह्या अंगाने वैज्ञानिक निरीक्षणे करून पंचांग तयार झाले तर ते हवे आहे मी श बा दीक्षितापासून लोकमान्य टिळकांच्या पर्यंत अनेकांचे संदर्भ देऊन ह्याबाबत आर्यांच्या नेमक्या कुठे चुका झाल्यात त्या पाहून व दुरुस्त करून  त्या अंगाने काम करूया अशी सूचना दिलीये जी आता स्वीकारण्यात आलीये मीच बरोबर अशी माझी भूमिका नाही पुनर्विचार व्हावा अशी विनंती आहे 

भारतीय शैव हे कायमच पंचांगाचे मास्टर लोक होते पण आठव्या शतकात शैवांची मागपडणी (पीछेहाट) सुरु झाली आणि त्याचा भारतावर विपरीत परिणाम झाला पंचांग हा शहरवासीयांना फक्त मुहूर्ताचा विषय असतो पण गावात शेतीविषयीची कामे त्यावर अवलंबून असतात असो 

आर्य पुरोहितांना जे करायचंय ते करू द्या पण शैव पुरोहितांनी व शैवांनी मोक्ष , विज्ञान, चिन्हविज्ञान तंत्रज्ञान  व चिन्हतंत्रज्ञान ह्या अंगानेच पुढे गेले पाहिजे हे मी ठामपणे मांडतो आहेच  हळूहळू का होईना पण ह्याबाबत जागृती होते आहे हे चांगले लक्षण आहे शैवांच्याकडे विज्ञान तंत्रज्ञानातले तीन चार नोबल लॉरेंट निर्माण होत नाहीत तोवर काही खरं नाही मोक्षदर्शन हा आरंभ असू शकतो पण मुख्य काम विज्ञान चिन्हविज्ञान तंत्रज्ञान चिन्हतंत्रज्ञान ह्याच क्षेत्रात होत असते 

श्रीधर तिळवे नाईक 

तू भेटलास तेव्हा स्थिती थोडी गंभीर होती शैलेन्द्रांच्यामुळे डॉक्टरांकडे गेलो पल्स प्रचंड झाल्याने हे झालंय असं त्यांचं म्हणणं आहे आता थोडा बरा आहे बोलतांना कमी वेदना होतायत 

शैवांची कामं मुख्यतः मौखिक असल्यानेच गप्प आहोत आर्यभट वैग्रे शैवच होते व त्यांचे ग्रंथ उपलब्ध आहेत फलज्योतिषशास्त्रात महेश्वर , काशिनाथ ,वराहमिहीर अशांची मते मिळतात ती पंचांगाशिवाय अस्तित्वात आली असतील काय ? तुला असं म्हणायचंय का गावातला गुरव किंवा जंगम किंवा शैव ब्राम्हण पूर्वी अंदाजपंचे पेरण्याचे मुहूर्त सांगायचे ? माझ्या आजोबांनाच मी हे मुहूर्त काढताना बघितले आहे . ज्योतिष आणि फलज्योतिष हे अनेकदा पूर्वी एकच मानले जायचे अगदी न्यूटनसुद्धा फलज्योतिष अभ्यासायचा  हे तुला माहीत नाही का ? ह्या देशात जसे बौद्धांचे ग्रंथ जाळले गेले तसे शैवांचेही ! श्रीलंका ,चीन , तिबेट मध्ये बौद्ध धर्मग्रंथ मिळाले नसते तर भारतात बौद्धांकडे  काय घंटा पुरावे होते ? आता आता व्हिएतनाममध्ये शैव राजवट असल्याचे आणि तिला नंतर बौद्ध व वैष्णवांनी रिप्लेस केल्याचे पुढे येते आहे . हळूहळू पुरावे पुढे येतीलच पण पुराव्याची वाट पहात आम्ही आता काम करू नये असं तुला म्हणायचंय का ?

ज्याला आसुरी बरं वाटून घ्यायचे असते तो आसुरी बरं वाटून घेतो 

जिथे गोतम बुद्धच कपिल ह्या शैवाच्या खांद्यावर बसलेला आहे तिथे बौद्ध ज्ञानाविषयी काय बोलावे ? ज्याला बौद्ध ज्ञान म्हंटले जाते तिथे तेच मुळी शैवांच्यापासून सुरु होते सूर आर्यांचे ओरिजनल दर्शन एकच मीमांसा बाकी सगळी शैवांची उसनवारी ! चायनीज प्रवासी बौद्ध धर्म स्वीकारूनच आले होते ते बौद्ध धर्माविषयीच आणि बौद्ध धर्माच्या बाजूने बोलणार व बौद्ध ग्रंथ न्हेणार जे नैसर्गिकच आहे . शैव प्रवासी आले असते तर त्यांनी शैव ग्रंथ न्हेले असते बाकी पुराव्याची गोष्ट तर त्यासाठी शैव ग्रंथ वाचायला हवेत 

देशीवादाचा आरोप विनोदी आहे मुळात शंकरानी सांगितलेला शैव असो कि बुद्धाचा बौद्ध हे धम्मच मुळात मार्गी आहेत पंचाग ही गोष्टच मुळात मार्गी आहे जे जे समस्त मानवजातीसाठी सांगितले जाते ते ते मार्गीच असते शंकराच्या काळात समुद्र पर्यटन करतील अशी जहाजे न्हवती त्यामुळे शंकर कधीही जहाजात बसलेला दिसत नाही त्यामुळे भारतीय उपखंड हेच जग होते आणि त्या प्रदेशात शैव धम्म पसरवण्याचा आदेश दिला गेला गौतम बुद्धाच्या काळात आशिया खंड हा जग होता म्हणून आशियाभर बौद्ध धर्म पसरवण्याचा त्याने आदेश दिला ख्रिश्चन व इस्लामच्या काळात आफ्रिका आशिया युरोप माहीत झाले होते म्हणून ह्यांनी त्रिखंड व्यापले पुढे दोन्ही अमेरिका व ऑस्ट्रेलिया खंड माहिती झाले म्हणून हेही जगात आले आठव्या शतकानंतर शैव देशीवादी झाले आणि प्रत्याभिज्ञा स्पंद दर्शन काश्मिरी शैवागम झाले सिद्धांत दर्शन तामिळ सिद्ध दर्शन झाले ह्याउलट ह्या काळात शंकराचार्यांनी मार्गी होत वेदांत भारतभर न्हेला देशीवादाने भारताचे विशेषतः बहुजन समाजाचे कायमच नुकसान केले आहे 


थोडक्यात कपिलच्या खांद्यावर गौतम बुद्ध असतो आणि आंबेडकरांनीच हे मांडलेलं असतं मग बुद्ध मूर्तिपूजेच्या विरुद्ध असल्याने शैव उत्पादक वर्गाने बनवलेल्या शंकराच्या मूर्त्यांना बुद्धाच्या मुर्त्या म्हणायचे असते आणि शैवांच्या शिवभक्तीनुसार बुद्धाची भक्ती सुरु करून महायान पसरावयाचे असते शैवांच्या तंत्राला आत्मसात करून पुढचे वज्रयान रचायचे असते शैवांच्यावर टीका करणाऱ्यांना शैव ग्रंथ वा दर्शने वाचण्याची तसदी घ्यायची नसते शैव मंदिरांची आर्किटेक्ट्स ही जिवंत पुरावे असतानाही शैवांना अक्कल नाही असे भासवायचे असते मूळ मुद्द्यावर(इथे मान्सूनच्या तारखा का चुकतायत हा मुद्दा आहे ) भाष्य न करता कुठलेतरी तळातले वाक्य उचलून वादविवादाची लांबड लावायची असते 

आणि मूळ पोस्टमध्ये उद्युक्त केलेले लेखक चर्चेत न आणता कॉमेंट्स पास करायच्या असतात 


एक बौद्ध पंडित  सिद्धाला  म्हणाला ,"मी तुझ्यापेक्षा जास्त जाणतो "

सिद्ध म्हणाला ,"हो "


प्रकृती बिघडलीये प्रज्ञा ठणठणीत आहे मानसिक ताण इमॅजिनेशन्स असतात ते अस्तित्वात नाहीत आपुलकीबद्दल धन्यवाद मित्रवर्य 

सर , पंचांग म्हणजे पाच अंगे ती पुढीलप्रमाणे 

१ ग्रहगती व ग्रहस्थिती 

२ अवकाशबिंदू जसा अयनबिंदू 

३ नक्षत्रस्थिती (ग्रीक लोकांच्यात राशी )

४ तिथी , पक्ष व वार 

५ वर्ष 

पंचांग ऍस्ट्रॉनॉमी ज्याला भारतात ज्योतिष म्हणतात त्याचा भाग आहे ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे फलज्योतिष हे पूर्ण वेगळे आहे व मी मागेच इथे म्हंटल्याप्रमाणे त्याला करमणूक म्हणूनच स्थान द्यावे पाश्चात्य देशात भविष्याचा तार्किक अभ्यास करण्याच्या शाखेला फ्यूचरॉलॉजी म्हणतात त्याला विज्ञान म्हणावे कि नाही किंवा त्याला विज्ञानाचे स्वरूप कसे द्यावे त्यात पूर्वसूचनचा  समावेश करावा कि नाही हा वाद सतत चालत असतो पण त्याचा फायदा असा असतो कि माणसे भविष्यकेंद्री विचार करतात केवळ इतिहासात गोते खात बसत नाहीत मला ह्याच शाखेत बॅचलर व मास्टर डिग्री मिळवायची होती पण भारतात त्यावेळी कुठल्याच विद्यापीठात ही शाखा शिकवली जात न्हवती आणि युरोप अमेरिकेत जाण्यासाठी लागणारा पैसा माझ्या बापाकडे वा माझ्याकडे न्हवता पुढे १९९० साली तामिळनाडू मध्ये ह्या शाखेचा विचार सुरु झाला मात्र मी स्वतःच्या जीवावर ह्या शाखेचा स्वतःच्या अल्पमतीप्रमाणे अभ्यास करत राहिलो कम्युनिझमच्या इतिहासात फक्त चायनाने ह्या शाखेचा वापर १९७२ पासून करायला सुरवात केली आहे बाकी देशांनी तो केला असता तर कदाचित तिथला कम्युनिझम वाचला असता बाकी मार्क्सने दिलेल्या प्रेडीक्शन्सचा विचार आम्ही आर्थिक फ्यूचरॉलॉजीत अधूनमधून करत असतो 

राहता राहिली गोष्ट जगबुडीची ! तर जगबुडीचा मला अनुभव नाही मी जगबुडीविषयी फक्त कथा , दंतकथा ,  कादंबऱ्यांतून सिनेमातून ऐकून व पाहून आहे त्यामुळे जगबुडी होणार कि नाही मला माहित नाही किंवा होणार असेल तर कधी होणार ह्याविषयी मी काहीच सांगू शकणार नाही मला वाटतं तुम्ही हा प्रश्न जगबुडीतज्ञानां विचारावा 

तूर्तास शेतकऱ्यांच्या पहिल्या पेरण्या वाया जाताहेत तर त्याला आत्ताचे पंचांग किंवा हवामानशास्त्र जबाबदार आहे का हा माझ्या कन्सर्नचा विषय आहे आणि विज्ञानांत वैयक्तिक मतांना काहीच किंमत नसते त्यामुळे वैज्ञानिक निरीक्षणे करून पंचांगाचा पुनर्विचार करावा का इतकाच प्रश्न मी चर्चेला घेतला आहे एक पेरणी वाया जाणे म्हणजे शेतकऱ्याचे किती श्रम व धन वाया हे आपण कम्युनिस्ट असल्याने सांगण्याची गरज नाही . 





पंचांग म्हणजे कुणी मुहूर्त सांगणारा किंवा जगबुडी सांगणारा ब्राम्हण असा गैरसमज होऊ नये म्हणून हे सांगतो आहे सद्या आपण ख्रिश्चन पंचांग आणि ह्या पंचांगानुसार तयार झालेले कॅलेंडर वापरतो आणि आपल्या ते गावीही नाही . अपवाद काही  इस्लामिक देश ते मात्र इस्लामिक पंचांग वापरतात नासाने स्वतःचे पंचांग डिक्लेअर केलेले आहे पण अजून तरी कुठल्या देशाने ते शास्त्रशुद्ध असूनही स्वीकारलेले नाही असो इथे पंचांग म्हणजे काय ते सांगतो आहे 

ह्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना केलेलं लिखाण )

Thursday, March 10, 2022

 अंदाजानुसार निकाल लागले गोव्यात आपला जास्तीत जास्त दोन जागा मिळतील असाच अंदाज होता सुरेलला जास्तीत जास्त १२ टक्क्यापेक्षा अधिक मते मिळणार नाहीत हे आधीच माहीत होते उत्तर प्रदेशात २७५ सीट्स  भाजप प्लसला  म्हंटल्याने शिव्या खाल्ल्या होत्या (अशाच शिव्या शरद पवारांना विधानसभेत दिल्या तेव्हा खाल्ल्या होत्या पण अंदाज अचूक झाल्यावर शांतता पसरली )पण प्रत्यक्ष निकाल लागल्यावर सॉरी आलं 

पंजाबमध्येही अपेक्षित निकाल लागला प्रश्न असा आहे कि महाराष्ट्रात आप का प्रसार पावत नाही ?मीडियामध्ये बोललं कि पक्षाचा प्रचार होतो अशी समजूत आहे का ?

असो माझ्यादृष्टीने धार्मिक आणि प्रबोधनीक पुरोगामी दोन्ही प्रकार आऊटडेटेड आहेत उत्तराधुनिक पक्ष अस्तित्वात नाही त्याचा पुरेपूर फायदा भाजपला मिळतो आहे चौथ्या नवतेचा एक पक्ष सोडा साधा राजकीय तुकडा पण अस्तित्वात नाही असो 

श्रीधर तिळवे नाईक 

हिंदुत्ववाद किमान १६० वर्षे जुना आहे हे प्रथम लक्ष्यात घ्या श्रीधर तिळवे 

सगळे काव्यसंग्रह आणि अडा हॉका बाणासुना ही कादंबरी सोल्ड आऊट आहे एका भारतीय विद्यार्थ्यांचे उदगार ह्या काव्यसंग्रहाची दुसरी बृहद आवृत्ती अलीकडे हस्ताक्षर प्रकाशनाने प्रकाशित केली आहे 

Thursday, February 17, 2022

 डिस्को लहर गेली श्रीधर तिळवे नाईक 

भप्पी लाहिरी गेले आमच्या पिढीचा एक वादग्रस्त संगीतकार गेला आमची पिढी नाचायला लागली ती भप्पीदांच्या सुरक्षामधल्या मौसम है गानेका पासून मिथुन चक्रबर्तीला त्यांचा आवाज एकदम फिट्ट बसायचा आणि त्याच्या डिस्कोला वाव देणारे त्यांचे संगीत होते ज्याला फोर ऑन द फ्लोर बिट्स म्हणतात त्याचा भारतीय शैलीत वापर करणारे ते पहिले संगीतकार होते हा बिट त्यांच्याआधी आर डी बर्मन कल्याणजी आनंदजी ह्यांनी वापरला होता पण त्याला पॉप्युलर बनवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता पुढे डिस्को म्हणून पुढे आलेला हा संगीतप्रकार भप्पीदांनी प्रचंड हाताळला किंबहुना आर डी पेक्षा वेगळी ओळख ह्या वापरामुळेच निर्माण झाली 

जर तिशोत्तरी जॅझची असेल साठोत्तरी रॉकची असेल तर आमची ऐंशोत्तरी ही डिस्कोची होती असं म्हणायला हरकत नाही सॅटरडे नाईट फिवर हा १९७७ चा चित्रपट माझ्या बालपणावर लॉन्ग  टाइम ठसा उमटवून गेला होता आणि माझी डिस्कोशी ओळख इथूनच सुरु झाली 

पुढे ए आर रेहमानपासून जे संगीताचे डिजिटल युग आले त्याची पायाभरणी भप्पीदांनी डिस्को मधून केली नैसर्गिक वाद्यांच्याकडून मॅनमेड वाद्यांच्याकडे सुरु झालेल्या प्रवासात ह्या ऐंशोत्तरी संगीताचा प्रचंड वाटा होता इलेक्ट्रिक पियानो आणि सिंथेसायझर ह्यांनी संगीताचे रूप पालटायला ह्याच काळात सुरवात केली प्रोग्रॅम्ड म्युझिकचा हा आरंभ होता मात्र ह्या बदलांची घनता आणि गहनता समजून घेणे भप्पीदांना जमले नाही ही त्यांची मर्यादा होती त्याऐवजी आर डी पासून वेगळी आयडेंटिटी निर्माण करणे आणि ह्या बदलाचा उथळपणे कमर्शियल वापर करणे ह्याकडे त्यांचा कल होता 

आर डी बर्मनने ओ पी नय्यरला चॅलेंज करून स्वतःचे वेगळे म्युझिक प्रस्थापित केले आणि आरडीला फॉलो करणारे जतीन ललित , आनंद मिलिंद असे एक स्कूल निर्माण झाले भप्पीदा हे ह्या स्कूलमधले पहिले विद्यार्थी त्यांचे वडील अपरेश मुखर्जी बंग संगीतकार होते आणि लता मंगेशकरांचे त्यांच्याकडे येणे जाणे होते (त्यांनी त्यांच्यासाठी अनेक गाणी गायली होती ) किशोरकुमार अशोककुमार त्यांचे मामा होते साहजिकच घरी संगीताचा माहोल होता मुखर्जी फॅमिली ही इंडस्ट्रीतील एक मोठी फॅमिली (ह्या फॅमिलीतील सुजॉय मुखर्जी हा माझा एकेकाळी मित्र होता त्याच्यामुळे त्याचे वडील जॉय मुखर्जीचा परिचय झाला होता ) होती आणि तिचा त्यांना पाठिंबा होता मात्र ह्या फॅमिलीने उचलेगिरीला कधीच पाठिंबा दिला नाही आणि भप्पीदाला कधीकधी ह्यावरून ऐकवले जाई त्यामुळेच ओरिजिनल धून निर्माण करण्याची त्यांची तडस शाबूत राहिली 

सुरवातीला त्यांनी आरडीच्या शैलीत संगीत दिले त्यांच्या दादू ह्या बंगाली फिल्ममधे लता मंगेशकर गायल्या तर  किशोरमामाने (किशोरकुमार ) चलते चलते मेरे ये गीत याद रखना हे अजरामर गाणे गायिले आणि त्यांची घौडदौड सुरु झाली ह्याचवेळी आप की  खातीर  साठी बम्बयसे आया मेरा दोस्त गाजले 

चलते चलते हा चित्रपट नायक विशाल आनंद देव आनंदची भुरटी नक्कल मारत होता त्यामुळे फ्लॉप झाला तरी त्यातील गाणी गाजली ह्यातले प्यारमे कभी कभी ऐसा हो जाता है हे भप्पीदांचे ड्युएट माझे ऑल टाइम फेवरीट आहे 

मग सुरक्षा आला ह्यातील संगीत आर डी च्या शैलीत असूनही आर डी पेक्षा वेगळे होते ह्यातील दिल था अकेला अकेला मधुर होते तर मौसम हैं गानेका व गनमास्टर जी नाईन ट्रेन्डसेटर ! भप्पीदांनी मला झटका दिला तो तीन  गाण्यांनी पहिले डिस्को डान्सरमधल्या याद आ रहा तेरा प्यार हे  दर्दभरे गाणे हे दर्दभरे गाणे डान्सिकल फॉर्ममध्ये दर्द पेश करणारे पूर्णपणे वेगळे गाणे होते दुसरे वारदात मधले तू मुझे जानसेभी प्यारा है ने ह्यात नशिलेगिरी होती पण डिस्कोथेकमधली होती तिसरे गाणे सलमा आगाचे होते दिलके अरमान आसूंओमे बह गये सारखे सेमिक्लासिकल गाणे ऐकून माझ्या मनात तिच्याविषयी वेगळी इमेज होती भप्पीदांनी त्या इमेजचा अक्षरशः भुगा केला कसम पैदा करनेवालीकी मधले ये रातमें जो मजा हैं  हे गाणे केवळ अभूतपूर्व होते आशा भोसलेंच्या साम्राज्याला ह्या गाण्याने तडा गेला आणि आशा भोसलेंच्यापेक्षाही वेगळ्या आवाजात हस्कीपणा निर्माण करता येतो हे भप्पीदांनी व सलमा आगाने सिद्ध केले (ह्या गाण्याचे  जलवा ४ सारखे व्हर्जन्स ऐकावेत म्हणजे सलमा आगाच्या आवाजाची किंमत कळते शमशाद बेगमच्या स्कूलचा हा आवाज म्हणजे एक नवा व्हर्जन होता आणि तो भप्पीदांनी निर्माण केला होता दुर्देवाने सलमा आगा नंतर मुस्लिम परंपरेत परतली आणि अशी गाणी गाणे तिने बंद केले )ह्या गाण्यात मिथुन डान्स करत न्हवता पण त्याने ड्रम सेट वर जी ऍक्टिंग केली ती झकास होती ह्या गाण्यांच्यात भप्पी गहन होते एक वेगळा साउंड निर्माण करण्याचा सृजनशील प्रयत्न होता ह्याशिवाय मिथुनच्या डिस्को शैलीला पूरक देखा है मैने तुम्हे फिरसे पलटके सारखी आमच्यासारख्या नाचखोर (मराठी समाजाच्या दृष्टीने वाया गेलेल्या  ) लोकांना डान्सप्रवण करणारी अनेक गाणी भप्पीदांनी दिली . 

प्रकाश मेहरांना खास कल्याणजी आनंदजी शैलीत त्यांनी नमक हलाल व शराबी मधली गाणी दिली आणि त्यासाठी त्यांना पारितोषिके दिली गेली ही गाणे छान होती पण जहाँ चार यार मिल जाये व इंतेहा हो गयी इंतजारकी(हे थर्ड डिग्री ह्या अलबमची कॉपी केलेले गाणे होते )  ही फक्त  दोन गाणी भप्पीदा टचची होती बाकी सारा मामला कल्याणजी आनंदजीसारखा होता त्यातील मंजिले अपनी जगह व पग घुंगरू बांध मीरा नाची थी गाजली 

बॉलिवूडमध्ये प्रोड्युसर आणि ऍक्टर्स अनेकदा संगीतकारांना "ह्या गाण्याची कॉपी करा " म्हणून विनंती करतात अशावेळी नकार दिला तर संपूर्ण चित्रपट हातातून जातो त्यामुळे अनेकदा संगीतकार झक मारत चोऱ्या करतात कधीकधी कॉप्या करण्याचा मोह आवरत नाही भप्पीदा ह्याला अपवाद न्हवते त्यांच्या प्यारा दुश्मन मधील हरी ओम हरी सरळ सरळ इरप्शनची कॉपी होती झुबीझुबी हे मॉडर्न टॉकिंगची कोई यहाँ नाचे नाचे द बगल्स ची मेरे पास आओगे (टारझन ) हे मिडल ऑफ द रोडचे ह्याच चित्रपटातील जिलेले जिलेले ओसीबीसा जिमी जिमी हे ओटवनचे वैग्रे (ही यादी खूप मोठी आहे ) नक्कल होते कथेबाबत सलीम जावेद व संगीताबाबत भप्पी लाहिरी ह्यांनी चोरीला  ऑफिशियल केले त्यांना स्वतःला ह्या चोऱ्या पसंत न्हवत्या असं ते म्हणत पण काळ बदललाय आणि मी हे केले नसते तर टिकलो तर टिकलो नसतो असा त्यांचा दावा होता 

जे अमेरिकेत होते ते बॉलिवूडमध्ये दहा वर्षांनी होते १२ जुलै १९७९ ला अमेरिकेत डिस्को डिमॉलिशन नाईट घडली आणि डिस्को संगीताच्या पतनाला सुरवात झाली आपल्याकडे हे पतन १९९० ला सुरु झाले आणि हळूहळू भप्पीदांचे वर्चस्व संपत गेले ए आर रेहमानने ह्या पिढीला चॅलेंज दिले आणि पुढे साजिद वाजिद विशाल भारद्वाज अमित त्रिवेदी ह्यासारख्या संगीतकारांनी ह्या युगाचे वर्चस्व संपवले 

ह्या काळात साऊथमध्ये इलाया राजा जबरदस्त निर्मिती करत होता त्यामुळे भप्पीदांना क्लासिकल दर्जा प्राप्त झाला नाही पण डिस्को संगीताचे त्यांनी अफलातून भारतीयीकरण केले ह्याबद्दल शंका नाही इलायाने असेंडिंग नोट्स निर्माण करून त्यात जी क्रांती केली तशी कोणतीही क्रांती भप्पीदांना जमली नाही इलायाने ए आर रहमान , युवा शंकर ह्यांच्यासारखे त्यांचे संगीत पुढे न्हेणारे शिष्य निर्माण केले तसंही काही बप्पीदांना जमलं असं दिसत नाही आजसुद्धा भप्पीदांनी जे केले त्याचे मूल्यमापन करणं जड जातं कारण त्यांचे कोणते गाणे चोरी केलेलं निघेल सांगता येत नाही 

आजच्या पिढीला मात्र ते माहिती झाले ते डर्टी पिक्चरमधल्या उ लाला उलाला ह्या गाण्यामुळे ! त्यांचे आमच्या काळात दुर्लक्षित झालेले कलियोको चमन सारखे गाणे अचानक रिमिक्समध्ये हिट झाले ह्याबाबतीत जी केस झाली ती त्यांनी जिंकली . 

एक गोष्ट नक्की त्यांनी आमच्या कुमार वयात एक वेगळा नृत्यप्रधान साउंड दिला आणि आम्हाला मनसोक्त नाचू दिले त्यांना माझी आदरांजली !

श्रीधर तिळवे नाईक 



Wednesday, February 9, 2022

 माझ्या आयुष्यात मी पाहिलेला पाहिलेला पहिला स्टार म्हणजे रमेश देव ! माझी पहिली मिटिंग त्यांच्याबरोबर होती ती हिशेबाची ! मी हिशेब करत असतांना ते काहीसे अचंब्याने पाहत होते . मग वडिलांना म्हणाले ," हा वयाच्या मानाने फार फास्ट आहे "

वडील म्हणाले ,"हो '

आमच्या तिळवे भंडारमध्ये ज्या काही लोकांची खाती होती त्यात देव कुटुंबीय होते त्यामुळे मग भेटी होत राहिल्या अभिनेत्यांचे पैसे वरखाली होत असत त्याला रमेश देव अपवाद न्हवते मात्र घरी सर्व सामान नीट पोहचवा अशी त्यांची विनंती असे व वडील ते काम इमान इतबारे करत कारण देव फॅमिलीही बाहेरून येऊन कोल्हापुरात सेटल झालेली त्यामुळे एक इमोशनल बॉण्ड तयार झाला होता . ते मूळचे राजस्थानी होते आणि प्रख्यात जोधपूर पॅलेस त्यांच्या पूर्वजांनी बांधला होता ह्यावर अनेकांचा विश्वासही बसणार नाही इतके त्यांचे मराठीकरण झाले होते 

माझे आईवडील रमेश व सीमा देव (माझ्या आईचे व सीमा देव ह्यांचे दोघांचेही नाव नलिनी होते त्यामुळेही एक बॉण्ड होता ) दोघांचेही फॅन दोघांचे जवळ जवळ सर्वच चित्रपट आम्ही बघितले कधीही दुकानात आले कि साधे सरळ वागायचे बोलायचे मुंबईला सेटल होईतोवर हे चालले पुढेही वर्षातून एखादी चक्कर व्हायची १९८० नंतर सर्व कमी होत गेले पण पुढे अजिंक्य देवची प्रत्येक फिल्म आम्ही पाहिली ते वडिलांच्या आग्रहास्तव !

मुंबईला आलो तेव्हा लिस्टमध्ये रमेश देव होतेच मी फोन केल्यावर ते अजिंक्यला फोन करून ते थेट घरीच ये म्हणाले अजिंक्यला मी फोन करून मी पत्ता घेतला आणि भेटलो मी तिळवेंचा मुलगा आहे म्हंटल्यावर सीमा देव एकदम खुश झाल्या रमेश देवांनी सर्वांची आस्थेने चौकशी केली मी त्यांना त्यांच्या शेजारचे अपडेट्स दिले एक जुना माहोल तयार झाला 

पुढे मग अजिंक्यने मला शंकरच्या हिंदुस्थानी ह्या चित्रपटाची रिमेक करायची आहे तू लिहिशील का म्हणून विचारले मला कॉपी करायचा विलक्षण कंटाळा साहजिकच मी प्रयत्न करतो म्हणालो खरा पण माझ्याकडून काही प्रयत्न झाले नाही अजिंक्यच्याही लक्षात आलं असावं बहुदा ! त्याने नाद सोडला आणि नात्यात एक अवघडलेपणा आला 

त्यानंतर मी भेटलो नाही आणि आता थेट वार्ताच आली . एका अत्यंत सज्जन अभिनेत्याचा हा अंत होता मी पुढेही अनेक स्टार्सना भेटलो  पण रमेश देव ह्यांच्याइतका साधा सरळ अभिनेता मी पाहिला नाही त्यांची आनंदमधली भूमिका अनेकांच्या आवडीची पण मला जैसे को तैसा मधला खलनायक अधिक आवडला कारण ते जे न्हवते ते त्यांनी साकार केले होते आनंदमध्ये ते त्यांच्या स्वभावासारखे होते पुढे राजेश खन्नाबरोबर त्यांनी अनेक फिल्म्स केल्या . अभिताभबद्दल त्यांना कौतुक होते आणि आनंदच्या सेटवरचे त्यांनी सांगितलेले किस्से इंटरेस्टिंग होते रामपूरका लक्ष्मण सारख्या  काही सुपरहिट फिल्म्स मध्ये त्यांनी काम केले 

त्यांचे अभिनयाचे स्कूल हे राजा परांजपे ह्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेले होते ज्यात निरीक्षण, नाट्यशिलता  व अनुसरणाला महत्व असायचे त्यांची पहिली महत्वाची फिल्म आंधळा मागतो एक डोळा ही राजा परांजपे ह्यांचीच होती त्यामुळे ते स्वाभाविक होते १९८० नंतर त्यांच्या अनेक हिंदी फिल्म्स आपटल्या आणि महत्वाच्या लेखक दिग्दर्शकांपासून ते दुरावले मात्र नंतर अचानक त्यांना जाहिरातक्षेत्रात निर्माता म्हणून जबरदस्त यश मिळायला सुरवात झाली आणि ते निर्मितीक्षेत्रात स्थिरावले त्यातूनच पुढे अभिनय देव (दिल्ली बेली )हा एक अफलातून दिग्दर्शक आकाराला आला  

त्यांना थोडी अजिंक्याचीच काळजी होती आणि एक भविष्यावैज्ञानिक म्हणून तो किमान मराठीत तरी यशस्वी अभिनेता होईल अशी मी खात्री दिली होती 

आपली दोन्ही मुलं कलाक्षेत्रात आणण्याची रिस्क त्यांनी घेतली आणि ती यशस्वी झाली 

त्यांना माझी आदरांजली !

श्रीधर तिळवे नाईक 





Sunday, February 6, 2022

 लताबाई गेल्या आणि भवतालावर एक पॉज पसरला बुद्धीच्या आवाक्याबाहेर असलेली त्यांची मधाळ गायकी कायमच आयुष्यात तारे पेरीत मुलायम स्वरप्रकाश प्रकटत करत राहिली जन्मजात गन्धाराचं गूढ कधीच सुटलं नाही दैवी स्वरलयीचं विलक्षण देणं त्यांना लाभलं होतं 

माझा आवडता संगीतकार ओ पी नय्यरने त्यांच्याकडून एकही गाणं गाऊन घेतलं नाही तरीही लताबाई तो गेला तेव्हा त्याचे वेगळेपण अधोरेखित करत्या झाल्या तर ज्यांचं आयुष्य ओपी मुळं घडलं त्या आशाबाई चुप्प राहिल्या हा फरक बोलका होता त्या हिंदुत्ववादी होत्या आणि त्यांनी ते कधीही लपवलं नाही अलीकडे त्यांना त्यामुळे फार बायस टीका झेलावी लागली त्यांची गायकी हिंदवी होती हिंदुत्ववादी न्हवती ह्याचाही अनेकांना विसर पडला 

हिंदी फिल्मी संगीतात स्त्रीगायकीची सुरैया , शमशाद बेगम , गीता बाली आणि लता मंगेशकर अशी चार घराणी आहेत त्यातील लता मंगेशकर घराण्याच्या त्या आद्य प्रवर्तक गीता बाली घराण्यात नंतर आशा भोसले ही त्यांच्यापेक्षा सरस वारस जन्माला आली तसं लता मंगेशकर घराण्यात झालं नाही आमच्या पिढीत त्यांच्यापेक्षा त्यांच्याच घराण्यातील अनुराधा पौडवाल लोकप्रिय झाल्या आणि नंतर अलका याज्ञीक आणि कविता कृष्णमूर्तींनी आपले राज्य निर्माण केले पण तरीही लताबाईंच्या आसपासही कोणी पोहचू शकल्या नाहीत संगीत देवीकडून मानवी कडे जसं जसं कलायला लागलं तशी आशा भोसलेंची पकड काही काळ वाढली तरी लताबाईंचे साम्राज्य अबाधित राहिले आशा जे गाऊ शकत होत्या त्या स्वरावटी लताबाई सहज तितक्याच मादक गाऊ शकायच्या उदा दो घूंट मुझको पिला दे शराबी किंवा ओ जाने जॉ मात्र ह्या मादकपणातही दैवी स्पर्श लपायचा नाही त्या उलट आशाबाईंचा आवाज कधीही दैवी उंची गाठू शकला नाही त्यामुळेच लताबाई ह्या जगातल्या सर्वोत्तम गायिका आहेत हे ठसत राहिलं दैवी कधीही मानवी होऊ शकतं पण मानवी कधीही दैवी होऊ शकत नाही त्याचे हे उदाहरण होते (अपवाद आशाबाईंनी गायिलेले दिन तैसा रजनी ) लताबाईंची 

१ ये दिल और उनकी निगाहोके साये 

२ रातभी हैं कुछ भिगी भिगी 

३ आजा रे परदेसी 

४ ए दिले नादान 

५ झूम झूम ढलती रात 

६ श्रावणात घन निळा 

७ ऐरणीच्या देवा तुला 

८ कही दीप जले कही दिल 

९ पलभरमे ये क्या हो गया वो मैं गयी 

१० लग जा गले 

११ कोई नहीं है फिरभी हैं मुझको 

१२ आपकी नजरोने समझा 

१३ बेदर्दी बालमा तुझको 

१४ सोलह बरसकि बाली उमरको सलाम 

१५ जब प्यार किया तो डरना क्या 


ही माझ्या आवडीची ! त्यांच्या सुरेलपणावर विश्वकोश बनू शकतो इतके हे सूर अचूक आणि अभिजात होते , मराठी लोकांनी करियर कसे बनवावे ह्याचे धडे त्यांच्याकडून गिरवावे इतकी त्यांची मॅनेजमेंट परफेक्ट होती त्यांच्या व्यवहाराला नाक मुरडणारा मराठी स्वभाव हा खरेतर आऊटडेटेड झालेला स्वभाव आहे त्यापेक्षा बॉलिवूडमध्ये मराठी माणसाने कसं वागलं पाहिजे ह्याच्या त्या आदर्श होता राजेश खन्नाच्या आशीर्वादचे आणि शाहरुख खानच्या मन्नतचे वाटेल ते नखरे झेलणाऱ्या मराठी लोकांनी लताबाईंच्या प्रभुकुंजचे नखरे मात्र ओव्हररेटेड केले एकंदरच यशस्वीपणाचे मराठीतील बुद्धिवादी लोकांना वावडे आहे कि काय अशीच शंका येते त्यांनी बालपणात सोसलेल्या दारिद्र्याच्या झळा आयुष्यभर त्यांचा पाठलाग करत राहिल्या त्यातून त्या बाहेर येत्या तर होत्या त्याहून अधिक दिलदार झाल्या असत्या आणि धनासक्त स्त्रीची इमेज तयार झाली नसती 

साहित्यिकांच्यावर विशेषतः गीतकारांच्यावर मात्र त्यांचे प्रेम होते एल एम स्टुडिओत मी संगीतकार म्हणून प्रथम एंट्री मारली तेव्हा तिथे टांगलेले गीतकारांचे फोटो पाहून काहीसा चकित झालो होतो 

संगीतकार सज्जादवरचे  त्यांचे प्रेम हाही माझ्या कौतुकाचा विषय आहे त्यांनी त्याला आठवणीत ठेवला नसता तर कदाचित तो विस्मरणात गेला असता राज कपूरशी त्यांनी घेतलेला पंगा हा तात्विक नीडरपणा दाखवणारा होता (पुढे असाच पंगा अलिशा चिनॉयने यशराज बरोबर घेतला तेव्हा तिला माघार घ्यावी लागली होती )

अलीकडच्या गीतकारीवर त्या प्रचंड नाराज होत्या त्याचा परिणाम गाण्यांची संख्या कमी होण्यात झाला उच्छंख्रुलपणा त्यांच्या पिंडाला मानवणारा न्हवता वास्तविक ज्या आधुनिकतेतला त्या उच्चंख्रुल समजत त्याच  आधुनिकतेतून  माईकचा शोध लागला नसता तर त्यांच्या नाजूक गायकीला कदाचित मान्यता मिळाली नसती त्या पिंडाने अभिजात रोमँटिकवादी होत्या हेच खरे त्यामुळेच गीतलेखनातील आधुनिकता त्यांना झेपणारी न्हवतीच 

इतिहास आणि क्रिकेट ह्याचे त्यांना वेड होते आणि क्रिकेटला स्टेट्स देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता त्या गेल्या आणि अभिजात वळणदार जरतारी सुरेलपणा गेला 

त्यांना माझी आदरांजली 

श्रीधर तिळवे नाईक