Sunday, August 7, 2022

 पुन्हा एकदा सौष्ठव पण डिजटल श्रीधर तिळवे नाईक 

माणूस मरणाच्या दारात असताना त्याला स्वतःची उरलेली कर्तव्ये दिसत असतात ह्याला मी अपवाद न्हवतो  साहजिकच इतर क्षेत्रांप्रमाणे साहित्याच्या क्षेत्रात बाकी असलेली माझी कामे मला दिसायला लागली साहित्याच्या क्षेत्रात दशखंडी तिळवे हा नितीन वाघ व विनायक येवले ह्यांनी डिझाईन केलेला प्रकल्प टाईप व  प्रकाशित करणे धर्म व अर्थ ह्या कादंबऱ्या टाईप व प्रकाशित करणे चौथ्या नवतेच्या मांडणीच्या उरलेल्या जागा भरणे आणि सौष्ठवचे अंक इंटरनेट अर्काइव्जवर डिजीटाईझ करणे वैग्रे 

अनियतकालिकांनी आपली  साईझ व नियमितता नियतकालिकासारखी नियमित ठेवू नये छोटा धमाका करावा व गायब व्हावे हे माझे अनियतकालिकांच्याबद्दल तत्व ! साहजिकच मी जेव्हा असे काही लेखन माझ्या कडे आले तेव्हाच अंक काढला अंक नियमित काढायला गेलात कि साहित्यही पाट्या टाकल्यासारखं वाट्याला येते  म्हणजे मन्या जोशींच्या मला आवडलेल्या २४ कविताच मी घेतल्या त्यावेळी तो फारसा माहीतच न्हवता भुजंगची स्वातंत्र्याचं गाणं हीच कविता मी घेतली अभिजित देशपांडेचे नव्वदनंतरच्या साहित्यव्यवहारावर प्रकाश टाकणारे लेख घेतले ज्ञानदाच्या रोमँटिसिझममधून बाहेर पडलेल्या कविताच मी घेतल्या मंगेश काळेला शक्तिपाताचे सूत्र मध्ये आवाज सापडला असं वाटलं तेव्हाच तो सौष्ठवमध्ये आला हेमंत दिवटे हा तर माझा सहकारी पण त्याच्याही कविता आणि इंटरव्यू थांबताच येत नाही ही त्याचा आवाज अधोरेखित करणारी कविता आल्यावरच सौष्ठव मध्ये आला 

साठोत्तरीचे साहित्य घ्यायचे नाही ह्यावर मी ठाम होतो आणि मला अनेकदा वचन देऊनही नव्या लोकांनी साहित्य दिलं नाही मग रिकाम्या जागा भराव्यात तसा मी अंक माझ्या समीक्षेने भरला मला महत्वाच्या वाटणाऱ्या समकालीनांच्यापैकी सलील वाघ , हेमंत दिवटे , मंगेश काळे , सचिन केतकर ह्यांचे इंटरव्यू आले अभिजीत देशपांडे ,मन्या जोशी व नितीन रिंढे ह्यांचे राहून गेले पण सौष्ठवचा पॅटर्न नंतर हेमंत दिवटेने अभिधानानंतरमध्ये अधिक व्यापक करून इंटरव्यू घेतले आणि एका अर्थाने हे मिशन पुरे झाले नवीन पिढीत संतोष पवार , नितीन वाघ ,  प्रणव सखदेव , ओंकार कुलकर्णी , स्वप्नील वैग्रेंचे असे इंटरव्यू आले पाहिजेत असं वाटतं भुजंग व अरुण काळेला सुरवातीला  चौथी नवता अमान्य होती पण नंतर विचार करावा लागेल असं त्यांना वाटायला लागलं भुजंग आणि मी तो माझ्या हॉस्टलवर आला कि हमखास भेटायचो जगभरच्या आदिवासी साहित्यावर आमच्यात चर्चा व्हायच्या आदिवासी मौखिक साहित्याचे तालन हा आम्हा दोघांच्याही आस्थेचा विषय त्या अंगाने हा इंटरव्यू घ्यायचा वैग्रे खूप चालायचं पण ते घडलं नाही 

मंगेश बनसोड आल्हाद भावसार हे मित्र कायमच सोबत होते मंगेश सहसंपादक होता माझे जे एस हॉलचे महेश म्हात्रें के  श्यामसुंदर ह्यांच्यासारखे हॉस्टेलमेट्स सौष्ठवच्या कायमच मागे होते के श्यामसुंदरचे लेबर्स व लेबर ऍक्ट वरचे काम त्यावेळी सुरु झाले होते जे मला महत्वाचे वाटत होते त्यावर सौष्ठवचा एक इंग्रजी अंक काढायचा प्लॅन होता 

सौष्ठवचा लोगो हा आशुतोष आपटेने तयार केला होता अविनाश धर्माधिकारी ह्यांनी सौष्ठवला जी जागा दिली त्याबद्दल मी कायमच ऋणी राहीन त्याकाळात ते पंतप्रधान किमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे वाटायचे एव्हढी त्यांची पात्रता आहे असं वाटायचं आणि आजही वाटते त्यांना किमान केंद्रात मोदींनी घ्यायला हवं होतं त्यांच्या कित्येक सहकाऱ्यांच्यापेक्षा धर्माधिकारी उजवे आहेत असो भाजपमध्ये टॅलेंट अडवण्याची आणि हलक्या दर्जाची माणसे उंच उडवण्याची एक नवी रीत १९९७ नंतर उदयाला आली आहे धर्माधिकारी त्याचे बळी ठरले पुन्हा असो 

ह्या काळात धर्माधिकारींची  राईट टू इन्फर्मेशन ऍक्टवरची चळवळ सुरु झाली होती जी चौथ्या नवतेच्या दृष्टीने मला फार  महत्वाची वाटत होती  त्यांच्याप्रमाणे आम्हा सर्वांनाच त्यावेळी अण्णा हजारे काही करतील (१९९९ चा काळ )असं वाटत होतं पुढं त्यांनी आंदोलन राष्ट्रीय पातळीवर न्हेलंही पण ते ज्या तऱ्हेने विस्कळीत होत गेलं ते हादरवणारं होतं त्यांचं आंदोलन भाजप स्पॉन्सर्ड होतं वैग्रे बकवास आहे भाजपने ह्या आंदोलनाचा वापर काँग्रेसची सत्ता  संपवण्यासाठी केला एव्हढंच 

धर्माधिकारांच्यामुळेच कीर्तीकुमार  शिंदे , मंदार फणसे , अद्वैत मेहता , राहुल सरवटे असे सुरवातीला सहकारी पण नंतर उत्तम मित्र झालेले लोक ह्याकाळात मिळाले तेराव्या अंकात चक्क राहुल सरवटे व मंदार फणसेची कविता होती हे आता इंटरेस्टिंग वाटते मंदारने नोबल पारितोषिक विजेत्या विस्साव शिंबोस्कीचे भाषणही एका अंकासाठी भाषांतरित केले होते  

माझी विद्यार्थिनी पूजा मून हिच्या सहकार्याने सौष्ठवचे डिजिटाइझ्ड करण्याचे काम पूर्ण झाले हे काम करताना जाणवलेल्या काही गोष्टी विचित्र होत्या म्हणजे मन्या जोशीवरचा अंक हा फक्त त्याच्यावरच आहे हे आता कळलं ह्या अंकाला अभिजित देशपांडेची समीक्षा मिळती तर मजा आली असती  दोन अंक तर कुठं गायब झाले  कुणास ठाऊक ? साहित्यात हिशेब ठेवणे माझ्या बेबंद स्वभावात नाही त्यामुळे माझ्या हजारो  कविता जशा माझ्याकडे चालून आल्या तशे हे अंकही चालून येतील असं म्हणायचं 

सौष्ठवचं काम चौथ्या नवतेचा धमाका करणं हे होतं ते झालं शंकर सारडांनी दैनिक पुढारीमधील एका लेखात प्रस्थापितांच्यात ह्या अंकाने काय झालं होतं ते सांगितलं आहे महेश म्हात्रेने सकाळमध्ये माझा त्यामुळेच इंटरव्यू घेतला होता व आश्चर्यकारकरित्या अरुण म्हात्रे ह्याने प्रस्थापित लोकांची बाजू घेऊन सकाळमध्ये माझा प्रतिवाद केला होता ह्या धमाक्यामुळेच मला शोधत हेमंत दिवटे होस्टेलवर आला मी सौष्ठवचा पहिला अंक ९ फेब्रुवारी १९९३ ला काढला त्याच्यानंतर त्याने अभिधाचा गझल विशेषांक काढला होता पण सौष्ठवचा धमाका झाला आणि हा आला त्या काळात तो गझल विशेषांक काढण्याइतपत रोमँटिक होता पण नंतर बदलला त्याने संपादकपदाची ऑफर दिली मी ती स्वीकारली व  अभिधात गेलो खरेतर त्याने नाव बदलूया असं सांगितलं होतं मी ते ऐकायला हवं होतं असो आम्ही मग दिलीप चित्रे विशेषांक चौथी नवता विशेषांक काढले मात्र एका अंकानंतर जे काही झालं ते अनपेक्षित होतं त्यावर पुढे कधीतरी 

कुठल्याही नवतेचा सहसंवेदनशीलतेमुळे एक गोतावळा तयार होतोच त्यातून वाचायचे कसे हा एक फार मोठा प्रश्न असतो मी दुरावा ठेवण्याचे धोरण स्वीकारून सौष्ठवचा गोतावळा होणार नाही ह्याची काळजी घेतली आणि ती यशस्वीही झाली मात्र इमोशनल बॉण्ड्स आजही ताजे आहेत 

मागच्या नवतेतले लोक तुम्ही आमच्याशी जुळवून घ्या असे सांगतच असतात मलाही नारायण सुर्वे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा परिसंवादात बोलावले गेले एका बाजूला राजन गवस व दुसऱ्या बाजूला मी होतो राजनने देशीवादाचा कट्टर पुरस्कार केला आणि मीही त्याला अनुमोदन द्यावी अशी अपेक्षा असताना मी देशीवाद्यांच्या साहित्य संमेलनात देशीवादावर हल्ला बोल केला परिणामी देशीवादी भडकले व मला शंका आहे कि पॉप्युलर प्रकाशनातील माझ्या पुस्तकांचे प्रकाशन लांबले जे काही पुस्तकांबाबत अजूनही लांबलेलेच आहे. पुढे हेमंत दिवटेमुळे आमच्या पिढीचे अभिधानानंतर प्रकाशनच सुरु झाले  

काहीवेळा आरोप होणे अटळ असते ते माझ्यावरही झाले म्हणजे किशोर कदम मला तू साहित्य क्षेत्रातील शरद पवार आहे असं म्हणायचा (अलीकडे तो मला साहित्यक्षेत्रातील अमित शहा म्हणतो ) मंगेश बनसोडच्या संपादनाखाली आम्ही दलित ह्या शब्दाची व्याप्ती वाढवणाऱ्या अंकाची निर्मिती केली तेव्हाही ही व्याप्ती वाढवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला असा प्रश्न केला गेला सर्वात जास्त आरोप भुजंग मेश्राम करायचा मी कधी अशा आरोपांच्याकडे लक्ष दिलं नाही माझा आग्रह कुणी डावलला नाही अगदी भुजंग मेश्रामसारखा नाठाळही मी समोर असल्यावर मला विचारल्याशिवाय दारू स्वतःच्या ग्लासात ओतायचा नाही (एकदा त्याची मी दोन तास अडवून चांगलीच पंचाईत केली होती )मात्र मीही फालतू दुराग्रह धरले नाहीत आपण आपलं काम करत रहावं आज ना उद्या तुमचं काम बोलेलच अशी माझी धारणा होती 

सौष्ठवचं बंद पडणं अपरिहार्य होतं मी राहुल सरवटेकडे संपादन दिल्यावर त्याला कोलंबिया विद्यापीठाची ऑफर आली मला जोशी कि कांबळेची ऑफर आली मंगेश बनसोड स्वतःच्या परिस्थितीला मॅनेज करण्यात दंग होता आल्हाद भावसारने मुंबई सोडली होती आणि कीर्ती शिंदेला स्वतःची आयडेंटिटी मेंटेन करायची होती त्यामुळे संपादन चालवणार कोण ? शिवाय कीर्तीने अंक काढण्यापेक्षा पुस्तकप्रकाशन व पुस्तक दुकान चालवणे हे महत्वाचे आहे असा युक्तिवाद केला व तो मला पटला हा युक्तिवाद प्रमाण मानून कीर्तीने नवता प्रकाशन चालू केले व दहिसरमध्ये  ग्रंथदालनही !त्यातून नितीन वाघ सारखे काही लेखक पुढे आणले गेले आता तर सौष्ठव अभिधाची पहिली पिढी थेट अभ्यासक्रमात दाखल झाली त्यामुळे बंड करणे न्हवे तर आपल्याविरुद्ध बंड करणाऱ्या लोकांची वाट पाहणे अपरिहार्य झाले आहे  

प्रत्येक संपादकाला संपादकीय लिहायला लागतात तशी मीही लिहिली त्यातली काही आजही रिलेव्हन्ट वाटतात 

मेडीटेशनची हुक्की आली कि पळ काढणाऱ्या व त्यामुळं झक्की वाटणाऱ्या पण वचन व वेळ पाळण्याबाबत आग्रही व बुद्धी पक्की असणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला इतक्या साऱ्या लोकांनी झेललं कसं असाच प्रश्न आता पडतो . एकंदरच भारतीय संस्कृती झक्की माणसांना व चक्कीत जाळ असणाऱ्या व करणाऱ्या माणसांना पेलण्यात व पचवण्यात निपुण आहे असं म्हणायचं . पुन्हा तिसऱ्यांदा असो . (चिन्हकीत असो म्हणजे पूर्णविराम नाही पण पूर्णविराम दाखवावा लागतो अशी पॉलिटिकली करेक्टनेस  प्रोजेक्ट करणारी स्थिती )

श्रीधर तिळवे नाईक 


 




No comments: