Sunday, November 27, 2016

महेश तू म्हणतोस ते खरे आहे अशी पात्रे अडा हॉ कॉ तही आहेत . खुद्द आनंद यादव ह्यांच्यावर रथ नावाची  एक कादंबरी रंगनाथ पठारेंनी लिहिलीये असा संशय साहित्य क्षेत्रात व्यक्त केला जातो

प्रश्न असा आहे कि तुमच्या आयुष्यातील ही पात्रे तुम्ही महाकृतीकार म्हणून कशी आणता ? दुसरी गोष्ट फक्त प्रत्यक्ष पात्रे कामाची नाहीत तर काल्पनिक पात्रेही निर्माण करता आली पाहिजेत अ डॉ हॉ कॉत अशी काल्पनिक पात्रेही भरपूर आहेत . आनंद यादवांनी आत्मचरित्रात्मक कांदंबऱ्यात सुनील तांबे म्हणतात तसे  पात्रे प्रत्यक्ष घेतली पण कादंबरीकाराचे स्वातंत्र्य शाबूत ठेवून त्यांचा काल्पनिक विकासही घडवला .

सतीशराव तुम्ही म्हणता ते थोडे बरोबर आहे पण आनंद यादवांचा फोकस कधीही हलला नाही किंबहुना आधुनिकवाद त्यांनी शेवटपर्यंत सांभाळला आणि तो कालबाह्य झालेला असूनही रेटला . प्रॉब्लेम असा आहे कि विलास सारंगांचे अनुभवविश्व असे आहे कि त्यात कल्पनेचे मजले चढवता येतात पण ग्रामीण भागातील कुणबी नारू कारू  वर्गाला असा कल्पनाविलास परवडणारा नसतो नेमाडेंच्या सारखा शासक समूहातून आलेला मनुष्य किमान पक्षी एग्झिस्टनशीयल एन्क्वायरी करू शकतो कुणबी नारू कारू समूहात हे फार अवघड जाते . आनंद यादवांनी एग्झिस्टनशीयल एन्क्वायरीचे शिवधनुष्य हातात घेतलेच नाही मग पेलणे तर खूप दूर ! नेमाडेंनी हे शिवधनुष्य पेलून यादवांच्यावर मात केली .

तो माडगूळकरांचा जिरेटोप आनंद यादवांना हवा होता कारण त्यांना मुळात नेमाडे हे आपले मुख्य प्रतिस्पर्धी आहेत हेच कळायला उशीर झाला मुख्य प्रॉब्लेम ते सत्यकथेकडून आले हाच झाला आणि आनंद यादवांच्यावर चढलेला हा सत्यकथेचा टिळा त्यांना आयुष्यभर पुसता आला नाही ते ब्राह्मणी ग्रामीणकार झाले ज्याचा पुरेपूर फायदा नेमाडेंनी उठवला शेवटी शासक समूहातून आलेले राजकरणात निपुण असतात . त्यामुळेच तुम्ही म्हणता तश्या खेळ्या खेळून नेमाडेंनी  मात केली

नितीन वाघ तुकारामाच्या अभंगात तुकारामाच्या बालपणाविषयी आवश्यक तशी माहिती नाही ही बेसिक गोष्टच तुम्हाला माहित नाही असे दिसते तुकारामाचे अभंग कच्चा माल म्हणून वापरलेले आहेत . आनंद यादवांना इतकी अक्कल नक्कीच होती

तुम्ही म्हणता तसे वाटते किंबुहना भारतीयांची महाकाव्ये पुराणे व दंतकथा ह्या अतिवास्तववादी कल्पनाजन्य आहे आणि त्यामागचा उद्देश बहुजन समाजाला गुलाम बनवणे हाच होता जेव्हा हे नव्या पिढीला कळले तेव्हा वास्तववादी परंपरा शोधली गेली महात्मा फुलेंनी ह्याची सुरवात केली आणि नेमाडे थेट व्हाया चक्रधर बौद्ध वास्तववादापर्यंत पोहचले त्यामुळे वास्तववाद हा  ब्राह्मण्याविरुध्दचे शस्त्र  म्हणून
आणला गेला दलित आत्मकथनांनी त्याला नंतर बळकटीच दिली यादव ह्याच पिढीत लिहीत होते आणि वास्तववादी होते पण वास्तववादातले धोके त्यांना माहीत होते त्यामुळे सत्यकथीय सोंदर्यशास्त्राची पाठराखण समीक्षेत आणि फिक्शनमध्ये वास्तववाद अशी ही पॉलिसी होती आनंद यादव न वाचताच त्यांच्याविरुद्ध बोंबलणारे फारच झाले कलेचे कातडे फसली ह्याच्याशी मी पूर्ण सहमत

तू म्हणतोस ते योग्यच आहे जर आपण प्रतिभेचा विचार केला तर नेमाडेंचे पारडे खूपच जड आहे पण सध्या आपण आपल्या गावात जे काही बघतोय तिथे फक्त नेमाडे पुरेसे ठरणार नाहीत असे वाटते आनंद यादव हाही एक पर्याय आहे हे निदान ध्यानात आणून द्यावे एवढाच ह्या पोस्टचा उद्देश होता कुणी सांगावे कदाचित यादवांचा पर्याय निवडून कुणी नवा लेखक त्याला फार व्यापक बनवेल दुसरी गोष्ट ग्रामीण साहित्यावरचा देशीवादी  प्रभाव हा ह्या साहित्याला एकारलेपणा देतो आहे त्यावर उतारा म्हणून यादवांच्यासारखे लेखक बरे पडतात मी सत्यकथेच्या विरुद्ध आहे हे तर तू जाणतोसच

एक वाचक म्हणून सांगतो वाचक सर्वत्रच बसतो वाचक वृत्तीने हिंदू असतो त्याला कुठलाही देव चालतो आणि कुठेलेही देऊळ चालते

 प्रवीण माडगूळकर सत्यकथेकडून माडगूळकर आले डहाके आले काळसेकर आले पण डहाके आनंद यादवांनी स्वतः चे साहित्यशास्त्र  मांडून सत्यकथेची मांडणी पुढे न्हेली माडगूळकरांनी हे केले नाही त्यामुळे माडगूळकरांच्याकडून धोका नाही पण यादव ह्याबाबत नमले नाहीत परिणामी सगळे देशीवादी दूर होत गेले
सर्वांनी एक गोष्ट लक्ष्यात घ्यायला हवी कि यादव गेले त्यामुळे त्यांनी वैयक्तिक पातळीवर संघ जवळ केला कि नाही किंवा त्यांची तुकारामावेळची माघार वगैरे साईडलाईन केलेलेच बरे ! नेमाडेंनी आयुष्यात कधी समाजाशी पंगा घेतलाच नाही यादवांनी निदान तो घेतला . परंपरेच्या भुईकोट किल्ल्यात सुरक्षित राहून क्रांतिकारक होण्याची अदभूत किमया नेमाडेंना साधली यादव किल्ल्याच्या बाहेर येऊन भुईसपाट झाले एवढाच काय तो फरक ! मुद्दा आहे तो यादव जे सोडून गेलेत त्याचे आता काय ? बहुप्रसवा लेखणीचे सर्व काही  आवडणे अशक्यच पण प्रत्येकाला किमान दोन किंवा तीन कादंबऱ्या आवडतील एव्हडी तजवीज त्यांनी केलीये खळाळ चा  उल्लेख झाला नाही पण तेही पुस्तक काहींना आवडते गोतावळाबाबत ८०% तरी सहमत आहेत ते नेमाडेंच्या इतके थोर नाहीत हे तर उघडच आहे पण त्यांनी जे दिले आहे ते दुर्लक्ष्य करण्याजोगे नाहीये एव्हढे तर सर्वांनाच मान्य व्हावे

हे ब्रिटिश लेखक म्हणणे शक्य नाही कारण त्याला हे माहित असेल कि देशीवाद हा प्रथम अमेरिकेत निर्माण झाला फारातफार तो सारंगांना अमेरिकन देशीवादाचा इतिहास कसा माहीत नाही ते सांगेल

नितीन वाघ आपल्या प्रश्नांची उत्तरे चर्चेत आहेत पण थोडी तपशीलवार देतोय १९६० नंतर देशी संस्कृतीतून दोन चळवळी आल्या तर पोटी संस्कृतीतून स्त्रीवादी , दलित , झोपडीवादी , मुस्लिम वगैरे तर जमातीतून आदिवासी साहित्याची चळवळ आदिवासी देशीतील दोन चळवळी ग्रामीण साहित्याची चळवळ आणि दुसरी देशीवादी आनंद यादव आणि नेमाडे ह्यांची तुलना ह्यासाठी कारण दोघेही एकाच संस्कृतीचे बायप्रॉडक्ट आहेत

कुणीतरी एक संपला कि दुसरा देशी संस्कृतीचा राजा होणार हे उघड होते नेमाडे सत्यकथाविरोधी होते पण वारकरी चळवळीचे समर्थक होते वारकरी परंपरेचे समर्थक होते आणि यादवही वारकरीचेच समर्थक होते त्यामुळे दोघेही अंतिमतः हिंदुत्ववाद्यांना जाऊन मिळणे अटळ होते आणि दोघेही मिळाले पण मिळतांना कुणी राजासारखे मिळायचे हाच प्रश्न होता नेमाडेंनी ग्रामीण साहित्याची चळवळ आणि महानगरी साहित्य टप्प्याटप्प्याने संपवले प्रथम माडगूळकर आणि भाऊ पाध्ये ह्यांना कुरवाळून आणि नंतर हसत हसत  चेष्टा करत पण लाथेने उडवत त्यात तेच महानगरी लेखक जवळ केले गेले व टिकवले  गेले ज्यांनी वारकरी चळवळीची कास धरली म्हणजे अरुण कोल्हटकर , दिलीप चित्रे वैगरे हीच गोष्ट ग्रामीण बाबत ज्यांनी नेमाडेंची कास धरली त्यांचा प्रपोगण्डा जास्त झाला पुढे  वारकऱ्यांनाच पुढे टाकून आनंद यादवांना संपवले गेले नेमाडे मराठी साहित्यकारणातले शरद पवार आहेत पण हे कळायला तुला थोडा वेळ लागेल आज नेमाडे जातिव्यवस्थेचे आडव्या अक्षाचे समर्थन करतायत ज्यात उच्चंनीचता नाहीशी होते पण पारंपरिक धंदे तसेच टिकतात आत्ता काय महारांनी पुन्हा महारकीच करायची काय ? हे कळतंय कि अक्कल गहाण टाकलायस ? गांधी महान होते नेमाडेही महान आहेत पण तो जो दोघांचा आडवा अक्ष आहे ना तो उडवण्यासाठी विरोध आवश्यक आहे .
तुम्ही म्हणताय तसे वाटते पण प्रत्यक्षात दुसऱ्या नवतेची सैद्धांतिक मांडणी मर्ढेकर , करंदीकर , सारंग ,  आनंद यादव आणि सुधीर रसाळ तिसऱ्या नवतेची देशी मांडणी नेमाडे , दिलीप चित्रे , चंद्रकांत पाटील , द गो गोडसे ह्यांनी मार्गी मांडणी   गंगाधर पाटील , म सु पाटील हरिशचंद्र थोरात यांनी आणि चौथ्या नवतेची मांडणी श्रीधर तिळवे उत्तर आधुनिक मांडणी सचिन केतकर विश्राम गुप्ते ह्यांनी  उत्कृष्टपणे केली आहे लोक वाचत नाहीत हा खरा प्रॉब्लेम आहे








आनंद यादव गेले श्रीधर तिळवे नाईक 

आनंद यादव गेले . व्यंकटेश माडगूळकर आणि इतरांनी सुरु केलेल्या आधुनिक देशीपणाचा एक इन्सायडर म्हणून विकास करणारा साहित्याच्या कोल्हापुरी स्कुलचा प्रतिभावंत लेखक गेला . कागलमध्ये जन्मलेल्या ह्या कोल्हापुरी लेखकाची हवी तशी कदर कोल्हापूरकर लोकांनी कधी केली नाही  ते नेमके काय करतायत हेसुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही . 

आनंद यादव करत काय होते ?

ते अभिरुचीने जन्माला घातलेल्या आणि सत्यकथेने विकसित केलेल्या आधुनिकचे कलावादी देशी मॉडेल तयार करू पहात होते व्यंकटेश माडगूळकर आणि भालचंद्र नेमाडे ह्यांनी जन्माला घातलेल्या शासक मराठा समाजाच्या देशी  मॉडेलला ते अप्रत्यक्षरीत्या च्यालेंज देत होते .परिणामी नेमाडेंच्या अवाजवी प्रभावामुळे मार्गी  संस्कृतीत विलास सारंगांची जशी गळचेपी केली गेली तशीच गळचेपी साठठोत्तरीने देशी संस्कृतीत आनंद यादवांची केली कलावादी आवाज केवळ दाबायचा नाही तर ठार मारायचा  हा नेमाडी अजेंडा आनंद यादवांना कायमच उपेक्षेच्या गर्तेत फेकत राहिला . 

वास्तविक आनंद यादव कुणबी समाजात जन्मले होते आणि त्यांची गोतावळा ही कादंबरी कुणबी संवेदनशीलतेने लिहिलेली पहिली कादंबरी होती . ग्रामीण जीवनाकडे आउटसायडर म्हणून बघण्याऱ्या व्यंकटेश माडगूळकरांपेक्षा आनंद यादवांनी इन्सायडर म्हणून केलेले हे लिखाण वेगळे होते आणि त्याला भरभरून दाद मिळाली  . शासक मराठा समाजाकडून ह्याचवेळी कोल्हापूर स्कूलमधून मृत्युंजय सारखी कादंबरी आली पण तरीही गोतावळा टिकली ती तिच्या अंगभूत रचनेने ! मराठीत शासक समूहाकडून कोसला आणि अशासक समूहाकडून गोतावळा येणे हे आश्वासक होते पण पुढे शासक समूहाचे देशीवादी मॉडेल अधिकाधिक लोकप्रिय होत गेले इतकेच कशाला सारे अशासक मराठाही कोसला छाताडावर घेऊन नाचू लागले आणि आनंद यादव हा पर्याय मागे पडू लागला . 

हे असे का घडले ?

पहिले कारण शेती नको असलेल्या  सर्व मराठ्यांना शेतीतून बाहेर पडलेला पांडुरंग अधिक जवळचा वाटला . 

दुसरे कारण गोतावळा प्रत्यक्ष शेतीशी निगडित होती तर कोसला विध्यार्थी जीवनाशी साहजिकच विद्यार्थी समूहाला कोसला आधिक भावली 

तिसरे कारण नवतेच्या दृष्टीने गोतावळा दुसऱ्या आधुनिकतावादी नवतेशी तर कोसला तिसऱ्या देशी नवतेशी निगडित होती त्यामुळे साहजिकच संवेदनशीलतेबाबत कोसला आधिक आड्वान्स होती . 

चौथी कोसला कलात्मक पातळीवर गोतावळ्यापेक्षा सरस होती 

प्रश्न असा आहे कि कोसला हे पलायन होते का ? आणि गोतावळा शेतीत ठामपणे थांबणे ?

ह्याचे उत्तर हो असे आहे पण कोसलातले पलायन हे अभिजात पलायन आहे तर गोतावळातले थांबणे हे काहीसे रटाळ आहे 

तरीही आनंद यादवांची थोरवी अशी कि त्यांनी तरीही आपला कुणबी समूह सोडला नाही झोंबी , नांगरणी , कांचवेल , नटरंग सारख्या कलाकृतीतून हा समाज घट्ट पकडून ठेवला . नेमाडे  तमाशाविषयी नुसती बडबड करत होते तेव्हा आनंद यादव नटरंग लिहीत होते नेमाडे वारकरी समाजावर बोलत होते तेव्हा आनंद यादव ज्ञानेश्वर आणि तुकाराम ह्यांच्यावर आधुनिक दृष्टिकोनातून कादंबऱ्या लिहीत होते (लोकसखा ज्ञानेश्वर , संतसूर्य तुकाराम) दोघांच्यातला हा फरक नेमाडेंच्या कुणबी भक्तांना कधी दिसलाच नाही कारू आणि नारू ह्यांनाही तो कधी कळला नाही 

साहजिकच तुकारामावरच्या कादंबरीवर वाद झाला तेव्हा सॅम चॅनेलच्या स्टुडिओत संजय आवटेंच्या समोर फक्त मी आणि संजय सोनवणी यादवांच्या बाजूने उभे होतो तर देशीवादी सदानंद मोरे आमच्या विरोधात उभे होते देशीवाद्यांना ही कादंबरी तुकारामाचा अपमान वाटत होती . कारण त्यांना शासक समुदायाची परंपरा जपणे फार महत्वाचे वाटत होते वास्तविक झाले काय होते ? तर यादवांनी आधुनिकतेला साजेशी भूमिका घेत फ्रॉइडच्या मानसशास्त्राचा आधार घेत तुकारामाचे एक काल्पनिक बालपण तयार केले होते आणि हे काल्पनिक बालपण ,  हे आधुनिकत्व आणि ते व्यक्त करण्याचे लेखकाचे स्वातंत्र्य देशीवाद्यांना अमान्य होते . हा दहशतवाद आम्हाला अमान्य होता आणि आहे . ह्या दहशतवादाने ह्या कादंबरीचा बळी घेतला आणि ही कादंबरी मागे घेतली गेली हेच स्वातंत्र्य किरण नगरकरांनी संत मीराबाईबाबत घेतले तेव्हा  मात्र कुणी चकार शब्दही काढला नाही कारण देशीवादांच्या दृष्टिकोनातून ती त्यांच्या देशात बसत नाही त्यामुळे तिचे काय करायचे ते राजस्थानवाले आणि इंग्लिशवाले बघून घेतील . असो. 

उत्तरार्धात आनंद यादवांना हे कळून चुकले कि नुसत्या सौदर्यशास्त्राने ग्रामीण साहित्याचे भले होणार नाही त्यांनी समाजशास्त्रालाही महत्व देणे सुरु केले तर नेमाडे ह्यांनाही कळून चुकले कि नुसत्या समाजशास्त्राने काही होणार नाही थोडी सौन्दर्यशास्त्राची कदर केली पाहिजे वस्तुस्थिती अशी आहे कि देशीपण नीट साहित्यात आणायचे असेल तर एकतर सौन्दर्यलक्ष्यी समाजशास्त्राची धाटणी स्वीकारायला हवी किंवा समाजशास्त्रीय सौन्दर्यशास्त्र निर्माण करायला हवे . देशीपणाला नव्या काळाच्या संदर्भात साकार करायला चाललेल्या ग्रामीण  समूहातील नव्या लेखकांना एवढे जरी कळले तरी ती आनंद यादवांना योग्य अशी श्रद्धांजली होईल .