माझ्या आयुष्यात मी पाहिलेला पाहिलेला पहिला स्टार म्हणजे रमेश देव ! माझी पहिली मिटिंग त्यांच्याबरोबर होती ती हिशेबाची ! मी हिशेब करत असतांना ते काहीसे अचंब्याने पाहत होते . मग वडिलांना म्हणाले ," हा वयाच्या मानाने फार फास्ट आहे "
वडील म्हणाले ,"हो '
आमच्या तिळवे भंडारमध्ये ज्या काही लोकांची खाती होती त्यात देव कुटुंबीय होते त्यामुळे मग भेटी होत राहिल्या अभिनेत्यांचे पैसे वरखाली होत असत त्याला रमेश देव अपवाद न्हवते मात्र घरी सर्व सामान नीट पोहचवा अशी त्यांची विनंती असे व वडील ते काम इमान इतबारे करत कारण देव फॅमिलीही बाहेरून येऊन कोल्हापुरात सेटल झालेली त्यामुळे एक इमोशनल बॉण्ड तयार झाला होता . ते मूळचे राजस्थानी होते आणि प्रख्यात जोधपूर पॅलेस त्यांच्या पूर्वजांनी बांधला होता ह्यावर अनेकांचा विश्वासही बसणार नाही इतके त्यांचे मराठीकरण झाले होते
माझे आईवडील रमेश व सीमा देव (माझ्या आईचे व सीमा देव ह्यांचे दोघांचेही नाव नलिनी होते त्यामुळेही एक बॉण्ड होता ) दोघांचेही फॅन दोघांचे जवळ जवळ सर्वच चित्रपट आम्ही बघितले कधीही दुकानात आले कि साधे सरळ वागायचे बोलायचे मुंबईला सेटल होईतोवर हे चालले पुढेही वर्षातून एखादी चक्कर व्हायची १९८० नंतर सर्व कमी होत गेले पण पुढे अजिंक्य देवची प्रत्येक फिल्म आम्ही पाहिली ते वडिलांच्या आग्रहास्तव !
मुंबईला आलो तेव्हा लिस्टमध्ये रमेश देव होतेच मी फोन केल्यावर ते अजिंक्यला फोन करून ते थेट घरीच ये म्हणाले अजिंक्यला मी फोन करून मी पत्ता घेतला आणि भेटलो मी तिळवेंचा मुलगा आहे म्हंटल्यावर सीमा देव एकदम खुश झाल्या रमेश देवांनी सर्वांची आस्थेने चौकशी केली मी त्यांना त्यांच्या शेजारचे अपडेट्स दिले एक जुना माहोल तयार झाला
पुढे मग अजिंक्यने मला शंकरच्या हिंदुस्थानी ह्या चित्रपटाची रिमेक करायची आहे तू लिहिशील का म्हणून विचारले मला कॉपी करायचा विलक्षण कंटाळा साहजिकच मी प्रयत्न करतो म्हणालो खरा पण माझ्याकडून काही प्रयत्न झाले नाही अजिंक्यच्याही लक्षात आलं असावं बहुदा ! त्याने नाद सोडला आणि नात्यात एक अवघडलेपणा आला
त्यानंतर मी भेटलो नाही आणि आता थेट वार्ताच आली . एका अत्यंत सज्जन अभिनेत्याचा हा अंत होता मी पुढेही अनेक स्टार्सना भेटलो पण रमेश देव ह्यांच्याइतका साधा सरळ अभिनेता मी पाहिला नाही त्यांची आनंदमधली भूमिका अनेकांच्या आवडीची पण मला जैसे को तैसा मधला खलनायक अधिक आवडला कारण ते जे न्हवते ते त्यांनी साकार केले होते आनंदमध्ये ते त्यांच्या स्वभावासारखे होते पुढे राजेश खन्नाबरोबर त्यांनी अनेक फिल्म्स केल्या . अभिताभबद्दल त्यांना कौतुक होते आणि आनंदच्या सेटवरचे त्यांनी सांगितलेले किस्से इंटरेस्टिंग होते रामपूरका लक्ष्मण सारख्या काही सुपरहिट फिल्म्स मध्ये त्यांनी काम केले
त्यांचे अभिनयाचे स्कूल हे राजा परांजपे ह्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेले होते ज्यात निरीक्षण, नाट्यशिलता व अनुसरणाला महत्व असायचे त्यांची पहिली महत्वाची फिल्म आंधळा मागतो एक डोळा ही राजा परांजपे ह्यांचीच होती त्यामुळे ते स्वाभाविक होते १९८० नंतर त्यांच्या अनेक हिंदी फिल्म्स आपटल्या आणि महत्वाच्या लेखक दिग्दर्शकांपासून ते दुरावले मात्र नंतर अचानक त्यांना जाहिरातक्षेत्रात निर्माता म्हणून जबरदस्त यश मिळायला सुरवात झाली आणि ते निर्मितीक्षेत्रात स्थिरावले त्यातूनच पुढे अभिनय देव (दिल्ली बेली )हा एक अफलातून दिग्दर्शक आकाराला आला
त्यांना थोडी अजिंक्याचीच काळजी होती आणि एक भविष्यावैज्ञानिक म्हणून तो किमान मराठीत तरी यशस्वी अभिनेता होईल अशी मी खात्री दिली होती
आपली दोन्ही मुलं कलाक्षेत्रात आणण्याची रिस्क त्यांनी घेतली आणि ती यशस्वी झाली
त्यांना माझी आदरांजली !
श्रीधर तिळवे नाईक
No comments:
Post a Comment