Thursday, April 9, 2015

कविंनो , तुम्ही कवितेच्या धंद्याला तयार आहात का ?
श्रीधर तिळवे
कविंनो ,
एकविसाव्या शतकातील कविंनो

साधारण एक मिल्लीयन डोळे डीजीटल
पण कवितेला अवेलेबल फक्त दहा

इन्टरनेटवर नग्नता सिडक्शनचि लाल बाराखडी गिरवत बॉडीफोय होतीये
कम्युनिकेशनचि battery all time चार्ज होतीये
इन्फर मेशनला fashion चा दर्जा प्राप्त होतोय
आणि जो तो तिने डीझाईन केलेले कपडे घालून वेबसाईटतोय

ह्या बेसुमार काळात
कवितेच्या कपड्याखाली बॉडीच उरलेली नाहीये
कवितेची battery हृदयाला रिचार्ज करत नाहीये
कवितेच्या वेबसाईटवर कुणी राहायला येत नाहीये

अश्यावेळी कवितेच्या धंद्याला तुम्ही तयार आहात का कविंनो ?

चेहऱ्यांना मेकप करून त्यांना मुखवटा बनवणारे सौंदर्यशास्त्र आसपास
विशफील थिंकिंगचा सोप ओपेरा सादर करणारे व्यवहारज्ञान थेट श्वासात

हे पाईपड्रीम आहे की पाईपांचा बिझनेस आहे ?
हे टेकचे फ्युचर आहे कि रीवोल्युशनचे फीचर आहे ?

कंपन्या रीस्कमध्ये भळभळतायत कि फळफळतायत ?
हा काळावरचा आक्षेप आहे कि काळातला हस्तक्षेप आहे ?

माणसाला डीजीटीव नेटिव बनवणारा हा काळ
काळजाला सोशल मेडीआ बनवणारा हा इंटरनेटचा फाळ

कवितेचे फळकूट घेवून कुठे जाणार आहात कवींनो ?

जो स्नूझर  तो लूझर
जो गेट तो ग्रेट

कॉम्पुटरपुढे सर्व समान
कॉम्पुटरपुढे सर्व सामान

साईझ इररिलेवन्ट होत चाललेल्या ह्या अवकाशात
कवितेच्या फॉर्मवर कसली बोडक्याची चर्चा करताय कवींनो ?

सर्वत्र रिटर्न मिळण्याऱ्या ह्या काळात
कवितेवर परतावा नाही
जगभर पळाली तरी
कौऊटिंगमध्ये तिच्या नावाने धावा नाहीत

ती चेंजचा ईवोल्विङ्ग फोर्स नाही
ती कशाचाही ओरीजनल सोर्स नाही

ना बेटर ना चीपर ना फास्टर
ना सेवर ना लीपर ना सर्वर

ती मार्केटमध्ये इतकी इररीलेवंट
कि तिला धन्द्यालाही बसवता येत नाही

ती पाळीत कायमची उभी  कवींनो
मुलांना जन्म देवून जळतिये तिची नाभी

ती वाचकात नाहीशी होणार नाही
ती वाचक नसल्याने नाहीशी होणार आहे

तेव्हा
सेकंदाला दहा लाख ढग तयार करण्याऱ्या ह्या कूल वादळात
कवींचे कुल
एप्रिल फूल आहे………………कवींनो

( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )

श्रीधर तिळवे

No comments: