Sunday, February 6, 2022

 लताबाई गेल्या आणि भवतालावर एक पॉज पसरला बुद्धीच्या आवाक्याबाहेर असलेली त्यांची मधाळ गायकी कायमच आयुष्यात तारे पेरीत मुलायम स्वरप्रकाश प्रकटत करत राहिली जन्मजात गन्धाराचं गूढ कधीच सुटलं नाही दैवी स्वरलयीचं विलक्षण देणं त्यांना लाभलं होतं 

माझा आवडता संगीतकार ओ पी नय्यरने त्यांच्याकडून एकही गाणं गाऊन घेतलं नाही तरीही लताबाई तो गेला तेव्हा त्याचे वेगळेपण अधोरेखित करत्या झाल्या तर ज्यांचं आयुष्य ओपी मुळं घडलं त्या आशाबाई चुप्प राहिल्या हा फरक बोलका होता त्या हिंदुत्ववादी होत्या आणि त्यांनी ते कधीही लपवलं नाही अलीकडे त्यांना त्यामुळे फार बायस टीका झेलावी लागली त्यांची गायकी हिंदवी होती हिंदुत्ववादी न्हवती ह्याचाही अनेकांना विसर पडला 

हिंदी फिल्मी संगीतात स्त्रीगायकीची सुरैया , शमशाद बेगम , गीता बाली आणि लता मंगेशकर अशी चार घराणी आहेत त्यातील लता मंगेशकर घराण्याच्या त्या आद्य प्रवर्तक गीता बाली घराण्यात नंतर आशा भोसले ही त्यांच्यापेक्षा सरस वारस जन्माला आली तसं लता मंगेशकर घराण्यात झालं नाही आमच्या पिढीत त्यांच्यापेक्षा त्यांच्याच घराण्यातील अनुराधा पौडवाल लोकप्रिय झाल्या आणि नंतर अलका याज्ञीक आणि कविता कृष्णमूर्तींनी आपले राज्य निर्माण केले पण तरीही लताबाईंच्या आसपासही कोणी पोहचू शकल्या नाहीत संगीत देवीकडून मानवी कडे जसं जसं कलायला लागलं तशी आशा भोसलेंची पकड काही काळ वाढली तरी लताबाईंचे साम्राज्य अबाधित राहिले आशा जे गाऊ शकत होत्या त्या स्वरावटी लताबाई सहज तितक्याच मादक गाऊ शकायच्या उदा दो घूंट मुझको पिला दे शराबी किंवा ओ जाने जॉ मात्र ह्या मादकपणातही दैवी स्पर्श लपायचा नाही त्या उलट आशाबाईंचा आवाज कधीही दैवी उंची गाठू शकला नाही त्यामुळेच लताबाई ह्या जगातल्या सर्वोत्तम गायिका आहेत हे ठसत राहिलं दैवी कधीही मानवी होऊ शकतं पण मानवी कधीही दैवी होऊ शकत नाही त्याचे हे उदाहरण होते (अपवाद आशाबाईंनी गायिलेले दिन तैसा रजनी ) लताबाईंची 

१ ये दिल और उनकी निगाहोके साये 

२ रातभी हैं कुछ भिगी भिगी 

३ आजा रे परदेसी 

४ ए दिले नादान 

५ झूम झूम ढलती रात 

६ श्रावणात घन निळा 

७ ऐरणीच्या देवा तुला 

८ कही दीप जले कही दिल 

९ पलभरमे ये क्या हो गया वो मैं गयी 

१० लग जा गले 

११ कोई नहीं है फिरभी हैं मुझको 

१२ आपकी नजरोने समझा 

१३ बेदर्दी बालमा तुझको 

१४ सोलह बरसकि बाली उमरको सलाम 

१५ जब प्यार किया तो डरना क्या 


ही माझ्या आवडीची ! त्यांच्या सुरेलपणावर विश्वकोश बनू शकतो इतके हे सूर अचूक आणि अभिजात होते , मराठी लोकांनी करियर कसे बनवावे ह्याचे धडे त्यांच्याकडून गिरवावे इतकी त्यांची मॅनेजमेंट परफेक्ट होती त्यांच्या व्यवहाराला नाक मुरडणारा मराठी स्वभाव हा खरेतर आऊटडेटेड झालेला स्वभाव आहे त्यापेक्षा बॉलिवूडमध्ये मराठी माणसाने कसं वागलं पाहिजे ह्याच्या त्या आदर्श होता राजेश खन्नाच्या आशीर्वादचे आणि शाहरुख खानच्या मन्नतचे वाटेल ते नखरे झेलणाऱ्या मराठी लोकांनी लताबाईंच्या प्रभुकुंजचे नखरे मात्र ओव्हररेटेड केले एकंदरच यशस्वीपणाचे मराठीतील बुद्धिवादी लोकांना वावडे आहे कि काय अशीच शंका येते त्यांनी बालपणात सोसलेल्या दारिद्र्याच्या झळा आयुष्यभर त्यांचा पाठलाग करत राहिल्या त्यातून त्या बाहेर येत्या तर होत्या त्याहून अधिक दिलदार झाल्या असत्या आणि धनासक्त स्त्रीची इमेज तयार झाली नसती 

साहित्यिकांच्यावर विशेषतः गीतकारांच्यावर मात्र त्यांचे प्रेम होते एल एम स्टुडिओत मी संगीतकार म्हणून प्रथम एंट्री मारली तेव्हा तिथे टांगलेले गीतकारांचे फोटो पाहून काहीसा चकित झालो होतो 

संगीतकार सज्जादवरचे  त्यांचे प्रेम हाही माझ्या कौतुकाचा विषय आहे त्यांनी त्याला आठवणीत ठेवला नसता तर कदाचित तो विस्मरणात गेला असता राज कपूरशी त्यांनी घेतलेला पंगा हा तात्विक नीडरपणा दाखवणारा होता (पुढे असाच पंगा अलिशा चिनॉयने यशराज बरोबर घेतला तेव्हा तिला माघार घ्यावी लागली होती )

अलीकडच्या गीतकारीवर त्या प्रचंड नाराज होत्या त्याचा परिणाम गाण्यांची संख्या कमी होण्यात झाला उच्छंख्रुलपणा त्यांच्या पिंडाला मानवणारा न्हवता वास्तविक ज्या आधुनिकतेतला त्या उच्चंख्रुल समजत त्याच  आधुनिकतेतून  माईकचा शोध लागला नसता तर त्यांच्या नाजूक गायकीला कदाचित मान्यता मिळाली नसती त्या पिंडाने अभिजात रोमँटिकवादी होत्या हेच खरे त्यामुळेच गीतलेखनातील आधुनिकता त्यांना झेपणारी न्हवतीच 

इतिहास आणि क्रिकेट ह्याचे त्यांना वेड होते आणि क्रिकेटला स्टेट्स देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता त्या गेल्या आणि अभिजात वळणदार जरतारी सुरेलपणा गेला 

त्यांना माझी आदरांजली 

श्रीधर तिळवे नाईक 









No comments: