Sunday, June 4, 2023

 गिरीश मिस्त्री : क्रिएटिव्ह फोटोग्राफीचा प्रवर्तक श्रीधर तिळवे नाईक 


२२ मेला गिरीश कार्डियाक अरेस्टने गेला . भारताचा एक जबरा सररियल फोटोग्राफर गेला . फॅशनचे जग बदलणारा फ्रंट प्रोजेक्शन टेक्नॉलॉजीचा इंडियातील पायोनियर गेला टाइम्स ऑफ इंडियाच्या फोटोग्राफी जर्नलचा पाहुणा संपादक गेला अशियन फोटोग्राफीत १० मोस्ट इन्फ्लुएन्शियल पिपलमध्ये तीन वेळा समावेश असलेला फिलॉसॉफर फोटोग्राफर गेला आणि  मुंबईतील माझा पहिला अथपासून इतिपर्यंत मुंबईकर असलेला मित्र गेला .  त्याच्या मरणाची बातमी त्याची बहीण हेमाद्वारा माझ्यापर्यंत खूपच उशिरा पोहचली . तरीही त्या बातमीतले दुखांश फेरी मारून गेलेच . 

त्याची माझी ओळख माझी मानलेली बहीण कल्पना हिने करून दिली मुळात मी १९८९ ला मुंबईत रहिवासासाठी उतरलो तेव्हा माझ्यासाठी आधार होता तो कल्पना आणि महाडेश्वर कुटुंबीय ह्यांचा ! ही मुंबईतील माझी पहिली फॅमिली ! कल्पनाने मी मुंबईत उतरल्या उतरल्या तिच्या फोर्टच्या  ऑफिसात बोलावले आणि तिच्या बॉसची म्हणजे गिरीशच्या वडिलांची ओळख करून दिली मला येणाऱ्या फ्लॅशेसची चर्चा मी मुंबईत येण्याआधीच पोहचली होती आणि मिस्त्री भविष्य जाणायला उत्सुक होते ते त्यावेळी मुंबईतले नामाकिंत सीए होते तरीही त्यांचे प्रश्न होते मला फ्लॅशेस आल्याने मी बोलत गेलो आणि मला मुंबईतील रहिवासाच्या पहिल्याच दिवशी दुसरी फॅमिली मिळाली 

गिरीश मला भेटायला उत्सुक होता तो वडिलांच्यामुळे ! पाऊणे सहा सहा फूट दरम्यान उंची गोरा रंग ब्रॉड चेहरा भव्य कपाळ सरळ पण मोठे नाक भेदक डोळे त्याला एक टिपिकल पारशी देखणेपण देत होते . तो चालतांना बोलतांना एखाद्या सिंहासारखा असायचा पर्शियन सिंहच बसलाय किंवा चालतोय असं वाटायचं 

कमर्शियल फोटोग्राफर म्हणून त्याने १९८३ ला कामाला सुरवात केली त्याकाळात टेक्नॉलॉजिकल अड्वान्समेंट फार नसल्याने व फोटोशॉप अस्तित्वात नसल्याने फोटोग्राफर्सना खूप ऍक्युरेट आणि प्रिसाईज असणे भाग असायचे ते अपरिहार्य होते तो तसा होताच त्यामुळे शूट करतांना कधीकधी राग नाकावर !

पहिल्या भेटीत कुठल्याही फोटोग्राफरचे प्रश्न असतात तेच त्याने विचारले मी त्याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीची गॅरेंटी दिली. मी कवी आहे म्हंटल्यावर फ्यूचरॉलॉजी साईडलाईन झाली आणि कलेवर  खोलवर चर्चा सुरु झाली जगातल्या नामाकिंत फोटोग्राफरवर व त्यांच्या कामावर गिरीशची मास्टरी होती त्यामुळे चर्चेला मजा यायला लागली त्याचे स्वतःचे काम त्यावेळी रियॅलिझ्मकडून सररियॅलिझमकडे जाणारे होते त्यामुळे त्यावर चर्चा अटळच होती  

प्रकाशावरचे व शॅडो पॅटर्न्सवरचे त्याचे नियंत्रण असामान्य होते त्याला फोटोग्राफीला पेंटिंगमध्ये कन्व्हर्ट करायचे होते ती हूबेहूबकरणाची कला न राहता पेंटिंगप्रमाणे स्वायत्त कला झाली पाहिजे हा त्याचा ध्यास होता आणि फोटो काढताना तो नेहमीच फोटोला पेंटिंग बनवण्याचा भावनेने पछाडलेला असायचा ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीबद्दल त्याला आकर्षण होते आणि ग्रिडींग स्टोनहेंजवरचे त्याचे ह्या काळातले काम असामान्य होते त्याने निर्माण केलेली शेड्सची व्हरायटी ह्या काळात क्वचितच कुणाला साधलेली असेल त्याच्या सररियल कामाला त्याकाळी मिळणारा प्रतिसाद अल्प असला तरी त्याचे काम रिव्होल्यूशनरी आहे ह्याची कल्पना आमच्यासारख्या काहींना होती 

संपादक असतानाही त्याने फोटोग्राफीच्या कमर्शियलइतके कलातत्वालाही  प्राधान्य दिले होते त्याच्या भाषेत फाइन आर्ट टचला !

पुढच्या भेटीत आम्ही अध्यात्माकडे वळलो ईश्वरावर त्याचा विश्वास न्हवता ना मोक्षावर पण बहुदा गुण लागला आणि त्याच्यासाठी योग्य मेडिटेशन्स मला शोधायला लागली त्याच्या फोटोग्राफीत अध्यात्म वाढायला लागलं आणि गणपतीतला व शिवामधला त्याचा इंटरेस्ट कमालीचा वाढला हिंदू मायथॉलॉजीला आधुनिक मांडणीत कसे साकारायचे हा एक प्रश्न बनला एकीकडे इंडस्ट्रियल कमर्शियल फोटोग्राफीला कला बनवण्याचा ध्यास आणि दुसरीकडे मिथ्समधील सनातन आदिबंधांचा पाठपुरावा अशी त्याची फोटोग्राफिक वाटचाल सुरु झाली 

तो मरिनड्राइव्हवर रहायचा आणि मी चर्चगेटला जे एस हॉल होस्टेलला रहायला आलो आणि आमच्या भेटीगाठी वाढल्या फार गुजराती टाईपचं घरचं खायची इच्छा झाली कि अपवादात्मकवेळा मी त्याच्या घरी जेवायलाही जायचो ह्यानिमित्ताने त्याची आई मला अनेक बारीकसारीक प्रश्न मुलांच्या काळजीपोटी विचारायची आणि मी तिला पॉझिटिव्ह बनवायचो ती गुजरातीत प्रश्न विचारायची आणि मी मराठीत उत्तर द्यायचो त्यामुळे हा एक फार इंटरेस्टिंग संभाषणाचा प्रकार असायचा त्याकाळात सगळी मिस्त्री फॅमिली त्यावेळी चैतन्याने झळझळायची त्यामुळे मजा यायची मला गुजराती शिकवण्याचाही तो प्रयत्न करायचा पण तो फेल गेला त्याला मराठी उत्तम समजायची आणि तो चक्क दादा कोंडकेंचा त्याकाळात फॅन होता 

आणि मग एक दिवस ते घडले मला फ्लॅश आला आणि मी अपघात पाहिला काय घडू शकतं ते मी तपशीलवार गिरीशला सांगितलं दुर्देवाने त्याने ते खूप लाइटली घेतले आणि बातमी आली गिरीशला अपघात झालाय 

सर्व ऑपरेशन्स करूनही त्याला व्हीलचेअर टाळता आली नाही सिंह जायबंदी झाला ह्याकाळात मित्र म्हणून त्याच्याबरोबर राहणं मला गरजेचं वाटत असल्याने त्याने कधीही बोलावलं कि मी जात असे त्याला जास्तीतजास्त पॉझिटिव्ह ठेवत असे हळूहळू त्याने नवीन जगणे स्वीकारले पुढचा प्रश्न होता मी एकटाच राहणार कि बायको मिळणार ? कशी मिळणार ?

हा प्रश्न त्याच्या फॅमिलीलाही पडायला लागला त्याचा भाऊ शरद अमेरिकेला सेटल झाला बहीण बहुदा इंग्लंडला आणि दुसरी बहीण हेमा जर्मनीला ! साहजिकच गिरीशची पार्टनर हा चिंतेचा विषय झाला माझ्या सुदैवाने ह्यावेळचा माझा फ्लॅश पॉझिटिव्ह होता आणि त्याला त्याप्रमाणे जोडीदारीण मिळाली ती मराठी होती 

घरसंसार , इस्टेट आणि त्याने काढलेली शरी फोटोग्राफी अकादमी ह्यांच्यात तो हळूहळू बिझी होत गेला आणि कमर्शियल काम हे केंद्रवर्ती बनत चालले माझ्याही आयुष्यात ज्ञ आली भेटींची संख्या घटली त्याचे काम मात्र येत राहिले अपवादात्मकवेळा त्याने बोलावले तेव्हा मी त्याच्या स्टुडिओत गेलोही . तो आत्ताच्या काळावर खुश न्हवता पूर्वी फोटोग्राफर इमेजमेकर होता आता फोटोशॉपच इमेज मेकर आहे असं तो विषादाने म्हणायचा माझ्या मते इंटरनेट वापरून एक नवी इन्स्टॉलेशन टाईप फोटोग्राफी आपण विकसित करणे हा ह्यावर उपाय आहे त्याला ते पटायचं नाही तो ह्याबाबत मनाने साठोत्तरीवालाच राहिला कॉपी पेस्टचा तो क्रिटिक होता ते योग्यच होते सध्याच्या काळात सर्वच कमर्शियल रूथलेस झालंय फोटोग्राफी त्याला अपवाद न्हवती आयफोन आल्यानंतर टच ऑफ क्रिएटिव्हिटी हरवलीय हे आम्हा दोघांनाही मान्य होते पण त्याचा प्रश्न असा होता कि ह्यात टच ऑफ क्रिएटिव्हिटी कसा द्यायचा ? त्याचा प्रयत्न कायम त्या दिशेने चालायचा आणि हे आवश्यक होतं अर्थात कॉपी पेस्टला कला समजणाऱ्या लोकांच्यात हे पटवणे अवघडच होते 

नंतर एका भेटीत मी माझ्या कविता इंग्लिशमध्ये भाषांतरित करत नाही म्हणून तो चांगलाच उखडला अपना आश्रम छोडके बाहर आओ मियाँ म्हणून त्याने खेच खेच खेचली माझे ह्यावरचे म्हणणे मला काही नोबल बिबल मिळवायचे नाही असं होतं ते त्याला पटलं नाही मग मी दोन वर्षे त्याला भेटलोच नाही मग कल्पनाने पुन्हा बोलावले म्हणून गेलो आता प्रश्न स्टुडिओविषयक आणि त्याने काढलेल्या अकँडमीविषयक होते 

नंतर मलाच अपघात झाला मी गेली नऊ वर्षे कधी बेडरिडन कधी पेनकिलर्स घेऊन लेक्चर्स बीडन असा जगत असल्याने भेटी थांबल्या त्यातच माझी श्रवणशक्ती ऑन ऑफ होत होती त्यामुळे समोर भेटून करणार काय असाच प्रश्न होता 

आणि आता बातमी आली ती थेट मृत्यूची ! गिरीश म्हणायचा जाना तो सबको हैं क्या करके जाओगे ये इम्पॉर्टन्ट हैं । गिरीश त्याच्या पाठीमागे असंख्य अव्वल दर्जाची फोटोचित्रे , विक्रम बावा , जिग्नेश झवेरी सारखे अनेक प्रतिभावान विद्यार्थी सोडून गेलाय जी भारतीय फोटोग्राफीच्या इतिहासात नक्कीच इम्पॉर्टन्ट आहेत ! अलविदा मेरे दोस्त ! बडी जल्दबाजी की मेहरबां जाते जाते !

श्रीधर तिळवे नाईक 

No comments: