Tuesday, September 27, 2016

मोर्चा श्रीधर तिळवे 



एक सिंग्युलॅरिटीचा अवाढव्य भास
तलवारीसारखा रस्त्यावरून चालत

स्क्रिनवर युद्धसदृष्य शांतता पेश करत

वाहिन्यांची नाकं बंद झालेत
त्यांच्या नाकातून नाकाबंदीचे रक्त येतंय

अनपेक्षित नॉकॉउटने सर्व हैराण झालेत

हा लाव्हा कुणी तयार केला
ह्या ज्वालामुखीची बीजे  कुणी पेरली

शेतीला आग लागल्यानंतरही पेरणारे हात इतके जिवंत ?

ज्यांनी त्यांना देशोधडीला लावले त्यांना त्यांचे शांतपणे चालणेही
धमकी वाटू लागलीये

मागण्या चुकीच्या कि बरोबर हे ठरवता येत नाहीये

हा मोर्चा पोस्टमॉडर्न म्हणावा का मग ?

कि हा जागतिकीकरणामुळे हवालदिल झालेल्यांचा
पोस्टपोस्टमॉडर्न मोर्चा आहे ?

कि सतराव्या शतकानंतर नव्याने आलेली ही जाग आहे ?

हातात तलवारी नाहीत
पण प्रत्येकजण योद्धा आहे

ह्यांना जातीयवादी म्हणावे का मग ?

ही जात आहे कि जनता आहे ?

जंतूंना ठरवता येत नाहीये

एक जंगली अस्वस्थता आहे
जी रस्त्यारस्त्यावर माणुसकी लिहीत चाललीये
आणि माणसांना ह्या माणुसकीचे काय करायचे
ते कळत नाहीये

श्रीधर तिळवे नाईक 

मोर्चा २ श्रीधर तिळवे नाईक 
मोर्चा सिम्युलेट होतोय 
मोर्चा रिक्लोन होतोय 

मोर्चा इंटरनेटसारखा ग्राहक वाढवत चाललाय 

मोर्चा तत्सम होतोय तद्भव होतोय अपभ्रंश होतोय 

इट माइट बी गेम फ्रॉम बारामती 
मती मारली गेल्याने हा सातबारा रस्त्यावर आलाय 
हा महाराष्ट्राच्या पुरोगामी समाजकारणात प्रतिगामी हस्तक्षेप आहे 

मुलगी मेलीये आणि रडतीये स्वतःच्या प्रेतात 

हे सगळं तिच्यातून निघालंय ह्यावर तिचा  विश्वास बसत नाहीये 

ती अतोनात दुःखी आहे 

जखमा सुजलेत 
रक्त वळून खड झालंय 
आणि त्या खडीवरून मोर्चा चाललाय 

नराधम माहीत आहेत 
पण ती  मेल्याने ती त्यांचे काहीच करू शकत नाहीये 
ती प्रेतात बसून रडतीये 

हा मोर्चा तिचा शोक आहे का ?

तिने ऍट्रॉसिटी कायदा वाचलेला नाहीये 
तिला फेबु दलित माहीत नाहीत 
तिला फेबु मराठा माहीत नाहीत  

तिला खुंखारतेचा माइक्रोहार्ड माहित आहे 
निर्लज्ज पुरुषप्रधानतेचा टोकदार पाशवीपणा माहीत आहे 

हा मोर्चा त्या पुरुषप्रधानतेच्या दारी का जात नाहीये 
कि आपल्यासाठी चाललेला हा सविनय आक्रोश आहे ?

तिला प्रेतात बसूनही गुंतागुंत कळत नाहीये 

मोर्चे इतके गुंतागुंतीचे का होतायत 
कि नवा समाज नीट असेम्ब्ल न झाल्याचे हे लक्षण आहे ?
कि समाज कायमच चिरफाळी असतो ?

अट्रोसिटीची चायनीज वॉल शोक करतीये 
तिला आपण संरक्षक असल्याचा अभिमान होता 
त्याला छेद गेलाय 

ती विचार  करतीये 
परिवर्तन म्हणजे काय ?
कालच्या शोषितांना उद्याचे शोषक बनण्याची संधी ?

मुलीला भिंतीसमोर 
आणि भिंतीला मुलीसमोर उभं केलं गेलंय 
आणि भिंत आणि मुलगी 
एकमेकासमोर ठाकल्यासारख्या दिसतायत  

दोघीही शोक करतायत 
आणि आपले  अश्रू राजकीय होतील ह्या भयाने अवघडतायत 

बलात्कारात आरक्षण रीमिक्स होतंय 
आरक्षणात शेती रिमिक्स होतीये 
शेतीत पावसाळा रिमिक्स होतोय 
पावसाळ्यात समाजव्यवस्था रिमिक्स होतीये 
समाजव्यवस्थेत ब्रेकिंग न्यूज रिमिक्स होतीये 

आणि मोर्चा मिक्सर घुसळत घुसळत रिसिम्युलेट होतोय 

शासक वाट पाहतायत एका नव्या ब्रेकिंग न्यूजची 
माध्यमे वाट पाहतायत एका फ्रेश ब्रेकिंग न्यूजची 
जी मोर्चा नाहीशी करेल 
आणि फक्त रस्त्यापुरता उरवेल 

सर्वांनाच माहित आहे 
मोर्चा एक दिवस 
थकून घरी परतणार आहे 

श्रीधर तिळवे नाईक 


No comments: