पुन्हा एकदा ग़ज़ल /श्रीधर तिळवे
काल मी माझ्या काहीश्या अडगळीत पडलेल्या ४ मुक्त गझला मुद्दामच ब्लॉगर व फेसबुकवर टाकल्या .
गझल हा माझा एक आवडीचा काव्य प्रकार आहे कारण तो माझ्या मनाच्या फार जवळ आहे . ह्यामागचे कारण स्पष्ट आहे . माझ्या आयुष्यात वाचलेला पहिला काव्यसंग्रह हा दिवान ए गालिब होता . साहजिकच कवितेशी माझे असलेले नाते हे गझलेपासून सुरु झाले होते . गालीबनंतर मीर जोश इक़्बाल साहीर जोनिस्सार अख्तर मजरूह विंदा करंदीकर असा फडशा पाडत मी काही काळ गझलेचा नादखुळा झालो .
गझल जन्मली ती विश्वीय संवेदनशीलता पोटात घेवून ! मीर मध्ये त्याचे पडसाद आहेत पण भारतात तिचा जबराट अविष्कार दिसतो तो सृष्टीय संवेदनशीलतेत ! स्वच्छन्दवाद वास्तववाद आणि परिवर्तनवाद हे सृष्टीय संवेदनशीलतेचे तीन महत्वाचे आयाम !धर्माशी बांधल्या गेलेल्या मानवी भावभावनांना स्वछन्दवाद मुक्त करतो आणि भावनांची तीव्रता हा अपराध न मानता त्यांना उघड उघड मनमोकळेपणाने समाजाची कसलीही पर्वा न करता मांडतो . गझल ही ह्या भावनिक तीव्रतेची महाराणी आहे आणि गालिब हा तिचा बादशहा आहे . साहजिकच गालिब तुमची पाठ सोडत नाही . अकबराने पारंपारिक मुस्लीम धर्म धुडकावून ह्या स्वछन्दवादाची सुरवात केली . (खरा रोमांटिक ग्रेस दाखवतात तशी अनारकली नव्हती किंवा सलीम नव्हता तर खुद्द अकबर होता फिल्मी भाकड कथावर विश्वास ठेवल्याबद्दल आपण ग्रेस ह्यांना माफ करणेच योग्य कारण भावनेच्या भरात होण्याऱ्या चुका स्वछन्दवादात माफ करायच्या असतात ) आणि त्यातून निर्माण झालेली शोकांतीकाही सोसली . गालिब हा गझलेतील अकबर आहे . मराठीत तुकाराम हे इतके मोठे प्रकरण होऊन गेले कि त्यानंतर गालिब निर्माण होणे अशक्यच होते साहजिकच मराठीत स्वच्छ न्दवादी गझल माधव ज्युलियनाच्या रूपाने फक्त ओळखरुपात आली . ह्यानंतर मराठीत निर्माण व्हायला हवा होता असा एक कवी जो स्वच्छन्दवाद, वास्तववाद आणि परिवर्तनवाद ह्या सर्वांचा एकत्रित सृष्टीय अविष्कार गझलेत करेल . पण मराठीत निर्माण झाला तो गझलेला थेट प्रतिसृष्टीत प्रवेश मिळवून देणारा कवी माधव ज्युलियनाचा शिष्य - विंदा करंदीकर . विंदानी मराठीला ''मुक्त गझल '' दिली . माझ्या १९८२ ते ८७ ह्या कालखंडात लिहलेल्या देकॅथलोन मधल्या गझला ( मराठी ९२ व हिंदी ८७ ) ह्या विंदांच्या मुक्त गझला पुढे न्हेण्याचा प्रयत्न होता (तो यशस्वी झाला कि नाही हे इतरांनी ठरवायचे आहे ) दुर्देवाने मराठीत प्रतीसृष्टीय गझलेच्या कुळाला फारसे अनुयायी लाभले नाहीत . ह्यामागचे कारण होते विन्दानंतर आलेली आणि सृष्टीयतेच्या अंगाने जाणारी देशीवादी मराठीवादी सुरेश भटांची देशी गझल . ह्या गझलेत स्वच्छन्दवाद वास्तववाद आणि परिवर्तनवाद हे सृष्टीय संवेदनशीलतेचे तीन महत्वाचे आयाम ओतप्रोत भरलेले होते . नेमाडेंनी जश्या वास्तव वादी कादम्बऱ्या लिहून मराठी कादंबरी मागे न्हेली तशीच सुरेश भटांनी देशीवादी गझल लिहून मराठी गझल मागे न्हेली . वास्तविक भट ह्यांना मुक्त गझल पुढे न्हेता आली असती पण त्यासाठी लागणारे व्हिजन त्यांच्याकडे न्हव्ते . हिंदीत मात्र विंदा निर्माण होण्याऐवजी गोपालदास नीरज निर्माण झाले ज्यांनी हिंदीला परिपूर्ण सृष्टीय गझल पुरवली त्यामुळे पुढे दुष्यंतकुमारच्या प्रतीसृष्टीय अस्तीत्ववादी गझलेला अवतरणे सहज शक्य झाले . विंदांच्या मुक्त गझलेला पुढे न्हेणारा दुष्यंतकुमार ह्यांच्या तोडीचा अविष्कार न झाल्याने सुरेश भट हेच मराठी गझलेचे सर्वेसर्वा झाले आणि मराठी गझल काहीकाळ सृष्टीयतेत अडकून पडली . सुरेश भटांना विरोध करणारे आमच्यासारखे गझलकार हे कचऱ्याच्या टोपलीत गेले आम्ही एका अर्थाने विंदा स्कूल चे पापी होतो . अर्थात भटांचे हे वर्चस्व कायम स्वरुपात टिकणे शक्यच न्हवते . किशोर कदम , चंद्रशेखर सानेकर ह्या सारख्या समर्थ गझल कारांनी अस्तित्ववादाच्या जवळ जाणारी गझल लिहायला सुरवात केली आणि आता फेसबुकवर जी नवीन गझल अवतरतिये तिच्यावर प्रतीसृष्टीय अस्तित्ववादाचा प्रभाव आधिक आहे असे जाणवते . ही गझल भटांच्या प्रभावापासून काहीशी मुक्त आहे आणि हे चांगलेच आहे . तिच्यातली विविधताही लक्ष्यणीय आहे .
१९८४ नंतर गझल हा माझा काही मुख्य अविष्कार राहिला नाही आणि मी पुढे चौथ्या नवतेपर्यंत पोहचलो . मात्र अधूनमधून गझल येत राहिली म्हणूनच क. व्ही (पॉप्युलर प्रकाशन )ह्या काव्यसंग्रहाची सुरवात मी गझलेने केली . कारण गझलेने आता चीन्ह्सृष्टीय वळण घेणे आवश्यक आहे असे मला वाटत होते . ह्या चीन्ह्सृष्टीय गझलेची झलकही फेसबुकवर आढळते आहे .
मराठीतल्या काही अडाणी कवीलेखकांना मी गझलेवर लिहले कि पोटशूळ उठतो . त्यांना हा मागासलेपणा वाटतो . वास्तविक समाजात काही तंत्रे व प्रकार हे इतके लवचिक असतात कि कुठल्याही काळात ती तंत्रे आणि प्रकार हे कालबाह्य होत नाहीत . गझल हा काव्यप्रकार हा असा लवचिक काव्यप्रकार आहे . बाकी शहाण्यांना अधिक सांगणे न लगे आणि मूर्खांना कितीही सांगून काही फायदा नाही .
श्रीधर तिळवे नाईक
No comments:
Post a Comment