Saturday, July 24, 2021

 सतीश काळसेकर मार्क्सवादाची पॅशन गेली 

महेश म्हात्रे ह्या परममित्राच्या लेखनानं कळलं कि सतीश काळसेकर गेले हल्ली कवी गेले कि हवा जडच होते पण काळसेकरांच्या मृत्यूने श्वासही जड झाला 

मुंबईला जे एस हॉल (हॉस्टेल ) ला आल्यावर साठोत्तरीपैकी ज्यांची पहिली भेट झाली त्यात काळसेकर फर्स्ट ! कदाचित त्या काळात ज्यांच्याशी माझा इमोशनल बॉण्ड निर्माण झाला अशा दोघांपैकी एक (दुसरे केशव मेश्राम ) गावातून मुंबईत आलेल्या प्रत्येक कवीसाठी काळसेकर थोरल्या भावासारखे असत डोळ्यातल्या डोळ्यात हसत ते जेव्हा बोलायचे तेव्हा त्यात तर्क आणि काळजी दोन्ही असायची त्यांचं सावळं आणि रुबाबदार व्यक्तिमत्व पहिल्याच भेटीत इम्प्रेशनचं दही जमवायचं 

त्यांची माझी पहिली भेट पीपल्स बुक हाऊसमध्ये झाली दुकानदाराचा मुलगा असल्याने मला पुस्तकांच्या दुकानात जाऊन पुस्तक खरेदी करायला आजही आवडतं त्यावेळीही आवडे माहीत नाही कशी पण पॉप्युलरनं माझा पहिला संग्रह स्वीकारला आहे ह्याची न्यूज त्यांच्याकडे होती पहिल्याच भेटीनंतर त्यांनी मला " बुद्धिमान आहेस पण भोळसट आहेस तेव्हा ह्या शहरात सावध रहा " अशी वॉर्निंग दिली होती 

पुढे ऋत्विज हा माझा मित्र आशुतोष आपटे ह्याचा मित्र असल्याने भेटायला आला तेव्हा मला माहीतच न्हवतं कि तो काळसेकरांचा मुलगा आहे ऋत्विज आमच्या हॉस्टेल ग्रुपमध्ये लगेच विरघळला मी मंगेश बनसोड आल्हाद भावसार महेश म्हात्रे राजेश बेहरे के श्यामसुंदर अशी एक हॉस्टेल टोळी बनत गेली आणि वाढतही गेली पुढे पोस्टर पोएट्रीचा उपक्रम राबवतांना मी त्यांची मला अतिशय आवडलेली पुस्तकांच्या संग्रहाविषयी ही कविता पोस्टर साठी घेतली ही कविता म्हणजे प्रत्येक पुस्तकप्रेमींची सॉलिलुकी होती आणि आम्हा सर्वांनाच ती आवडली होती आम्ही इथूनच चौथ्या नवतेचे रणशिंग फुंकले आणि ते साठोत्तरीविरुद्ध असूनही साठोत्तरीपैकी काहींनी त्याला पाठिंबा दिला सतीश काळसेकर पाठिंबा देणाऱ्यांपैकी होते काळसेकर फक्त पाठिंबा देऊन थांबले नाहीत त्यांनी नवीन पोरांच्या कविता ऐका म्हणून एक काव्यवाचनाचा प्रोग्रॅमही पीपल्सला ठेवला त्यात मी , ज्ञानदा व इतरांनी  कविता वाचल्या पुढे ह्यातूनच लोकवाङ्मयने काढलेली आठ कवींची काव्यसंग्रह मालिका फळाला आली माझा काव्यसंग्रह पॉप्युलरने १९९२ सालीच काढला होता त्यामुळे मला ह्यात घेता येणार नाही असं काळसेकरांनी सांगितलं तेव्हा मी आनंदाने अहो हे बरोबरच आहे असं म्हणालो ह्या संग्रहांच्यावर लिहायला नंतर समीक्षक मिळेना तेव्हा काळसेकरांनी आणि आल्हाद भावसार ह्यांनी मला विनंती केली आणि मी महानगरमध्ये बहुदा लेख टाकला 

मी मार्क्सशी सहमत नसलो तरी त्याचा शत्रूही न्हवतो ह्याकाळात साहजिकच वैचारिक टकराव अटळ होते सोविएत युनिअन कोलॅप्स झाल्यानंतर जी अभूतपूर्व परिस्थिती उद्भवली होती त्याचे प्रेशर त्यांच्यावरही होते सर्वच एकनिष्ठ कॉम्रेडप्रमाणे तेही क्रांतिक्षणाची वाट पहात होते मी त्यांना सरळच म्हणायचो कि हे वाट पहाणे वांझोटे आहे ते फक्त एकदाच मला म्हणाले कि तू भेटलास कि पेसिमीझम येतो मी म्हणालो मी तुम्हाला रियालिटी दाखवतोय मार्क्सवादाला ह्या देशात भवितव्य नाही आणि असलेच तर शरद पाटील ह्यांच्यासारखं काहीतरी काम सध्याच्या काळात व्हायला हवं मार्क्स भारतीय वाटत नाही हा मार्क्सवादाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांना हे पटणं शक्यच न्हवतं हळूहळू आमचे संबंध ढिले पडायला लागले एकदा तर श्रीधरनं सगळी पोरं बिघडवली म्हणाले मी रिएक्ट झालो नाही 

मग पुन्हा एकदा भेटले तेव्हा पूर्वीचाच जिव्हाळा आवाजात होता सौष्ठव का बंद केलेस वैग्रे सगळ्याच साठोत्तरीप्रमाणे त्यांचाही मी प्रिंटिंगमध्ये अधिकाधिक संग्रह काढायला हवेत  असा आग्रह होता त्याउलट मला त्यांच्या समग्र कविता एकत्र हव्या होत्या 

नंतर मग एकदा फोनवर बोलणे झाले तेव्हा दिवस काढून निवांत ये मला तुझ्याशी निवांत बोलायचं आहे म्हणाले पण मला शक्य झालं नाही 

आणि आता ते गेले 

मला खात्री आहे नव्वदोत्तर पिढीतला प्रत्येक कवी ह्या बातमीने थोडा का होईना हलला असेल आमच्या पिढीला भरभरून स्नेह आणि प्लॅटफॉर्म त्यांनी दिला मतभेदांना जागा दिली आणि नातं मोठं मानलं ते मार्क्सवादी साहित्याचा मोठाच आधार होते 

त्यांच्या कवितेवर मला जे म्हणायचं आहे ते मी टिकाहरणमध्ये म्हंटलं आहेच त्यांच्या रूपाने एका मार्क्सवादी पिढीची पॅशनच गेली म्हणायला हरकत नाही 

गुड बाय कॉम्रेड !


श्रीधर तिळवे नाईक 





Thursday, July 8, 2021

 पॅशन दाय नेम इज दिलीपकुमार श्रीधर तिळवे नाईक 

दिलीपकुमार माझ्या बालपणात मला कधीच आवडले नाहीत माझे वडील त्याचे डायहार्ड फॅन त्यामुळे लहानपणी त्याचे काही चित्रपट मला नाईलाजाने पाहायला लागत वडील दर सोमवारी मला शक्य असेल तर एक चित्रपट दाखवत आणि तो बहुतांशी इंग्लिश असे तरीही काही मॅटिनीज दिलीपकुमारचे होते पण लहानपणी मनोजकुमारने दिग्दर्शित केलेला क्रांती पाहिला आणि मला वाटलं कि हा चांगला अभिनेता आहे मी मग दिलीपकुमार रिटेक सुरु केला आणि केदार शर्माचा जोगन पाहिला मला दिलीपकुमारचा अभिनय मोकाट आवडलेला हा पहिला चित्रपट !

ह्या वेळीच  रमेश सिप्पी सलीम जावेदचा शक्ती , यश चोप्राचा मशाल  पाहताना वाटलं कि दम आहे त्यानंतर मग बिमल रॉयचा देवदास फिरून पाहिला आणि फिरून फिरून गंगावेश तसा पाहत राहिलो हा एक अद्भुत चित्रपट होता खऱ्याअर्थाने रोमँटिक चित्रपटाचा कळस !देवदासमधली पॅशन हा एक ग्रंथाचा विषय आहे 

मात्र त्याला दिलेले वास्तववादी अभिनयाचा टॅग मला कधीच पटला नाही राज कपूर दिलीपकुमार आणि देव आनंद हे तिघेही रोमँटिक अभिनेतेच ! अगदी मुघल ए आझम मधेही दिलीपकुमार मला दिलीपकुमार विथ पॅशनच वाटला . आणि तो तसा होता म्हणूनच पृथ्वीराज कपूरच्या क्लासिकल स्कूलच्या सर्वोच्च अभिनयापुढे व मधुबालाच्या क्लासिकल सौंदर्यापुढे तोडीसतोड पॅशन घेऊन टिकला त्याउलट त्याला समांतर असलेले बलराज साहनी व मोतीलाल हे जास्त व खरे वास्तववादी होते दिलीप कुमारकडे असलेली पॅशन राज व देव दोघांच्यातही मिसिंग होती आणि तिची कसर हे लोक स्टाईलने भरून काढण्याचा हे दोघे केविलवाणा प्रयत्न करत ही पॅशन नेमकी कुठून येत होती हे कोडे खुद्द दिलीपकुमारलाही सुटले असेल कि नाही कुणास ठाऊक ?

मग पुन्हा कधीतरी गंगा जमुना (ह्यावरूनच पुढे सलीम जावेदचा दिवार आला ) पाहिला आणि मग मधुमती दोघेही अभिनयात ढग होते अंदाज न येणारे पण पाऊसगच्च  ! नया दौर , राम और श्याम , लीडर ! माझी दिलीपकुमारची यादी इथे संपते बैराग वैग्रे पाहिले पण पॅशन मिसिंग वाटली . 

१९९२ ला अडा हॉ का बा ना सु ना लिहिताना कामत्रिकोणासाठी दिलीपकुमार ,  सायरा व अस्मा हा त्रिकोण निवडला आणि डोकं गरगरवणारे अनेक तपशील उपलब्ध झाले मग मी दिलीपकुमार एक व्यक्ती म्हणून विचार करणे सोडून दिले जो माणूस आपल्या मित्राच्या बायकोशी रोमान्स करतो आणि नंतर तिला वाऱ्यावर सोडतो त्याला माझ्या एथिक्समध्ये जागा नाही साहजिकच व्यक्ती म्हणून दिलीपकुमारला जागा मिळणे बंद झाले मात्र एक अभिनेता म्हणून असलेला त्यांच्याविषयीचा आदर कधीच कमी झाला नाही पॅशनेट ऍक्टिंग कशी करायची ह्याची दिलीपकुमार म्हणजे चालतेबोलते विद्यापीठ होते दुर्देवाने ह्या विद्यापीठाचे धर्मेंद्र , राजेंद्रकुमार , मनोजकुमार असे अनेक विद्यार्थी सुपरस्टार झाले तरी दिलीपकुमारची पॅशन ह्या सर्वांच्यात मिसिंग होती आणि नकलेत ती मग कितीही चांगली असो पॅशन ओतता येत नाही हे सिद्ध झाले सुदैवाने ह्यापैकी धर्मेंद्रने आपली अभिनयशैली बदलून हीमॅन केली आणि तो वाचला नाहीतर राजेंद्रकुमारसारखा तोही अशोभनीय झाला असता 

पुढे ह्या विद्यापीठाला समांतर रोमँटिक विद्यापीठ राजेश खन्नाने उभे केले आणि दिलीपकुमार स्कूल काही काळ मागे पडले पण पुढे अभिताभ बच्चनच्या रूपाने दिलीपकुमार विथ पॅशन विद्यापीठ पुन्हा नूतनीकरणासकट उगवले आणि त्याने दिलीपकुमारची दुसरी इनिंग प्रमोट केली पुढे शाहरुख खानने दिलीपकुमार विथ राजेश खन्ना ह्यांचा समतोल साधून ऍक्टिंगमधला तिसरा रोमँटिसिझम आणला जो आजच्या पिढीत रणवीरसिंग पुढे न्हेतोय 

माझा ना अल्ल्हाहवर  विश्वास आहे ना जन्नतवर ! त्यामुळे अलविदा ऍक्टर ऑफ पॅशन ! जहाँ रहो पॅशनमे रहो ! 

श्रीधर तिळवे नाईक