Tuesday, September 27, 2016

मोर्चा श्रीधर तिळवे 



एक सिंग्युलॅरिटीचा अवाढव्य भास
तलवारीसारखा रस्त्यावरून चालत

स्क्रिनवर युद्धसदृष्य शांतता पेश करत

वाहिन्यांची नाकं बंद झालेत
त्यांच्या नाकातून नाकाबंदीचे रक्त येतंय

अनपेक्षित नॉकॉउटने सर्व हैराण झालेत

हा लाव्हा कुणी तयार केला
ह्या ज्वालामुखीची बीजे  कुणी पेरली

शेतीला आग लागल्यानंतरही पेरणारे हात इतके जिवंत ?

ज्यांनी त्यांना देशोधडीला लावले त्यांना त्यांचे शांतपणे चालणेही
धमकी वाटू लागलीये

मागण्या चुकीच्या कि बरोबर हे ठरवता येत नाहीये

हा मोर्चा पोस्टमॉडर्न म्हणावा का मग ?

कि हा जागतिकीकरणामुळे हवालदिल झालेल्यांचा
पोस्टपोस्टमॉडर्न मोर्चा आहे ?

कि सतराव्या शतकानंतर नव्याने आलेली ही जाग आहे ?

हातात तलवारी नाहीत
पण प्रत्येकजण योद्धा आहे

ह्यांना जातीयवादी म्हणावे का मग ?

ही जात आहे कि जनता आहे ?

जंतूंना ठरवता येत नाहीये

एक जंगली अस्वस्थता आहे
जी रस्त्यारस्त्यावर माणुसकी लिहीत चाललीये
आणि माणसांना ह्या माणुसकीचे काय करायचे
ते कळत नाहीये

श्रीधर तिळवे नाईक 

मोर्चा २ श्रीधर तिळवे नाईक 
मोर्चा सिम्युलेट होतोय 
मोर्चा रिक्लोन होतोय 

मोर्चा इंटरनेटसारखा ग्राहक वाढवत चाललाय 

मोर्चा तत्सम होतोय तद्भव होतोय अपभ्रंश होतोय 

इट माइट बी गेम फ्रॉम बारामती 
मती मारली गेल्याने हा सातबारा रस्त्यावर आलाय 
हा महाराष्ट्राच्या पुरोगामी समाजकारणात प्रतिगामी हस्तक्षेप आहे 

मुलगी मेलीये आणि रडतीये स्वतःच्या प्रेतात 

हे सगळं तिच्यातून निघालंय ह्यावर तिचा  विश्वास बसत नाहीये 

ती अतोनात दुःखी आहे 

जखमा सुजलेत 
रक्त वळून खड झालंय 
आणि त्या खडीवरून मोर्चा चाललाय 

नराधम माहीत आहेत 
पण ती  मेल्याने ती त्यांचे काहीच करू शकत नाहीये 
ती प्रेतात बसून रडतीये 

हा मोर्चा तिचा शोक आहे का ?

तिने ऍट्रॉसिटी कायदा वाचलेला नाहीये 
तिला फेबु दलित माहीत नाहीत 
तिला फेबु मराठा माहीत नाहीत  

तिला खुंखारतेचा माइक्रोहार्ड माहित आहे 
निर्लज्ज पुरुषप्रधानतेचा टोकदार पाशवीपणा माहीत आहे 

हा मोर्चा त्या पुरुषप्रधानतेच्या दारी का जात नाहीये 
कि आपल्यासाठी चाललेला हा सविनय आक्रोश आहे ?

तिला प्रेतात बसूनही गुंतागुंत कळत नाहीये 

मोर्चे इतके गुंतागुंतीचे का होतायत 
कि नवा समाज नीट असेम्ब्ल न झाल्याचे हे लक्षण आहे ?
कि समाज कायमच चिरफाळी असतो ?

अट्रोसिटीची चायनीज वॉल शोक करतीये 
तिला आपण संरक्षक असल्याचा अभिमान होता 
त्याला छेद गेलाय 

ती विचार  करतीये 
परिवर्तन म्हणजे काय ?
कालच्या शोषितांना उद्याचे शोषक बनण्याची संधी ?

मुलीला भिंतीसमोर 
आणि भिंतीला मुलीसमोर उभं केलं गेलंय 
आणि भिंत आणि मुलगी 
एकमेकासमोर ठाकल्यासारख्या दिसतायत  

दोघीही शोक करतायत 
आणि आपले  अश्रू राजकीय होतील ह्या भयाने अवघडतायत 

बलात्कारात आरक्षण रीमिक्स होतंय 
आरक्षणात शेती रिमिक्स होतीये 
शेतीत पावसाळा रिमिक्स होतोय 
पावसाळ्यात समाजव्यवस्था रिमिक्स होतीये 
समाजव्यवस्थेत ब्रेकिंग न्यूज रिमिक्स होतीये 

आणि मोर्चा मिक्सर घुसळत घुसळत रिसिम्युलेट होतोय 

शासक वाट पाहतायत एका नव्या ब्रेकिंग न्यूजची 
माध्यमे वाट पाहतायत एका फ्रेश ब्रेकिंग न्यूजची 
जी मोर्चा नाहीशी करेल 
आणि फक्त रस्त्यापुरता उरवेल 

सर्वांनाच माहित आहे 
मोर्चा एक दिवस 
थकून घरी परतणार आहे 

श्रीधर तिळवे नाईक 


Monday, September 26, 2016

माझे डोळे फार लवकर उघडण्याचे कारण मी साठोत्तरी पिढी आमच्यापर्यंत पोहचण्याची वाट पाहिली नाही . चंद्रशेखर जहागीरदारांसारख्या लोकांच्याकडून मटेरियल मिळवले त्याने ताकदही कळाली आणि मग मर्यादाही लवकरच स्पष्ट झाल्या त्यामुळेच चौथ्या नव्तेचे बंड उभा करता आले . झिंग हवी . जी भाषा आणावीशी वाटते ती दुसरा कुणी आणेल म्हणून वाट पाहू नका . तुम्ही स्वतःच आणा .

मुख्य म्हणजे साठोत्तरी आणि नव्व्दोत्तरी दोघांनाही फाट्यावर मारा

गालिब तुकाराम आत्ता लिहताना रिलेव्हन्ट ही रोमँटिक कल्पना आहे . आदिवासी कलेकडे अथवा तुकारामाकडे मी आत्ता बघत असतो . हनुमानचालिसानेही आत्ताच्या लोकांना उतारा पडतोच पण ती अंधश्रद्धा आहे हे कळायला तुम्ही किमान रॅशनल असावे लागता . कालातीत आपल्या हातात नसते असतो तो आत्ताचा क्षण . तो पकडता आला पाहिजे आणि त्या पकडण्याचा मार्गातला सर्वात मोठा अडथळा गालिब तुकाराम साठोत्तरी आणि नव्व्दोत्तरी असतात . काहींना हे कळते काहींना आयुष्यभर लिहूनही कळत नाही 
 अनेक पीएचड्या धूळ खात पडलेत अनेक भाषिक मासिकांतून अनेक लेख आलेत . वस्तुस्थिती अशी आहे कि साहित्यिकांनी काहीही वाचलेले नसते . नुसती टिवटिव करण्यात सगळे मास्टर झालेत . प्रश्न उलटा आहे . साहित्यिक  कधी अकॅडेमिक पर्यंत पोहचणार आणि कधी ह्या पिएचडया प्रकाशित होणार ?

Friday, September 23, 2016

सन्त तुकारामांनी त्यांच्या अवघ्या वीस वर्षाच्या लेखकीय कारकिर्दीत ४००० अभंग लिहीले , म्हणजे साधारण दोन दिवसाला एक . आत्ताच्या काही तथाकथित अल्पप्रसववादी कवी व समीक्षकांनीं त्यांना केवळ ह्या एका मुद्द्यावरून मोडीत काढले असते. अल्पप्रसववाद्यांनो हा मूर्खपणा थांबवा  

Monday, September 12, 2016

कवितांचे वर्गीकरण करतांना सर्वात मोठा प्रॉब्लेम संक्रमणात्मक कालखंडातल्या कविता वर्गीकृत करताना येतो क .  व्ही . २ हा काव्यसंग्रह चॅनेल सिरीज मध्ये टाकावा कि नेट सिरीजमध्ये टाकावा हा प्रश्न सुटता सुटत नाहीये हीच गोष्ट चॅनेल वर्ड्स बाबत ह्यातील काही कविता ह्या नंतरच्या कालखंडातल्या असल्याने त्या कुठे टाकाव्यात हा प्रश्न वारंवार येतोय आणखी एक गोष्ट साफ दिसतीये आयुष्य शिफ्ट झालंय तशी स्पष्टता अधिक आहे म्हणजे मुंबईत १९८९ साली दाखल झाल्यावर लिहलेल्या कविता स्पष्टपणे चॅनेल सिरीजमध्ये टाकता येतात हीच गोष्ट नेट सिरींजबाबत . चित्रपटसृष्टीत बॉलीवूडमध्ये  २००९ - १० मध्ये फूलटाइमर म्हणून दाखल झाल्यावर लिहलेल्या कविता स्पष्टपणे नेट सिरीजमध्ये टाकता येतात नंतर अपघात झाल्यानंतर फूल टाइमर बेडरिडन झाल्यानंतर लिहिलेल्या कविता स्पष्टपणे निर्वाण सिरीजमध्ये टाकता येतात . पण जिथे संक्रमण आहे तिथे गोंधळ सुरु होतो . माझा जोशी कि कांबळे ह्या चित्रपटाचा दौर आणि सोशल नेट्वर्कसचा दौर एकच आहे आणि ह्या कालखंडातल्या कविता गोंधळ उडवतात . हा गोंधळ शेवटी थीमॅटीकतेचा आश्रय घेऊन सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे अपवादात्मक काहीवेळा अजिबोगरीब गोष्टीही घडलेल्या आहेत म्हणजे चॅनेल निर्वस्तु मधल्या निर्वस्तुवादी कविता ह्या १९८७ ते १९९३ ह्या कालखंडातल्या आहेत आणि त्यातील काही कविता सौष्ठव आणि नंतर अभिधात होत्या पण अरुण कोलटकरांच्या मृत्यूनंतर लिहलेली कविता चक्क निर्वस्तुवादी आहे हे ती लिहिल्यानंतर माझ्या लक्ष्यात आले आणि ती ह्याच संग्रहात ठेवावी लागली . असो . थोडक्यात वर्गीकरणाशी झगडतोय .


Saturday, September 10, 2016

प्रज्ञा , हा लेख १९९९ चा आहे आणि तो नंतर परममित्र मध्ये प्रकाशित झाला होता . भुजंगच्या मर्यादा पुढे अधिक स्पष्ट होत गेल्या आणि अरुणच्याही ! अरुण काळे  ढसाळांच्या संवेदनशीलतेने जागतिकीकरणाला सामोरा
जाणारा कवी आहे आणि ह्या गोष्टीने त्याला ताकद दिली आणि मर्यादाही ! असो . 

Friday, September 9, 2016

Wednesday, September 7, 2016