Wednesday, June 3, 2015

ऑक्टोबर १९९०

अनेकांचे हेतू चांगले होते 
तुझेही 

वडिलांचे चलअचल हेतू चांगलेच होते 
पण तरीही माझा चंचल सत्यानाश 

क्लीनिकल समुद्राचे क्लिनसिकल कट इमोशन्सचे 
पॉईंट ब्लॅक इच्छांचे चोंदलेले नाक 
रॅपरमध्ये गुंडाळलेले स्वतःचे प्रेत खाण्याची सक्ती 
जस्ट अनदर संडे म्हणत कोल्हापुरी शिव्यांचे ऑम्लेट 

वाच पण कुणाच्या आसपास वावरत वाचन नको 
पुस्तकातले किरदार त्या माणसात दिसायला लागते 
गा पण पक्ष्यांना स्पर्धा देण्यासाठी नको 
भेट द्यायला येणाऱ्यांचे आवाज म्यूट नको करू 
राष्ट्रांच्या पवित्र स्थानी अन्गझायटी पेरणारे राजकारण नको 

आता अडवाणींना अडवायला कुठला घोडा आणू ?

तपश्चर्येचा हक्क नाकारणारे देव 
आणि इथे तुझ्या नास्तिक गालावरचे चार्वाकी दव 

देवांच्या पार्किंगची भांडणे देव सोडवू शकत नाहीत 
कारण ती मुळात देवांनी निर्माण केलेलीच नसतात 
माणसांना पार्किंग लागते 
माणसांच्या देवांना पार्किंग लागते 

तुला हवाय मुंबईला जाण्यापूर्वीचा एक कोल्हापुरी संभोग 
आणि ही रथयात्रा अशी आडवी येतीये मेंदूच्या हमरस्त्यावर 
समोर गर्दीतही स्पष्ट दिसणारी 
वडिलांना गाढवावर बसून दिलेली वचने 

पर्मनन्टमध्ये तत्कालची परेड 

शांततेचा फुगा दोन्ही बाजूनी फुटला 
आणि व्हायोलन्स दोघांनी पाटा फिरवत कुंटला 

विश्रामस्थानांचा अंत 
शांतताही दंगली घडल्यावर जाणवायला लागतात 
तोपर्यंत एक तणाव तरी असतो 
किंवा बनाव तरी असतो 

हजारॊपैकी किती लोक आपणासाठी मॅटर करतात 

आपली झेप आपल्या देहापर्यंत 
अनलिमिटेड झेपेची हौस आपण देवात पुरी करतो 

कृष्णाने काशी लुटली होती 
ह्याची मी आता आठवण करू द्यावी का ?

ह्या देशात दंतकथा वारत नाहीत 
पुन्हा पुन्हा जन्म घेतात 

किंवा त्यांना कुणीतरी जाणीवपूर्वक जिवंत ठेवतं 
कलेच्या बाटलीत कोंबून 

वेद वेदी वदंता वाद विवाद विवाद्य 
सगळं एकत्रच आहे 

अयोध्या घड्याळ पाहतीये 
तिला कळत नाहीये 
हे सम्पणार आहे 
कि पुन्हा सुरु होणार आहे 

कवी रामावर भावुक कविता लिहीतायत 

मानवतेची रँक धर्मापेक्षा अधिक होऊ शकत नाही 

पातळ शेवट भूमीचा जाडजूड कसा करावा ?
रेकॉर्ड केलेल्या सकाळीत मोर शूट झालेले नाहीत 

अख्खा देश रामायण झालाय माय डियर 

बरं झालं श्रीलंकेने आपलं नाव श्रीलंका ठेवलं 
भारतात लंका असती 
तर रावणदहनाला जाळली असती 
खांडववनासारखी 

बरंच काही डिकोड होतंय 
कदाचित अख्खा अनकॉन्शस डिकोड होतोय रथयात्रेत 

ह्या देशाला नेमकं काय हवंय डिकोड होतंय 

त्या युनिव्हर्सिट्या खरोखर हव्या आहेत का 

ज्ञानापेक्षा करमणूक महत्वाच्या वाटणाऱ्या युगात मी जन्म घेतलाय का ?

डिजिट करन्सी टाईप करतायत 

वैश्विक फ़ंडींग 

कन्स्ट्रक्शन किट्स हातात दिसत नाहीयेत कुणाच्या 

पोलिटिकल कारणांनी का असेना 
हा देश एका देवात प्रथमच सेटल होतोय 

प्रत्येकाचा पर्सनल राम विलीन होतोय 

विद्वानांनो ह्यापुढे रामाच्या जनभूमीवर वाद घालायचा नाही 
आम्ही सांगतो तीच जन्मभूमी 
काल्पनिक तर बिलकुल म्हणायचं नाही 
एका काल्पनिक देवासाठी एव्हढे खरेखुर्रे लोक जमा होतील ?

नेमक्या ह्याच दिवशी मी तुझ्या घरी 
आणि समोर टीव्हीची रहदारी 

ओनिडा ओनिडा ओनिडा 
तिढा तिढा तिढा 

मालक कोण आणि मत्सर कोणाचा 
प्रश्नच नाही राम माझा एका बाणाचा 

धुके जळालेले आहे 
पुरोगामीत्व पळालेले आहे 

त्याला नको शोधू 
शव जळालेले आहे 

जे शत्रूवत होते 
आपल्याकडे वळालेले आहे 

ही गर्दी पहा 
तिला झालेली सर्दी पहा 

भगवी त्वचा सर्वांची 
एकोप्याची वर्दी पहा 

कोण सुटले आहे 
सामील दर्दी पहा 

तुम्हाला दिसत नाहीये 
राम तुमच्या काळजात वसत नाहीये 

तुझी एल्बो पॅड्स 
डोळ्याचा अंतरावर 
वेच 

स्मितांची बाईक रेस 
ओठांवर 
खेच 

त्वचेविषयी काय 
आपल्याच देहाची गाय -नाही 
पेच 

श्वासाइतकी तू नैसर्गिक माझ्या 
उमलतेस मेमरीच्या गुलाबात ताज्या 

वडिलांना विसर 

ते रथयात्रेत गेलेत जरी गाठली साठी 
त्याचा एव्हढा त्रागा कशासाठी ?

हा तुझा माझा किंवा वडिलांचा प्रश्न नाही 
दंतकथा निवडायची का वास्तव हा प्रश्न आहे 

वास्तव नीट हाताळलं असतं 
तर दंतकथा अशी ताडमाड कशाला झाली असती ?

कायम अल्पसंख्यांक अल्पसंख्याक 
बहुसंख्याक अस्तित्वातच नाहीत 
किचनमध्ये काम करणाऱ्या बाईसारखे टेकन फॉर ग्रांटेड 
कधीतरी किचनमधली बाई 
हॉलमध्ये येऊन हक्क मागणारच 
आणि विषय भलताच काढणारच 

माझ्या तळव्याचा बूट अवेलेबल नाही 
म्हणून मी माझा पाय कापून छोटा करावा काय ?

मी तेच बोलणार 
जे मला योग्य वाटत 

केवळ तुझ्या कम्युनिस्ट कानांना योग्य वाटावं ते बोलण्यासाठी 
मी आलेलो नाही 
आणि हो हिंदुत्ववादी आहेस असा भंपक आरोप नको 

व्हर्जिन मुमेंट आहे प्रेमाची 
पकडूया का 

तुझी त्वचा म्हणजे अखंडित गरम सफेद बर्फ 
पेटवूया  का 

रथयात्रा सगळ्या दिशांनी पांगत असेल तर 
आपण एकमेकांच्या देहाचं वास्तव 
बनूया का 

मंदिर होईल होईल 
आपण देव तर होऊ शकतो 

माझं जग तुझं जग 
जुगुया का ?
जगूया का ?
श्रीधर तिळवे - नाईक
(
चॅनललव , सेक्स  एण्ड एलसेट्रा ह्या काव्यफाईलीतून)

No comments: