Tuesday, August 8, 2017

बांधकाम चालू आहे ह्या कवितेला प्रकाशित होऊन २१ वर्षे होतायत असे सुधीर देवरे ह्यांनी लक्ष्यात आणून दिले त्याबद्दल प्रथम त्यांचे आभार मानतो
 ह्या कवितेने त्यावेळी  भरपूर वाद निर्माण केला
ह्या कवितेमुळे मी काय कमवले तर चौथी नवता लोकांच्यात काही प्रमाणात पोहचली अभिधाचे नाव झाले . मंगेश बनसोड , अभिजित देशपांडे , महेश म्हात्रे ह्यांच्याशी असलेली मैत्री आधिक घट्ट झाली , दिलीप चित्रे , आदिल जसावाला अ . शहा , संदेश भंडारे एस कापूसकर  ह्यांच्याशी तात्पुरता वैयक्तिक परिचय झाला . मला धर्म ही कादंबरी सुचली आणि बांधकाम चालू आहे हा काव्यसंग्रह निर्माण झाला
मी काय गमावले तर ज्ञ ला मी गमावले आणि माझ्या पाठीत  काही सुरे जमा झाले ते अलीकडे सर्वच गळून पडल्याने गळून पडले हेमंत दिवटेशी असलेली घनदाट मैत्री तुटली स्मृती दिवटे सारखी मानलेली बहीण कायमची दूर गेली माझ्या पी एच डी चा प्रबंध पाण्यात गेला आणि पाच वर्षाची मेहनतही ! काही कविता मिळाल्या पण काही कविता कायमच्या नाहीश्या झाल्या. अडा हॉ कॉ बा ना सु ना प्रकाशित करण्याबाबतचा माझा उत्साह पूर्ण मावळला , साहित्यक्षेत्रात काही लोकांनी अस्पृश्याचा दर्जा कायमस्वरूपी दिला आणि अभिधाशी माझे असलेले नाते पातळ झाले आणि सौष्ठव पुन्हा सुरु करावे लागले

ह्याचा माझ्या साधनेला मात्र प्रचंड फायदा झाला मुख्य म्हणजे तंत्र मार्गातून ज्ञ गेल्याने कायमचा मुक्त झालो आणि काही माणसांच्यामुळे ओशो हा माणूस किती बंडलबाज होता  ते कळले एक साधक म्हणून त्यामुळे ह्या कवितेचा मी ऋणी आहे

काही लोकांच्या आणि मित्रांच्या खास आग्रहावरून  ही  एकेकाळी गाजलेली कविता इथे  देतो आहे ह्या कवितेला प्रकाशित होऊन ह्या ऑगस्टला  २१ वर्षे होतायत त्यानिमित्ताने 

 बांधकाम चालू आहे श्रीधर तिळवे नाईक    (उत्तरार्ध)
।। १।।
बांधकाम चालू आहे 

चालू आहे बांधकाम 
सकाम आणि निष्काम 
आता सर्वत्र शिरा आणि धमन्या 
उथळ रक्ताचा बोथट  खळखळाट - हृदयाचा अभाव 

सर्वत्र संगणकांचे फिरते कीबोर्ड 
हातांच्या बदल्या प्रोग्रॅमचे सरकते कायापालट 

अंतिम काही नाही 
स्थिर काही नाही 
सत्य काही नाही 

केवळ बदलती मयभया आणि तिच्या उठाबश्या 

बदलाची शिक्षा सोसत बिल्डिंगांची मोड्यूलेशन्स 
काम संपताच फेकून दिलेल्या डिस्पोजेबल रिव्होल्यूशन्स 

माणसं झाडात जातात 
झाडं माणसात नाहीत 
अशी ही प्रगतीची एकतर्फी वाहतूक 
मुसाफिरा 
हे सारं वगळून तू कुठं जाणार निर्हेतूक 

सर्वत्र माणसांचे अमानुष आरसे 
सर्वत्र पडणारे तुझेच प्रतिबिंब   

।। ।।
तू नव्हतास होती मयसभा
तू आहेस आहे मयसभा
तू नसशील असेल मयसभा

तिच्या बदलत्या अंगात मृत्यूचा संभोग
तिच्या चंचल ढंगात चिन्हांचा कायापालट
तिच्या सरकत्या लेहंग्यात आयुष्याची खसखस

तू तर केवळ भटकभवाना व्हायरस

मुंगीइतकेही नाही स्टेबल  तुझे टाईमटेबल 
उंदराइतकेही सेटल नाही तुझे बीळ


नश्वर लॅबोरेटरीजना चकवा देत
कितीकाळ राहशील नॉनप्रायोगिक
कुठे बांधशील सूक्ष्म घर तुझे
त्यांचे मायक्रोस्कोपिक उन्हं टाळून

मुसाफिरा ,
तू म्हणजे
मायसभेचा अनंत बांधकामात
मोड्युलर भिंतीला होणारी सेल्युलर लघवी
चंचल आणि लाघवी
लवचिक आणि चकवी

।। ।।
विरचित कर अहंकार
मायसभेच्या  अनियमित फैलावात
भरून घे एक श्वास
शांतपणे मरून जा

आपटू नकोस भिंतीवर हात
वाजणार नाही बांधकामातून कसलीच टाळी
नेसवू नकोस गतीला तुझी त्वचा
मोबाईल स्तनांना पुरणार नाही तिची काचोळी

उत्क्रांतीचे हरवलेले दुधाचे दात
शोधू नकोस आत

फक्त
जे सतत फिरतं आहे
ते वाहतं ठेव
आणि
देहाएवढा श्वास घेऊन
जा मरून उडी मारून

अर्थाच्या पलीकडे
अर्थाच्या अलीकडून

।। ।।

ही कुठली  आदिककथा तुझ्या टीव्ही स्क्रीनवर?
हे कुठले अँटिक कावळे तुझ्या घराच्या अन्टेनावर?

कोण राम कोण सीता
कोण कृष्ण कुठली गीता

कोणी पाठवले भूतकाळ तुझ्या व्हिज्युअल वॉशिंगमशीनमध्ये
कोणी वाळत घातले अँटिक चेहरे तुझ्या दोरीवर हँगर लावून


मुसाफिरा
म्युटेशन आणि इव्होल्यूशन
यांना पार करून पोहचतात
इतिहासाच्या कायनेटिक होंडा वर्तमानात

पोटॅन्शियल गोंडा घोळवत
घालतात गंडा
स्मृतिखंडाच्या संगणकीय मनात

त्यातून जो पसारा वाचतो
त्यात असते फॅन्टसीचे सॉस
मॅजिकचे बटर
आणि प्रत्येक क्षणी सिरियलचे सँडविच संपवत
देत जातो आपण सांस्कृतिक ढेकर

।। ।।

प्रत्येक बाई असते पोटॅन्शियल आई
प्रत्येक मुल असते वाट चुकलेला कंडोम

संभोगातील आनंद झाले स्वीच ऑफ
की पुनरुत्पादनाचे स्विच होतात ऑन

फ्रिजनंतरही उरतो अंगात बोअरडमचा शिळा रगाडा
फॅननंतरही उरतो गर्भाशयात वांझपणाचा संपृक्त उकाडा
टीव्हीनंतरही उरतो डोळ्यात अमूर्ततेचा गूढ डार्कनेस
टेपरेकॉर्डरनंतरही उरतात कानात रिकाम्या कॅसेट्स कॉर्डलेस

जेव्हा सारेच फर्निचर होते स्थिर
तेव्हा चेंज म्हणून प्रसवले जाते गतिशील मूल

रेंज बघून आखला जातो बाळंपणाचा एपिसोड

फिल घेत आईपणाचा
सांडले जाते थ्रिल
आणि एकेक सील खोलत
वाढवले जातात तपशील

म्हणूनच मुसाफिरा 

कोणत्याही हॉस्पिटलात
बाईच्या गर्भाशयात राहू नकोस उभा
काहीच जन्माला घालणारा
जप तुझ्या सवतासुभा

।। ।।

मुलांनो,
टीव्हीमध्येच मांडा तुम्ही आता तुमचे गोकुळ
कम्प्युटरमध्येच सांडा तुमच्या ह्या बाळलिलांचे कूळ

खेळणी म्हणून आणा
डायनॉसॉर आणि रिडल्स
मशिनगन आणि नूडल्स

नेटप्रॅक्टिस करा घरातल्या डासांबरोबर
रॅकेटसारख्या पेला गुडनाईटच्या कॉईल्स
आतापासूनच घाला बॉडीत पेनकिलरच्या टाईल्स

आणि
किलर  इंस्टिंक्ट  जोपासत
सुरक्षित ठेवा तुमच्या कुंड्या

तुमच्या मांड्या ऑटोमॅटिक होवोत
तुमची वाढ ऑटोमॅटिक घडो

।। ।।

शिस्नाच्या  नळात वीर्याचा सप्लाय
कुठली  म्युनिसिपालटी सोडते कोणास ठाऊक ?

मेन्स्ट्रुएशन  सायकलमध्ये संभोगाच्या बायसिकल्स
कुठली टीम चालवते कुणास ठाऊक ?

पोरपोरी एकमेकांस पाहतात
एकमेकांत वाहतात

मुसाफिर
वैश्विक ब्लुफिल्मच्या
अर्धनारीनटेश्वर पोझमध्ये
नारी निळी
की नटेश्वर निळा ?

सर्वत्र गोंधळ  सावळा
निस्तरू नकोस

एकमेकांवर हल्ले
एकमेकांवर डल्ले
एकमेकांचे गल्ले
एकमेकांत

शरीरापासून सुरुवात शरीरामध्ये शेवट
संभोगानंतर उरतात एकमेकांविरुद्धचे कट

रक्ताची हॉट कॉफी होते
रक्तात कोल्ड ड्रिंक
कंडोमच्या पिंकदाणीत
वीर्याची नपुंसक पिंक

।। ।।
मुसाफिरा
कुठेही न्हे तुझ्या आयुष्याच्या पालख्या
मल्टीनॅशनल्स सुसज्जच आहेत
सर्वत्रच दुर्गेसारख्या

सर्वत्र त्यांचीच कंस्ट्रक्शन्स
सर्वत्र त्यांचाच इंस्ट्रक्शन्स
त्यांच्या एकेका कमर्शिअलचे
तुझ्याच गळ्याभोवती कॉन्सेन्ट्रेशन

त्यांना तुझा देह हवा

ओठ हवेत लिपस्टिकसाठी
त्वचा हवी साबणाकरता
मनगट हवे घड्याळासाठी
पाय हवेत बुटाकरिता
अंग हवे कपड्यासाठी
डोळे हवेत टिव्हीकरता
नाक हवे परफ्युमसाठी 
कान हवेत  कॅसेटकरता

तूच त्यांचा कर्तासवरता

दे हफ्त्याहफ्त्याने त्यांना तुझा देह

टोचून घे त्यांच्या उत्पादनाचे ग्लुकोज तुझ्या देहात
आजारी पडशील तेव्हा
फीड कर त्यांच्या पिल्स तुझ्या देहाला
आणि आरोग्याची फ्लॉपी 
बडवत रहा
हॉस्पिटलच्या कम्प्युटरमध्ये

हफ्ताहफ्त्याने स्वतःचा बळी दे
हफ्ताहफ्त्याने नाहीसा हो

।। ।।
ईश्वर असेल अगर नसेल
ईश्वराच्याच शोधात इथले पवित्रे
शिर्डीला लाभते नवसाचे मंदिर
पंढरपूरच्या टाळक्यावरून  जेव्हा उडून जातात पत्रे

विठ्ठलाला रिप्लेस करतो साईबाबांचा चमत्कार
रुक्मिणीची सीट होते कॅन्सल काळात
कित्येक  तुकाराम उडून  जातात म्हातारीसारखे
कित्तेक ज्ञानेश्वर गायब होतात तृष्णांच्या बोळात

भक्तांच्या दिंड्या नवसात चमकतात
पालख्यांच्या मोबव्हिलरमध्ये नवे किलर मिरवतात
विठ्ठल ब्लॅक रुक्मिणी व्हाईट
इस्टमनकलर भक्तीमध्ये ब्लॅक अँड व्हाईट वैकुंठ जिरवतात

।। १० ।।
कुठून उगवत राहते ही क्रियांची क्रिएटिव्हिटी
प्रत्येक ऍक्शनला कशी प्राप्त होते स्वतःची आयडेंटिटी

विज्ञान आणि कला
आयडेंटिकल ट्वीन्स मध्ये  फिल्मी फारकत
पॉलिटिकल व्हिलनला पॉवरची बरकत

एकेक हरकत उत्पादन
एकेक कसरत वितरण

मार्केटच्या चढउतारावर तुझे हायकिंग अवलंबून
इम्पोर्ट एक्सपोर्ट बॅलन्सेसवर तुझे सायलेन्स विसंबून

काहीही निर्माण कर
काहीही जन्मास घाल
तुझ्या एकेक निर्मितीला
खाऊन टाकेल इथली पाल

।। ११ ।।
तू कोण आहेस
तू आलास कोठून
तू जाणार कोठे

विश्व काय आहे
विश्व आले कोठून
विश्व जाणार कोठे

समाज काय आहे
समाज आला कोठून
समाज जाणार कोठे

सारेच व्हर्टिकल प्रश्न आता लॅटरल
सारीच आर्टिफॅक्टस आता नॅचरल

ईश्वर नाही
ईश्वराखाली अवतार नाही
अवताराखाली ग्रंथ नाही
ग्रंथाखाली पुरोहित नाही

मालक नाही
मालकाखाली मॅनेजर नाही
मॅनेजरखाली सुपरवाईजर नाही
सुपरवाईजरखाली वर्कर नाही

सारेच पिरॅमिड आता ट्रान्सवाईज हॉटेली सेवा
सारीच शिखरे आता ऑटोमॅनेज्ड मैदानी मेवा

कसा टिकणार तुझ्या केंद्रशोधक हायकिंगचा चाव
सर्वातच जॉगिंग आणि सपाटीमध्ये धाव

सारेच नॉलेज शूट करणाऱ्या काळात
कशी टाळणार तू सिनेमॅटिक गन
कसे टाळणार ऑटोमॅटिक ज्ञानाचे स्फोट
ज्ञानाचे तरंग आणि ज्ञानाचे कण

तू एक कविता लिहितोस
एक झाड नाहीसे होते
तू एक पुस्तक छापून घेतोस
एक अरण्य गायब होते

तुझ्याही ज्ञानाची गोळी त्याच्या छातीत
ज्या गोळ्यांनी पडलाय निसर्ग उताणा
कुणाच्या नावाने ठोकणार बोंब
कुणाच्या नावाने करणार ठणाणा

ज्ञानाआधी ज्ञान
ज्ञानामध्ये ज्ञान
ज्ञानानंतर ज्ञान

स्फोटावरती चिन्हांच्या मुकाट्याने हो तू स्वार
कुणाचा कुठे कंट्रोल नाही ह्या चक्राला ना केंद्र ना आकार

फक्त फिल्मात फिरत राह शोधू नको कशाचाच उगम
मृत्यूचा शॉट येईपर्यंत आनंदित ठेव तुझा दम

।। १२ ।।
सायकल स्कुटर बुलेट होंडा
बंदूक पिस्तूल स्टेनगन मशिनगन
फौंटन बॉल जॉटर जेटर
मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेकट्रोनिक सॉफ्टवेअर

झिगझॅग  रेषेत उडणारे वैज्ञानिक ससे
शर्यत सोसत धावणारे मेंदूचे कासव

सर्वत्र अगणित साउंडट्रॅकसचा मळा
आणि तुझ्याजवळ तुझा एकुलता एक गळा

मुसाफिरा,
कशा साधशील कोकीळवेळा
ह्या पोस्टइंडस्ट्रियल वसंतात

ह्या फांदीवर बहर त्या फांदीवर पानगळती
ह्या पानामध्ये रॉक त्या पानात शास्त्रीय संगीत

कुठल्याही झाडावर कुठलेही ऋतू कितीही ऋतू कसेही ऋतू

शरीराच्या  हवामानाचे बदलते अंदाज
आणि
सर्वत्र वाजणारा पाण्याचा सिंथेसाईजर

समुद्रात केले जातील मॅनेज पावसाळे
तिथे तुझ्या आसवांना कसली येईल किंमत

HO च्याच परिभाषेत पाणी आणि बर्फ
वाफ आणि  बिसलरी
तिथे तुझ्या बासरीत कसे वाजेल दुःख
कोण जाईल मुळाशी

साऱ्याच बुध्यांच्या तळाशी आता केवळ वेटिंगरूम
ट्रेनचे टाईमटेबल वाचण्यासाठी तिसऱ्या डोळ्यात एक झूम

।। १३ ।।

गावातून शहरात आलास
शहरातून महानगरात
विखुरला देशादेशात
फांद्याफांद्यानी पसरलास

आकाशात टांगलेला हा उलटा अश्वत्थ
ह्या पारंबीवर रशियाचा उपग्रह
त्या पारंबीवर फ्रान्सचा
इथे सूर अमेरिकेचा
तिथे सूर जर्मनीचा

सुरपारब्यांचा हा अब्स्ट्रॅक्ट खेळ
प्रक्षेपणांचा हा फॉर्मलेस मेळ

कुठे सापडतील मुळे
तुझ्या ह्या वेताळी अवताराला
जिथे सारेच अमूर्त आहे
तिथे कसा येशील तू आकाराला

विक्रम साजऱ्या करणाऱ्या शेकडो गोष्टी तुझ्याजवळ
आणि तुला वाहून न्हेणारे हे वैज्ञानिक शतक
आध्यात्माचा राजहंस कधीचाच अडून गेलेला
तुझ्या काळजात उरलेले कलेचे बदक

तुझ्या साऱ्याच प्रश्नांची कम्प्युटराईज्ड उत्तरे
आणि उडून गेलेली तुझ्या गोष्टीतील अत्तरे

मुसाफिरा
गोष्टी संपून गेल्यावर
काढून घेतली जाईल तुझ्या वेताळपंचविशीची स्पॉन्सरशीप
आणि
लटकत राहशील तू प्रेताप्रमाणे ह्या आसमंती अश्वत्थाला
नव्या टाइमस्लॉटच्या प्रतिक्षेत सीप सीप सीप

।। १४ ।।
शॉवरमधून कोसळतो जो रिमझिम पाऊस
त्या पावसाळ्याचे मान आंघोळीनंतर आभार
गॅससिलेंडरमधून उगवतो जो अग्नीचा आशीर्वाद
त्या आगीला दे पोट भरून धन्यवाद
वायूचे अवयव जो मॅनेज करतो फॅन
त्या फॅनला जोडून घे आयुष्याचे श्वास

हे धातू हे लाकूड ह्या विटा हे कागद
हे सारेच पृथ्वीचे बदलणारे अभिनय
ह्या साऱ्यांनाच कर अवयव जोडून नमस्कार

हा टीव्ही हे कपडे हा फोन हे स्लीपर
ह्या साऱ्याच आकाशाच्या मूलभूत पाठराखणी
माहेर मानून त्यांना हो अंगभूत कृतज्ञ

चार भिंतीत घेत राहा पंचकमहाभूतांचा गुहागर फील
डायनिंग टेबलभवती गोळा कर तात्पुरत्या टोळीचे डिस्पोजेबल सभासद
कॅसेटच्या फिरतीवर थिरकत ठेव आदिवासी नाच

औद्योगिक अन्न संपेपर्यंत
प्रोजेक्टमध्ये कर काम
आणि गरज संपली की जा निघून

ह्या कंपनीतून त्या कंपनीत
ह्या डिपार्टमेंटमधून त्या डिपार्टमेंटमध्ये
ह्या शहरातून त्या शहरात
ह्या घरातून त्या घरात

मुसाफिरा
जिथे अवघी पृथ्वी फिरता रंगमंच आहे
तिथे तुला कोण देईल स्थिर भूमिका स्थिर संवाद

ह्या नाटकाला ना नायक
ना खलनायक
सारेच एकमेकांच्या भूमिकेत साहाय्यक
सारेच माहित नसलेल्या रोलचे लेखक

एकमेकास अनोळखी
एकमेकाला पूरक

।। १५ ।।
उजव्या हातात रम आणि व्हिस्की
डाव्या हातात हातभट्टी आणि उचकी

उजव्या जिभेत केक आणि वेफर
डाव्या जिभेत झुणका आणि भाकर

उजव्या हातात न्यूयॉर्क आणि सिंगापूर
डाव्या हातात शिर्डी आणि पंढरपूर

उजव्या मेंदूत कॉनव्हेंट आणि बी सी डी
डाव्या मेंदूत मराठी आणि

मुसाफिरा
परस्परविरोधात आता कोण करेल उठाव
कोण माजवेल बंड

दोन्ही हातांचा एकमेकांस अल्कोहोलिक शेकहॅण्ड
दोन्ही जिभांचा लागणारा एकमेकांस टाळा

दोन्ही पायात चाललेली तीन पायांची शर्यत
दोन्ही मेंदूत बौद्धिक संभोगाचे अद्वैत 

परस्परांना पडलेले परस्परांचे विळखे
परस्परांचे परस्परांत आळोखे आणि पिळोखे

मुसाफिरा
ह्या अद्वैती  आसमंतास
कोण मांडेल वर्ग
कोण सांडेल चळवळी
कोण करेल निग्रह

सर्वत्र आता एकच ग्रह

तेव्हा दे सोडून तुझा क्रांतीचा आग्रह

स्वतःमध्ये झाडू मारून
स्वतःपुरता स्वच्छ हो

समोर एक आरसा ठेव
स्वतःपुरता चेहरा जप
आरशामध्ये मांड देव
स्वतःमध्ये कर तप

।। १६ ।।
कलोनियल केशवसूत नॉनकलोनियल पुशि., ना. धों
ओझोनथराच्या भोकात धाड यांचे सर्व रोमॅन्टिक स्वर्ग
कलोनियल मर्ढेकर नॉनकलोनियल नेटिविस्ट
गार्बेजमध्ये फेकून दे यांचे पृथ्वीनर्काचे नेटवर्क

गांडीला पाय लावून पळून गेलेला ***
आणि कंडोम वाटत फिरणारी संभोगसुलभ ***

रिकाम्या झालेल्या विटेवर आता
कसा टेकेल तुझा ग्लोबल माथा
इंद्रायणीच्या नॉनरेसिडेन्शियल पाण्यावर
कशी तरंगती ठेवशील तुझी गाथा

कम्प्युटरमधील व्हायरससारखी तुझी ही कविता
तिला ना बाप ना आई
ना गणगोत ना पुण्याई

कुठेतरी फ्लॉपी  वाजते आणि ती जन्म घेते
कुठेतरी हालचाल होते आणि ती मरुन जाते

मुसाफिरा
आध्यात्मिक करमणुकीचा हा डिस्पोजेबल अवतार
करून धारण हो निर्विकार

।। १७ ।।
खंडाखंडात फुटला होतास
 पृथ्वीमध्ये एकसंध झालास

पृथ्वीमध्ये फोडला गेलास
मॅटरमध्ये एकसंध झालास

मॅटरमध्ये फोडला गेलास
मूलद्रव्यात वाटला गेलास

एटममध्ये सांधला गेलास
पार्टिकल्समध्ये वाटला गेलास

पार्टिकल्समध्ये संशयित झालास
तरंगामध्ये त्रिशंकू झालास
दोन्हीमध्ये एब्सर्ड झालास
अन आता 
क्वार्क्समध्ये पुन्हा एकसंध झालास

मुसाफिरा
कसे ऍडजस्ट करशील तुझ्या जिज्ञासेचे ओठ
कसे ऍडजस्ट करशील संभोगासाठी तुझ्या लॅबचे आसन
प्रत्येक क्षणी सरड्याचा बदलत रंग
प्रत्येक क्षणी सरड्याचे बदलणारे कुंपण

।। १८ ।।

शहरामागून पालथलीस शहरे
नोकऱ्यामागून नोकऱ्या
संसारामागून उलथलेस संसार
छोकऱ्यामागून छोकऱ्या

कित्येक आयुष्याच्या फोडल्यास खापऱ्या
कित्येकदा स्वतःचेच पाहिलेस खून
जेव्हा खुनाचे आरोप आले
झालास फरारी तेव्हा स्वतःतून

अंगावर आलेत कित्येक चार्जेस
कित्येक चार्जेस काढून घेतले गेले
मृत्यूच्या ठाण्यात झालास जिवंत
आयुष्यात तुझ्याच आयुष्य मेले

कित्येक कपडे आले आणि गेले
कित्येकदा साक्षात देह बदललास
कैकदा त्वचा आल्टर रफ़ू केल्यास
कैकदा प्लॅस्टिक सर्जरीने त्वचाच पालटल्यास

मुसाफिरा
एका अंड्यातून किती कोंबड्या उजवल्यास
मुसाफिरा
एका पेशीतून किती टेस्टट्यूबबेबीज प्रसवल्यास

।। १९ ।।
तीन तास सिनेमा भाड्याने घे
तीन तास टाईम पास कर
एक शरीर प्रेम बुचकळून टाक
एक शरीर एनर्जी पास कर
हजार फूट एसेलवर्ल्ड भाड्याने घे
हजार फूट स्पेस पास कर

जिथे आयुष्यच अवघे रिळासारखे होते पास
तिथे कोण तुला देईल स्थिरस्थावर विश्रांती
उपग्रहांच्या रहाटगाडग्यात कसा फिक्स राहील
तुझ्या करमणुकीचा दोर
कशी थांबवशील ही आयुष्याची भ्रमंती

तू एका ट्रेनमधून दुसऱ्या ट्रेनमध्ये
दुसऱ्या ट्रेनमधून पुन्हा तिसऱ्या
अनुभवत सर्वत्र डिस्पोजेबल गर्दी
शूट करत प्रत्येक स्टेशनवर नवे चेहरे नव्या टपऱ्या

हे विश्वच जिथे टपोरी अनरिवायंडेबल फिल्मसारखे
तिथे तुझ्या डोळ्यांचा  कॅमेरा
टिपणार तरी काय
जपणार तरी काय

मुसाफिरा
प्रत्येक शॉटगणिक जिथे तुझा रोल बदलतो
तिथे तुझ्या अस्तित्वात
स्थिरावणार तरी काय
आणि टिकणार तरी काय

।। २० ।।

नातलग येतायत
नाती वाहतायेत
मित्र येतायत
मैत्री वाहतायेत
लोक येतायत
समाज वाहतायेत

ह्या टेलिफोनमधून त्या टेलीफोनमध्ये
ह्या पेजरमधून त्या पेजरमध्ये
ह्या मोबाईलमधून त्या मोबाईलमध्ये
ह्या फॅक्समधून त्या फॅक्समध्ये
ह्या इमेलमधून त्या इमेलमध्ये

साऱ्याच रक्तसंबंधांच्या ह्या इलेकट्रोनिक शिरा
इलेकट्रोनिक धमन्या
प्रत्येकवेळी ते स्पीकर
आणि तू नेहमीच रिसिव्हर एन्डला

मुसाफिरा
पसर तुझ्या इंद्रियांचा सॉफ्टवेअर पदर
स्वीकार त्यांच्या मनाच्या इंडिव्हिज्युअल संहिता

त्यांनी कम्युनिकेट केलेल्या आकांतानी
निमूटपणे सजव तुझा एकांत 

चिन्हांचा स्फोट होईपर्यंत 
हाताळत राहा आयुष्याचा बॉम्ब 

आणि तुझी वेळ आली 
की मुकाट्याने स्फोटात वाजत 
नाहीसा हो कम्युनिकेशनमधून 

कम्युनिकेशनच्या पलीकडे 
कम्युनिकेशनच्या अलीकडून 

।। २१ ।।
कधी घेशील मिती ओलांडून अनंताकडे ट्रान्सक्वांटम  उडी 
कधी भोगशील मृत्यू सांताचा  घेऊन सांतातच खोलवर बुडी 

सर्वत्र इंटरनेटचे घनदाट जाळे 
आणि तू उपग्रहासारखा गुरुत्वाकर्षणाला लटकलेला 

तुझ्या प्रत्येक साधनेत तृष्णांचे मेसेज 
तुझ्या प्रत्येक स्वातंत्र्यात आळशीपणाचा प्रोग्राम 
समाधीच्या प्रत्येक क्षणात मारली गेलेली मोबाईल पाचर 
आणि शरीरात दरवळणारी संभोगाची  शुगरकोटेड ग्यानबाजी मेख 

मुसाफिरा 
गोडधोड सणासाठी पुन्हा पुन्हा जन्मत राहा 
मुसाफिरा 
बांधकामाचा डायबेटिस होऊन पुन्हा पुन्हा नाहीसा हो 

।। २२ ।।
तुझी एन्ट्री नव्हती तुझ्या हाती 
तुझी एक्झिट  नाही तुझ्या हाती 

फक्त फिरणे हीच तुझी गती 
फक्त जगणे हीच तुझी नियती 

मुसाफिरा 
फिर क्लॉकवाईज 
वा भटक अँटीक्लॉकवाईज 
जग स्पेसवाईज 
वा हालचाल अँटीस्पेसवाईज 

नाही ऐकणार तुझे कान कधी साउंडप्रूफ सिम्फनीचा अनहद 
नाही उतरवणार तुझ्या त्वचा कधी ट्रान्सटचेबल इंटरकोर्सची हळद 

नाही शूट करणार तुझे  डोळे कधी ट्रान्सव्हिज्युअल  असणेपण केवल अन शुद्ध 
नाही खाणार तुझी जीभ कधी निर्वाणाची डेथडिश सुबुद्ध अन प्रबूंद्ध 

नाही हुंगणार तुझे नाक कधी पृथ्वीचे सुगंधीत फुल सगुण 
नाही होणार तुझे शरीर कधी विश्वाचे निर्गुण क्रियेटीव्ह हस्तमैथुन 

तू फक्त बांधकाम करशील 
इथून तिथे तिथून इथे 
तू फक्त हालचाल करशील 
आतून बाहेर बाहेरून आत 

मुसाफिरा 
तेव्हा थांबव आता तुझ्या  शरीराचे दोन काटे 
दोरा पार होईपर्यंत सांभाळ हि नीडल 
आणि फिडल वाजवत कर्मांची शरीरातून गायब हो 

मुसाफिरा 
तू नव्हतास तेव्हाही मयसभा होती 
मुसाफिरा 
तू नसशील तेव्हाही मयसभा असेल 

श्रीधर तिळवे नाईक 

(प्रथम प्रकाशन अभिधा  ऑगस्ट  १९९६   . व्ही .प्रकाशन वर्ष २००४  पॉप्युलर प्रकाशन  ह्या चॅनेल सिरींजमधील पहिल्या  प्रकाशित काव्यसंग्रहातून )

No comments: