मंगेश पाडगावकर :लोकप्रिय रोमांटीसिझमचा अस्त -श्रीधर तिळवे -नाईक
पाडगावकर गेले . मी आयुष्यभर पाडगावकरावर कडक टीका केली वेळप्रसंगी पाडबानां (पाडगावकर आणि बापट) मराठी कवितेचे खलनायक म्हंटले . तरीही त्यांच्या जाण्याने एक पॉज आलाच . ज्या काळात बेसूर असण्याऱ्या काव्यगायनाचा सुळसुळाट निर्माण झाला होता तेव्हा प्रबोधनवादी नवतेचे वसंत बापट , रोमांटिक नवतेचे मंगेश पाडगावकर आणि आधुनिकतावादी नवतेचे विंदा करंदीकर असे तीन कवी काव्यवाचनाची संकल्पना घेवून उतरले तिघांनीही कविता कशी वाचायची ह्याचा वस्तुपाठ घालून दिला . आणि त्याचबरोबर पाडगावकर आणि बापट ह्या दोघांनी मंचीय कवितेचे कुळही सुरु केले . मराठीतील हे कुळ बघता बघता मुख्य प्रवाह बनले आणि गल्लोगल्ली बापट आणि पाडगावकर निर्माण झाले . त्यांनी गंभीर कविता संपवली . मात्र तरीही पाडगावकर काय करतायत ह्याविषयी कायमच उत्सुकता असायची . पाडगावकर कविता मस्त वाचायचे . जे लिखित आहे ते मौखिक करून पोचवायचे कसे ह्याविषयीची त्यांची जाण विलक्षण तल्लख होती . आमच्या पिढीत ही जाण किशोर कदम सौमित्र , दासू वैद्य , प्रकाश होळकर , अरुण म्हात्रे , अशोक नायगावकर ह्यांनी पुढे न्हेली .पाडगावकरांची मला भावलेली दुसरी गोष्ट म्हणजे रोमांटीसिझमवरची त्यांची अविचल निष्ठा ! ह्या माणसाने आपल्या कवितेचा पिंड कधीही सोडला नाही . प्रेमावर त्यांचे प्रेम होते आणि वैयक्तिक संबंधातही त्यांनी ते जोपासले .
आणि त्यांनी लिहिलेली गाणी !ती केवळ अफलातून !त्यांच्या कविता उरोत न उरोत पण त्यांनी लिहिलेली गाणी अजरामर आहेत . ''भातुकलीच्या खेळामधली '' ''अखेरचे येतील '' ''भेट तुझी माझी स्मरते '' '' असा बेभान हा वारा '' '' सांग सांग भोलानाथ '' '' दिवस तुझे हे फुलायचे ''अभूतपूर्व ! दिवसातून किमान एकदा तरी त्यांचे एक तरी गाणे ओठावर यायचेच ! त्यांना गीतकार म्हणून आधिक वापरायला हवे होते पण चित्रपटात अकलेचा ह्याबाबत दुष्काळच . हिंदी वाल्यांनी जसे साहीर शकील कैफी जांनिसार अख्तर मजरूह ह्यांना नीट वापरले तसे मराठी वाल्यांनी पाडगावकर , भट , महानोर ह्यांना वापरले असते तर बहार आली असती .
पाडगावकरांच्या जाण्याने लोकप्रिय रोमांटीसिझमचा शेवटचा सत्यकथावादी तारा निखळला . त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली . ईश्वर यदाकदाचित असलाच तर मला खात्री आहे पाडगावकर त्याला तुमचे आणि आमचे सेम असते हेच सांगत असतील .
No comments:
Post a Comment