डिस्को लहर गेली श्रीधर तिळवे नाईक
भप्पी लाहिरी गेले आमच्या पिढीचा एक वादग्रस्त संगीतकार गेला आमची पिढी नाचायला लागली ती भप्पीदांच्या सुरक्षामधल्या मौसम है गानेका पासून मिथुन चक्रबर्तीला त्यांचा आवाज एकदम फिट्ट बसायचा आणि त्याच्या डिस्कोला वाव देणारे त्यांचे संगीत होते ज्याला फोर ऑन द फ्लोर बिट्स म्हणतात त्याचा भारतीय शैलीत वापर करणारे ते पहिले संगीतकार होते हा बिट त्यांच्याआधी आर डी बर्मन कल्याणजी आनंदजी ह्यांनी वापरला होता पण त्याला पॉप्युलर बनवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता पुढे डिस्को म्हणून पुढे आलेला हा संगीतप्रकार भप्पीदांनी प्रचंड हाताळला किंबहुना आर डी पेक्षा वेगळी ओळख ह्या वापरामुळेच निर्माण झाली
जर तिशोत्तरी जॅझची असेल साठोत्तरी रॉकची असेल तर आमची ऐंशोत्तरी ही डिस्कोची होती असं म्हणायला हरकत नाही सॅटरडे नाईट फिवर हा १९७७ चा चित्रपट माझ्या बालपणावर लॉन्ग टाइम ठसा उमटवून गेला होता आणि माझी डिस्कोशी ओळख इथूनच सुरु झाली
पुढे ए आर रेहमानपासून जे संगीताचे डिजिटल युग आले त्याची पायाभरणी भप्पीदांनी डिस्को मधून केली नैसर्गिक वाद्यांच्याकडून मॅनमेड वाद्यांच्याकडे सुरु झालेल्या प्रवासात ह्या ऐंशोत्तरी संगीताचा प्रचंड वाटा होता इलेक्ट्रिक पियानो आणि सिंथेसायझर ह्यांनी संगीताचे रूप पालटायला ह्याच काळात सुरवात केली प्रोग्रॅम्ड म्युझिकचा हा आरंभ होता मात्र ह्या बदलांची घनता आणि गहनता समजून घेणे भप्पीदांना जमले नाही ही त्यांची मर्यादा होती त्याऐवजी आर डी पासून वेगळी आयडेंटिटी निर्माण करणे आणि ह्या बदलाचा उथळपणे कमर्शियल वापर करणे ह्याकडे त्यांचा कल होता
आर डी बर्मनने ओ पी नय्यरला चॅलेंज करून स्वतःचे वेगळे म्युझिक प्रस्थापित केले आणि आरडीला फॉलो करणारे जतीन ललित , आनंद मिलिंद असे एक स्कूल निर्माण झाले भप्पीदा हे ह्या स्कूलमधले पहिले विद्यार्थी त्यांचे वडील अपरेश मुखर्जी बंग संगीतकार होते आणि लता मंगेशकरांचे त्यांच्याकडे येणे जाणे होते (त्यांनी त्यांच्यासाठी अनेक गाणी गायली होती ) किशोरकुमार अशोककुमार त्यांचे मामा होते साहजिकच घरी संगीताचा माहोल होता मुखर्जी फॅमिली ही इंडस्ट्रीतील एक मोठी फॅमिली (ह्या फॅमिलीतील सुजॉय मुखर्जी हा माझा एकेकाळी मित्र होता त्याच्यामुळे त्याचे वडील जॉय मुखर्जीचा परिचय झाला होता ) होती आणि तिचा त्यांना पाठिंबा होता मात्र ह्या फॅमिलीने उचलेगिरीला कधीच पाठिंबा दिला नाही आणि भप्पीदाला कधीकधी ह्यावरून ऐकवले जाई त्यामुळेच ओरिजिनल धून निर्माण करण्याची त्यांची तडस शाबूत राहिली
सुरवातीला त्यांनी आरडीच्या शैलीत संगीत दिले त्यांच्या दादू ह्या बंगाली फिल्ममधे लता मंगेशकर गायल्या तर किशोरमामाने (किशोरकुमार ) चलते चलते मेरे ये गीत याद रखना हे अजरामर गाणे गायिले आणि त्यांची घौडदौड सुरु झाली ह्याचवेळी आप की खातीर साठी बम्बयसे आया मेरा दोस्त गाजले
चलते चलते हा चित्रपट नायक विशाल आनंद देव आनंदची भुरटी नक्कल मारत होता त्यामुळे फ्लॉप झाला तरी त्यातील गाणी गाजली ह्यातले प्यारमे कभी कभी ऐसा हो जाता है हे भप्पीदांचे ड्युएट माझे ऑल टाइम फेवरीट आहे
मग सुरक्षा आला ह्यातील संगीत आर डी च्या शैलीत असूनही आर डी पेक्षा वेगळे होते ह्यातील दिल था अकेला अकेला मधुर होते तर मौसम हैं गानेका व गनमास्टर जी नाईन ट्रेन्डसेटर ! भप्पीदांनी मला झटका दिला तो तीन गाण्यांनी पहिले डिस्को डान्सरमधल्या याद आ रहा तेरा प्यार हे दर्दभरे गाणे हे दर्दभरे गाणे डान्सिकल फॉर्ममध्ये दर्द पेश करणारे पूर्णपणे वेगळे गाणे होते दुसरे वारदात मधले तू मुझे जानसेभी प्यारा है ने ह्यात नशिलेगिरी होती पण डिस्कोथेकमधली होती तिसरे गाणे सलमा आगाचे होते दिलके अरमान आसूंओमे बह गये सारखे सेमिक्लासिकल गाणे ऐकून माझ्या मनात तिच्याविषयी वेगळी इमेज होती भप्पीदांनी त्या इमेजचा अक्षरशः भुगा केला कसम पैदा करनेवालीकी मधले ये रातमें जो मजा हैं हे गाणे केवळ अभूतपूर्व होते आशा भोसलेंच्या साम्राज्याला ह्या गाण्याने तडा गेला आणि आशा भोसलेंच्यापेक्षाही वेगळ्या आवाजात हस्कीपणा निर्माण करता येतो हे भप्पीदांनी व सलमा आगाने सिद्ध केले (ह्या गाण्याचे जलवा ४ सारखे व्हर्जन्स ऐकावेत म्हणजे सलमा आगाच्या आवाजाची किंमत कळते शमशाद बेगमच्या स्कूलचा हा आवाज म्हणजे एक नवा व्हर्जन होता आणि तो भप्पीदांनी निर्माण केला होता दुर्देवाने सलमा आगा नंतर मुस्लिम परंपरेत परतली आणि अशी गाणी गाणे तिने बंद केले )ह्या गाण्यात मिथुन डान्स करत न्हवता पण त्याने ड्रम सेट वर जी ऍक्टिंग केली ती झकास होती ह्या गाण्यांच्यात भप्पी गहन होते एक वेगळा साउंड निर्माण करण्याचा सृजनशील प्रयत्न होता ह्याशिवाय मिथुनच्या डिस्को शैलीला पूरक देखा है मैने तुम्हे फिरसे पलटके सारखी आमच्यासारख्या नाचखोर (मराठी समाजाच्या दृष्टीने वाया गेलेल्या ) लोकांना डान्सप्रवण करणारी अनेक गाणी भप्पीदांनी दिली .
प्रकाश मेहरांना खास कल्याणजी आनंदजी शैलीत त्यांनी नमक हलाल व शराबी मधली गाणी दिली आणि त्यासाठी त्यांना पारितोषिके दिली गेली ही गाणे छान होती पण जहाँ चार यार मिल जाये व इंतेहा हो गयी इंतजारकी(हे थर्ड डिग्री ह्या अलबमची कॉपी केलेले गाणे होते ) ही फक्त दोन गाणी भप्पीदा टचची होती बाकी सारा मामला कल्याणजी आनंदजीसारखा होता त्यातील मंजिले अपनी जगह व पग घुंगरू बांध मीरा नाची थी गाजली
बॉलिवूडमध्ये प्रोड्युसर आणि ऍक्टर्स अनेकदा संगीतकारांना "ह्या गाण्याची कॉपी करा " म्हणून विनंती करतात अशावेळी नकार दिला तर संपूर्ण चित्रपट हातातून जातो त्यामुळे अनेकदा संगीतकार झक मारत चोऱ्या करतात कधीकधी कॉप्या करण्याचा मोह आवरत नाही भप्पीदा ह्याला अपवाद न्हवते त्यांच्या प्यारा दुश्मन मधील हरी ओम हरी सरळ सरळ इरप्शनची कॉपी होती झुबीझुबी हे मॉडर्न टॉकिंगची कोई यहाँ नाचे नाचे द बगल्स ची मेरे पास आओगे (टारझन ) हे मिडल ऑफ द रोडचे ह्याच चित्रपटातील जिलेले जिलेले ओसीबीसा जिमी जिमी हे ओटवनचे वैग्रे (ही यादी खूप मोठी आहे ) नक्कल होते कथेबाबत सलीम जावेद व संगीताबाबत भप्पी लाहिरी ह्यांनी चोरीला ऑफिशियल केले त्यांना स्वतःला ह्या चोऱ्या पसंत न्हवत्या असं ते म्हणत पण काळ बदललाय आणि मी हे केले नसते तर टिकलो तर टिकलो नसतो असा त्यांचा दावा होता
जे अमेरिकेत होते ते बॉलिवूडमध्ये दहा वर्षांनी होते १२ जुलै १९७९ ला अमेरिकेत डिस्को डिमॉलिशन नाईट घडली आणि डिस्को संगीताच्या पतनाला सुरवात झाली आपल्याकडे हे पतन १९९० ला सुरु झाले आणि हळूहळू भप्पीदांचे वर्चस्व संपत गेले ए आर रेहमानने ह्या पिढीला चॅलेंज दिले आणि पुढे साजिद वाजिद विशाल भारद्वाज अमित त्रिवेदी ह्यासारख्या संगीतकारांनी ह्या युगाचे वर्चस्व संपवले
ह्या काळात साऊथमध्ये इलाया राजा जबरदस्त निर्मिती करत होता त्यामुळे भप्पीदांना क्लासिकल दर्जा प्राप्त झाला नाही पण डिस्को संगीताचे त्यांनी अफलातून भारतीयीकरण केले ह्याबद्दल शंका नाही इलायाने असेंडिंग नोट्स निर्माण करून त्यात जी क्रांती केली तशी कोणतीही क्रांती भप्पीदांना जमली नाही इलायाने ए आर रहमान , युवा शंकर ह्यांच्यासारखे त्यांचे संगीत पुढे न्हेणारे शिष्य निर्माण केले तसंही काही बप्पीदांना जमलं असं दिसत नाही आजसुद्धा भप्पीदांनी जे केले त्याचे मूल्यमापन करणं जड जातं कारण त्यांचे कोणते गाणे चोरी केलेलं निघेल सांगता येत नाही
आजच्या पिढीला मात्र ते माहिती झाले ते डर्टी पिक्चरमधल्या उ लाला उलाला ह्या गाण्यामुळे ! त्यांचे आमच्या काळात दुर्लक्षित झालेले कलियोको चमन सारखे गाणे अचानक रिमिक्समध्ये हिट झाले ह्याबाबतीत जी केस झाली ती त्यांनी जिंकली .
एक गोष्ट नक्की त्यांनी आमच्या कुमार वयात एक वेगळा नृत्यप्रधान साउंड दिला आणि आम्हाला मनसोक्त नाचू दिले त्यांना माझी आदरांजली !
श्रीधर तिळवे नाईक
No comments:
Post a Comment