Showing posts with label चौथी नवता आणि कला. Show all posts
Showing posts with label चौथी नवता आणि कला. Show all posts

Monday, December 14, 2015





सुरवात माहित नाहीय
शेवट सापडत नाहीये 
तुला आवडो अगर न आवडो 
 पण जे आहे ते ''मधे '' आहे 

विलास सारंगांचा चौथा  व्यक्तिवाद 

श्रीधर तिळवे 
विलास सारंग गेले . त्यांची तब्येत तशी काही वर्षे खराब होती आणि त्यांच्या मृत्यूची कुणकुण तशी लागलेली होती त्यामुळे धक्का न्हवता पण उदासी आलीच . 

विलास सारंग माझ्यासाठी नेहमीच '' सत्यकथेच्या पलीकडे गेलेले सत्यकथावादी कवी '' राहिले आणि त्यांच्या समीक्षेवर मी ''अभिधानन्तर''मध्ये ''अक्षरांचा श्रम केला :सत्यकथेचा आधुनिकवाद ''  असा एक प्रदीर्घ लेख लिहला होता आणि त्यांची मते खोडून काढण्याचा माझ्या परीने त्यात प्रयत्न केला होता. मराठीत साठोत्तरीतील  ज्यांच्याशी वाद घालावा असे वाटणारे जे काही मोजके प्रज्ञावंत लोक झाले त्यात विलास सारंग हे फार महत्वाचे प्रज्ञावंत लेखक होते . 

विलास सारंग मराठीत नेमका कोणता रोल पार पाडत होते ?

जगात विश्वीय युगात धर्माला आव्हान देणारे जे साहित्य जन्मले  त्यातून जगातला पहिला व्यक्तिवाद जन्मला . त्याचे स्वरूप हे प्रामुख्याने अध्यात्मिक होते.  एका अर्थाने हा अध्यात्मिक व्यक्तिवाद होता . त्याने प्रस्थापित धर्माला गदागदा हलवले . मराठीत ह्या व्यक्तिवादाची स्थापना ज्ञानेश्वर  चक्रधर आणि नामदेव  ह्या त्रयीने  केली .  ह्यातील ज्ञानेश्वरांना मराठी संस्कृतीने  बहिष्कृत केले होते  आणि पुढे त्यांना समाधी  घ्यायला लावली . चक्रधरांचा बहुधा दाभोळकर-पान्सरेन्च्याप्रमाणे खून झाला आणि नामदेवांना त्यांच्या घराण्याचा विठ्ठल मंदिरावरचा हक्क सोडायला लावून  शेवटी घुमान मध्ये सेटल  व्हायला भाग पाडले . ह्या व्यक्तिवादाचा कळस होता तुकाराम ! हा एक अफलातून कवी होता आणि त्याच्या हयातीत मराठी लोकांनी  त्याला जितका त्रास देता येईल तितका दिला . मराठी हि प्रतिगामी संस्कृती असल्यानेच मराठीत कायमच विचार करण्याऱ्या प्रतिभावंत माणसाला तो हयात असताना दाबायचे ,त्याच्या आसपासच्या  मिडीओकर लोकांना प्रोत्साहन द्यायचे मग तो मेल्यानंतर त्याच्या नावाने गळा काढून त्याला डोक्यावर घेवून नाचायचे आणि आमची मराठी संस्कृती कशी पुरोगामी आहे ते गळा फाडून सांगायचे अशी एक  मेल्यानंतर मानसन्मान देण्याची मर्तीकी परंपरा आहे .  ज्ञानेश्वर  चक्रधर आणि नामदेव  ह्या त्रयीबाबत  ती मराठीने पार पाडली आणि ह्यातील प्रत्येक लेखक मेल्यानंतर मराठी लोकांनी त्यांला मराठी संस्कृतीत  सेटल करून घेतले . 

पुढे इंग्रज लोकांच्या राज्यात सृष्टीय युग पुन्हा आले.  त्यातून ज्योतिबा फुलेंनी समाजप्रधान  प्रबोधनवाद आणि वास्तववादाची पायाभरणी केली . मराठीत त्यानंतर  दुसरा व्यक्तिवाद जन्मला तो सौंदर्यवादाच्या रूपाने . केशवसुतांच्यात प्रथम त्याचे पडसाद उमटले पण त्याची पायाभरणी बालकवींनी केली . ज्ञानेश्वर  चक्रधर आणि नामदेव  ह्या त्रयीबाबत जे केले तेच मराठी संस्कृतीने केशवसुत व बालकवींच्या बाबत केले.  हे लेखक मेल्यानंतर मराठी संस्कृतीत मराठी लोकांनी त्यांना सेटल करून घेतले .ह्या सेटलमेन्टचे सर्वात प्रतिमा वादी उथळ रूप  होते  सत्य कथेचा  रोमांटिक  प्रतीमावाद ! पुढे  हा दुसरा व्यक्तिवाद -सौंदर्यवाद चांगल्या अर्थाने कळसाला पोहचला तो पु शी रेगे , ग्रेस आणि ना धो महानोर ह्यांच्या कवितेत !

१९४० नंतर भारतात प्रतीसृष्टीयता स्थिरावली . मर्ढेकर आणि विंदा करंदीकर ह्यांनी तिसरा व्यक्तिवाद आणला तो आधुनिक व्यक्तिवादाच्या रूपाने . ह्या व्यक्तीवादाला छेद देणारा चौथा  व्यक्तिवाद जन्मला तो अस्तित्व वादाच्या रूपाने . मराठीत ह्या अस्तित्व वादी व्यक्तिवादाची अत्यंत सखोल पायाभरणी केली चार  लेखकांनी दिलीप पु चित्रे , कोसलातील नेमाडे , भाऊ पाध्ये  आणि विलास सारंग ह्यांनी ! ह्यातील दिलीप पु चित्रे , कोसलातील नेमाडे हे दोघेही देशी वादाच्या अंगाने  अस्तित्व वादी व्यक्तिवादाची वाट त्यागून गेले तर भाऊ पाध्ये वास्तव वादाला जाऊन मिळाले परिणामी  अस्तित्व वादी व्यक्तिवादाला एकमेव साठोत्तरी समर्थक उरला तो म्हणजे विलास सारंग . स्वतः च्या  ह्या एकटे पडण्याला विलास सारंग कधीच घाबरले नाहीत उलट यु टर्न घेण्याऱ्या नेमाडेशी व त्यांच्या देशीवादाशी ते तात्त्विक पातळी वर लढत राहिले.  विलास सारंगाना पुढे घेवून जाणारे सतीश तांबे , मेघनाद कुलकर्णी असे काही मराठी कथाकार झाले पण त्यांच्याकडे जितके लक्ष्य द्यायला हवे होते तितके मराठीने दिले नाही . त्यामुळे सारंगांच्या वाटेने जाऊन उपेक्षित राहण्यापेक्षा लवकरच प्रस्थापित करायला सोपी अशी देशीवादी किंवा दलित साहित्याची वाट पकडणे हे अनेक करीअरीस्ट लेखकांना आकर्षक वाटू लागले . शिवाय कल्पनाशक्तीला ताण द्यायला भाग पाडणारी प्रतिभा असणे हे थोडे अवघडच बांधकाम होते . परिणामी कल्पनाशक्ती आणि अस्तित्वाचे प्रश्न ह्यांची सांगड घालून अस्तित्वाचा पाठलाग करणारा हा लेखक पुढेही मराठीने कायमच परीघावर ठेवला . त्याला न्याय द्यायला शेवटी मंगेश काळेला खेळचा एक विशेषांक काढावा लागला . 



वास्तविक सारंगाचा अस्तित्ववादी व्यक्तिवाद हा फक्त कविता आणि कथेत दिसतो . त्यांच्या कादम्बरीत मात्र व्यक्तिवाद आणि समष्टीवाद ह्यांच्यातील द्वंद पकडणारा द्वन्दवाद दिसतो आणि त्यातून कादंबरी हा फॉर्म व्यक्तिवादी होऊच शकत नाही कि काय अशी शंका येवू लागते . मात्र तरीही जो प्रभाव  कोसलाचा पडला तो एन्कीच्या  राज्याचा पडला नाही ह्याचे काय कारण असावे. वस्तुस्थिती अशी आहे कि कोसला ही एक आधुनिक प्रतिगामी कादंबरी आहे आणि मराठी संस्कृती ही प्रतिगामी असल्याने आधुनिकतेची कोसलात उडवली गेलेली टवाळी मराठी माणसाला भावली. मृत्युंजय स्वामी  आणि कोसला ह्या तीनही कादंबऱयाना दाद देणारी मानसिकता एकच आहे.शिवाय मराठी वाचक कॉलेजनंतर काही वाचत नाही त्यामुळे मराठी बहुतांशी वाचकाचे वय कायमच २१ असते त्यामुळे कॉलेजवयात वाचलेल्या कॉलेजच्या भावविश्वाशी निगडीत कोसला दुनियादारी ह्या कादंबऱ्या (ज्याला सारंग  नोस्तालजीयाचा रोग म्हणतात )त्याला आयुष्यभर आवडत राहतात. ह्या वयाच्या पुढील विकास दर्शवणाऱ्याएन्कीच्या  राज्यासारख्या कादंबऱ्या त्याला भावत नाहीत त्यात  एन्कीच्या  राज्यात परदेश आहे जन्मता देशी बनलेल्या मराठी वाचकांना हे विश्व काय भावणार ? ह्या कारणानं सारंग कायम परदेशी लेखक राहिले. 
         खुद्द सारंगाना हे जाणवले असावे आणि त्यातूनच भारतीय वास्तवाकडे ते परतले . हि पीछेहाट होती . दलित विचारवंतांनी आधीच मांडलेले मॉडेल त्यांनी आधिक चकाचक भाषेत मांडून आपण काहीतरी नवे मांडतोय असा आव आणला . पण अनुष्टुभमधल्या त्यांच्या ह्या लेखांनी दलित साहित्य शास्त्राने पुढे आणलेला साहित्यातील जातीयतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आणला  मात्र त्याचे स्वरूप देशीवादी न्हवते तर अस्तित्व प्रमाण मानून जगण्याऱ्या व्यक्तीला जातींचा होणारा त्रास असे होते . हा खरेतर जातिव्यवस्थेविरुद्धचा अस्तित्ववादी त्रागा होता आणि त्यानी तो नोंदवला ते बरेच झाले . 

सारंगांचे खरे योगदान काय  आहे ?  त्यांनी अस्तित्ववादी व्यक्तिवादाचा झेंडा फडकावत ठेवला . जेव्हा वास्तव वादाच्या नावाखाली कल्पनाशक्तीची कोंडी केली जात होती तेव्हा त्यांनी ही कोंडी फोडण्याची अथक कोशिश केली आणि कल्पनाशक्तीचे जागरण जिवंत ठेवले . ते एक हाडाचे प्रतिभावंत लेखक होते . सत्यकथा ही त्यांच्या पायातील बेडी होती कि त्यांनी प्रकाशनासाठी वापरलेला तो एक अस्तित्ववादी टेकू होता हे एक कोडे होते आणि ते आता सुटेल असे वाटत नाही .नेहमी प्रमाणे आता मेल्यानंतर विलास सारंगानाही मानसन्मान देण्याची आणि त्यांना मराठी संस्कृतीत सेटल करून घेण्याची मर्तीकी परंपरा मराठी संस्कृती पार पाडेलच . 

साठोत्तरी हि आमची बाप पिढी ! त्यांच्या अंगाखान्द्यावर आम्ही खेळलो आणि बाप फारच कर्मठ आहे हे लक्षात येताच त्यांचे साठोत्तरी साहित्याचे घर सोडून नवे चौथ्या नवतेचे घर आम्ही बांधले पण तरीही बाप कायमचा दूर गेल्यावर दु :ख होतेच. कोल्हटकर ग्रेस ,चित्रे ढसाळ आणि  आता विलास सारंग ! अस्तित्व संपल्यावर उठण्याऱ्या अस्तित्वाच्या आठवणींचे काय करायचे ?
प्रसन्नजी , कोसला आवश्यकच होती तिने मराठी कादम्बरीला मौजेच्या आणि सत्यकथेच्या दालनातून बाहेर काढली त्यामुळे मी त्यानंतर देशीवाद निर्माण झाला नसता तर परंपरेचा पुरस्कार करणाऱ्या वास्तववादाची लाट १९८० नंतर निर्माण झाली नसती . देशिवादाने परंपरेला खोटी  प्रतिष्ठा
दिली . वास्तविक देशिवादाआधी तुकाराम मर्ढेकर करंदीकरही परंपरेवर हल्ला करत परंपरेचे भान राखत लिहीतच होते की ! पण परंपरा म्हणजे लय भारी असे वाटायला लागले ते नेमाडेन्च्यामुळे !आणि दलित साहित्य म्हणजे परंपरेच्या विरोधातला सर्वात मोठा उठाव ! भक्तीची पिपाणी वाजवण्याऱ्याना बुद्ध धम्म स्वीकारून जरा ज्ञानाचे तबलाबोल पण ऐका की म्हणणारा , वर्णजाती विरुद्ध निर्भीड पणे उभा ठाकणारा , सकाळ संध्याकाळ विठ्ठ लाचे नाव घेण्याऱ्याना riddles  ऑफ रामकृष्ण लिहून देवांचीच उलट सुलट तपासणी करायला भाग पाडणारा असा हा उठाव होता त्यामुळे भक्तीत झोपलेली  मराठी संस्कृती जागी व्हायला लागली होती तोवर नेमाडेंनी ही परंपरेची अफू आणली . तिचा प्रसार असा काही झाला की साठोत्तरी नंतरचे साहित्य भक्ती आणि आस्था चानेल बनते कि काय अशी शंका निर्माण झाली . नेमाडेंचा महिमा असा कि दिलीप चित्रे सारखा लेखक जो फक्त देशी होता पुढे देशीवादी झाला . ह्या'' परंपरा परंपरा नेमाड पंथी नायक परंपरा ''वातावरणात दलित उठाव विरून गेला आणि नव्या दलित नायकाची वाट अडवली गेली . 
प्रसन्नजी
कोसलाच्या लेखनकाळावेळी बाबासाहेबांच्या निधनानंतर दलित समाजात एक पोकळी निर्माण झाली होती त्यामुळे ताबडतोब कोसलासारखे सत्यकथेला आव्हान देणारे ताबडतोब काही निर्माण झाले असते असे मला वाटत नाही त्याउलट नेमाडेंचा समाज यशवंतराव चव्हाण ह्यांच्या नेतृत्वाखाली मराठीत प्रबळ झाला होता एकीकडे पोकळी निर्माण झाली होती तर दुसरीकडे सत्ता प्रस्थापित झाली होती बाबासाहेबानंतर दलितांना दुसरा महानायक imagine करणे कल्पनेतही शक्य न्हवते ह्याउलट यशवंतरावात सर्वांना दुसरे  शिवाजी
महाराज दिसायला लागले होते त्यावेळी कुणालाही  वाटले नसेल कि पांडुरंग सांगवीकर जसा पुणे सोडून सांगवीत येतो तसे यशवंतराव दिल्ली सोडून महाराष्ट्रात येवून बसणार आहेत . सांगवीकरला मेस हाताळता आली नाही आणि यशवंत रावांना दिल्ली ! १९६५ नंतर दलित समाजाला हळू हळू बाबासाहेबांची पोकळी ओलांडून जाणे जमू लागले  नवीन 

Saturday, November 21, 2015

चौथ्या नवतेची कलाकृती काय करते ?
श्रीधर तिळवे -नाईक 

जतनता ही एक अपरिहार्य गोष्ट आहे मानवात ही जतनता दोन प्रकारची असते
१ जैविक 
२ चिन्हीक 
चिन्हिकतेतून माध्यमता जन्मते आणि माध्यमतेतून मिडिया 
जैविक जतनता ही जनुकांच्यातून वहात असते तिचे बायो-प्रोग्राम आपणाला अनेकदा स्वभावजन्यता देत असतात हे बायोप्रोग्राम प्रामुख्याने दहा प्रकारचे असतात 
१ शारीरिक 
२चीत्तीक 
३ भवनीक   
४ अहमिक 
५ शाक्तिक 
६ क्रीयीक 
७ अवकाशीक 
८ कालीक 
९ अवस्थिक 
१० स्थितीक 

हे सर्वच बायोप्रोग्राम आपल्या अनेक गोष्टींना डीक्टेट करत असतात . ते जैविक असल्याने त्यांच्यावर सहजासहजी मात करता येत नाहीं . हे आपल्या आतून बाहेर जात असतात 

चिन्हिक जतनता ही जनुकांच्यातून वहात नसते तर ती समाजाकडून आपणाला प्राप्त होत असते तिचे चिन्हप्रोग्राम आपणाला अनेकदा समाजजन्यता  देत असतात हे चिन्हप्रोग्राम प्रामुख्याने दहा प्रकारचे असतात 
१ कायिक  
२ ज्ञानिक  
३ भाविक  
४ ओळखीक 
५ सत्तीक  
६ कर्तव्यिक 
७ भौगोलिक  
८ काळीक  
९ समाजावस्थिक 
१० समाजस्थितीक

 हे सर्वच चिन्हप्रोग्राम आपल्या अनेक गोष्टींना डीक्टेट करत असतात . ते सामाजिक  असल्याने त्यांच्यावर  मात करता येते  . हे आपल्या बाहेरून  आत येत असतात 

ह्या दोन्ही प्रोग्रामच्या घुसळमिसळीतून आपली जीवकक्षा निर्माण होत असते ही अणूंच्याप्रमाणे आपल्या आसपास भ्रमण करीत असते ही घुसळमिसळ कधी द्वंदात्मक असते कधी सहकार्यात्मक कधी तडजोडीय तर कधी संघर्षात्मक असते त्यातून
 १ दैहिक  
२ वैचारिक   
३ भावनिक 
४ अस्मितीय 
५ शासकीय  
६ कार्यीक  
७ जागीक  
८ वेळीक 
९ स्वावस्थिक 
१० स्वस्थितीक

असे दहा कक्षीय प्रोग्राम तयार होतात आणि आपल्या जीवकक्षेत भ्रमण करू लागतात 

आपले चिन्हसृष्टीतील जगणे हे ह्या तीस प्रोग्रामातून स्पंदत असते 

चौथ्या नवतेची कलाकृती ही ह्या जगण्याचे स्पंदन चिन्हांकित करत असते . 

श्रीधर तिळवे -नाईक 





Sunday, November 8, 2015

नितीशांचा विजय अपेक्षित होता मात्र ते एवढ्या सीट्स जिंकतील असे वाटले न्हवते  हा एकमेव जद नेता असा आहे जो विचारप्रणालीच्या पुढे जाऊन सुव्यवस्थापनाकडे वळला . ह्या निवडणुकीत त्याने कॅम्पेन गुरु आणून चौथ्या नवतेची चिन्ह तांत्रिकी वापरली आणि त्याचा फायदाही झाला . गेली कित्येक वर्षे हा नेता प्रांत वगैरे न पाहता भारतभरातून गुणी माणसे गोळा करून त्यांना बिहारच्या विकासासाठी वापरतोय आणि त्याची फळेही दिसतायत आता लालूप्रसाद यादवांनी त्यांचा कट्टर बिहारवाद आणला नाही म्हणजे मिळवले अन्यथा पुन्हा भांडण अटळ . मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो . ते कुशल नेते आहेत आणि बिहार आणखी पुढे न्हेतीलच . काँग्रेस नष्ट होणे ही मात्र चिंतेची बाब आहे . कुणी काहीही म्हंटले तरी हा शेवटी प्रादेशिक पक्षाचा विजय आहे . काँग्रेस जितक्या लवकर रिस्टोअर करेल तितके बरे अन्यथा ……

श्रीधर तिळवे 

Tuesday, September 1, 2015

४६ श्रीधर / श्रीधर तिळवे 
Transcending digital 
Transcending fleshal 
Here I  am 
A digifleshal guy 
सर्वत्र  माझा पाय 
बूटेबल 
हार्मोनिअसली  फंक्शनल 
श्रीधर  तिळवे नाईक 
(क. व्ही . २  ह्या  काव्य फायलीतून )

Saturday, June 27, 2015

पंकज भोंसले धन्यवाद !

प्रिय पंकज भोंसले ,
सुनील तांबे , प्रणव सुखदेव  , गणेश मतकरी ह्यांनी सुरु केलेल्या चर्चेत अचानक तुमचा लोकप्रभेतील (१३ ज्यून २०१४ )  '' टीकायन : झापड बंद  समीक्षेने मारलेले नवे साहित्य  '' हा लेख वाचण्यात
 आला आणि त्यात ''अ डॉ हॉ कॉ बा ना सु ना''  ह्या माझ्या साहित्य कृतीचा उल्लेख आढळला (मी तिला कादम्बरी म्हणत नाही कारण कादम्बरी हा फॉर्म आऊटडेटेड झालाय असे माझे मत आहे ) आणि मी दचकलोच . ह्या साहित्यकृतीची दखल घेतली गेली नाही ह्याची तुम्ही दिलेली कारणे सत्य असावीत पण आपण काय करू शकतो ? मी माझी धर्मावरची साहित्यकृती पुरी केली . ''अ डॉ हॉ कॉ बा ना सु ना''  ही मारली गेल्याने ''अ डॉ हॉ कॉ बा ना सु ना'' चा प्रकाशक सतीश पाध्ये ही नवी साहित्यकृती प्रकाशित करण्यास असमर्थ ठरला आता आपण लिहलेली साहित्यकृती प्रकाशितही होणार नाही हे स्पष्ट झाले तर आपण काय करायचे ? तर पुन्हा नवी साहित्यकृती लिहायला घ्यायची . मी आता अर्थावरची साहित्यकृती लिहतोय . जर तुमची साहित्यसंस्कृती तुम्हाला वाळीत टाकत असेल तर आपण गाव्कुसातून लिहावे नाहीतरी माझ्या आजोबाला आपल्या मुलीचे लग्न जातीबाहेर केले म्हणून गावाने वाळीत टाकले होतेच . माझा आजोबा जंगलाच्या आधारे जगला पण झुकला नाही . तो जगण्या साठी झुकला नाही तर मी मान्यतेसाठी काय झुकणार ? मराठी साहित्यसंस्कृती गेली तेल लावत !
तुमचे मात्र आभार ! असा लेख लिहायला निर्भयता लागते . तुमच्या निर्भयतेला सलाम !

श्रीधर तिळवे 

Sunday, April 26, 2015

भालचंद्र नेमाडे ह्यांचे ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना केलेले  भाषण
श्रीधर तिळवे

भालचंद्र नेमाडे ह्यांनी ज्ञानपीठ स्वीकारताना केलेले भाषण हे एका लेखकाचे भाषण वाटलेच नाही . असे वाटले कि retirement घ्यायला निघालेला प्राध्यापक आपल्या नोकरीतील कामाविषयी अवघडलेल्या अवस्थेत बोलतोय . मुख्य म्हणजे नेमाडेंचा नेहमीचा मिश्किल लेखक मिसिंग होता . असे का घडले ? कारण उघड आहे . नेमाडेंनी भाषणासाठी निवडलेली भाषा . नेमाडे मराठीत भाषण करून आपला देशीवाद मांडतील अशी अपेक्षा होती पण प्रत्यक्ष कृती करताना त्यांना मार्गी निवडणे भाग पडले आणि त्यांनी चौथ्या नवतेची ''मार्गी , देशी ,पोटी आणि जमाती ह्यांचा समतोल हवा आणि मार्गीसाठी इंग्लिश अपरिहार्य आहे '' ही भूमिका स्वीकारली. हा विरोधाभास आजचा नाही . सुरवातीपासूनचा  आहे .  इंग्लिश मध्ये भाषण करताना मिश्कीलता येणार कशी आणि कुठून ? वाईट गोष्ट म्हणजे नेमाडे नैसर्गिक ही वाटले नाहीत .

मात्र ह्या भाषणात त्यांनी आपली लेखनभूमिका अत्यंत नेमक्या भाषेत मांडली . नेमाडे नेहमीच अवकाश आणि काळ अशी वैज्ञानिक  सुरवात करतात जी मलाही मान्य आहे मग नेमाडे हळूच मागील दाराने परंपरा आणतात जी मला अमान्य आहे . इथेही त्यांनी तेच केले . मग हजारो वर्षाचे सातत्य त्यांनी आणले आणि शेवटी नवे होऊन पुन्हा तसेच होतो असे सांगितले . आमचे म्हणणे असे कि एखादी गोष्ट सातत्याने टिकली म्हणून महान होत नाही अन्यथा जातीव्यवस्था, अस्पृश्यता आणि गुरूचरित्र ह्यांनाही महान म्हणावे लागेल . बुद्ध टिकला म्हणून महान नाही तर महान आहे वसुधैव ग्लोबल आहे म्हणून टिकला . अर्थात सर्वच महान गोष्टी टिकत नाहीत . अनेकदा रानटी लोकांनी महान गोष्टी जाळून वा आघात करून नष्ट केल्या आहेत उदाहरणार्थ सहज आणि तीलोपा  ह्यान्च्या कविता . त्या भारतातून नष्ट झाल्या होत्या . तिबेटी बुद्धिस्ट धारेने त्या टिकवल्या म्हणून मिळाल्या . महान गोष्टी फक्त निर्माण होऊन चालत नाहीत तर त्या टिकवाव्या लागतात प्रतिगामी संस्कृती प्रतिगामी गोष्टी टिकवतात उदा . गुरुचरित्र , वेद पुरोगामी संस्कृती पुरोगामी गोष्टी टिकवतात .प्रश्न असा कि महान गोष्टी महान का होतात नेमाडे म्हणतात देशियतेमुळे आम्ही म्हणतो मार्गी , देशी , पोटी आणि जमाती ह्यांच्या समतोलामुळे हा समतोल साधण्यात देशीवाद एक अडथळा म्हणून अडगळीसारखा आडवा येतो म्हणून आमचा देशिवादाला विरोध आहे आणि मार्गीपण, देशीपण , पोटीपण आणि जमातीपण ह्यांना पाठींबा आहे . नेमाडे ह्यांनी ह्याही भाषणात देशीवाद मांडला . इंग्लिशमधून मांडला . पण देशिवाद्च मांडला .

 त्यानंतर मोदींनी वेद आणि वेदातील वैज्ञानिकता हा हिंदुत्वाचा लाडका अजेंडा आणलाच आणि आम्ही ज्याची मांडणी करतो तो सिद्धांत  '' देशीवाद हा अंतिमतः मूलतत्ववाद्यांना मदत करणार आहे '' सिद्ध केला . वेदकाळात जसे ऋषी तसे नेमाडे असे सांगून भविष्यकाळातील नेमाडेंची ऋषी भालचंद्र नेमाडे ही प्रतिमाही प्रज्वलित केली . नेमाडेपेक्षा मोदी अधिक नैसर्गिक वाटले .

मोदींनी मांडलेला सरस्वतीबरोबर लक्ष्मी आली पाहिजे हा मुद्दा अचूक होता . पण मला एकदा चित्रपट अभिनेता गोविंदा ह्याच्या आईने म्हणजे निर्मलाआईनी सांगितलेला मुद्दा त्याला जोडावसा वाटतो तो म्हणजे '' श्रीधर बेटा इस फिल्डमे आना है तो एक बात ध्यानमे रख ये दुनियाका एकमात्र फिल्ड ऐसा हैं जिसमे लक्ष्मी सरस्वतिके पीछे आती हैं ।'' ते अकरा लाख रुपये म्हणजे सरस्वतीच्या पाठीमागे आलेली लक्ष्मी होती . नेमाडे कधीही शक्य असूनही लक्ष्मिच्या मागे गेले नाहीत . त्यांनी अत्यंत जीव पणाला लावून सरस्वतीची साधना केली ज्ञानपीठ हा त्या साधनेचा गौरव आहे आणि नेमाडे त्याला पूर्ण पात्र आहेत . नेमाडे ह्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन !

Wednesday, April 22, 2015

प्रसन्न जोशी  ह्यांनी कोसला संदर्भात विचारलेल्या  कोसलाने व तश्या कादंबऱ्यानी दलित नायकाची वाट  अडवून धरली का  ह्या  प्रश्नाचे उत्तर 
श्रीधर तिळवे 

प्रसन्नजी प्रथम आभार मानतो . दलितांचा पहिला नायक खुद्द आंबेडकरच होते साहित्यात विशेषत : महाकृतीत त्या लेवलचा नायक अजूनही दलित कादम्बरीकारांना जन्माला घालता आलेला नाही . त्यामुळे कोसलापूर्वी महान  दलित कादम्बरी म्हणावी अशी दिसत नाही कोसला आधीच आली त्यामुळे कोसलाने दलित नायक संपवला वा अडवून धरला असे म्हणता येणार नाही वास्तविक अण्णाभाऊ साठेंनी पार्श्वभूमी निर्माण केली होती . बाबुराव बागुलांच्या कथांनीही ही पार्श्वभूमी पुढे न्हेली होती पण त्यातून नवा नायक अवतरला तो आत्मचरित्रात्मक ! दगडू पवार पासून ! नेमाडेंच्या नायकाने न्हवे तर नेमाडेंच्या देशीवादाने दलित नायक अडवून ठेवला गावगाड्यात पाणी अडवावे तसा ! ह्यातच भर म्हणून नेमाडेंच्यात झालेला बदल ढसाळांच्या पुरेसा लक्ष्यात आला नाही त्यामुळे पाणी अडलंय कुठे हेच कळले नाही . नेमाडेंनी जातीच्या आडव्या अक्षाचा पुरस्कार केला तरी हे लोक नेमाडेंना पाठींबा देत राहिले . आडव्या अक्षात उच्च निच्च गेले तरी जन्मजात व्यवसाय तसाच राहतो हे आजही अनेक दलितांच्या लक्ष्यात येत नाहीये मी ह्यावर ''आत्मचरित्रातले  काल्पनिक क्षण '' ह्या काव्य -कादम्बरीत दीर्घ लिहिले आहे . पण लक्षात कोण घेतो ? पुढे ओबीसी फुलेवादी समूह जागा झाला त्यातून नवा सुशिक्षित ओबीसी लेखक उदयाला आले आणि त्यांना नेमाडेंच्यात नायक दिसला ह्याला आनंद यादवांचा वैचारिक भोंगळपणा जबाबदार होता आज शेतकरी वर्गाची अवस्था गोतावळ्याशी जास्त जुळते कोसला व नेमाडे ह्यांच्या इतर  कादंबऱ्याशी नाही तरीही यादव सत्यकथेच्या stamp मुळे मागे पडले दुसरी गोष्ट शेतकरी लेखकांनाही आता शेतकरी रहावयाचे न्हवते तर नेमाडेंच्या प्रमाणे चकाचक नोकरी करून प्रतिष्ठा कमवायची होती त्यातच नेमाडेंनी उघडपणाने फुलेवादी भूमिका स्वीकारली आनंद  यादवां च्या समरसता मंचापेक्षा ही भूमिका कणखर होती त्यामुळे नेमाडे हे ओबीसी समुहाचे आदर्श नायक बनले दोघेही अंतिमत : हिंदुत्वात जाऊन उडी मारणार आहेत हे कुणाच्याच लक्षात आले नाही कुणबी वर्गाला शहाण्णव कुळी बन ण्याचे जे वेध लागले होते /आहे त्याचे हे साहित्यिक प्रतिबिंब होते /आहे . ह्या सगळ्या प्रक्रियेत ज्या दलितांना नवा नायक निर्माण करायचा होता त्यांची फारच कुचम्ब् ना झाली .सामाजिक पातळीवर दलितांचे गावात क्षत्रिय आणि ओबीसी समूहाशी संघर्ष सुरु झाले गावात ब्राह्मण नसल्याने ब्राह्मणांना शिव्या तरी कशा घालणार आणि किती घालणार शिवाय शहरात ओबीसी आणि दलित दोघेही समान-संघर्षी त्यामुळे कोसलाशी नाते जुळते आणि व्यापक पातळीवर जुळत ही नाही असा तिढा निर्माण झाला वास्तविक लेखक नेमाडेंना सलाम आणि देशीवादी नेमाडेंना टाटा आणि गुडबाय अशीच भूमिका सर्व दलित लेखकांनी घ्यायला हवी होती पण ती न घेतल्याने पांडुरंग सांगवीकर नेमका का आवडतो ह्याची मीमांसा झालीच नाही . ज्यांना मृत्युंजय स्वामी आवडते त्यांनाच कोसलाही आवडते हे ढळढळीत सत्य अनेकांना दिसले नाही . पांडुरंग सांगवीकर बाबासाहेबांच्या शहरात चला ह्या संदेश्याच्या विपरीत आधुनिकतेला घाबरून गावात परततो त्यामुळे आपल्याला ज्यांना शहरातील आधुनिकता अवगत करून नवे जग निर्माण करायचे आहे त्यांना पांडुरंग सांगवीकर काही कामाचा नाही हेच अनेक दलित लेखकांच्या लक्षात आले नाही माझ्या अडाहव्का बानासुना ह्या कादंबरीबाबत एकाची तक्रार काय तर तुझा नायक फारच कृत्या करतो . म्हणजे पांडुरंग सांगवीकरासारखी मनातल्या मनात मांडे खाल्ले कि तो थोर मराठी नायक ! शेवटी परंपरेच्या खुंटावर मुकाट येवून बसला कि तो थोर मराठी नायक !  ह्या नायकाला व त्याच्या पराभवाला  देशीवादाने परंपरेचे मखमली म्यान पुरवले परिणामी सर्वत्र कोसलाच कोसला नेमाडेच नेमाडे ! मग भुरटे नेमाडे प्रतीनेमाडे !
थो ड क्या त काय तर कोसलाने न्हवे   कोसलाला नंतर जे देशीवादी आवरण चढले त्या  देशिवादाच्या आवरणाने दलित नायकाची वाट अडवून धरली . मराठी साहित्याला एक कोसला आवश्यक होती देशिवादाने तिचा   नेमाड  पंथ बनवला आणि ह्या पंथाने अनेक दलित लेखकांना आंधळे केले .
श्रीधर तिळवे 

Saturday, April 18, 2015



विलास सारंगांचा चौथा  व्यक्तिवाद 
श्रीधर तिळवे 
विलास सारंग गेले . त्यांची तब्येत तशी काही वर्षे खराब होती आणि त्यांच्या मृत्यूची कुणकुण तशी लागलेली होती त्यामुळे धक्का न्हवता पण उदासी आलीच . 

विलास सारंग माझ्यासाठी नेहमीच '' सत्यकथेच्या पलीकडे गेलेले सत्यकथावादी कवी '' राहिले आणि त्यांच्या समीक्षेवर मी ''अभिधानन्तर''मध्ये ''अक्षरांचा श्रम केला :सत्यकथेचा आधुनिकवाद ''  असा एक प्रदीर्घ लेख लिहला होता आणि त्यांची मते खोडून काढण्याचा माझ्या परीने त्यात प्रयत्न केला होता. मराठीत साठोत्तरीतील  ज्यांच्याशी वाद घालावा असे वाटणारे जे काही मोजके प्रज्ञावंत लोक झाले त्यात विलास सारंग हे फार महत्वाचे प्रज्ञावंत लेखक होते . 

विलास सारंग मराठीत नेमका कोणता रोल पार पाडत होते ?

जगात विश्वीय युगात धर्माला आव्हान देणारे जे साहित्य जन्मले  त्यातून जगातला पहिला व्यक्तिवाद जन्मला . त्याचे स्वरूप हे प्रामुख्याने अध्यात्मिक होते.  एका अर्थाने हा अध्यात्मिक व्यक्तिवाद होता . त्याने प्रस्थापित धर्माला गदागदा हलवले . मराठीत ह्या व्यक्तिवादाची स्थापना ज्ञानेश्वर  चक्रधर आणि नामदेव  ह्या त्रयीने  केली .  ह्यातील ज्ञानेश्वरांना मराठी संस्कृतीने  बहिष्कृत केले होते  आणि पुढे त्यांना समाधी  घ्यायला लावली . चक्रधरांचा बहुधा दाभोळकर-पान्सरेन्च्याप्रमाणे खून झाला आणि नामदेवांना त्यांच्या घराण्याचा विठ्ठल मंदिरावरचा हक्क सोडायला लावून  शेवटी घुमान मध्ये सेटल  व्हायला भाग पाडले . ह्या व्यक्तिवादाचा कळस होता तुकाराम ! हा एक अफलातून कवी होता आणि त्याच्या हयातीत मराठी लोकांनी  त्याला जितका त्रास देता येईल तितका दिला . मराठी हि प्रतिगामी संस्कृती असल्यानेच मराठीत कायमच विचार करण्याऱ्या प्रतिभावंत माणसाला तो हयात असताना दाबायचे ,त्याच्या आसपासच्या  मिडीओकर लोकांना प्रोत्साहन द्यायचे मग तो मेल्यानंतर त्याच्या नावाने गळा काढून त्याला डोक्यावर घेवून नाचायचे आणि आमची मराठी संस्कृती कशी पुरोगामी आहे ते गळा फाडून सांगायचे अशी एक  मेल्यानंतर मानसन्मान देण्याची मर्तीकी परंपरा आहे .  ज्ञानेश्वर  चक्रधर आणि नामदेव  ह्या त्रयीबाबत  ती मराठीने पार पाडली आणि ह्यातील प्रत्येक लेखक मेल्यानंतर मराठी लोकांनी त्यांला मराठी संस्कृतीत  सेटल करून घेतले . 

पुढे इंग्रज लोकांच्या राज्यात सृष्टीय युग पुन्हा आले.  त्यातून ज्योतिबा फुलेंनी समाजप्रधान  प्रबोधनवाद आणि वास्तववादाची पायाभरणी केली . मराठीत त्यानंतर  दुसरा व्यक्तिवाद जन्मला तो सौंदर्यवादाच्या रूपाने . केशवसुतांच्यात प्रथम त्याचे पडसाद उमटले पण त्याची पायाभरणी बालकवींनी केली . ज्ञानेश्वर  चक्रधर आणि नामदेव  ह्या त्रयीबाबत जे केले तेच मराठी संस्कृतीने केशवसुत व बालकवींच्या बाबत केले.  हे लेखक मेल्यानंतर मराठी संस्कृतीत मराठी लोकांनी त्यांना सेटल करून घेतले .ह्या सेटलमेन्टचे सर्वात प्रतिमा वादी उथळ रूप  होते  सत्य कथेचा  रोमांटिक  प्रतीमावाद ! पुढे  हा दुसरा व्यक्तिवाद -सौंदर्यवाद चांगल्या अर्थाने कळसाला पोहचला तो पु शी रेगे , ग्रेस आणि ना धो महानोर ह्यांच्या कवितेत !

१९४० नंतर भारतात प्रतीसृष्टीयता स्थिरावली . मर्ढेकर आणि विंदा करंदीकर ह्यांनी तिसरा व्यक्तिवाद आणला तो आधुनिक व्यक्तिवादाच्या रूपाने . ह्या व्यक्तीवादाला छेद देणारा चौथा  व्यक्तिवाद जन्मला तो अस्तित्व वादाच्या रूपाने . मराठीत ह्या अस्तित्व वादी व्यक्तिवादाची अत्यंत सखोल पायाभरणी केली चार  लेखकांनी दिलीप पु चित्रे , कोसलातील नेमाडे , भाऊ पाध्ये  आणि विलास सारंग ह्यांनी ! ह्यातील दिलीप पु चित्रे , कोसलातील नेमाडे हे दोघेही देशी वादाच्या अंगाने  अस्तित्व वादी व्यक्तिवादाची वाट त्यागून गेले तर भाऊ पाध्ये वास्तव वादाला जाऊन मिळाले परिणामी  अस्तित्व वादी व्यक्तिवादाला एकमेव साठोत्तरी समर्थक उरला तो म्हणजे विलास सारंग . स्वतः च्या  ह्या एकटे पडण्याला विलास सारंग कधीच घाबरले नाहीत उलट यु टर्न घेण्याऱ्या नेमाडेशी व त्यांच्या देशीवादाशी ते तात्त्विक पातळी वर लढत राहिले.  विलास सारंगाना पुढे घेवून जाणारे सतीश तांबे , मेघनाद कुलकर्णी असे काही मराठी कथाकार झाले पण त्यांच्याकडे जितके लक्ष्य द्यायला हवे होते तितके मराठीने दिले नाही . त्यामुळे सारंगांच्या वाटेने जाऊन उपेक्षित राहण्यापेक्षा लवकरच प्रस्थापित करायला सोपी अशी देशीवादी किंवा दलित साहित्याची वाट पकडणे हे अनेक करीअरीस्ट लेखकांना आकर्षक वाटू लागले . शिवाय कल्पनाशक्तीला ताण द्यायला भाग पाडणारी प्रतिभा असणे हे थोडे अवघडच बांधकाम होते . परिणामी कल्पनाशक्ती आणि अस्तित्वाचे प्रश्न ह्यांची सांगड घालून अस्तित्वाचा पाठलाग करणारा हा लेखक पुढेही मराठीने कायमच परीघावर ठेवला . त्याला न्याय द्यायला शेवटी मंगेश काळेला खेळचा एक विशेषांक काढावा लागला . 



वास्तविक सारंगाचा अस्तित्ववादी व्यक्तिवाद हा फक्त कविता आणि कथेत दिसतो . त्यांच्या कादम्बरीत मात्र व्यक्तिवाद आणि समष्टीवाद ह्यांच्यातील द्वंद पकडणारा द्वन्दवाद दिसतो आणि त्यातून कादंबरी हा फॉर्म व्यक्तिवादी होऊच शकत नाही कि काय अशी शंका येवू लागते . मात्र तरीही जो प्रभाव  कोसलाचा पडला तो एन्कीच्या  राज्याचा पडला नाही ह्याचे काय कारण असावे. वस्तुस्थिती अशी आहे कि कोसला ही एक आधुनिक प्रतिगामी कादंबरी आहे आणि मराठी संस्कृती ही प्रतिगामी असल्याने आधुनिकतेची कोसलात उडवली गेलेली टवाळी मराठी माणसाला भावली. मृत्युंजय स्वामी  आणि कोसला ह्या तीनही कादंबऱयाना दाद देणारी मानसिकता एकच आहे.शिवाय मराठी वाचक कॉलेजनंतर काही वाचत नाही त्यामुळे मराठी बहुतांशी वाचकाचे वय कायमच २१ असते त्यामुळे कॉलेजवयात वाचलेल्या कॉलेजच्या भावविश्वाशी निगडीत कोसला दुनियादारी ह्या कादंबऱ्या (ज्याला सारंग  नोस्तालजीयाचा रोग म्हणतात )त्याला आयुष्यभर आवडत राहतात. ह्या वयाच्या पुढील विकास दर्शवणाऱ्या एन्कीच्या  राज्यासारख्या कादंबऱ्या त्याला भावत नाहीत त्यात  एन्कीच्या  राज्यात परदेश आहे जन्मता देशी बनलेल्या मराठी वाचकांना हे विश्व काय भावणार ? ह्या कारणानं सारंग कायम परदेशी लेखक राहिले. 
         खुद्द सारंगाना हे जाणवले असावे आणि त्यातूनच भारतीय वास्तवाकडे ते परतले . हि पीछेहाट होती . दलित विचारवंतांनी आधीच मांडलेले मॉडेल त्यांनी आधिक चकाचक भाषेत मांडून आपण काहीतरी नवे मांडतोय असा आव आणला . पण अनुष्टुभमधल्या त्यांच्या ह्या लेखांनी दलित साहित्य शास्त्राने पुढे आणलेला साहित्यातील जातीयतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आणला  मात्र त्याचे स्वरूप देशीवादी न्हवते तर अस्तित्व प्रमाण मानून जगण्याऱ्या व्यक्तीला जातींचा होणारा त्रास असे होते . हा खरेतर जातिव्यवस्थेविरुद्धचा अस्तित्ववादी त्रागा होता आणि त्यानी तो नोंदवला ते बरेच झाले . 

सारंगांचे खरे योगदान काय  आहे ?  त्यांनी अस्तित्ववादी व्यक्तिवादाचा झेंडा फडकावत ठेवला . जेव्हा वास्तव वादाच्या नावाखाली कल्पनाशक्तीची कोंडी केली जात होती तेव्हा त्यांनी ही कोंडी फोडण्याची अथक कोशिश केली आणि कल्पनाशक्तीचे जागरण जिवंत ठेवले . ते एक हाडाचे प्रतिभावंत लेखक होते . सत्यकथा ही त्यांच्या पायातील बेडी होती कि त्यांनी प्रकाशनासाठी वापरलेला तो एक अस्तित्ववादी टेकू होता हे एक कोडे होते आणि ते आता सुटेल असे वाटत नाही .नेहमी प्रमाणे आता मेल्यानंतर विलास सारंगानाही मानसन्मान देण्याची आणि त्यांना मराठी संस्कृतीत सेटल करून घेण्याची मर्तीकी परंपरा मराठी संस्कृती पार पाडेलच . 

साठोत्तरी हि आमची बाप पिढी ! त्यांच्या अंगाखान्द्यावर आम्ही खेळलो आणि बाप फारच कर्मठ आहे हे लक्षात येताच त्यांचे साठोत्तरी साहित्याचे घर सोडून नवे चौथ्या नवतेचे घर आम्ही बांधले पण तरीही बाप कायमचा दूर गेल्यावर दु :ख होतेच. कोल्हटकर , ग्रेस ,चित्रे , ढसाळ आणि  आता विलास सारंग ! अस्तित्व संपल्यावर उठण्याऱ्या अस्तित्वाच्या आठवणींचे काय करायचे ?

Thursday, April 2, 2015

रियाजी साहित्य आणि तरबेजी साहित्य / श्रीधर तिळवे


माझे दिलीप पु चित्रे ह्यांच्याशी जे काही कडेलोटी मतभेद झाले त्यातील एक मतभेद हा रियाजी कविता प्रकाशित कराव्यात कि न कराव्यात ह्याविषयी होता . त्यांच्या मते "१९६० नंतरचे सर्व कवी हे मर्ढेकर व पु शि रेगे ह्यांच्या वाटेने जात असताना तू  मनमोहनांची चुकीची व धोकादायक वाट पकडली आहेस  आणि स्वतःच्या रीयाझी कविता प्रकाशित करण्याचा त्यांचा मूर्खपणाही रिपीट करायला निघाला  आहेस  ."
माझे म्हणणे असे कि ''मी काही जाणीवपूर्वक मनमोहनांची वाट पकडलेली नाहीये किंबहूना मराठीत मनमोहन असे काही स्कूल नाहीये असलेच तर त्याचे टोक थेट गाथासप्तशती पर्यंत भिडते आणि रीयाझी कविता प्रकाशित करू नयेत हा आग्रह भांडवलशाहीच्या '' कविता ही क्रयवस्तू असल्याने ती एक फीनिशड product म्हणून ग्राहकांच्यापर्यंत पोहचली पाहिजे '' ह्या आग्रहाचा प्रतिध्वनी आहे .''
 ह्यावर त्यांचे म्हणणे असे होते कि '' जर संगीतात रियाझ कुणी प्रकाशित करत नाही तर कवी म्हणून तू हा अट्टाहास का धरावास ? '' माझे  म्हणणे असे कि '' संगीतातही रियाझ प्रकाशित करण्याचा अट्टाहास आपण धरायला हवा . त्यामुळे कुमार गन्धर्वासारखे संगीतकार गायक कसे वाढत गेले ते कळण्याची शक्यता वाढते . चित्रकलेत चित्रकाराचे रीयाझी काम प्रकाशित होतेच की !''
साहजिकच माझ्या '' डेकॅथलॉन '' आणि ''कोल्हापूर ते मुंबई व्हाया कविता ''( हा पुढे क . व्ही . ह्या नावाने प्रकाशित झाला . ) ह्या दोन्ही संग्रहातील कविता प्रकाशित करायला त्यांचा कट्टर विरोध होता . मी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतोय असे त्यांना वाटत होते .
आज ह्या मतभेदाची आठवण येण्याचे कारण पुन्हा एकदा ह्या अंगाने निर्माण झालेली कोंडी . अलीकडे काही रसिक जेव्हा नवीन काय म्हणून विचारतात तेव्हा काय बोलायचे असा एक यक्षप्रश्न माझ्यापुढे निर्माण होतो
२. 
२००७ नंतर माझ्या कवितेने तिसरे वळण घेतले आणि रीयाझी कवितेचा नवीन कालखंड सुरु झाला . पहिले वळण १९८२ साली सुरु झाले त्यातीरीयाझी कविता मी''एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार '' ''डेकॅथलॉन '' ह्या नावाने प्रकाशित करून तरबेजी कविता ''डेकॅथलॉन : रियल '' '' डेकॅथ लॉन :सररिअल ''
'' डे कॅथलोन :ट्रान्सरिअल '' ''डेकॅथलॉन: इनिशिअल'' ''डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल'' ''डेकॅथलॉन:ए ल से ट्रा '' 
ह्या नावाने  आणायचे ठरवले अर्थात नावं ठरली न्हवती आणि संग्रहाची रचनाही ! ह्यातील काही संग्रह आलेही . हिला मी डेकॅथ लॉन series म्हणतो 
दुसरे वळण १९८७-८८ साली सुरु झाले . ह्या वळणातील रीयाझी कविता मी ''क . व्ही '' ह्या संग्रहात आणल्या . ह्या वळणाला मी चांणेल सिरीज म्हणतो . ह्या वळणातील तरबेजी कविता मी ''चांणेल : डीस्ट्रोयरी '' ''स्त्रीवाहिनी '' चांणेल: अंडर द वर्ल्ड '' ''चांणेल: स्पी(निर्वस्तु ) '' ''चांणेल: टी '' ''चांणेल: डब्लू '' ''चांणेल: ज्ञ '' ''चांणेल: आर '' ''चांणेल: श्रीशिल्लक '' ''चांणेल:ग '' '' क . व्ही २'' ''श्रीवाहिनी '' ह्या संग्रहात समाविष्ट केल्या . त्यातील काही प्रकाशितहि झाले . 

प्रत्येक वळणावर मी धडपडलो आणि अडखळलोही ! कुठलेही नवीन मला चटकन पकडता येत नाही . ते अस्पष्ट जाणवते आणि मग माझा रियाझ चालू होतो . हा रियाज आशय आणि अविष्कार अशा दोन्ही पातळ्यावर चालू असतो . कधी आशय जमतो पण अविष्कार जमत नाही तर कधी अविष्कार जमतो पण आशय जमत नाही . मग अचानक सूर सापडतो आणि तरबेजी कविता जमू लागते . 
तिसरे वळण ह्याला अपवाद  ठरले नाही ''चांणेल :डब्लू  व श्रीवाहीनी'' ने मला पार एक्झ्होस्ट केले  कोल्हापुरी भाषेत सांगायचे तर असा काही पीट्टा पाडला की मी आयुष्यात प्रथमच तब्बल एक वर्ष कवितालेस जगलो . ह्याही वळणाची रीयाझी कविता प्रथम प्रकाशित करायची आणि मग तरबेजी कविता प्रकाशित करायची असे मी ठरवले खरे पण अचानक मागील वर्षी झालेल्या अपघाताने सर्व काही उलटेपालटे केले . एकतर  ''चांणेल: स्पी(निर्वस्तु ) '' '' श्रीवाहीनी''  ह्या दोन्ही काव्यसंग्रहांचे प्रकाशन फाफ्ल्ले आणि साक्षात मृत्यू समोर दिसल्याने स्वतःचे सर्व कवितासंग्रह जाऊ द्या पण अर्धे तरी कवितासंग्रह तरी प्रकाशित झालेले दिसतील कि नाही अशी शंका निर्माण झाली . अशावेळी रियाजी कवितासंग्रह काढावा कि न काढावा कि तिसऱ्या वळणाचा थेट तरबेजी कवितासंग्रह काढावा असा प्रश्न निर्माण झाला . हा प्रश्न आजही सुटलेला नाही . त्यामुळे आजकाल कुणी कवितेत काही नवीन ? असे विचारले कि मी confusion आणि chaos आहे असे उत्तर देतो .खरेतर ह्या सिरीजला काय नाव द्यावे हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही . प्रथम रियाजी कि तरबेजी कविता प्रकाशित कराव्यात हा प्रश्न तर फारच टोकदार झालेला आहे . असो . काही लोकांच्या प्रेमळ चौकशीला दिलेले हे उत्तर आहे . प्रत्येकाला उत्तर देण्यापेक्षा सर्वांनाच एकसाथ उत्तर द्यावे म्हणून हा bloggerप्रपंच . 
 
श्रीधर तिळवे

Thursday, February 26, 2015

मी 
मूळात '' मी '' हाच काल्पनिक त्यातून मी अमुक अमुक जातीचा हे महाकाल्पनिक लोकांना जगायला कल्पना लागतात हि खरी शोकांतिका ! बघू आणखी किती शतके लोक ह्या FANTACY त वाया घालवतात . 

Friday, February 13, 2015

His collection of stories titled AMERIKECHE ADHYAKSHA ALE TEVHACHI GOSHT is published by NAVTA PRAKASHAN in 2011. Stories are related with emergency, Bhopal gas tragedy, an arrival of Bill Clinton, death of science and reaction of nastik, Mahatma Basweshwar, existential miracles, love story under the shadow of dalit-election politics, twin tower attack and imaginary death of poet and his last day experience.

Wednesday, February 11, 2015

आउटडेटेड नेमाडे आणि प्रतीसृष्टीय कादंबरीचा मृत्यू 
 श्रीधर तिळवे 
                                     1
कलाकृतीचे वर्गीकरण हे समीक्षेतील एक आवश्यक पाप आहे . सर्व  साधारण पणे आकारानुसार (sizeनुसार ) कलाकृतींचे  चार प्रकार होतात.

१ महाकृती
२ बृहदकृती
३ दीर्घकृती
४ लघुकृती
विश्वीय कालखंडात महाकाव्य, बृहद्काव्य, दीर्घकाव्य,  लघुकाव्य असे चार प्रकार उदयास आले .महाकाव्य हा महाकृतीचा  विश्वीय  आकार होता रामायण आणि महाभारत ही जगातील दोन श्रेष्ठ महाकाव्ये इंडियiने दिली

सृष्टीयतेत  scientific revolution  नंतर  गद्याचा व वास्तव आकलनाचा प्रभाव वाढत गेला. गटेनबर्गने चायनीज तंत्र अधिक विकसित करून छापील  संस्कृती आणली आणि महाकृतीत पद्याचा वापर करण्याची गरज संपली त्यातून आधुनिक कादंबरी स्थिरावली सौंदर्य वाद आणि वास्तववाद ही तिची साहित्यिक ideology होती

 ह्या आधुनिक कादंबरी विरुद्ध उभी टाकली ती  प्रतिसृष्टीय आधुनिकतावादी  कादंबरी ! नवकादंबरी आणि प्रतिकादम्बरी हे त्यांचे स्वरूप होते . रणांगण ह्या विश्रiम  बेडेकर ह्यांच्या  कादम्बरीने नवकादंबरीची सुरवात केली असली तरी ती परिपूर्ण नवकादंबरी नव्हती . नेमाडे ह्यांचे योगदान इथून सुरु होते . ''कोसला'' ही मराठीतील पहिली परिपूर्ण नवकादंबरी आहे परिपूर्ण नवकादंबरी ही आधुनिक विरुद्ध उभी ठाकते. कोसला
ही
१ पुणे हे आधुनिक शहर
२ इतिहास हा ideology चा कणा
३ आधुनिक शिक्षण
४ आधुनिकतील ठोंबेपणा
५ पोलिस ही आधुनिक राज्याची सत्ता दर्शवणारी संस्था
६ पैसे व पैसेवाला शेतकरी बाप
ह्या सर्वाविरुद्ध उभी ठाकते . scientific rationalism ने बधीर केलेली भावनिक संवेदनशीलता नाकारून अत्यंत उत्कट संवेदन शीलता अपनवते . पांडुरंग बहीणीच्या मृत्यूने पिसाटून जातो कारण घरच्या लोकांची बधीरता त्याला सहन होत नाही . हा romanticism नाही ही sensibility आहे .
पण
 हा पण महत्वाचा आहे . pandurang त्या प्रश्नांचा सामना करत नाही तो चक्क पळून गावात येतो . कृषीय आधुनिक स्वीकारतो खुंट्या वर बसतो पांडुरंग  औध्यो गिक होत नाही . प्रतिसृष्टिय औध्योगिकतेला नाकारत तो परंपरेत दाखल होतो . घरी रग्गड पैसा असल्याने हा देशीवाद त्याला परवडतो किंबुहना परंपरा वैगरे टिकवणे ह्या चैनी गरीबाला कुठे परवडायच्या 

ह्याचा जो परिणाम होण्याची शक्यता होती तीच झाली . नेमाडे कायमचे मागे परतले . ज्या आधुनिक शिक्षण संस्थेविरुद्ध ते कोसलात उभे ठाकले तिथेच शिकवू लागलेमात्र इथेही नेमाडे अस्सलच राहिले . ते जिथे होते ती एक आधुनिक संस्था होती तिचे ते चाकर होते ते प्रामाणिकपणे शिकवू लागले नेमाडे ह्यांचा हा अस्सल प्रामाणिकपणा हा त्यांच्या केवळ व्यक्तिमत्वाचाच नव्हे तर त्यांच्या साहित्याचाच विशेष आहे. त्यांनी ओळखले कि आपण कोसलात घेतलेली उडी इथे कामाची नाही ज्या सृष्टीय वास्तववादाविरुद्ध त्यानी स्वःता बंड केले त्या वास्तववादाला ते जाऊन मिळाले. हे पलायन नव्हते हे भारतीय वास्तवाचे नागडे आकलन होते . मुख्य सेनापतीनेच मशीनगन टाकून तलवार उचलल्यावर जी अवस्था होते तीच मराठी  साहित्यीकाची झाली . जो तो तलवारीने वास्तव लिहू लागला ह्याचा एक फायदा असा झाला की मराठी साहित्यातील भुरटा वास्तववाद ,शब्दबंबाळ प्रतीमावाद आणि फोफ्सा सौंदर्य वाद जाऊन त्या जागी अस्सल वास्तव आले . ह्या परिवर्तनात  दलित साहित्याचा वाटा अधिक असला तरी बिढार जरीला झूल ह्या तिन्ही कादंबऱ्याचा ह्यात मोलाचा हातभार होता .
पण ह्याचा एक दुष्परिणाम असा झाला की साहित्यात ideology महत्वाची ठरू लागली . कोण कुठल्या ideology चा समर्थक आहे ते महत्वाचे झाले आणि लेखनाची गुणवत्ता पाहणे दुय्यम महत्वाचे झाले ह्याचा एक दुष्परीणाम असा झाला कि मराठीत वास्तववादाचे दळण सुरु झाले ह्या दळणाने प्रतीसृष्टीयकादम्बरीचा प्राण काढून घेतला आणि मराठी साहित्यात प्रतीसृष्टीय कादम्बरी मृत्यू पावली . 
                            2
नेमाडे ह्यांनी वास्तववादी कादम्बऱ्या लिहल्या खऱ्या पण त्या लिह्ण्यामागील साहित्यबाह्य कारण तेही वास्तववादाच्या पलीकडील देणे त्यांना गरजेचे होते कारण त्यांच्या वास्तववादापेक्षा सशक्त वास्तववाद आंबेडकरी विचारप्रणाली मधून आलेले बाबुराव बागुल आणि इतर दलित साहित्यिक सादर करत होते . दया पवार ह्यांच्या '' बलुत '' ह्या आत्मकथनाने तर नेमाडे ह्यांचा वास्तववादही किती पातळ आहे ते दाखवून दिले नंतरच्या दलित आत्मकथनानी भारतीय साहित्याचा चेहरामोहराच  बदलून टाकला . 
ह्या पार्श्वभूमीवर नेमाडे ह्यांना स्वत:च्या वास्तववादाची नवी ओळख निर्माण करणे गरजेचे बनले.अशावेळी आंबेडकरांच्या विचारप्रणालीला शह देणारा एकच विचारवंत नेमाडेच्या कामाला येवू शकत होता तो म्हणजे महात्मा गांधी ! देशिवादाची पहिली अस्सल मांडणी ही  गांधीनी केली होती विदेशी संस्कृतीचा व वसाहतवादाचा प्रभाव रोखणे हे गांधी ह्यांचे सांस्कृतिक धोरण होते पुढे लोहिया ह्यांनी हा देशीवाद समाजवादाच्या अंगाने पुढे न्हेला जयप्रकाश नारायण ह्यांनी तो इंदिरा गांधी ह्यांना नामोहरण करण्यासाठी वापरला राजकीय पातळीवर यशस्वी झालेला हा समाजवादी देशीवाद एकाच वेळी आंबेडकरवादाला शह देत होता आणि वसाहतवादाला विरोधही करत होता. ह्यातूनच कोकाकोलाला हाकलून देणे वगैरे प्रकार झाले . त्यातूनच ब्राह्मणेतरांना देशीवाद देत देत दलितांना वेगळ्या पद्धतीने गोन्जारण्याचे धोरण अवलंबले गेले. सृष्टीयतेला आवश्यक अशी विचारप्रणाली देशीवादाच्या रूपाने नेमाडे ह्यांना मिळाली आणि १९८३-४ साली ती अधिकृतरीत्या सादर करण्यात आली . तिने आंबेडकरवादाला शह आणि मात दिलीच पण नेमाडे ह्यांचे कोसलाने निर्माण केलेले नायकत्व अबाधित राखले . माघार घेवूनही कशी सत्ता सोडायची नाही आणि नायकत्वही कसे अबाधित राखायचे हे कॉंग्रेसने समस्त क्षत्रियांना शिकवले होतेच नेमाडे ह्यांनी ही शिकवणी कला क्षेत्रात गिरवली . आश्चर्यकारक रीतीने खुद्द दलित साहित्यिक नेमाडे ह्यांची भलावण करू लागले आणि त्यांनीही साहित्यात कॉंग्रेसला सहकार्य करण्याऱ्या रिपब्लिक पार्टीचे धोरण स्वीकारले . ही irony होती पण तिने देशीवादाचा विजयरथ दलित वस्तीतही फिरवला आणि मंगेश बनसोड सारखे आमचे मित्रही नेमाडे ह्यांचे fan म्हणून मिरवू लागले. पुढे ह्या देशिवादाला हिंदू फोडणीही मिळाली. नेमाडे ह्यांचा देशीवाद हा अंतिमतः हिंदुत्व वाद्यांना मदत करणार हे लक्ष्यात येताच मी नेमाडे ह्यांच्यावर वैचारिक हल्ले करायला सुरवात केली. भा . ज . प . मधील वाजपायी आणि देशिवादातील नेमाडे ह्यांची व्यक्तिमत्वे अत्यंत उमदी आणि कारीश्मातिक असली तरी ती अंतिमतः हानिकारक आहेत . दोघेही सज्जन आहेत पण दोघेही अंतिमतः डायबेटीस देणारे आहेत साहजिकच नेमाडे ह्यांना प्रखर विरोध करणारे लेख मी १९९०- ९१ साली लिहिले आणि अभिधा सौष्ठव आणि इतरत्र ते छापूनही आले.  माझे साठोत्तरीविरोधातील बंड ह्या लेखांनी अधोरेखित केले .
ह्याचा अर्थ नेमाडे हे ह्या सन्मानाला अपात्र आहेत असा नाही आणि त्यामुळे कुणाला पोटदुखी व्हायची गरजही नाही. नेमाडे ह्यांच्यामुळे देशी वास्तववादी परंपरा अधिक सशक्त झाली आणि त्यांनी पहिली परिपूर्ण नवकादंबरी लिहली हे त्यांचे योगदान कोण नाकारणार ? ते ज्ञानपीठाला  सर्वाधिक पात्र होते ह्याबददल  माझ्या मनात कसलीही शंका नाही पण त्यांनी घेतलेल्या माघारीमुळे देशी जादुई वास्तववादाची शक्यता कायमची  गाडली गेली हेही खरेच ! वास्तविक भारतीय परंपरा ही वास्तववादी जितकी आहे तितकी अतिवास्तववादीही आहे पण नेमाडे ह्यांच्या वास्तववादाने कल्पनाशक्तीच मारून टाकली आणि चक्क मराठी कविताही वास्तववादी झाली जगात वास्तववादाचे कवितेत celebration करणारी मराठी कविता ही एक अनोखी कवितासंस्कृती आहे . आक्षेप त्यालाही नाही पण त्यामुळे कवितेत गद्य साजरे करणारे लेखक कवी म्हणून मिरवू लागले आणि त्याने मराठी कविताही बिघडवली त्याचे काय ? हे एक बरेच आहे की नेमाडे हे ह्यापुढे फक्त कविताच लिहणार आहेत कदाचित त्यामुळे त्यांनी सुरु केलेला कवितेतील पद्याचा कर्करोग बरा होईल  
                                 3
ज्यावेळी मराठीत वास्तववादाचा गवगवा सुरु झाला होता त्यावेळी विज्ञानात मात्र वास्तव धोक्यात आले होते सापेक्षतावादाने माणसाला दिसणारे वास्तव हे तो कोठे  आहे आणि त्याची काय गती आहे त्यावर अवलंबून आहे असे सिद्ध करून माणसाच्या इंद्रियशक्तीची हवाच काढून घेतली डोळ्यांनी दिसणारा वेग शून्य  असेल पण तो प्रत्यक्षात लाखो मैल असू शकतो हे कळल्यावर कुठला शहाणा माणूस डोळ्यांनी दिसण्याऱ्या वास्तवावर विश्वास ठेवेल ? नेमाड्यांनी मुळांचा सिद्धांत मांडून भल्याभल्यांना मूर्ख बनवले आणि १९६० नंतर सापेक्ष वास्तववादा ऐवजी निरपेक्ष वास्तववादाचा पारंपारिक पाढा सर्वांनी वाचायला सुरवात केली आणि मग लिहायलाही ! कादंबरी हि मुळात निरपेक्ष वां  आत्मकेंद्री वास्तव सांगायलाच जन्माला आली होती त्यामुळे एकतर पारंपारिक कादंबरी स्वीकारा वा कादंबरीला बदला असे दोनच पर्याय  लेखकाकडे उरले . नेमाडेंनी संपूर्ण मराठी साहित्याला पहिल्या पर्यायात ढकलून दिले आणि प्रतीकादम्बरीचा पर्याय रोखून धरला . स्वामी लिह्ण्याऱ्या रणजीत देसाई ह्यांनी हेच केले होते . त्यामुळे मराठीत पारंपारिक कादंबरीचा मृत्यू झालाच नाही आणि प्रतीकादम्बरीची वाट रोखली गेली सात सक्क त्रेचाळीस ह्या महाकृतीने प्रतीकादम्बरीची वाट शोधली होती पण त्या वाटेने फार लोक गेलेच नाही आणि विसाव्या शतकात प्रतीकादम्बरीचा वाढ होण्याआधीच मृत्यू झाला.