Saturday, February 7, 2015


नेमाडे आणि ज्ञानपीठ 
श्रीधर तिळवे- नाईक 

प्रथम नेमाडे ह्यांचे मनापासून अभिनंदन !

नेमाडे  ह्यांना ज्ञानपीठ मिळणे अटळच होते कारण तिसऱ्या नवतेतील फक्त पांच जणांना ते मिळण्याची शक्यता होती . विजय तेंडूलकर , दिलीप चित्रे ,  नामदेव ढसाळ , अरुण कोल्हटकर आणि भालचंद्र नेमाडे ह्यातील  चौघांचे  निधन झाल्याने फक्त नेमाडेच  उरले होते .हे पाचही जण ह्या सन्मानाला पात्र होते पण सर्वाधिक पात्र होते भालचंद्र नेमाडे कारण नेमाडे हे फक्त कवी नव्हते  तर सर्वोत्कृष्ट कादंबरीकार होते . त्यांच्या ह्या सन्मानाने मी आनंदलो आहे आणि ह्याचे मराठी साहित्यावर काय परिणाम होऊ शकतात ह्या विचाराने थोडा चिंतीतही  झालो आहे  . 

पुरस्काराला सर्वस्व मानणारे एक कल्चर मराठीत अस्तित्वात आलेले आहे , त्यामुळे हा पुरस्कार म्हणजे देशीवादाचा विजय आहे असे मानले जाऊ शकते आणि त्याचा निगेटीव परिणाम मराठी संस्कृतीवर होऊ शकतो . त्यामुळे दिवाळी साजरी करत असताना तिच्यामुळे नेमके कोणते फटाके भविष्यकाळात फुटू शकतात तेही पहावे लागेल 

कुठलीही साहित्यिक चळवळ ही शिम्ग्यासारखी असते ती  नवतेची आग पेटवून तिच्यात परंपरा जाळते । त्यातून जे परंपरेत चांगले असते ते तावूनसुलाखून बाहेर पडते आणि जे राख व्हायच्या लायकीचे असते ते जळून जाते . तिसऱ्या नवतेने जी आग पेटवली त्यात नेमाडे व ढसाळ ह्यांचा सिंहाचा वाटा होता . ह्यातील विजय तेंडूलकर व ढसाळ ह्यांना सन्मान मिळून दिवाळी साजरी झाली फक्त नेमाडेना असे काही मिळावे असे मनापासून वाटत होते . ज्ञानपीठ पुरस्कारामुळे हेही घडले ते बरेच झाले . शेवटी नेमाडे ह्यांचा शिमगा हा ह्या अर्थाने  दिवाळीपर्यंत पोहचला . 

मी आयुष्यभर नेमाडे ह्यांच्याविरोधात लढलो पण त्यांच्या बद्दल पूर्ण आदर बाळगून! नेमाडे हे माझे आवडते शत्रू आहेत . त्यामुळे त्यांच्या '' टीकास्वय वर'' ह्या ग्रंथाला खोडून काढण्यासाठी मी '' टीका हरण '' हा ग्रंथ  लिहला हि टीका नेमाडे ह्यांनी वाचायची तसदी घेतली असेल असे मला वाटत नाही मात्र नेमाडे ह्यांच्या काही समर्थकांचा मी शत्रू झालो आणि देशीवाद्यांच्या काळ्या यादीत गेलो .  देशीवाद्यांच्या काळ्या यादीत जाणे म्हणजे अलिखित देशी परंपरेनुसार वाळीत टाकले जाणे ! एकाच वेळी गंभीर देशीवादी आणि उथळ नव्वदोत्तरी लोकांचे शत्रुत्व मी पत्करल्याने दोन्ही बाजूनी माझा खून होणे अटळ होते . तो होतानाही नेमाडे ह्यांच्यावर टीका करणे मी सोडले नाही कारण नेमाडे ह्यांचा देशीवाद आणि वाजपायी आणि मोदी ह्यांचा हिंदुत्ववाद ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे माझे स्पष्ट मत आहे . नेमाडे ह्यांना नरेंद्र मोदी सत्येवर आल्यावर ज्ञानपीठ मिळाले हा योगायोग नसून हिंदुत्ववादी विचारप्रणाली दोन चेहऱ्यांनी ह्या देशावर राज्य करणार असल्याचे ते संसूचन आहे .दुर्देवाने आपला ओ बी सी वर्ग हा अजूनही सर्व गोष्टी नीट समजून घेत नाही कारण त्याला क्षत्रिय होण्याचा हा राजमार्ग आहे असे वाटते . नेमाडे हे नीट ओळखून आहेत आणि मोदीही ! ह्याचा राजकीय परिणाम चांगला होण्याची शक्यता मी नाकारत नाही पण तो परिणाम अल्पकालीन ठरण्याची शक्यता अधिक आहे ऱाजा होणे कुणाला आवडत नाही? पण हे राजेपद नंतर ब्राह्मनाळणारे होणार असेल तर दीर्घकालीन युद्धात ते महाग पडू शकते . लढाई जिंकून युद्ध हरण्याची भारतीय परंपरा आहेच

नेमाडे ह्यांचा देशीवाद ऑउट्डेटेड झालाय हि वस्तूस्थिति . किंबुह्ना ज्ञानपीठ हा सन्मान  तुम्ही आऊटडेटेड झाल्यावरच मिळतो . अनुयायी नेहमी प्रस्थापित आणि  आऊटडेटेड गोष्टींना मिळतात त्यामुळे नेमाडे हे आता कॉन्ग्रसी गवतासारखे सर्वत्र उगवणे अटळ . काही भूछत्राना वटवृक्षाचा दर्जा मिळणे अटळ . आणि हे सर्व देशीवादाच्या नावाने होणे अटळ

सर्वात वाईट गोष्ट म्हणजे खूद्द नेमाडे अजिबात देशीवादी नाहीत . जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींच्या ते प्रेमात असतात त्यामुळे समता पुरस्कार स्वीकारताना त्यांना व्हितगेस्तैन आणि द्स्तैव्स्की  आठवतात .स्व ताच्या साहित्यात जागतिकीकरण साजरे करणारे नेमाडे नंतरच्या पिढ्यांची मात्र देशीवादाच्या नावाखाली दिशाभूल करत फिरत असतात हि दिशाभूल आता अधिक सशक्त होणे अटळ आहे . नेमाडे ह्यांना मिळालेला पुरस्कार हा मार्गी आणि देशी ह्यांचा अजोड समन्वय करण्याऱ्या अभूतपूर्व प्रतिभावंताला मिळालेला पुरस्कार आहे कोसला हि फक्त म्ह्हा नुभवी पंथा मुळे शक्य झालेली नसून त्यात catcher in the wry चा हि सिंहाचा वाटा आहे अमेरिकन आणि मराठी संस्कृतीचा हा समन्वय आहे . ज्या देशीवादाची दुहाई नेमाडे देतात तो देशीवाद किती अमेरिकन आहे ते मी चौथी नवता ह्या ग्रंथात मांडले आहेच .'' लोकां सांगे देशीवाद स्व ता मात्र जागतीक वादी  '' असे  नेमाडे ह्यांचे धोरण आहे . त्यामुळे नेमाडे ह्यांना मिळालेला पुरस्कार हा देशीवादाच्या नावाखाली साजऱ्या करण्यात आलेल्या जागतिक वसुधैव कुटुंबवादाला मिळालेला पुरस्कार आहे हे आपण सर्व मराठी भाषिकांनी लक्ष्य।त घ्यावे हे उत्तम .

नेमाडे हे लेखक म्हणून मुळीच जातीयवादी नाहीत पण विचारवंत म्ह णून ते जातीयवाद बळकट करतात . त्यांना जातिव्यवस्थेचा उभा ब्राह्मणी अक्ष अमान्य आहे पण आडवा अक्ष मान्य आहे . महात्मा गांधीनी जी चूक केली तीच चूक नेमाडे इथे करतायत ह्या बाबतीत मी माझे म्हणणे ''आत्मचरित्रातले  काल्पनिक क्षण '' ह्या netamblage मध्ये सविस्तर मांडले आहे ते पहावे . इतकेच सांगतो कि जाती व्यवस्था  हि package डील  आहे . ती जेव्हा आडवा अक्ष घेवून येईल तेव्हा तिला उभे करणारे महाभाग निर्माण होऊन ती उभा अक्ष सोबत घेवूनच येईल नेमाडे ह्यांना ह्या वयातही हे कळू नये हे आपले दुर्देव तेव्हा ज्यांना जाती व्यवस्था मूळापासून नष्ट व्हावी असे वाटते त्यांनी नेमाडे ह्यांच्या नादी लागू नये हे बरे . नेमाडे ह्यांचे अभिनंदन करताना त्यांच्या विचारातील हा धोका लक्ष्यात घेऊनच त्यांचे अभिनंदन करावे हे उत्तम.

नेमाडे ह्यांचे  पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतो .

श्रीधर तिळवे 


No comments: