Wednesday, February 13, 2019

विष्णू सूर्या वाघ गेला . तो विष्णू होता सूर्य होता आणि वाघही होता . विष्णू होता कारण गोवन परम्परा रोमँटिक आणि सुमधुर भाषेत कशी मांडायची हे त्याला नीट माहित होते आणि तिचा वापर स्वतःच्या भल्यासाठी कसा करायचा हेही त्याला पॉलिटिकली नीट माहित होते तो सूर्य होता कारण सगळ्या काव्यग्रहांना स्वतःभोवती कसे फिरवायचे हे त्याला माहित होते त्याच्या भाषेचा प्रकाश त्याला नीट माहित होता गोव्याचा माहोलच असा आहे कि तुम्ही रोमँटिक आपसूकच होता मात्र हा रोमँटिक माहोल सामाजिक करणारे जे काही कवी होते त्यातील तो एक होता माझे दोन मित्र दैनिक गोमंतकाचे  संपादक झाले श्रीराम पचिंद्रे आणि विष्णू . विष्णूने गोमंतकाला एक चेहरा दिला  त्याचे अमोघ वक्तृत्व त्याला शेवटी राजकारणात घेऊन आले तिथेही   तो गोव्यातील बहुजनवादाचा वाघ म्हणून वावरला  .

तो माझा वैचारिक शत्रू होता आणि आम्हा उभयतांना हे प्रेमळ शत्रुत्व मान्य होते त्याचे मगोप सोडणे मला कधीच आवडले नाही पण त्याच्याकडे त्याची कारणे होती पुढे त्याने भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिथे तो इलेक्शन जिंकलाही पण त्या जिंकण्यातही एक अस्वस्थता होती किंबहुना अस्वस्थता आणि चंचलता त्याचा स्थायीभाव होती कि काय असे वाटावे इतक्या वेगाने त्याचे स्टान्स काहीवेळा बदलत त्यामुळेच मगोप , शिवसेना , काँग्रेस आणि भाजप अशा चारही पक्षात त्याची फेरी झाली

रोमँटिक माणसाचे सारे गुणदोष त्याच्यात होते आणि विलक्षण आवेगात जगण्याचा झेलझपाटाही त्याच्या तुकारामावरच्या तुका अभंग अभंग नाटकाने जो त्याकाळी वाद निर्माण झाला होता तेव्हा मी सौष्ठवमधून संपादकीय लिहून त्याला जाहीर पाठिंबा दिला होता मात्र तसाच पाठिंबा मी त्याच्या कवितेला द्यावा ही त्याची अपेक्षा मी कधीच पूर्ण केली नाही त्याने गोव्यात भरवलेल्या काव्यहोत्राला  मी ठाम भाषेत नकार दिल्याने तो माझ्यावर चांगलाच उखडला होता पण माझा नाईलाज होता आमच्यातल्या वैचारिक मतभेदांनी आमच्या मैत्रीचा बळी घेऊ नये म्हणून मी जागरूक असे आणि गोव्यात गेलो कि शक्यतो कॉन्टक्ट करी पण त्याच्या दृष्टीने मी च्यू असल्याने हळूहळू आमचे नाते विरत गेले

त्याच्या सुदिरसुक्तातील फरक ह्या कवितेवरून  झालेला वाद तर अनावश्यक होता शूद्रांच्या पॉईंट ऑफ व्हू ने मांडलेली ही कविता एव्हढी वादग्रस्त होईल असे कुणालाच वाटले न्हवते गोव्याच्या बदलत चाललेल्या चेहऱ्याची ती नांदी आहे

आज तो गेलाय तर याज्ञवल्कावरून आम्ही दोघांनी घातलेले वाद आठवतायत त्याचा बोलण्याचा धबधबा आठवतोय त्याच्या स्वभावातील राजकारणात राहूनही त्याने जपलेली आर्तता आठवतीये त्याचा बिनधास्त पणा आठवतोय तो गेले काही महिने आजारी होता मात्र त्यातूनही वाचून परतला होता त्यामुळे सर्व काही कदाचित ठीक होईल असं वाटत असतानाच तो अनपेक्षितपणे गेला

एका तडफेचा अंत असा व्हायला नको होता

गुड बाय विष्णू

श्रीधर तिळवे नाईक 

No comments: