Thursday, April 30, 2015

खरखर /श्रीधर तिळवे 

१८

ग्राविटीज  डिसलोकेट करून 
आत्मविश्वास बलाढ्यतेत उडतोय 


चांगले आणि वाईट 
दोघेही नक्कलच करतायत ट्रेण्डसची 

मी मेमरीजही ट्रान्झीटरी  करतोय 

अर्थाशिवायही शब्द उडवता  येतो 
फक्त अभिनयात विश्वास हवा 

मिडीयात  माझी वर्णने आहेत 


ही फोटोवरील खरखर व्हिडीओत काय खाजवतीये ?

श्रीधर तिळवे -नाईक

क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )

Wednesday, April 29, 2015

साउन्ड / श्रीधर तिळवे 

१६

स्टूडीओत डिजिटल स्फोट होतायत 

कानांत लोट 
नग्न ध्वनी मेंदूपर्यंत सौम्यरस पीत हेलकांडतोय 

साउन्डची चित्रे अतिग्राफिकवादात माझा गळा  बुच्काळतायत 

माझा  टेरीरीस्ट  आवाज गातोय
आवाजातून गाणहीं  उगवतय 
मात्र त्याचा अर्थ लागत नाही 

निर्माता म्हणतोय 
गाण्यातून गाण्यात इनवेस्ट केलेला ''अर्थ ''प्राप्त व्हायला हवा 
आपली ''गुड अर्थ '' हलायला हवी 
बाकी अर्थ-बिर्थ निघाला निघाला 
नाही निघाला नाही निघाला 
आपणाला कुठ ऑस्करला जायचय ?

मी बहिरा होतोय 
मी ठार बहिरा होत गातोय  

साऊ न्ड रेकॉरडीस्ट म्हणतोय 
''हिट साहेब लय हिट 
पब्लिक डोक्यावर घेणार ''

श्रीधर तिळवे -नाईक 




 ( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )

Tuesday, April 28, 2015

फुले /श्रीधर तिळवे  

१४

फुलांचा सुवास ओळखता न आल्याने
माझ्या खोलीतील रिअल माळी फुलांत नाहीसे होतायत

इन्टरनेटवर सुवास नाही
आणि फुले अशी कचकचीत नवी कि …

मला कळत नाहीये ह्या नव्या फुलांचा
सामना कसा करावा ?

जगातले प्रत्येक फुल इन्टरनेटवर थोडेच आहे?

 फुले  माझ्या दारावर थापा न मारता
जमतायत
त्यांना त्यांच्याविषयी शास्त्रीय माहिती हवीये

केवळ सुवासाने माळी नाहीशी करणारी फुले
रिअल फुले
मला ओळखता येत नाहीयेत

माझ्या घराची बाग हादरलिये
अबोली लाल पडतीये
अनंत अंत शोधतोय
जास्वंदी ओसाड गावची महाराणी बनतीये

थेट घरात घुसणारी ही पहलीच   फुले
आख्खी नागेशी शांत आहे

फुले शंकराचा तिसरा डोळा असल्यासारखी
मला LAPTOP ला   थेट पाहतायत

बाग हादरलिये माळी नाहीशी झाल्याने
माझे घर जे फुलण्यासाठी फेमस होते
ह्या फुलांमुळे आपण बदनाम होणार म्हणून
भिंतीत येरझाऱ्या करतय

ओळख झाली कि सामना करता येईल म्हणून मीही
फुलांची आय़्डेण्टीटी शोधतोय
 फुले  माझ्या आसपास बसून नागडा स्क्रीन पाहतायत
फुलांना कधीपासून ओळखीचे कपडे अंगावर लागू लागले ?

सर्च इंजिन नन्नाचा पाढा वाचतय

LAPTOP वर  माझी बोट डिजिटल असल्यासारखी नाहीशी होतायत

त्यांचा  सुवास माझ्या रूममध्ये  भोजन करतोय

पुस्तके सीडीज डीविडीज फस्त होतायत

मी नाहीसा होतोय
आणि फुले कि -बोर्डाला रिप्लेस करत
सुवासनृत्य करतायत

श्रीधर तिळवे -नाईक 

Monday, April 27, 2015

१५ 

अस्तित्वावर निर्णय सोपवण्याचे दिवस  

श्रीधर तिळवे 
अस्तित्वावर निर्णय सोपवण्याचे दिवस 
संपत चाललेत 
अस्तित्व आहे फक्त  फुटबाल 
ज्याच्याशी मैदानात उतरलेले कुणीही खेळतय 


आता चोईस हा त्रास नाही 
चंगळ आहे 
प्रत्येकाच्या वाट्याला आलेली 

आता आत काय आहे विचारू नकोस 
जे काही असेल ते फक्त जाहिरात असेल 

बाहेर काय आहे ते स्पष्टच आहे 


सर्वच विक्रीला ठेवले गेले आहे 
आणि ग्राहक म्हणून तुला काही हक्कही दिले गेले आहेत 

फक्त तुला स्वःताला विकायचे आहे 
जेणेकरून तुला जे हवे आहे 
ते तू खरेदी करू शकशील 

हे डील आहे 
आणि ह्यातून मुक्तता नाही 


तेव्हा सर्वस्व पणाला लावून स्वः ताला विक 
 खरीदला गेला नाहीस तर 
पडून पडून एक्स्पायर होशील 


स्वः ताला न विकण्याचे स्वातन्त्र्य तुला आहे 


पण ह्या स्वातन्त्र्यात आणि मरण्यात 
काहीच फरक नाही 


मला आनंद आहे कि तू स्वातंत्र्य निवडलंस 


बघ 
बाजाराच्याबाहेर मरणाचा आनंद आहे 

आनंद !

श्रीधर तिळवे-नाईक 
क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )

Sunday, April 26, 2015

सफर  /श्रीधर तिळवे 
१३
परतताना चार्म उरलेला नाहीये

माउथवॉश केला तर दात मावळले
चमत्कार केला तर चेहऱ्यावरील जादू मावळली

ब्युटीपार्लरमध्ये थांबलो तर ग्रेस गेली
बोलायला गेलो तर तोंडात ब्रेकडाऊन

अक्सिसना अक्सेस मिळाला नाही
 रिलेशनशिपला सक्सेस

प्रेक्षक मावळले
रिसिव्हर मावळले
कम्युनिकेशन मावळले


उगवायचा प्रयत्न केला
तेव्हा कळाले
पेरलेलेच न्हवते काही

मग इन्फ़्लुएन्स न टाकता
मुकाट परतलो
नवा पासवर्ड टाकण्यासाठी

 ( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )
१४
पेजर /श्रीधर तिळवे 
पेजर व्हायब्रटरतोय
मेसेज डोक्यात जातोय
पुन्हा पेजरमध्ये परततोय


तीन बटण तीन दिशा
अविरत पण भसाभसा
माझं प्रेत वाहतय

सर्व सखोल पेजरत पेजरत
उथळ होतय
श्रीधर तिळवे 

 ( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )
भालचंद्र नेमाडे ह्यांचे ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना केलेले  भाषण
श्रीधर तिळवे

भालचंद्र नेमाडे ह्यांनी ज्ञानपीठ स्वीकारताना केलेले भाषण हे एका लेखकाचे भाषण वाटलेच नाही . असे वाटले कि retirement घ्यायला निघालेला प्राध्यापक आपल्या नोकरीतील कामाविषयी अवघडलेल्या अवस्थेत बोलतोय . मुख्य म्हणजे नेमाडेंचा नेहमीचा मिश्किल लेखक मिसिंग होता . असे का घडले ? कारण उघड आहे . नेमाडेंनी भाषणासाठी निवडलेली भाषा . नेमाडे मराठीत भाषण करून आपला देशीवाद मांडतील अशी अपेक्षा होती पण प्रत्यक्ष कृती करताना त्यांना मार्गी निवडणे भाग पडले आणि त्यांनी चौथ्या नवतेची ''मार्गी , देशी ,पोटी आणि जमाती ह्यांचा समतोल हवा आणि मार्गीसाठी इंग्लिश अपरिहार्य आहे '' ही भूमिका स्वीकारली. हा विरोधाभास आजचा नाही . सुरवातीपासूनचा  आहे .  इंग्लिश मध्ये भाषण करताना मिश्कीलता येणार कशी आणि कुठून ? वाईट गोष्ट म्हणजे नेमाडे नैसर्गिक ही वाटले नाहीत .

मात्र ह्या भाषणात त्यांनी आपली लेखनभूमिका अत्यंत नेमक्या भाषेत मांडली . नेमाडे नेहमीच अवकाश आणि काळ अशी वैज्ञानिक  सुरवात करतात जी मलाही मान्य आहे मग नेमाडे हळूच मागील दाराने परंपरा आणतात जी मला अमान्य आहे . इथेही त्यांनी तेच केले . मग हजारो वर्षाचे सातत्य त्यांनी आणले आणि शेवटी नवे होऊन पुन्हा तसेच होतो असे सांगितले . आमचे म्हणणे असे कि एखादी गोष्ट सातत्याने टिकली म्हणून महान होत नाही अन्यथा जातीव्यवस्था, अस्पृश्यता आणि गुरूचरित्र ह्यांनाही महान म्हणावे लागेल . बुद्ध टिकला म्हणून महान नाही तर महान आहे वसुधैव ग्लोबल आहे म्हणून टिकला . अर्थात सर्वच महान गोष्टी टिकत नाहीत . अनेकदा रानटी लोकांनी महान गोष्टी जाळून वा आघात करून नष्ट केल्या आहेत उदाहरणार्थ सहज आणि तीलोपा  ह्यान्च्या कविता . त्या भारतातून नष्ट झाल्या होत्या . तिबेटी बुद्धिस्ट धारेने त्या टिकवल्या म्हणून मिळाल्या . महान गोष्टी फक्त निर्माण होऊन चालत नाहीत तर त्या टिकवाव्या लागतात प्रतिगामी संस्कृती प्रतिगामी गोष्टी टिकवतात उदा . गुरुचरित्र , वेद पुरोगामी संस्कृती पुरोगामी गोष्टी टिकवतात .प्रश्न असा कि महान गोष्टी महान का होतात नेमाडे म्हणतात देशियतेमुळे आम्ही म्हणतो मार्गी , देशी , पोटी आणि जमाती ह्यांच्या समतोलामुळे हा समतोल साधण्यात देशीवाद एक अडथळा म्हणून अडगळीसारखा आडवा येतो म्हणून आमचा देशिवादाला विरोध आहे आणि मार्गीपण, देशीपण , पोटीपण आणि जमातीपण ह्यांना पाठींबा आहे . नेमाडे ह्यांनी ह्याही भाषणात देशीवाद मांडला . इंग्लिशमधून मांडला . पण देशिवाद्च मांडला .

 त्यानंतर मोदींनी वेद आणि वेदातील वैज्ञानिकता हा हिंदुत्वाचा लाडका अजेंडा आणलाच आणि आम्ही ज्याची मांडणी करतो तो सिद्धांत  '' देशीवाद हा अंतिमतः मूलतत्ववाद्यांना मदत करणार आहे '' सिद्ध केला . वेदकाळात जसे ऋषी तसे नेमाडे असे सांगून भविष्यकाळातील नेमाडेंची ऋषी भालचंद्र नेमाडे ही प्रतिमाही प्रज्वलित केली . नेमाडेपेक्षा मोदी अधिक नैसर्गिक वाटले .

मोदींनी मांडलेला सरस्वतीबरोबर लक्ष्मी आली पाहिजे हा मुद्दा अचूक होता . पण मला एकदा चित्रपट अभिनेता गोविंदा ह्याच्या आईने म्हणजे निर्मलाआईनी सांगितलेला मुद्दा त्याला जोडावसा वाटतो तो म्हणजे '' श्रीधर बेटा इस फिल्डमे आना है तो एक बात ध्यानमे रख ये दुनियाका एकमात्र फिल्ड ऐसा हैं जिसमे लक्ष्मी सरस्वतिके पीछे आती हैं ।'' ते अकरा लाख रुपये म्हणजे सरस्वतीच्या पाठीमागे आलेली लक्ष्मी होती . नेमाडे कधीही शक्य असूनही लक्ष्मिच्या मागे गेले नाहीत . त्यांनी अत्यंत जीव पणाला लावून सरस्वतीची साधना केली ज्ञानपीठ हा त्या साधनेचा गौरव आहे आणि नेमाडे त्याला पूर्ण पात्र आहेत . नेमाडे ह्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन !

Friday, April 24, 2015

alice इन कॉम्पुटर  land / श्रीधर तिळवे 

१२

गुंतागुंतीचा करंट करंट 
मोटिवेशन डब करतोय उमलत्या एरियात 

सिम्बोइसिसला सतरा तोंन्ड इन्टरनेटीन्ग्ची  अन 
ट्रेण्डसच्या अठरापगड जाती च्यानेलमुडी 

alice इज इनसीक्युर इन हर कम्प्युटरland हो ना alice ?

मेसेज ड्रोपऑउट होतायत तुझ्या श्वासल डिझाईनमधून 

काळीजरक्षक गुप्ततॆ तून  अध्याप नरभक्षक वहात नाहीये 
पण कधीही वाहील 

चल जिवंतपणाची अडवायजरी  कमिटी  नेमू 
आणि ह्या ब्यांफलिंग ब्याटल्स लढायला प्रपोज करू 

माझा कोड्ब्रेक्रर हात इनफेमस झालाय म्हणून काय झालं ?
ह्या डीफिकल्ट टू ब्रेकमधून ब्रेकथ्रू मिळवून देईन 
तहहयात कंपनीला 

आत्ता ह्यातही तुला इनबिल्ट जेलचा चेहरा दिसत असेल 
तर माझ्या स्वातंत्र्याचा नाईलाज आहे 

जा पळण्याऱ्या जहाजासारखी 

मात्र एक लक्ष्यात ठेव 

पळण्याऱ्या जहाजाच्या गांडीला 
समुद्र ढुंकूनही पहात नाही 

जा तुझी एकुलती एक न्यूड  body 
लीड करत alice 
( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )


Thursday, April 23, 2015

क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )


११

रिसेशन 

श्रीधर तिळवे 



miracle मागणारी कंपनी 

magic मागणारा बॉस 


गोस्सिप मागणारी मैत्रीण 

रिटर्न मागणारे शेअरहोल्डर्स 



अंधश्रद्धा निर्मुलन समिती 
इथेही अल्पमतात 


मी रीझाईन करून 
ही कविता लिहितोय . 

श्रीधर तिळवे नाईक 
१०

खादाड 

श्रीधर तिळवे 

झाडे सूर्यप्रकाश खाऊन गुजारा करतायत 
प्राणी झाडे खाऊन गुजारा करतायत  
नॉन्वेज प्राणी व्हेज प्राण्यांना खाऊन गुजारा करतायत 


लम्प स्वतःला स्पिन करून 
एकाच डिस्कमध्ये स्वतःला कोंबून 
महालम्प्च्या पोटात चाललेत 


महा लम्प आपला सारा सूर्य प्रकाश माळून 
एका अज्ञात पोटात चाललेत 
जे काळे कि गोरे हेही त्यांना माहित नाही 

प्रत्येकजण भक्ष्य आहे 
प्रत्येकजण शिकारी 


एक आहारसाखळी चालू आहे सर्वत्र 

अपघात होतात 
पण ते कुणाच्याच लक्ष्यात रहात नाहीत 

मी डायनोसर आठवणीत म्यान करून 
मेमरीबाजीत डिजिटलतोय 

ह्या डायनोसरमुळे मी कधीकाळी भूमिगत झालो होतो 
आणि आज त्यांना मी भूमीतून फ़ोस्सिलवत उभे करतो आहे 

माझ्या सूक्ष्म असण्याने त्यांच्यावर कधीकाळी मात केली होती 
हा विचारच मेंदूला हायबरनेट करतोय 

ते जिवंत असताना त्यांना त्यांच्या टिकण्याविषयी 
आत्मविश्वास वाटला असेल का ?
आणि जेव्हा ते नष्ट होत होते 
तेव्हा त्यांना ते नष्ट होत आहेत हे कळले असेल का ?

प्रकाश त्यांनीही खाल्ला असेल 
झाडे त्यांनीही खाल्ली असतील 
प्राणी त्यांनीही खाल्ले असतील 
पण मिटींऑर डोक्यावर आदळायला येत असतांना 
त्यांना त्याचा सुगावा तरी लागला असेल का ?

आहाराची साखळी डिस्टर्ब करायला हा कोण आगंतुक आला 
असे त्यांनी विचारले असेल का ?
कि त्यांनी त्याला खाण्याचा विचार केला असेल ?

कदाचित ते निर्बुद्ध म्हणूनच मेले असतील 
किंवा फक्त खादाड म्हणून 

खाली वाकून खाताना डोक्यावर काय पडते आहे 
ते थोडच दिसत ?

आपल्या डोक्यावर ग्लोबल वार्मिंग लटकते आहे 
आणि ये दिल मांगे मोर म्हणत 
डायनासरच्या फ़ॊसीलभवती बसून 
आपण कोक पितोच आहोत ना ?

श्रीधर तिळवे  

 ( 
क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )

Wednesday, April 22, 2015

प्रसन्न जोशी  ह्यांनी कोसला संदर्भात विचारलेल्या  कोसलाने व तश्या कादंबऱ्यानी दलित नायकाची वाट  अडवून धरली का  ह्या  प्रश्नाचे उत्तर 
श्रीधर तिळवे 

प्रसन्नजी प्रथम आभार मानतो . दलितांचा पहिला नायक खुद्द आंबेडकरच होते साहित्यात विशेषत : महाकृतीत त्या लेवलचा नायक अजूनही दलित कादम्बरीकारांना जन्माला घालता आलेला नाही . त्यामुळे कोसलापूर्वी महान  दलित कादम्बरी म्हणावी अशी दिसत नाही कोसला आधीच आली त्यामुळे कोसलाने दलित नायक संपवला वा अडवून धरला असे म्हणता येणार नाही वास्तविक अण्णाभाऊ साठेंनी पार्श्वभूमी निर्माण केली होती . बाबुराव बागुलांच्या कथांनीही ही पार्श्वभूमी पुढे न्हेली होती पण त्यातून नवा नायक अवतरला तो आत्मचरित्रात्मक ! दगडू पवार पासून ! नेमाडेंच्या नायकाने न्हवे तर नेमाडेंच्या देशीवादाने दलित नायक अडवून ठेवला गावगाड्यात पाणी अडवावे तसा ! ह्यातच भर म्हणून नेमाडेंच्यात झालेला बदल ढसाळांच्या पुरेसा लक्ष्यात आला नाही त्यामुळे पाणी अडलंय कुठे हेच कळले नाही . नेमाडेंनी जातीच्या आडव्या अक्षाचा पुरस्कार केला तरी हे लोक नेमाडेंना पाठींबा देत राहिले . आडव्या अक्षात उच्च निच्च गेले तरी जन्मजात व्यवसाय तसाच राहतो हे आजही अनेक दलितांच्या लक्ष्यात येत नाहीये मी ह्यावर ''आत्मचरित्रातले  काल्पनिक क्षण '' ह्या काव्य -कादम्बरीत दीर्घ लिहिले आहे . पण लक्षात कोण घेतो ? पुढे ओबीसी फुलेवादी समूह जागा झाला त्यातून नवा सुशिक्षित ओबीसी लेखक उदयाला आले आणि त्यांना नेमाडेंच्यात नायक दिसला ह्याला आनंद यादवांचा वैचारिक भोंगळपणा जबाबदार होता आज शेतकरी वर्गाची अवस्था गोतावळ्याशी जास्त जुळते कोसला व नेमाडे ह्यांच्या इतर  कादंबऱ्याशी नाही तरीही यादव सत्यकथेच्या stamp मुळे मागे पडले दुसरी गोष्ट शेतकरी लेखकांनाही आता शेतकरी रहावयाचे न्हवते तर नेमाडेंच्या प्रमाणे चकाचक नोकरी करून प्रतिष्ठा कमवायची होती त्यातच नेमाडेंनी उघडपणाने फुलेवादी भूमिका स्वीकारली आनंद  यादवां च्या समरसता मंचापेक्षा ही भूमिका कणखर होती त्यामुळे नेमाडे हे ओबीसी समुहाचे आदर्श नायक बनले दोघेही अंतिमत : हिंदुत्वात जाऊन उडी मारणार आहेत हे कुणाच्याच लक्षात आले नाही कुणबी वर्गाला शहाण्णव कुळी बन ण्याचे जे वेध लागले होते /आहे त्याचे हे साहित्यिक प्रतिबिंब होते /आहे . ह्या सगळ्या प्रक्रियेत ज्या दलितांना नवा नायक निर्माण करायचा होता त्यांची फारच कुचम्ब् ना झाली .सामाजिक पातळीवर दलितांचे गावात क्षत्रिय आणि ओबीसी समूहाशी संघर्ष सुरु झाले गावात ब्राह्मण नसल्याने ब्राह्मणांना शिव्या तरी कशा घालणार आणि किती घालणार शिवाय शहरात ओबीसी आणि दलित दोघेही समान-संघर्षी त्यामुळे कोसलाशी नाते जुळते आणि व्यापक पातळीवर जुळत ही नाही असा तिढा निर्माण झाला वास्तविक लेखक नेमाडेंना सलाम आणि देशीवादी नेमाडेंना टाटा आणि गुडबाय अशीच भूमिका सर्व दलित लेखकांनी घ्यायला हवी होती पण ती न घेतल्याने पांडुरंग सांगवीकर नेमका का आवडतो ह्याची मीमांसा झालीच नाही . ज्यांना मृत्युंजय स्वामी आवडते त्यांनाच कोसलाही आवडते हे ढळढळीत सत्य अनेकांना दिसले नाही . पांडुरंग सांगवीकर बाबासाहेबांच्या शहरात चला ह्या संदेश्याच्या विपरीत आधुनिकतेला घाबरून गावात परततो त्यामुळे आपल्याला ज्यांना शहरातील आधुनिकता अवगत करून नवे जग निर्माण करायचे आहे त्यांना पांडुरंग सांगवीकर काही कामाचा नाही हेच अनेक दलित लेखकांच्या लक्षात आले नाही माझ्या अडाहव्का बानासुना ह्या कादंबरीबाबत एकाची तक्रार काय तर तुझा नायक फारच कृत्या करतो . म्हणजे पांडुरंग सांगवीकरासारखी मनातल्या मनात मांडे खाल्ले कि तो थोर मराठी नायक ! शेवटी परंपरेच्या खुंटावर मुकाट येवून बसला कि तो थोर मराठी नायक !  ह्या नायकाला व त्याच्या पराभवाला  देशीवादाने परंपरेचे मखमली म्यान पुरवले परिणामी सर्वत्र कोसलाच कोसला नेमाडेच नेमाडे ! मग भुरटे नेमाडे प्रतीनेमाडे !
थो ड क्या त काय तर कोसलाने न्हवे   कोसलाला नंतर जे देशीवादी आवरण चढले त्या  देशिवादाच्या आवरणाने दलित नायकाची वाट अडवून धरली . मराठी साहित्याला एक कोसला आवश्यक होती देशिवादाने तिचा   नेमाड  पंथ बनवला आणि ह्या पंथाने अनेक दलित लेखकांना आंधळे केले .
श्रीधर तिळवे 

Tuesday, April 21, 2015


 जतीन साठी केलेला उपदेश 



रॉक करण्याचे दिवस संपले
अमेरिकन डायमंड खऱ्या भावात विक

डोण्ट कनफ्युज
भाषा प्लास्टिक आहे
काहीही बनू शकते

निवड हीही सक्ती असू शकते
कधी कधी विंडो शॉपिन्गही कर

विजेचे लोड्शेडींग चालू असताना
इन्फरमेशनच्या मुबलकतेवर चर्चा नको

ईण्टींमेट हो इंटेन्स हो
पण डाव्या खिशात नेहमी कंडोम बाळग

ईश्वर तुझ्यामाझ्याप्रमाणेच  एकटा आहे
आस्तिकच बनणार असशील  तर
त्याला डिस्टर्ब न करता प्रार्थना कर

न - असण्याला घाबर आणि मृत्युनंतर काहीच परतत नाही
हे  ओळखून नात्यांना सांभाळ

राजकारणात पडणार असशील तर एक सांगतो
हा जागा न बदलणारा समाज आहे

श्रीधर तिळवे
 ( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )

Monday, April 20, 2015

क व्ही २/ श्रीधर तिळवे 

सगळ कोरसमध्ये चाललय 
सगळ कोरसमध्ये चाललय


सोलो गाणाऱ्याला च्युत्यापात धाडल जातय

गोतावळा stamrतोय आणि बक्षिसे मिळवतोय

स्वःताला सिलेक्ट करणारे
थेट स्पॅममध्ये जाताय्यत

सुजेला त्सुनामी समजा
आणि हजारो fans मिळवा


दरवाजे विंडोजची नोकरी करतायत
आणि विंडोज घरातल्या माणसांना हाताळतायत

कविता फक्त स्वप्नातच स्फुरतायत
वास्तवात फुरफुरतायत

अंतहीन जोडण्यांची फक्त वर्णने

मी कविता लिहणार होतो
तर हात जगायला अमेरिकेला चाललाय

श्रीधर तिळवे 

Saturday, April 18, 2015

क व्ही २/ श्रीधर तिळवे 
चेहरा 
श्रीधर तिळवे 
सिंग्युलर इफेक्टपासून मी हे पोस्टर बनवलय 

त्याच्या ब्याकग्राउंडवर पहाट walk घेतीये 
डाव्या कोपऱ्यात फस्ट लिस्ट आहे 
उजव्या हिट लिस्ट 


मधोमध माझ्या मेंदूपासून बनवलेला क्लोनल पाय आहे 
बुटावर त्याच्या शेजारी वूडबस्टर चा ठसा 


ज्यांना माझा चेहरा हवाय त्यांच्यासाठी दिलाय एक option 
तळटीपेत कॅपिटलात 


 W W W  .SHRIDHAR TILVE . COM 
वर क्लिक करा 
आणि फेसइफेक्ट मिळवा 

मला हे पोस्टर सर्वत्र लावायचे आहे 
आणि माझा चेहरा आहे कि 
अद्याप अवतरलेला नाही 


विलास सारंगांचा चौथा  व्यक्तिवाद 
श्रीधर तिळवे 
विलास सारंग गेले . त्यांची तब्येत तशी काही वर्षे खराब होती आणि त्यांच्या मृत्यूची कुणकुण तशी लागलेली होती त्यामुळे धक्का न्हवता पण उदासी आलीच . 

विलास सारंग माझ्यासाठी नेहमीच '' सत्यकथेच्या पलीकडे गेलेले सत्यकथावादी कवी '' राहिले आणि त्यांच्या समीक्षेवर मी ''अभिधानन्तर''मध्ये ''अक्षरांचा श्रम केला :सत्यकथेचा आधुनिकवाद ''  असा एक प्रदीर्घ लेख लिहला होता आणि त्यांची मते खोडून काढण्याचा माझ्या परीने त्यात प्रयत्न केला होता. मराठीत साठोत्तरीतील  ज्यांच्याशी वाद घालावा असे वाटणारे जे काही मोजके प्रज्ञावंत लोक झाले त्यात विलास सारंग हे फार महत्वाचे प्रज्ञावंत लेखक होते . 

विलास सारंग मराठीत नेमका कोणता रोल पार पाडत होते ?

जगात विश्वीय युगात धर्माला आव्हान देणारे जे साहित्य जन्मले  त्यातून जगातला पहिला व्यक्तिवाद जन्मला . त्याचे स्वरूप हे प्रामुख्याने अध्यात्मिक होते.  एका अर्थाने हा अध्यात्मिक व्यक्तिवाद होता . त्याने प्रस्थापित धर्माला गदागदा हलवले . मराठीत ह्या व्यक्तिवादाची स्थापना ज्ञानेश्वर  चक्रधर आणि नामदेव  ह्या त्रयीने  केली .  ह्यातील ज्ञानेश्वरांना मराठी संस्कृतीने  बहिष्कृत केले होते  आणि पुढे त्यांना समाधी  घ्यायला लावली . चक्रधरांचा बहुधा दाभोळकर-पान्सरेन्च्याप्रमाणे खून झाला आणि नामदेवांना त्यांच्या घराण्याचा विठ्ठल मंदिरावरचा हक्क सोडायला लावून  शेवटी घुमान मध्ये सेटल  व्हायला भाग पाडले . ह्या व्यक्तिवादाचा कळस होता तुकाराम ! हा एक अफलातून कवी होता आणि त्याच्या हयातीत मराठी लोकांनी  त्याला जितका त्रास देता येईल तितका दिला . मराठी हि प्रतिगामी संस्कृती असल्यानेच मराठीत कायमच विचार करण्याऱ्या प्रतिभावंत माणसाला तो हयात असताना दाबायचे ,त्याच्या आसपासच्या  मिडीओकर लोकांना प्रोत्साहन द्यायचे मग तो मेल्यानंतर त्याच्या नावाने गळा काढून त्याला डोक्यावर घेवून नाचायचे आणि आमची मराठी संस्कृती कशी पुरोगामी आहे ते गळा फाडून सांगायचे अशी एक  मेल्यानंतर मानसन्मान देण्याची मर्तीकी परंपरा आहे .  ज्ञानेश्वर  चक्रधर आणि नामदेव  ह्या त्रयीबाबत  ती मराठीने पार पाडली आणि ह्यातील प्रत्येक लेखक मेल्यानंतर मराठी लोकांनी त्यांला मराठी संस्कृतीत  सेटल करून घेतले . 

पुढे इंग्रज लोकांच्या राज्यात सृष्टीय युग पुन्हा आले.  त्यातून ज्योतिबा फुलेंनी समाजप्रधान  प्रबोधनवाद आणि वास्तववादाची पायाभरणी केली . मराठीत त्यानंतर  दुसरा व्यक्तिवाद जन्मला तो सौंदर्यवादाच्या रूपाने . केशवसुतांच्यात प्रथम त्याचे पडसाद उमटले पण त्याची पायाभरणी बालकवींनी केली . ज्ञानेश्वर  चक्रधर आणि नामदेव  ह्या त्रयीबाबत जे केले तेच मराठी संस्कृतीने केशवसुत व बालकवींच्या बाबत केले.  हे लेखक मेल्यानंतर मराठी संस्कृतीत मराठी लोकांनी त्यांना सेटल करून घेतले .ह्या सेटलमेन्टचे सर्वात प्रतिमा वादी उथळ रूप  होते  सत्य कथेचा  रोमांटिक  प्रतीमावाद ! पुढे  हा दुसरा व्यक्तिवाद -सौंदर्यवाद चांगल्या अर्थाने कळसाला पोहचला तो पु शी रेगे , ग्रेस आणि ना धो महानोर ह्यांच्या कवितेत !

१९४० नंतर भारतात प्रतीसृष्टीयता स्थिरावली . मर्ढेकर आणि विंदा करंदीकर ह्यांनी तिसरा व्यक्तिवाद आणला तो आधुनिक व्यक्तिवादाच्या रूपाने . ह्या व्यक्तीवादाला छेद देणारा चौथा  व्यक्तिवाद जन्मला तो अस्तित्व वादाच्या रूपाने . मराठीत ह्या अस्तित्व वादी व्यक्तिवादाची अत्यंत सखोल पायाभरणी केली चार  लेखकांनी दिलीप पु चित्रे , कोसलातील नेमाडे , भाऊ पाध्ये  आणि विलास सारंग ह्यांनी ! ह्यातील दिलीप पु चित्रे , कोसलातील नेमाडे हे दोघेही देशी वादाच्या अंगाने  अस्तित्व वादी व्यक्तिवादाची वाट त्यागून गेले तर भाऊ पाध्ये वास्तव वादाला जाऊन मिळाले परिणामी  अस्तित्व वादी व्यक्तिवादाला एकमेव साठोत्तरी समर्थक उरला तो म्हणजे विलास सारंग . स्वतः च्या  ह्या एकटे पडण्याला विलास सारंग कधीच घाबरले नाहीत उलट यु टर्न घेण्याऱ्या नेमाडेशी व त्यांच्या देशीवादाशी ते तात्त्विक पातळी वर लढत राहिले.  विलास सारंगाना पुढे घेवून जाणारे सतीश तांबे , मेघनाद कुलकर्णी असे काही मराठी कथाकार झाले पण त्यांच्याकडे जितके लक्ष्य द्यायला हवे होते तितके मराठीने दिले नाही . त्यामुळे सारंगांच्या वाटेने जाऊन उपेक्षित राहण्यापेक्षा लवकरच प्रस्थापित करायला सोपी अशी देशीवादी किंवा दलित साहित्याची वाट पकडणे हे अनेक करीअरीस्ट लेखकांना आकर्षक वाटू लागले . शिवाय कल्पनाशक्तीला ताण द्यायला भाग पाडणारी प्रतिभा असणे हे थोडे अवघडच बांधकाम होते . परिणामी कल्पनाशक्ती आणि अस्तित्वाचे प्रश्न ह्यांची सांगड घालून अस्तित्वाचा पाठलाग करणारा हा लेखक पुढेही मराठीने कायमच परीघावर ठेवला . त्याला न्याय द्यायला शेवटी मंगेश काळेला खेळचा एक विशेषांक काढावा लागला . 



वास्तविक सारंगाचा अस्तित्ववादी व्यक्तिवाद हा फक्त कविता आणि कथेत दिसतो . त्यांच्या कादम्बरीत मात्र व्यक्तिवाद आणि समष्टीवाद ह्यांच्यातील द्वंद पकडणारा द्वन्दवाद दिसतो आणि त्यातून कादंबरी हा फॉर्म व्यक्तिवादी होऊच शकत नाही कि काय अशी शंका येवू लागते . मात्र तरीही जो प्रभाव  कोसलाचा पडला तो एन्कीच्या  राज्याचा पडला नाही ह्याचे काय कारण असावे. वस्तुस्थिती अशी आहे कि कोसला ही एक आधुनिक प्रतिगामी कादंबरी आहे आणि मराठी संस्कृती ही प्रतिगामी असल्याने आधुनिकतेची कोसलात उडवली गेलेली टवाळी मराठी माणसाला भावली. मृत्युंजय स्वामी  आणि कोसला ह्या तीनही कादंबऱयाना दाद देणारी मानसिकता एकच आहे.शिवाय मराठी वाचक कॉलेजनंतर काही वाचत नाही त्यामुळे मराठी बहुतांशी वाचकाचे वय कायमच २१ असते त्यामुळे कॉलेजवयात वाचलेल्या कॉलेजच्या भावविश्वाशी निगडीत कोसला दुनियादारी ह्या कादंबऱ्या (ज्याला सारंग  नोस्तालजीयाचा रोग म्हणतात )त्याला आयुष्यभर आवडत राहतात. ह्या वयाच्या पुढील विकास दर्शवणाऱ्या एन्कीच्या  राज्यासारख्या कादंबऱ्या त्याला भावत नाहीत त्यात  एन्कीच्या  राज्यात परदेश आहे जन्मता देशी बनलेल्या मराठी वाचकांना हे विश्व काय भावणार ? ह्या कारणानं सारंग कायम परदेशी लेखक राहिले. 
         खुद्द सारंगाना हे जाणवले असावे आणि त्यातूनच भारतीय वास्तवाकडे ते परतले . हि पीछेहाट होती . दलित विचारवंतांनी आधीच मांडलेले मॉडेल त्यांनी आधिक चकाचक भाषेत मांडून आपण काहीतरी नवे मांडतोय असा आव आणला . पण अनुष्टुभमधल्या त्यांच्या ह्या लेखांनी दलित साहित्य शास्त्राने पुढे आणलेला साहित्यातील जातीयतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आणला  मात्र त्याचे स्वरूप देशीवादी न्हवते तर अस्तित्व प्रमाण मानून जगण्याऱ्या व्यक्तीला जातींचा होणारा त्रास असे होते . हा खरेतर जातिव्यवस्थेविरुद्धचा अस्तित्ववादी त्रागा होता आणि त्यानी तो नोंदवला ते बरेच झाले . 

सारंगांचे खरे योगदान काय  आहे ?  त्यांनी अस्तित्ववादी व्यक्तिवादाचा झेंडा फडकावत ठेवला . जेव्हा वास्तव वादाच्या नावाखाली कल्पनाशक्तीची कोंडी केली जात होती तेव्हा त्यांनी ही कोंडी फोडण्याची अथक कोशिश केली आणि कल्पनाशक्तीचे जागरण जिवंत ठेवले . ते एक हाडाचे प्रतिभावंत लेखक होते . सत्यकथा ही त्यांच्या पायातील बेडी होती कि त्यांनी प्रकाशनासाठी वापरलेला तो एक अस्तित्ववादी टेकू होता हे एक कोडे होते आणि ते आता सुटेल असे वाटत नाही .नेहमी प्रमाणे आता मेल्यानंतर विलास सारंगानाही मानसन्मान देण्याची आणि त्यांना मराठी संस्कृतीत सेटल करून घेण्याची मर्तीकी परंपरा मराठी संस्कृती पार पाडेलच . 

साठोत्तरी हि आमची बाप पिढी ! त्यांच्या अंगाखान्द्यावर आम्ही खेळलो आणि बाप फारच कर्मठ आहे हे लक्षात येताच त्यांचे साठोत्तरी साहित्याचे घर सोडून नवे चौथ्या नवतेचे घर आम्ही बांधले पण तरीही बाप कायमचा दूर गेल्यावर दु :ख होतेच. कोल्हटकर , ग्रेस ,चित्रे , ढसाळ आणि  आता विलास सारंग ! अस्तित्व संपल्यावर उठण्याऱ्या अस्तित्वाच्या आठवणींचे काय करायचे ?

Thursday, April 9, 2015

कविंनो , तुम्ही कवितेच्या धंद्याला तयार आहात का ?
श्रीधर तिळवे
कविंनो ,
एकविसाव्या शतकातील कविंनो

साधारण एक मिल्लीयन डोळे डीजीटल
पण कवितेला अवेलेबल फक्त दहा

इन्टरनेटवर नग्नता सिडक्शनचि लाल बाराखडी गिरवत बॉडीफोय होतीये
कम्युनिकेशनचि battery all time चार्ज होतीये
इन्फर मेशनला fashion चा दर्जा प्राप्त होतोय
आणि जो तो तिने डीझाईन केलेले कपडे घालून वेबसाईटतोय

ह्या बेसुमार काळात
कवितेच्या कपड्याखाली बॉडीच उरलेली नाहीये
कवितेची battery हृदयाला रिचार्ज करत नाहीये
कवितेच्या वेबसाईटवर कुणी राहायला येत नाहीये

अश्यावेळी कवितेच्या धंद्याला तुम्ही तयार आहात का कविंनो ?

चेहऱ्यांना मेकप करून त्यांना मुखवटा बनवणारे सौंदर्यशास्त्र आसपास
विशफील थिंकिंगचा सोप ओपेरा सादर करणारे व्यवहारज्ञान थेट श्वासात

हे पाईपड्रीम आहे की पाईपांचा बिझनेस आहे ?
हे टेकचे फ्युचर आहे कि रीवोल्युशनचे फीचर आहे ?

कंपन्या रीस्कमध्ये भळभळतायत कि फळफळतायत ?
हा काळावरचा आक्षेप आहे कि काळातला हस्तक्षेप आहे ?

माणसाला डीजीटीव नेटिव बनवणारा हा काळ
काळजाला सोशल मेडीआ बनवणारा हा इंटरनेटचा फाळ

कवितेचे फळकूट घेवून कुठे जाणार आहात कवींनो ?

जो स्नूझर  तो लूझर
जो गेट तो ग्रेट

कॉम्पुटरपुढे सर्व समान
कॉम्पुटरपुढे सर्व सामान

साईझ इररिलेवन्ट होत चाललेल्या ह्या अवकाशात
कवितेच्या फॉर्मवर कसली बोडक्याची चर्चा करताय कवींनो ?

सर्वत्र रिटर्न मिळण्याऱ्या ह्या काळात
कवितेवर परतावा नाही
जगभर पळाली तरी
कौऊटिंगमध्ये तिच्या नावाने धावा नाहीत

ती चेंजचा ईवोल्विङ्ग फोर्स नाही
ती कशाचाही ओरीजनल सोर्स नाही

ना बेटर ना चीपर ना फास्टर
ना सेवर ना लीपर ना सर्वर

ती मार्केटमध्ये इतकी इररीलेवंट
कि तिला धन्द्यालाही बसवता येत नाही

ती पाळीत कायमची उभी  कवींनो
मुलांना जन्म देवून जळतिये तिची नाभी

ती वाचकात नाहीशी होणार नाही
ती वाचक नसल्याने नाहीशी होणार आहे

तेव्हा
सेकंदाला दहा लाख ढग तयार करण्याऱ्या ह्या कूल वादळात
कवींचे कुल
एप्रिल फूल आहे………………कवींनो

( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )

श्रीधर तिळवे

Sunday, April 5, 2015

 जातिमुक्त /श्रीधर तिळवे 

अस्पृश्यांनी  पाण्यात ढकललं
ब्राह्मणांनी वेदात जाळलं
क्षत्रियांनी सत्तात गाडलं
वैश्यानी नोटात सपाट केलं
शुद्रानी नांगराला जुंपून
शेवटी कापून खाल्ल

आणि तरीही शेवटी शिल्लक राहिलो
तेव्हा गळ्यात दिलं
हे कवितेचं मडकं
आणि संतापाचा खराटा

त्यानं स्वतःचंच  आयुष्य झाडत झाडत
मी शेवटी जातिमुक्त झालो .

श्रीधर तिळवे
(डेकॅथलोन  रिअल ह्या काव्यसंग्रहातून )

Thursday, April 2, 2015

रियाजी साहित्य आणि तरबेजी साहित्य / श्रीधर तिळवे


माझे दिलीप पु चित्रे ह्यांच्याशी जे काही कडेलोटी मतभेद झाले त्यातील एक मतभेद हा रियाजी कविता प्रकाशित कराव्यात कि न कराव्यात ह्याविषयी होता . त्यांच्या मते "१९६० नंतरचे सर्व कवी हे मर्ढेकर व पु शि रेगे ह्यांच्या वाटेने जात असताना तू  मनमोहनांची चुकीची व धोकादायक वाट पकडली आहेस  आणि स्वतःच्या रीयाझी कविता प्रकाशित करण्याचा त्यांचा मूर्खपणाही रिपीट करायला निघाला  आहेस  ."
माझे म्हणणे असे कि ''मी काही जाणीवपूर्वक मनमोहनांची वाट पकडलेली नाहीये किंबहूना मराठीत मनमोहन असे काही स्कूल नाहीये असलेच तर त्याचे टोक थेट गाथासप्तशती पर्यंत भिडते आणि रीयाझी कविता प्रकाशित करू नयेत हा आग्रह भांडवलशाहीच्या '' कविता ही क्रयवस्तू असल्याने ती एक फीनिशड product म्हणून ग्राहकांच्यापर्यंत पोहचली पाहिजे '' ह्या आग्रहाचा प्रतिध्वनी आहे .''
 ह्यावर त्यांचे म्हणणे असे होते कि '' जर संगीतात रियाझ कुणी प्रकाशित करत नाही तर कवी म्हणून तू हा अट्टाहास का धरावास ? '' माझे  म्हणणे असे कि '' संगीतातही रियाझ प्रकाशित करण्याचा अट्टाहास आपण धरायला हवा . त्यामुळे कुमार गन्धर्वासारखे संगीतकार गायक कसे वाढत गेले ते कळण्याची शक्यता वाढते . चित्रकलेत चित्रकाराचे रीयाझी काम प्रकाशित होतेच की !''
साहजिकच माझ्या '' डेकॅथलॉन '' आणि ''कोल्हापूर ते मुंबई व्हाया कविता ''( हा पुढे क . व्ही . ह्या नावाने प्रकाशित झाला . ) ह्या दोन्ही संग्रहातील कविता प्रकाशित करायला त्यांचा कट्टर विरोध होता . मी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतोय असे त्यांना वाटत होते .
आज ह्या मतभेदाची आठवण येण्याचे कारण पुन्हा एकदा ह्या अंगाने निर्माण झालेली कोंडी . अलीकडे काही रसिक जेव्हा नवीन काय म्हणून विचारतात तेव्हा काय बोलायचे असा एक यक्षप्रश्न माझ्यापुढे निर्माण होतो
२. 
२००७ नंतर माझ्या कवितेने तिसरे वळण घेतले आणि रीयाझी कवितेचा नवीन कालखंड सुरु झाला . पहिले वळण १९८२ साली सुरु झाले त्यातीरीयाझी कविता मी''एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार '' ''डेकॅथलॉन '' ह्या नावाने प्रकाशित करून तरबेजी कविता ''डेकॅथलॉन : रियल '' '' डेकॅथ लॉन :सररिअल ''
'' डे कॅथलोन :ट्रान्सरिअल '' ''डेकॅथलॉन: इनिशिअल'' ''डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल'' ''डेकॅथलॉन:ए ल से ट्रा '' 
ह्या नावाने  आणायचे ठरवले अर्थात नावं ठरली न्हवती आणि संग्रहाची रचनाही ! ह्यातील काही संग्रह आलेही . हिला मी डेकॅथ लॉन series म्हणतो 
दुसरे वळण १९८७-८८ साली सुरु झाले . ह्या वळणातील रीयाझी कविता मी ''क . व्ही '' ह्या संग्रहात आणल्या . ह्या वळणाला मी चांणेल सिरीज म्हणतो . ह्या वळणातील तरबेजी कविता मी ''चांणेल : डीस्ट्रोयरी '' ''स्त्रीवाहिनी '' चांणेल: अंडर द वर्ल्ड '' ''चांणेल: स्पी(निर्वस्तु ) '' ''चांणेल: टी '' ''चांणेल: डब्लू '' ''चांणेल: ज्ञ '' ''चांणेल: आर '' ''चांणेल: श्रीशिल्लक '' ''चांणेल:ग '' '' क . व्ही २'' ''श्रीवाहिनी '' ह्या संग्रहात समाविष्ट केल्या . त्यातील काही प्रकाशितहि झाले . 

प्रत्येक वळणावर मी धडपडलो आणि अडखळलोही ! कुठलेही नवीन मला चटकन पकडता येत नाही . ते अस्पष्ट जाणवते आणि मग माझा रियाझ चालू होतो . हा रियाज आशय आणि अविष्कार अशा दोन्ही पातळ्यावर चालू असतो . कधी आशय जमतो पण अविष्कार जमत नाही तर कधी अविष्कार जमतो पण आशय जमत नाही . मग अचानक सूर सापडतो आणि तरबेजी कविता जमू लागते . 
तिसरे वळण ह्याला अपवाद  ठरले नाही ''चांणेल :डब्लू  व श्रीवाहीनी'' ने मला पार एक्झ्होस्ट केले  कोल्हापुरी भाषेत सांगायचे तर असा काही पीट्टा पाडला की मी आयुष्यात प्रथमच तब्बल एक वर्ष कवितालेस जगलो . ह्याही वळणाची रीयाझी कविता प्रथम प्रकाशित करायची आणि मग तरबेजी कविता प्रकाशित करायची असे मी ठरवले खरे पण अचानक मागील वर्षी झालेल्या अपघाताने सर्व काही उलटेपालटे केले . एकतर  ''चांणेल: स्पी(निर्वस्तु ) '' '' श्रीवाहीनी''  ह्या दोन्ही काव्यसंग्रहांचे प्रकाशन फाफ्ल्ले आणि साक्षात मृत्यू समोर दिसल्याने स्वतःचे सर्व कवितासंग्रह जाऊ द्या पण अर्धे तरी कवितासंग्रह तरी प्रकाशित झालेले दिसतील कि नाही अशी शंका निर्माण झाली . अशावेळी रियाजी कवितासंग्रह काढावा कि न काढावा कि तिसऱ्या वळणाचा थेट तरबेजी कवितासंग्रह काढावा असा प्रश्न निर्माण झाला . हा प्रश्न आजही सुटलेला नाही . त्यामुळे आजकाल कुणी कवितेत काही नवीन ? असे विचारले कि मी confusion आणि chaos आहे असे उत्तर देतो .खरेतर ह्या सिरीजला काय नाव द्यावे हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही . प्रथम रियाजी कि तरबेजी कविता प्रकाशित कराव्यात हा प्रश्न तर फारच टोकदार झालेला आहे . असो . काही लोकांच्या प्रेमळ चौकशीला दिलेले हे उत्तर आहे . प्रत्येकाला उत्तर देण्यापेक्षा सर्वांनाच एकसाथ उत्तर द्यावे म्हणून हा bloggerप्रपंच . 
 
श्रीधर तिळवे

Wednesday, April 1, 2015

माझी कविता / श्रीधर तिळवे 

सगळच बाजारात सरकवण्यात येतंय
आणि मी
जो कधी ईश्वरावर कुर्बान झाला नाही
कि राष्ट्रासाठी ज्याने हौतात्म्य स्वीकारले नाही

ज्याने गुड democrate आणि गुड communist वा socialist व्हायला
कायम नकार दिला

स्वतःच्या दारावर पहारा देतोय

माझे घर अद्याप बाजार झालेले नाहीये

धर्माचे mall
 ideology चे mall
management चे mall
उभे करून
बाजार माझ्या दारात उभाय
आणि मी फक्त अध्यात्म बनून
स्वतःची नाणी पाडायला नकार देतोय

खरेतर भाषाही सेल ला लागून
शेवटी विकली गेलीये

माझी सर्व बाजूंनी कोंडी केली गेलीये

मी मरण्याआधीच
माझ्या शवाचा वास
सर्वत्र धाडण्यात आलाय
माझ्या हाताची सालटी सोलून
माझं नशीब हिस्कावण्यात आलंय
माझी कविता jokology चा syllabus झालीये

तरीही गरम रक्ताच्या झऱ्यात
मी आंघोळ करतोय
माझे श्वास
हवेवर ''प्राण'' लिह्तायात

माझी प्रत्येक होम डीली व री
बंद करण्यात आलीये

काहीही करून मी बाजारात उतरावे म्हणून
हे प्लांनिंग आहे

management चे school पचवलेले लोक मला पटवताय त
प्रत्येक माणूस कसा commodity आहे

आणि तरीही मी माझ्या आत्म्यात
गोसीपच्या फुशारक्या मोडून काढत
येणारा प्रत्यक्ष क्षण ''जिवंत '' वाजवतोच आहे

रोज कुरियरने येणाऱ्या फॉर सेल च्या पाट्या
घराबाहेर फेक्तोच आहे

लोकांना वाटतय
मला वेड  लागलय
मला माहित आहे
मी माझ्या युगाची
कविता जगतोय .


श्रीधर तिळवे