Sunday, November 27, 2016

आनंद यादव गेले श्रीधर तिळवे नाईक 

आनंद यादव गेले . व्यंकटेश माडगूळकर आणि इतरांनी सुरु केलेल्या आधुनिक देशीपणाचा एक इन्सायडर म्हणून विकास करणारा साहित्याच्या कोल्हापुरी स्कुलचा प्रतिभावंत लेखक गेला . कागलमध्ये जन्मलेल्या ह्या कोल्हापुरी लेखकाची हवी तशी कदर कोल्हापूरकर लोकांनी कधी केली नाही  ते नेमके काय करतायत हेसुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही . 

आनंद यादव करत काय होते ?

ते अभिरुचीने जन्माला घातलेल्या आणि सत्यकथेने विकसित केलेल्या आधुनिकचे कलावादी देशी मॉडेल तयार करू पहात होते व्यंकटेश माडगूळकर आणि भालचंद्र नेमाडे ह्यांनी जन्माला घातलेल्या शासक मराठा समाजाच्या देशी  मॉडेलला ते अप्रत्यक्षरीत्या च्यालेंज देत होते .परिणामी नेमाडेंच्या अवाजवी प्रभावामुळे मार्गी  संस्कृतीत विलास सारंगांची जशी गळचेपी केली गेली तशीच गळचेपी साठठोत्तरीने देशी संस्कृतीत आनंद यादवांची केली कलावादी आवाज केवळ दाबायचा नाही तर ठार मारायचा  हा नेमाडी अजेंडा आनंद यादवांना कायमच उपेक्षेच्या गर्तेत फेकत राहिला . 

वास्तविक आनंद यादव कुणबी समाजात जन्मले होते आणि त्यांची गोतावळा ही कादंबरी कुणबी संवेदनशीलतेने लिहिलेली पहिली कादंबरी होती . ग्रामीण जीवनाकडे आउटसायडर म्हणून बघण्याऱ्या व्यंकटेश माडगूळकरांपेक्षा आनंद यादवांनी इन्सायडर म्हणून केलेले हे लिखाण वेगळे होते आणि त्याला भरभरून दाद मिळाली  . शासक मराठा समाजाकडून ह्याचवेळी कोल्हापूर स्कूलमधून मृत्युंजय सारखी कादंबरी आली पण तरीही गोतावळा टिकली ती तिच्या अंगभूत रचनेने ! मराठीत शासक समूहाकडून कोसला आणि अशासक समूहाकडून गोतावळा येणे हे आश्वासक होते पण पुढे शासक समूहाचे देशीवादी मॉडेल अधिकाधिक लोकप्रिय होत गेले इतकेच कशाला सारे अशासक मराठाही कोसला छाताडावर घेऊन नाचू लागले आणि आनंद यादव हा पर्याय मागे पडू लागला . 

हे असे का घडले ?

पहिले कारण शेती नको असलेल्या  सर्व मराठ्यांना शेतीतून बाहेर पडलेला पांडुरंग अधिक जवळचा वाटला . 

दुसरे कारण गोतावळा प्रत्यक्ष शेतीशी निगडित होती तर कोसला विध्यार्थी जीवनाशी साहजिकच विद्यार्थी समूहाला कोसला आधिक भावली 

तिसरे कारण नवतेच्या दृष्टीने गोतावळा दुसऱ्या आधुनिकतावादी नवतेशी तर कोसला तिसऱ्या देशी नवतेशी निगडित होती त्यामुळे साहजिकच संवेदनशीलतेबाबत कोसला आधिक आड्वान्स होती . 

चौथी कोसला कलात्मक पातळीवर गोतावळ्यापेक्षा सरस होती 

प्रश्न असा आहे कि कोसला हे पलायन होते का ? आणि गोतावळा शेतीत ठामपणे थांबणे ?

ह्याचे उत्तर हो असे आहे पण कोसलातले पलायन हे अभिजात पलायन आहे तर गोतावळातले थांबणे हे काहीसे रटाळ आहे 

तरीही आनंद यादवांची थोरवी अशी कि त्यांनी तरीही आपला कुणबी समूह सोडला नाही झोंबी , नांगरणी , कांचवेल , नटरंग सारख्या कलाकृतीतून हा समाज घट्ट पकडून ठेवला . नेमाडे  तमाशाविषयी नुसती बडबड करत होते तेव्हा आनंद यादव नटरंग लिहीत होते नेमाडे वारकरी समाजावर बोलत होते तेव्हा आनंद यादव ज्ञानेश्वर आणि तुकाराम ह्यांच्यावर आधुनिक दृष्टिकोनातून कादंबऱ्या लिहीत होते (लोकसखा ज्ञानेश्वर , संतसूर्य तुकाराम) दोघांच्यातला हा फरक नेमाडेंच्या कुणबी भक्तांना कधी दिसलाच नाही कारू आणि नारू ह्यांनाही तो कधी कळला नाही 

साहजिकच तुकारामावरच्या कादंबरीवर वाद झाला तेव्हा सॅम चॅनेलच्या स्टुडिओत संजय आवटेंच्या समोर फक्त मी आणि संजय सोनवणी यादवांच्या बाजूने उभे होतो तर देशीवादी सदानंद मोरे आमच्या विरोधात उभे होते देशीवाद्यांना ही कादंबरी तुकारामाचा अपमान वाटत होती . कारण त्यांना शासक समुदायाची परंपरा जपणे फार महत्वाचे वाटत होते वास्तविक झाले काय होते ? तर यादवांनी आधुनिकतेला साजेशी भूमिका घेत फ्रॉइडच्या मानसशास्त्राचा आधार घेत तुकारामाचे एक काल्पनिक बालपण तयार केले होते आणि हे काल्पनिक बालपण ,  हे आधुनिकत्व आणि ते व्यक्त करण्याचे लेखकाचे स्वातंत्र्य देशीवाद्यांना अमान्य होते . हा दहशतवाद आम्हाला अमान्य होता आणि आहे . ह्या दहशतवादाने ह्या कादंबरीचा बळी घेतला आणि ही कादंबरी मागे घेतली गेली हेच स्वातंत्र्य किरण नगरकरांनी संत मीराबाईबाबत घेतले तेव्हा  मात्र कुणी चकार शब्दही काढला नाही कारण देशीवादांच्या दृष्टिकोनातून ती त्यांच्या देशात बसत नाही त्यामुळे तिचे काय करायचे ते राजस्थानवाले आणि इंग्लिशवाले बघून घेतील . असो. 

उत्तरार्धात आनंद यादवांना हे कळून चुकले कि नुसत्या सौदर्यशास्त्राने ग्रामीण साहित्याचे भले होणार नाही त्यांनी समाजशास्त्रालाही महत्व देणे सुरु केले तर नेमाडे ह्यांनाही कळून चुकले कि नुसत्या समाजशास्त्राने काही होणार नाही थोडी सौन्दर्यशास्त्राची कदर केली पाहिजे वस्तुस्थिती अशी आहे कि देशीपण नीट साहित्यात आणायचे असेल तर एकतर सौन्दर्यलक्ष्यी समाजशास्त्राची धाटणी स्वीकारायला हवी किंवा समाजशास्त्रीय सौन्दर्यशास्त्र निर्माण करायला हवे . देशीपणाला नव्या काळाच्या संदर्भात साकार करायला चाललेल्या ग्रामीण  समूहातील नव्या लेखकांना एवढे जरी कळले तरी ती आनंद यादवांना योग्य अशी श्रद्धांजली होईल .  



















No comments: