Friday, October 30, 2015

दत्तादादा 

श्रीधर राजा तिळवे

दत्ता दादा गेला . तो जाणारच होता . गोव्यात त्याला भेटलो तेव्हा मृत्यू त्याच्याभवती फिरतोय अशी जाणीव सतत होत होती त्यामुळे ह्या फेरीत दुसऱ्यांदा भेटलो . ही शेवटची भेट आहे हे उमगून . मुंबईत आलो सुरेलला थोडासा सौम्य पण इशारेवजा मेसेज टाकला आणि अचानक त्याच्या आठवणींचे मळभ दाटून आले . संन्याशाला रडणे अलाऊ नाही म्हणून रडलो नाही . 

खरेतर आम्ही दोघेही गेले कित्येक महिने बेडरिडन . मी अपघाताने शरीर मोडून घेतलेले तर त्याला आतील एका अवयवाने असाध्यसा आजार चिकटवलेला त्यामुळे दुरून एकमेकांना पाहण्याखेरीज काहीच हातात न्हवते . फरक असलाच तर एक होता तो कुटुंबप्रेमी असल्याने गावात कुटुंबात होता आणि मी संन्यस्त असल्याने मुंबईत एकटा होतो . कुटुंबप्रेमी  आणि निर्वाणप्रेमी हा आम्हा दोघांच्यातला फरक कायमच राहिला आणि आम्ही दोघे कधीही भेटलो तरी ह्या गोष्टीवरून वाद झाला नाही असे झाले नाही . त्याच्या डोक्यात वैदिक संन्यासी फिट्ट बसला होता आणि शैव संन्यास समजून घेण्याची त्याची तयारी न्हवती . अगदी माझ्या वडीलांच्या मृत्युवेळीही वैदिक संस्कार करायचे कि नाही ह्यावरून वाद झालाच . तो वैदिक संस्कार करण्याच्या बाजूने होता आणि मी विरुद्ध ! घराच्या पाठीमागेच सनातनचे मुख्य ऑफीस असल्याने संपूर्ण गावावर सनातनची छाया वाढत चालली होती आणि त्याचे पडसादही उमटत होते शेवटी तो सहिष्णू असल्याने त्याने समजुतदारपणा दाखवत वाद संपवला . 

आमचे वाद रंगत आणि त्या वादात उमटून दिसायची ती त्याची शार्प लख्ख बुद्धिमत्ता ! तो जन्मजात बुद्धिमान होता आणि कष्टाळूही ! त्यामुळेच कोर्टात क्लार्कपासून सुरवात करून एकाचवेळी कष्ट आणि शिक्षण करत त्याने एल एल बी केले आणि तो वकील झाला . तो कामाला वाघ असल्याने अनेक कामे अंगावर घेई आणि आपल्या अंगभूत सळसळत्या उत्साहाने पुरीही करी . कुठल्याही गोष्टीचा कीस पाडत तिचा तळ गाठण्याची तिळव्यांची वृत्ती त्याच्यात भरपूर होती .  ह्या कष्टाळूपणामुळे  आणि  बुद्धीमत्तेमुळे पुढे फोंड्यात तो  नंबर १ वकील म्हणून स्थापित झाला . फोंड्यात माझी ओळख दत्ता तिळवेचा चुलतभाऊ अशीच होती आणि आहे . 

दिसायला तो देखणा न्हवता पण रुबाबदार होता . शरीरयष्टी मध्यम चणीची व उंचीची होती .  त्याची तिळव्यांची टिपिकल नागवंशीय पिवळी गव्हाळ त्वचा चमकदार होती नाक मोह्न्जोदडी मोठे पण ऐटदार तर डोळे तीक्ष्ण होते  . सर्वच तिळव्यांच्या प्रमाणे  त्या नाकावर रागही होता . त्याची देहबोली कमालीच्या  उत्साहाने भारलेली होती आणि चेहरा कायमस्वरूपी हसरा होता. हा हसरा आणि उमदा  चेहरा त्याच्या स्वभावाचे सार होता .  त्याला बघून मला नेहमीच वाटायचे कि ह्या माणसाला जगण्याचा कधीही कंटाळा येणार नाही .  

त्याचे माणसांच्यावर अफाट प्रेम होते . तो माणूसवेडाच होता . त्यामुळे असंख्य माणसे त्याने जमवली होती . वकील असल्याने गोव्याचे गुन्हेगारी जग त्याला आतून बाहेरून माहित होते . फोन्ड्यातल्या अनेकांना तो तपशीलवार ओळखून होता . 

त्याचे कौटुंबिक आयुष्य सुरवातीला थोडे खडतर होते . त्याच्या दत्तक प्रकरणात अनेक गोच्या झाल्याने लहानपणी एक वेगळाच आयडेय़्ण्ण्टीटी  क्रायसिस त्याला फेस करावा लागला आणि त्याचे दु :ख कित्येक वर्षे त्याचा पाठलाग करत होते आईबाप असूनही पोरका असे त्याला वाटत होते कि काय कुणास ठावूक ? पुढे आशा वहिनींच्या रूपाने त्याच्या सारखीच उमदी , हसरी ,प्रेमळ , शिस्तशीर , बुद्धिमान पण बुद्धिमत्तेचे प्रदर्शन न  करणारी , लाघवी स्वभावाची मुलगी त्याला बायको म्हणून मिळाली आणि आमच्या कुटुंब कबिल्यातील सर्वोत्कृष्ट जोडपे म्हणून दोघांचा उदय झाला . आशा वहिनीने त्याला केवळ सांभाळले नाही तर  त्याच्या आयुष्याला नीट जमिनीवर ठेवले . आयुष्याच्या उत्तरार्धात त्याला पैसा , यश आणि प्रतिष्ठा अश्या तिन्ही गोष्टी मिळाल्या आणि त्याच्या काळजातले अनेक सल हळूहळू नाहीसे होउन तो एक कुटुंबप्रेमी गृहस्थ झाला अर्थातच त्याचे बाहेरचे ध्यान मात्र कधी कमी झाले नाही 

आमच्या नागेशी बांदिवडे गावात आमच्या रवळनाथाच्या मंदिराभवती तिळवे आणि नाईक असे आम्ही सर्वच एकत्र जगतो . एखाधा आदिवासी कम्युन जसा एकत्र जगतो तसे आम्ही शेकडो वर्षे एकत्रच जगतोय पूर्वी तर अनेकदा आपापसातच लग्न करायचो आत्ता लग्न करणे कमी झाले असले तरी जगणे एकत्र चालूच आहे सांभाळणे चालूच आहे . दादाला ह्या कम्युन विषयी प्रचंड प्रेम आणि जिव्हाळा होता आणि आपण सर्वांनी मिळून हा कम्युन टिकवायला हवा असे त्याला वाटत होते आणि मी ह्या कम्युनमध्ये आधिक मिसळायला हवे असे त्याला वाटे . त्याची ही अपेक्षा मी कधीही पुरी करू शकलो नाही . नवीन पिढी हा कम्युन टिकवेल कि नाही असा प्रश्नही अलीकडे त्याला पडायला लागला होता . त्याने आयुष्यभर हा कम्युन सांभाळला . एका अर्थाने तो केवळ माझाच नाही तर संपूर्ण कम्युनचाच दादा होता आणि सर्वांचा अडीअडचणीच्यावेळी  आधारही ! 

आत्ता तो गेलाय आणि मी इथे मुंबईत बेडरीडन आहे . खरेतर त्याला इतक्या लवकर जायाचे न्हवते आणि तो इतक्या लवकर जाईल असेही कुणाला वाटले न्हवते पण कॅन्सरने त्याला गाठले आणि तो अचानक फास्ट दिसेनासा झालाय 

अगदी लहानपणापासून दत्तादादाशी माझा एक भावनिक बॉण्ड आहे मात्र संन्यासाचे पथ्य म्हणून एक अंतरही आहे आणि होते तरीही तो गेल्याचे दु : ख जीवघेणे आहे . माझ्या सध्याच्या स्थितीमुळे मी फार लांब जाऊ शकत नाही पण शक्य असते तरी मी गेलो असतो कि नाही हे सांगणे कठीण . कारण मृत्यूवर माझा विश्वास नाही किंबहुना मृत्यू नावाचे काही नाहीच आहे . आहे ते केवळ स्थलांतर वा रुपांतर !

मला खात्री आहे दादाने जिथे स्थलांतर केले असेल तिथेही त्याचा चेहरा हसरा आणि उमदाच असेल आणि जगण्याचा नवा उत्साह घेऊन तो सळसळत असेल . 

वो सूरज बनकर आया था हमारे जीवनमे 
वो जहाँभी  होगा चाँद बटोरता होगा 

राजा /श्रीधर तिळवे 



















No comments: