Thursday, February 17, 2022

 डिस्को लहर गेली श्रीधर तिळवे नाईक 

भप्पी लाहिरी गेले आमच्या पिढीचा एक वादग्रस्त संगीतकार गेला आमची पिढी नाचायला लागली ती भप्पीदांच्या सुरक्षामधल्या मौसम है गानेका पासून मिथुन चक्रबर्तीला त्यांचा आवाज एकदम फिट्ट बसायचा आणि त्याच्या डिस्कोला वाव देणारे त्यांचे संगीत होते ज्याला फोर ऑन द फ्लोर बिट्स म्हणतात त्याचा भारतीय शैलीत वापर करणारे ते पहिले संगीतकार होते हा बिट त्यांच्याआधी आर डी बर्मन कल्याणजी आनंदजी ह्यांनी वापरला होता पण त्याला पॉप्युलर बनवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता पुढे डिस्को म्हणून पुढे आलेला हा संगीतप्रकार भप्पीदांनी प्रचंड हाताळला किंबहुना आर डी पेक्षा वेगळी ओळख ह्या वापरामुळेच निर्माण झाली 

जर तिशोत्तरी जॅझची असेल साठोत्तरी रॉकची असेल तर आमची ऐंशोत्तरी ही डिस्कोची होती असं म्हणायला हरकत नाही सॅटरडे नाईट फिवर हा १९७७ चा चित्रपट माझ्या बालपणावर लॉन्ग  टाइम ठसा उमटवून गेला होता आणि माझी डिस्कोशी ओळख इथूनच सुरु झाली 

पुढे ए आर रेहमानपासून जे संगीताचे डिजिटल युग आले त्याची पायाभरणी भप्पीदांनी डिस्को मधून केली नैसर्गिक वाद्यांच्याकडून मॅनमेड वाद्यांच्याकडे सुरु झालेल्या प्रवासात ह्या ऐंशोत्तरी संगीताचा प्रचंड वाटा होता इलेक्ट्रिक पियानो आणि सिंथेसायझर ह्यांनी संगीताचे रूप पालटायला ह्याच काळात सुरवात केली प्रोग्रॅम्ड म्युझिकचा हा आरंभ होता मात्र ह्या बदलांची घनता आणि गहनता समजून घेणे भप्पीदांना जमले नाही ही त्यांची मर्यादा होती त्याऐवजी आर डी पासून वेगळी आयडेंटिटी निर्माण करणे आणि ह्या बदलाचा उथळपणे कमर्शियल वापर करणे ह्याकडे त्यांचा कल होता 

आर डी बर्मनने ओ पी नय्यरला चॅलेंज करून स्वतःचे वेगळे म्युझिक प्रस्थापित केले आणि आरडीला फॉलो करणारे जतीन ललित , आनंद मिलिंद असे एक स्कूल निर्माण झाले भप्पीदा हे ह्या स्कूलमधले पहिले विद्यार्थी त्यांचे वडील अपरेश मुखर्जी बंग संगीतकार होते आणि लता मंगेशकरांचे त्यांच्याकडे येणे जाणे होते (त्यांनी त्यांच्यासाठी अनेक गाणी गायली होती ) किशोरकुमार अशोककुमार त्यांचे मामा होते साहजिकच घरी संगीताचा माहोल होता मुखर्जी फॅमिली ही इंडस्ट्रीतील एक मोठी फॅमिली (ह्या फॅमिलीतील सुजॉय मुखर्जी हा माझा एकेकाळी मित्र होता त्याच्यामुळे त्याचे वडील जॉय मुखर्जीचा परिचय झाला होता ) होती आणि तिचा त्यांना पाठिंबा होता मात्र ह्या फॅमिलीने उचलेगिरीला कधीच पाठिंबा दिला नाही आणि भप्पीदाला कधीकधी ह्यावरून ऐकवले जाई त्यामुळेच ओरिजिनल धून निर्माण करण्याची त्यांची तडस शाबूत राहिली 

सुरवातीला त्यांनी आरडीच्या शैलीत संगीत दिले त्यांच्या दादू ह्या बंगाली फिल्ममधे लता मंगेशकर गायल्या तर  किशोरमामाने (किशोरकुमार ) चलते चलते मेरे ये गीत याद रखना हे अजरामर गाणे गायिले आणि त्यांची घौडदौड सुरु झाली ह्याचवेळी आप की  खातीर  साठी बम्बयसे आया मेरा दोस्त गाजले 

चलते चलते हा चित्रपट नायक विशाल आनंद देव आनंदची भुरटी नक्कल मारत होता त्यामुळे फ्लॉप झाला तरी त्यातील गाणी गाजली ह्यातले प्यारमे कभी कभी ऐसा हो जाता है हे भप्पीदांचे ड्युएट माझे ऑल टाइम फेवरीट आहे 

मग सुरक्षा आला ह्यातील संगीत आर डी च्या शैलीत असूनही आर डी पेक्षा वेगळे होते ह्यातील दिल था अकेला अकेला मधुर होते तर मौसम हैं गानेका व गनमास्टर जी नाईन ट्रेन्डसेटर ! भप्पीदांनी मला झटका दिला तो तीन  गाण्यांनी पहिले डिस्को डान्सरमधल्या याद आ रहा तेरा प्यार हे  दर्दभरे गाणे हे दर्दभरे गाणे डान्सिकल फॉर्ममध्ये दर्द पेश करणारे पूर्णपणे वेगळे गाणे होते दुसरे वारदात मधले तू मुझे जानसेभी प्यारा है ने ह्यात नशिलेगिरी होती पण डिस्कोथेकमधली होती तिसरे गाणे सलमा आगाचे होते दिलके अरमान आसूंओमे बह गये सारखे सेमिक्लासिकल गाणे ऐकून माझ्या मनात तिच्याविषयी वेगळी इमेज होती भप्पीदांनी त्या इमेजचा अक्षरशः भुगा केला कसम पैदा करनेवालीकी मधले ये रातमें जो मजा हैं  हे गाणे केवळ अभूतपूर्व होते आशा भोसलेंच्या साम्राज्याला ह्या गाण्याने तडा गेला आणि आशा भोसलेंच्यापेक्षाही वेगळ्या आवाजात हस्कीपणा निर्माण करता येतो हे भप्पीदांनी व सलमा आगाने सिद्ध केले (ह्या गाण्याचे  जलवा ४ सारखे व्हर्जन्स ऐकावेत म्हणजे सलमा आगाच्या आवाजाची किंमत कळते शमशाद बेगमच्या स्कूलचा हा आवाज म्हणजे एक नवा व्हर्जन होता आणि तो भप्पीदांनी निर्माण केला होता दुर्देवाने सलमा आगा नंतर मुस्लिम परंपरेत परतली आणि अशी गाणी गाणे तिने बंद केले )ह्या गाण्यात मिथुन डान्स करत न्हवता पण त्याने ड्रम सेट वर जी ऍक्टिंग केली ती झकास होती ह्या गाण्यांच्यात भप्पी गहन होते एक वेगळा साउंड निर्माण करण्याचा सृजनशील प्रयत्न होता ह्याशिवाय मिथुनच्या डिस्को शैलीला पूरक देखा है मैने तुम्हे फिरसे पलटके सारखी आमच्यासारख्या नाचखोर (मराठी समाजाच्या दृष्टीने वाया गेलेल्या  ) लोकांना डान्सप्रवण करणारी अनेक गाणी भप्पीदांनी दिली . 

प्रकाश मेहरांना खास कल्याणजी आनंदजी शैलीत त्यांनी नमक हलाल व शराबी मधली गाणी दिली आणि त्यासाठी त्यांना पारितोषिके दिली गेली ही गाणे छान होती पण जहाँ चार यार मिल जाये व इंतेहा हो गयी इंतजारकी(हे थर्ड डिग्री ह्या अलबमची कॉपी केलेले गाणे होते )  ही फक्त  दोन गाणी भप्पीदा टचची होती बाकी सारा मामला कल्याणजी आनंदजीसारखा होता त्यातील मंजिले अपनी जगह व पग घुंगरू बांध मीरा नाची थी गाजली 

बॉलिवूडमध्ये प्रोड्युसर आणि ऍक्टर्स अनेकदा संगीतकारांना "ह्या गाण्याची कॉपी करा " म्हणून विनंती करतात अशावेळी नकार दिला तर संपूर्ण चित्रपट हातातून जातो त्यामुळे अनेकदा संगीतकार झक मारत चोऱ्या करतात कधीकधी कॉप्या करण्याचा मोह आवरत नाही भप्पीदा ह्याला अपवाद न्हवते त्यांच्या प्यारा दुश्मन मधील हरी ओम हरी सरळ सरळ इरप्शनची कॉपी होती झुबीझुबी हे मॉडर्न टॉकिंगची कोई यहाँ नाचे नाचे द बगल्स ची मेरे पास आओगे (टारझन ) हे मिडल ऑफ द रोडचे ह्याच चित्रपटातील जिलेले जिलेले ओसीबीसा जिमी जिमी हे ओटवनचे वैग्रे (ही यादी खूप मोठी आहे ) नक्कल होते कथेबाबत सलीम जावेद व संगीताबाबत भप्पी लाहिरी ह्यांनी चोरीला  ऑफिशियल केले त्यांना स्वतःला ह्या चोऱ्या पसंत न्हवत्या असं ते म्हणत पण काळ बदललाय आणि मी हे केले नसते तर टिकलो तर टिकलो नसतो असा त्यांचा दावा होता 

जे अमेरिकेत होते ते बॉलिवूडमध्ये दहा वर्षांनी होते १२ जुलै १९७९ ला अमेरिकेत डिस्को डिमॉलिशन नाईट घडली आणि डिस्को संगीताच्या पतनाला सुरवात झाली आपल्याकडे हे पतन १९९० ला सुरु झाले आणि हळूहळू भप्पीदांचे वर्चस्व संपत गेले ए आर रेहमानने ह्या पिढीला चॅलेंज दिले आणि पुढे साजिद वाजिद विशाल भारद्वाज अमित त्रिवेदी ह्यासारख्या संगीतकारांनी ह्या युगाचे वर्चस्व संपवले 

ह्या काळात साऊथमध्ये इलाया राजा जबरदस्त निर्मिती करत होता त्यामुळे भप्पीदांना क्लासिकल दर्जा प्राप्त झाला नाही पण डिस्को संगीताचे त्यांनी अफलातून भारतीयीकरण केले ह्याबद्दल शंका नाही इलायाने असेंडिंग नोट्स निर्माण करून त्यात जी क्रांती केली तशी कोणतीही क्रांती भप्पीदांना जमली नाही इलायाने ए आर रहमान , युवा शंकर ह्यांच्यासारखे त्यांचे संगीत पुढे न्हेणारे शिष्य निर्माण केले तसंही काही बप्पीदांना जमलं असं दिसत नाही आजसुद्धा भप्पीदांनी जे केले त्याचे मूल्यमापन करणं जड जातं कारण त्यांचे कोणते गाणे चोरी केलेलं निघेल सांगता येत नाही 

आजच्या पिढीला मात्र ते माहिती झाले ते डर्टी पिक्चरमधल्या उ लाला उलाला ह्या गाण्यामुळे ! त्यांचे आमच्या काळात दुर्लक्षित झालेले कलियोको चमन सारखे गाणे अचानक रिमिक्समध्ये हिट झाले ह्याबाबतीत जी केस झाली ती त्यांनी जिंकली . 

एक गोष्ट नक्की त्यांनी आमच्या कुमार वयात एक वेगळा नृत्यप्रधान साउंड दिला आणि आम्हाला मनसोक्त नाचू दिले त्यांना माझी आदरांजली !

श्रीधर तिळवे नाईक 



Wednesday, February 9, 2022

 माझ्या आयुष्यात मी पाहिलेला पाहिलेला पहिला स्टार म्हणजे रमेश देव ! माझी पहिली मिटिंग त्यांच्याबरोबर होती ती हिशेबाची ! मी हिशेब करत असतांना ते काहीसे अचंब्याने पाहत होते . मग वडिलांना म्हणाले ," हा वयाच्या मानाने फार फास्ट आहे "

वडील म्हणाले ,"हो '

आमच्या तिळवे भंडारमध्ये ज्या काही लोकांची खाती होती त्यात देव कुटुंबीय होते त्यामुळे मग भेटी होत राहिल्या अभिनेत्यांचे पैसे वरखाली होत असत त्याला रमेश देव अपवाद न्हवते मात्र घरी सर्व सामान नीट पोहचवा अशी त्यांची विनंती असे व वडील ते काम इमान इतबारे करत कारण देव फॅमिलीही बाहेरून येऊन कोल्हापुरात सेटल झालेली त्यामुळे एक इमोशनल बॉण्ड तयार झाला होता . ते मूळचे राजस्थानी होते आणि प्रख्यात जोधपूर पॅलेस त्यांच्या पूर्वजांनी बांधला होता ह्यावर अनेकांचा विश्वासही बसणार नाही इतके त्यांचे मराठीकरण झाले होते 

माझे आईवडील रमेश व सीमा देव (माझ्या आईचे व सीमा देव ह्यांचे दोघांचेही नाव नलिनी होते त्यामुळेही एक बॉण्ड होता ) दोघांचेही फॅन दोघांचे जवळ जवळ सर्वच चित्रपट आम्ही बघितले कधीही दुकानात आले कि साधे सरळ वागायचे बोलायचे मुंबईला सेटल होईतोवर हे चालले पुढेही वर्षातून एखादी चक्कर व्हायची १९८० नंतर सर्व कमी होत गेले पण पुढे अजिंक्य देवची प्रत्येक फिल्म आम्ही पाहिली ते वडिलांच्या आग्रहास्तव !

मुंबईला आलो तेव्हा लिस्टमध्ये रमेश देव होतेच मी फोन केल्यावर ते अजिंक्यला फोन करून ते थेट घरीच ये म्हणाले अजिंक्यला मी फोन करून मी पत्ता घेतला आणि भेटलो मी तिळवेंचा मुलगा आहे म्हंटल्यावर सीमा देव एकदम खुश झाल्या रमेश देवांनी सर्वांची आस्थेने चौकशी केली मी त्यांना त्यांच्या शेजारचे अपडेट्स दिले एक जुना माहोल तयार झाला 

पुढे मग अजिंक्यने मला शंकरच्या हिंदुस्थानी ह्या चित्रपटाची रिमेक करायची आहे तू लिहिशील का म्हणून विचारले मला कॉपी करायचा विलक्षण कंटाळा साहजिकच मी प्रयत्न करतो म्हणालो खरा पण माझ्याकडून काही प्रयत्न झाले नाही अजिंक्यच्याही लक्षात आलं असावं बहुदा ! त्याने नाद सोडला आणि नात्यात एक अवघडलेपणा आला 

त्यानंतर मी भेटलो नाही आणि आता थेट वार्ताच आली . एका अत्यंत सज्जन अभिनेत्याचा हा अंत होता मी पुढेही अनेक स्टार्सना भेटलो  पण रमेश देव ह्यांच्याइतका साधा सरळ अभिनेता मी पाहिला नाही त्यांची आनंदमधली भूमिका अनेकांच्या आवडीची पण मला जैसे को तैसा मधला खलनायक अधिक आवडला कारण ते जे न्हवते ते त्यांनी साकार केले होते आनंदमध्ये ते त्यांच्या स्वभावासारखे होते पुढे राजेश खन्नाबरोबर त्यांनी अनेक फिल्म्स केल्या . अभिताभबद्दल त्यांना कौतुक होते आणि आनंदच्या सेटवरचे त्यांनी सांगितलेले किस्से इंटरेस्टिंग होते रामपूरका लक्ष्मण सारख्या  काही सुपरहिट फिल्म्स मध्ये त्यांनी काम केले 

त्यांचे अभिनयाचे स्कूल हे राजा परांजपे ह्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेले होते ज्यात निरीक्षण, नाट्यशिलता  व अनुसरणाला महत्व असायचे त्यांची पहिली महत्वाची फिल्म आंधळा मागतो एक डोळा ही राजा परांजपे ह्यांचीच होती त्यामुळे ते स्वाभाविक होते १९८० नंतर त्यांच्या अनेक हिंदी फिल्म्स आपटल्या आणि महत्वाच्या लेखक दिग्दर्शकांपासून ते दुरावले मात्र नंतर अचानक त्यांना जाहिरातक्षेत्रात निर्माता म्हणून जबरदस्त यश मिळायला सुरवात झाली आणि ते निर्मितीक्षेत्रात स्थिरावले त्यातूनच पुढे अभिनय देव (दिल्ली बेली )हा एक अफलातून दिग्दर्शक आकाराला आला  

त्यांना थोडी अजिंक्याचीच काळजी होती आणि एक भविष्यावैज्ञानिक म्हणून तो किमान मराठीत तरी यशस्वी अभिनेता होईल अशी मी खात्री दिली होती 

आपली दोन्ही मुलं कलाक्षेत्रात आणण्याची रिस्क त्यांनी घेतली आणि ती यशस्वी झाली 

त्यांना माझी आदरांजली !

श्रीधर तिळवे नाईक 





Sunday, February 6, 2022

 लताबाई गेल्या आणि भवतालावर एक पॉज पसरला बुद्धीच्या आवाक्याबाहेर असलेली त्यांची मधाळ गायकी कायमच आयुष्यात तारे पेरीत मुलायम स्वरप्रकाश प्रकटत करत राहिली जन्मजात गन्धाराचं गूढ कधीच सुटलं नाही दैवी स्वरलयीचं विलक्षण देणं त्यांना लाभलं होतं 

माझा आवडता संगीतकार ओ पी नय्यरने त्यांच्याकडून एकही गाणं गाऊन घेतलं नाही तरीही लताबाई तो गेला तेव्हा त्याचे वेगळेपण अधोरेखित करत्या झाल्या तर ज्यांचं आयुष्य ओपी मुळं घडलं त्या आशाबाई चुप्प राहिल्या हा फरक बोलका होता त्या हिंदुत्ववादी होत्या आणि त्यांनी ते कधीही लपवलं नाही अलीकडे त्यांना त्यामुळे फार बायस टीका झेलावी लागली त्यांची गायकी हिंदवी होती हिंदुत्ववादी न्हवती ह्याचाही अनेकांना विसर पडला 

हिंदी फिल्मी संगीतात स्त्रीगायकीची सुरैया , शमशाद बेगम , गीता बाली आणि लता मंगेशकर अशी चार घराणी आहेत त्यातील लता मंगेशकर घराण्याच्या त्या आद्य प्रवर्तक गीता बाली घराण्यात नंतर आशा भोसले ही त्यांच्यापेक्षा सरस वारस जन्माला आली तसं लता मंगेशकर घराण्यात झालं नाही आमच्या पिढीत त्यांच्यापेक्षा त्यांच्याच घराण्यातील अनुराधा पौडवाल लोकप्रिय झाल्या आणि नंतर अलका याज्ञीक आणि कविता कृष्णमूर्तींनी आपले राज्य निर्माण केले पण तरीही लताबाईंच्या आसपासही कोणी पोहचू शकल्या नाहीत संगीत देवीकडून मानवी कडे जसं जसं कलायला लागलं तशी आशा भोसलेंची पकड काही काळ वाढली तरी लताबाईंचे साम्राज्य अबाधित राहिले आशा जे गाऊ शकत होत्या त्या स्वरावटी लताबाई सहज तितक्याच मादक गाऊ शकायच्या उदा दो घूंट मुझको पिला दे शराबी किंवा ओ जाने जॉ मात्र ह्या मादकपणातही दैवी स्पर्श लपायचा नाही त्या उलट आशाबाईंचा आवाज कधीही दैवी उंची गाठू शकला नाही त्यामुळेच लताबाई ह्या जगातल्या सर्वोत्तम गायिका आहेत हे ठसत राहिलं दैवी कधीही मानवी होऊ शकतं पण मानवी कधीही दैवी होऊ शकत नाही त्याचे हे उदाहरण होते (अपवाद आशाबाईंनी गायिलेले दिन तैसा रजनी ) लताबाईंची 

१ ये दिल और उनकी निगाहोके साये 

२ रातभी हैं कुछ भिगी भिगी 

३ आजा रे परदेसी 

४ ए दिले नादान 

५ झूम झूम ढलती रात 

६ श्रावणात घन निळा 

७ ऐरणीच्या देवा तुला 

८ कही दीप जले कही दिल 

९ पलभरमे ये क्या हो गया वो मैं गयी 

१० लग जा गले 

११ कोई नहीं है फिरभी हैं मुझको 

१२ आपकी नजरोने समझा 

१३ बेदर्दी बालमा तुझको 

१४ सोलह बरसकि बाली उमरको सलाम 

१५ जब प्यार किया तो डरना क्या 


ही माझ्या आवडीची ! त्यांच्या सुरेलपणावर विश्वकोश बनू शकतो इतके हे सूर अचूक आणि अभिजात होते , मराठी लोकांनी करियर कसे बनवावे ह्याचे धडे त्यांच्याकडून गिरवावे इतकी त्यांची मॅनेजमेंट परफेक्ट होती त्यांच्या व्यवहाराला नाक मुरडणारा मराठी स्वभाव हा खरेतर आऊटडेटेड झालेला स्वभाव आहे त्यापेक्षा बॉलिवूडमध्ये मराठी माणसाने कसं वागलं पाहिजे ह्याच्या त्या आदर्श होता राजेश खन्नाच्या आशीर्वादचे आणि शाहरुख खानच्या मन्नतचे वाटेल ते नखरे झेलणाऱ्या मराठी लोकांनी लताबाईंच्या प्रभुकुंजचे नखरे मात्र ओव्हररेटेड केले एकंदरच यशस्वीपणाचे मराठीतील बुद्धिवादी लोकांना वावडे आहे कि काय अशीच शंका येते त्यांनी बालपणात सोसलेल्या दारिद्र्याच्या झळा आयुष्यभर त्यांचा पाठलाग करत राहिल्या त्यातून त्या बाहेर येत्या तर होत्या त्याहून अधिक दिलदार झाल्या असत्या आणि धनासक्त स्त्रीची इमेज तयार झाली नसती 

साहित्यिकांच्यावर विशेषतः गीतकारांच्यावर मात्र त्यांचे प्रेम होते एल एम स्टुडिओत मी संगीतकार म्हणून प्रथम एंट्री मारली तेव्हा तिथे टांगलेले गीतकारांचे फोटो पाहून काहीसा चकित झालो होतो 

संगीतकार सज्जादवरचे  त्यांचे प्रेम हाही माझ्या कौतुकाचा विषय आहे त्यांनी त्याला आठवणीत ठेवला नसता तर कदाचित तो विस्मरणात गेला असता राज कपूरशी त्यांनी घेतलेला पंगा हा तात्विक नीडरपणा दाखवणारा होता (पुढे असाच पंगा अलिशा चिनॉयने यशराज बरोबर घेतला तेव्हा तिला माघार घ्यावी लागली होती )

अलीकडच्या गीतकारीवर त्या प्रचंड नाराज होत्या त्याचा परिणाम गाण्यांची संख्या कमी होण्यात झाला उच्छंख्रुलपणा त्यांच्या पिंडाला मानवणारा न्हवता वास्तविक ज्या आधुनिकतेतला त्या उच्चंख्रुल समजत त्याच  आधुनिकतेतून  माईकचा शोध लागला नसता तर त्यांच्या नाजूक गायकीला कदाचित मान्यता मिळाली नसती त्या पिंडाने अभिजात रोमँटिकवादी होत्या हेच खरे त्यामुळेच गीतलेखनातील आधुनिकता त्यांना झेपणारी न्हवतीच 

इतिहास आणि क्रिकेट ह्याचे त्यांना वेड होते आणि क्रिकेटला स्टेट्स देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता त्या गेल्या आणि अभिजात वळणदार जरतारी सुरेलपणा गेला 

त्यांना माझी आदरांजली 

श्रीधर तिळवे नाईक 









Sunday, August 29, 2021

मितभाषी श्रीधर तिळवे नाईक 

जयंत पवार गेला अत्यंत कमी पण नेहमी खरं बोलणारा मितभाषी आणि सोशिक जयंत गेला आमच्या शेवटच्या भेटीत आम्ही फक्त एकमेकांच्या आजारावर बोललो होतो आणि हम होंगे कामयाब ची हिडन धून आळवत वेगळे झालो होतो 

जयंत लालबाग परळच्या मिल कामगारांच्यात जन्मला वाढला साहजिकच त्याची मानसिकता पूर्ण अरबन कधीच झाली नाही मी ह्या ठिकाणी काही महिने राहिलो होतो त्यामुळे एकंदर जयंत काय वातावरणात वाढला असेल ह्याचा मला अंदाज होता  त्याने मुंबई डोक्यावर ठेवली पण लालबाग परळ काळजात ! सुरवातीला चौथ्या नवतेच्या पूर्ण विरोधात आणि नंतर बाजूने असा आमचा नातेप्रवास होता 

त्याचे पहिले नाटक फुल मेलोड्रॅमॅटिक पण दुसरे अंधांतर त्याच्या स्वतःच्या आयुष्याचा तुकडा सादर करणारे जणू वास्तवाची एक स्लाइस कापून रंगमंचावर ठेवलेली ! त्याच्या एकांकिकाही अशाच ! 

त्याला सिनेसृष्टीत लेखक दिग्दर्शक व्हायचे होते पण सर्व जबाबदाऱ्या सांभाळून ! त्यातील सिनेलेखक तो झाला ब्रेकिंग न्यूज ह्या फिल्ममुळे पण बॉलिवूडमधील सारा खेळ हिट फ्लॉपचा फिल्म फ्लॉप झाली आणि रोध निर्माण झाला सज्जनता ही बॉलिवूडमध्ये डीसक्वालिफिकेशन आहे ह्याविषयी आमच्यात सहमती होती 

त्याचे कथालेखन हे मराठीत फार महत्वाचे ! खरेतर मी त्यावर सविस्तर लिहिणार होतो किंबहुना ऐंशोत्तरी  पिढीचे कथालेखन हा एक प्रबंधाचा विषय आहे असं माझं मत आहे कथालेखनाची एव्हढी विविधता दाखवणारी पिढी ही फक्त गाडगीळ माडगूळकर प्रभाकर पाध्ये गोखले ह्यांच्या काळात होती जयंत हा आमच्या पिढीचा एक बिनीचा कथालेखक होता सुदैवाने साहित्य अकादमी मिळाल्याने त्याची दखलही घेतली गेली 

आणि आता तो गेला तो एक हरणारी लढाई लढतोय असं वाटत होतं . शेवटी हरला !

कमी शब्दात अस्तित्व दरवळत ठेवणारा एक मोठा लेखक गेला . अलविदा दोस्त !

श्रीधर तिळवे नाईक 

गतवर्षाचा धडा श्रीधर तिळवे नाईक 

एप्रिल २०२० ते मे २०२१ हा कालखंड कलात्मक पातळीवर फार विचित्र गेला १ कोव्हीड २ विषघटना आणि ३ आईचा मृत्यू अशा लागोपाठच्या घटनांनी वर्ष वेगवान केले आणि कवितेत त्यांची अभिव्यक्तीही झाली कवितेत वर्तमान ओतण्याची माझी कलाशैली आहे त्यातून कोव्हीडवर महाकाव्य विषघटनेवर बृहदकाव्य आणि आईच्या मृत्यूवर खंडकाव्य अशी तीन काव्ये झाली ह्यापूर्वी एकाच वर्षात तीन प्रकारची मोठी काव्ये कधी झाली न्हवती ती ह्यावर्षी झाली 

विचित्र गोष्ट अशी कि ह्या वर्तमानकालीन कविता फेसबुकवर टाकत असतांना डेकॅथलॉन एल्सट्रातल्या १९८३ -१९८७ ह्या दरम्यानच्या कविता मी टाकत होतो तर त्या काहींना आत्ताच्या काळाला रिलेव्हन्ट वाटायला लागल्या वास्तविक राजीव गांधींचा कालखंड आणि मोदींचा कालखंड ह्यांच्यात फरक आहे हा फरक टिपणाऱ्या राजकीय कविता फारश्या लिहिल्या जात नाहीयेत लोक अजूनही आधुनिक किंवा साठोत्तरी कवींच्या संवेदनशीलतेनं हा कालखंड बघतायत त्यातूनच जुन्या कविता वर्तमानकालीन वाटतायत राजीव गांधी आणि नरसिंहराव ह्यांनी ज्या कार्पोरेट जगताला वसवायला सुरवात केलीये ते मोदींनी पूर्णपणे एस्टॅब्लिश केलेलं आहे अगदी भाजपसारखा राजकीय पक्ष ही कार्पोरेट म्हणून सेटल झालाय भाजप हे कार्पोरेट प्लेयर म्हणून पोलिटिकल फ़ंक्शनिंग करतंय त्याच्या सत्ताकारणाचे अनेक लोचे आहेत आपण आता ते पकडतो आहोत का ? आमच्या पिढीची संवेदनशीलता आता पुरेशी नाहीये आणि साठोत्तरी संवेदनशीलता तर पूर्ण आऊटडेटेड आहे शारीरिक तारुण्यता जर जीर्ण वृद्ध संवेदनशीलतेनं काम करणार असेल तर तिला दाद काय देणार ? जगभर देशीवाद आणि उत्तराधुनिकवाद सर्वच वर्तमानाला जखडून टाकतो आहे मराठी कला ह्याला अपवाद नाहीत खरेतर सार्वजनिक जीवनात धर्माचा वाढलेला हस्तक्षेप हा नेमका कशाचा द्योतक आहे ? आधुनिक शासनयंत्रणेचं डेड फ़ंक्शनिंग ह्याला जबाबदार आहे उत्तराधुनिक शासनयंत्रणा तर मुलखाच्या वाचाळ निघाल्या आहेत घटलेल्या कार्यक्षमता नीट ऍक्टिव्हेट करण्याऐवजी कार्पोरेट जगताने धार्मिक राजवटी स्पॉन्सर करण्याचा जो मूर्ख उत्तराधुनिक खेळ रचला त्याने सर्वत्र हा अनाचाराचा हाहाकार माजवला आहे तालिबान ह्या हाहाकाराचे एक मूर्ख स्वरूप आहे ते राज्य करता न आल्याने कोसळेलंच पण अफगाण जनतेची त्यात आणखी वीस वर्षे वाया जातील ह्याचं वाईट वाटतं धार्मिक राजवटींनी कितीही आव आणला तरी त्यांना नवीन जगतासाठी आवश्यक शासनयंत्रणा उभा करता येणं शक्य नाही त्यांना एकतर आपलं तत्वज्ञान त्यागावं लागेल किंवा स्वतःच्या कर्माने नष्ट व्हावे लागेल शेवटी लोक एक आल्टरनेटिव्ह म्हणून त्यांच्याकडे बघतायत तो नीट फंक्शन झाला तर लोक हा पर्याय टिकवतील नाहीतर फेकतील औरंगजेबाची राजवट अशीच आतल्या फोफशेपणामुळं कोसळली होती मराठ्यांनी फक्त तिला ठोसे मारणे पुरेसं ठरलं 

कॅव्हिडनं आपल्या सर्वच शासनयंत्रणा ह्यात युरोपियन अमेरिकन शासनयंत्रणाही आल्या उघड्या पाडल्या प्रश्न त्या बदलायच्या कशा हा आहे 

पर्यावरणीय हाराकिरी ह्या वर्षी केंद्रस्थानी आली खरी पण ती फक्त चर्चेत राहिली 

 पैसा बिनडोक असतो त्याला नजीकचे स्वार्थ दिसतात पण भविष्यातले विनाश दिसत नाहीत मानवी जीवन पैशाच्या हाती सोपवणे ही आत्महत्या होती आणि ही आत्महत्या पूर्णत्वास पोहचली आहे . प्रश्न आहे अर्थधनशैली हा मानवी जीवनशैलीचा मुख्य आधार म्हणून फेल गेली असेल तर पर्याय काय ?


श्रीधर तिळवे नाईक 









Saturday, July 24, 2021

 सतीश काळसेकर मार्क्सवादाची पॅशन गेली 

महेश म्हात्रे ह्या परममित्राच्या लेखनानं कळलं कि सतीश काळसेकर गेले हल्ली कवी गेले कि हवा जडच होते पण काळसेकरांच्या मृत्यूने श्वासही जड झाला 

मुंबईला जे एस हॉल (हॉस्टेल ) ला आल्यावर साठोत्तरीपैकी ज्यांची पहिली भेट झाली त्यात काळसेकर फर्स्ट ! कदाचित त्या काळात ज्यांच्याशी माझा इमोशनल बॉण्ड निर्माण झाला अशा दोघांपैकी एक (दुसरे केशव मेश्राम ) गावातून मुंबईत आलेल्या प्रत्येक कवीसाठी काळसेकर थोरल्या भावासारखे असत डोळ्यातल्या डोळ्यात हसत ते जेव्हा बोलायचे तेव्हा त्यात तर्क आणि काळजी दोन्ही असायची त्यांचं सावळं आणि रुबाबदार व्यक्तिमत्व पहिल्याच भेटीत इम्प्रेशनचं दही जमवायचं 

त्यांची माझी पहिली भेट पीपल्स बुक हाऊसमध्ये झाली दुकानदाराचा मुलगा असल्याने मला पुस्तकांच्या दुकानात जाऊन पुस्तक खरेदी करायला आजही आवडतं त्यावेळीही आवडे माहीत नाही कशी पण पॉप्युलरनं माझा पहिला संग्रह स्वीकारला आहे ह्याची न्यूज त्यांच्याकडे होती पहिल्याच भेटीनंतर त्यांनी मला " बुद्धिमान आहेस पण भोळसट आहेस तेव्हा ह्या शहरात सावध रहा " अशी वॉर्निंग दिली होती 

पुढे ऋत्विज हा माझा मित्र आशुतोष आपटे ह्याचा मित्र असल्याने भेटायला आला तेव्हा मला माहीतच न्हवतं कि तो काळसेकरांचा मुलगा आहे ऋत्विज आमच्या हॉस्टेल ग्रुपमध्ये लगेच विरघळला मी मंगेश बनसोड आल्हाद भावसार महेश म्हात्रे राजेश बेहरे के श्यामसुंदर अशी एक हॉस्टेल टोळी बनत गेली आणि वाढतही गेली पुढे पोस्टर पोएट्रीचा उपक्रम राबवतांना मी त्यांची मला अतिशय आवडलेली पुस्तकांच्या संग्रहाविषयी ही कविता पोस्टर साठी घेतली ही कविता म्हणजे प्रत्येक पुस्तकप्रेमींची सॉलिलुकी होती आणि आम्हा सर्वांनाच ती आवडली होती आम्ही इथूनच चौथ्या नवतेचे रणशिंग फुंकले आणि ते साठोत्तरीविरुद्ध असूनही साठोत्तरीपैकी काहींनी त्याला पाठिंबा दिला सतीश काळसेकर पाठिंबा देणाऱ्यांपैकी होते काळसेकर फक्त पाठिंबा देऊन थांबले नाहीत त्यांनी नवीन पोरांच्या कविता ऐका म्हणून एक काव्यवाचनाचा प्रोग्रॅमही पीपल्सला ठेवला त्यात मी , ज्ञानदा व इतरांनी  कविता वाचल्या पुढे ह्यातूनच लोकवाङ्मयने काढलेली आठ कवींची काव्यसंग्रह मालिका फळाला आली माझा काव्यसंग्रह पॉप्युलरने १९९२ सालीच काढला होता त्यामुळे मला ह्यात घेता येणार नाही असं काळसेकरांनी सांगितलं तेव्हा मी आनंदाने अहो हे बरोबरच आहे असं म्हणालो ह्या संग्रहांच्यावर लिहायला नंतर समीक्षक मिळेना तेव्हा काळसेकरांनी आणि आल्हाद भावसार ह्यांनी मला विनंती केली आणि मी महानगरमध्ये बहुदा लेख टाकला 

मी मार्क्सशी सहमत नसलो तरी त्याचा शत्रूही न्हवतो ह्याकाळात साहजिकच वैचारिक टकराव अटळ होते सोविएत युनिअन कोलॅप्स झाल्यानंतर जी अभूतपूर्व परिस्थिती उद्भवली होती त्याचे प्रेशर त्यांच्यावरही होते सर्वच एकनिष्ठ कॉम्रेडप्रमाणे तेही क्रांतिक्षणाची वाट पहात होते मी त्यांना सरळच म्हणायचो कि हे वाट पहाणे वांझोटे आहे ते फक्त एकदाच मला म्हणाले कि तू भेटलास कि पेसिमीझम येतो मी म्हणालो मी तुम्हाला रियालिटी दाखवतोय मार्क्सवादाला ह्या देशात भवितव्य नाही आणि असलेच तर शरद पाटील ह्यांच्यासारखं काहीतरी काम सध्याच्या काळात व्हायला हवं मार्क्स भारतीय वाटत नाही हा मार्क्सवादाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांना हे पटणं शक्यच न्हवतं हळूहळू आमचे संबंध ढिले पडायला लागले एकदा तर श्रीधरनं सगळी पोरं बिघडवली म्हणाले मी रिएक्ट झालो नाही 

मग पुन्हा एकदा भेटले तेव्हा पूर्वीचाच जिव्हाळा आवाजात होता सौष्ठव का बंद केलेस वैग्रे सगळ्याच साठोत्तरीप्रमाणे त्यांचाही मी प्रिंटिंगमध्ये अधिकाधिक संग्रह काढायला हवेत  असा आग्रह होता त्याउलट मला त्यांच्या समग्र कविता एकत्र हव्या होत्या 

नंतर मग एकदा फोनवर बोलणे झाले तेव्हा दिवस काढून निवांत ये मला तुझ्याशी निवांत बोलायचं आहे म्हणाले पण मला शक्य झालं नाही 

आणि आता ते गेले 

मला खात्री आहे नव्वदोत्तर पिढीतला प्रत्येक कवी ह्या बातमीने थोडा का होईना हलला असेल आमच्या पिढीला भरभरून स्नेह आणि प्लॅटफॉर्म त्यांनी दिला मतभेदांना जागा दिली आणि नातं मोठं मानलं ते मार्क्सवादी साहित्याचा मोठाच आधार होते 

त्यांच्या कवितेवर मला जे म्हणायचं आहे ते मी टिकाहरणमध्ये म्हंटलं आहेच त्यांच्या रूपाने एका मार्क्सवादी पिढीची पॅशनच गेली म्हणायला हरकत नाही 

गुड बाय कॉम्रेड !


श्रीधर तिळवे नाईक 





Thursday, July 8, 2021

 पॅशन दाय नेम इज दिलीपकुमार श्रीधर तिळवे नाईक 

दिलीपकुमार माझ्या बालपणात मला कधीच आवडले नाहीत माझे वडील त्याचे डायहार्ड फॅन त्यामुळे लहानपणी त्याचे काही चित्रपट मला नाईलाजाने पाहायला लागत वडील दर सोमवारी मला शक्य असेल तर एक चित्रपट दाखवत आणि तो बहुतांशी इंग्लिश असे तरीही काही मॅटिनीज दिलीपकुमारचे होते पण लहानपणी मनोजकुमारने दिग्दर्शित केलेला क्रांती पाहिला आणि मला वाटलं कि हा चांगला अभिनेता आहे मी मग दिलीपकुमार रिटेक सुरु केला आणि केदार शर्माचा जोगन पाहिला मला दिलीपकुमारचा अभिनय मोकाट आवडलेला हा पहिला चित्रपट !

ह्या वेळीच  रमेश सिप्पी सलीम जावेदचा शक्ती , यश चोप्राचा मशाल  पाहताना वाटलं कि दम आहे त्यानंतर मग बिमल रॉयचा देवदास फिरून पाहिला आणि फिरून फिरून गंगावेश तसा पाहत राहिलो हा एक अद्भुत चित्रपट होता खऱ्याअर्थाने रोमँटिक चित्रपटाचा कळस !देवदासमधली पॅशन हा एक ग्रंथाचा विषय आहे 

मात्र त्याला दिलेले वास्तववादी अभिनयाचा टॅग मला कधीच पटला नाही राज कपूर दिलीपकुमार आणि देव आनंद हे तिघेही रोमँटिक अभिनेतेच ! अगदी मुघल ए आझम मधेही दिलीपकुमार मला दिलीपकुमार विथ पॅशनच वाटला . आणि तो तसा होता म्हणूनच पृथ्वीराज कपूरच्या क्लासिकल स्कूलच्या सर्वोच्च अभिनयापुढे व मधुबालाच्या क्लासिकल सौंदर्यापुढे तोडीसतोड पॅशन घेऊन टिकला त्याउलट त्याला समांतर असलेले बलराज साहनी व मोतीलाल हे जास्त व खरे वास्तववादी होते दिलीप कुमारकडे असलेली पॅशन राज व देव दोघांच्यातही मिसिंग होती आणि तिची कसर हे लोक स्टाईलने भरून काढण्याचा हे दोघे केविलवाणा प्रयत्न करत ही पॅशन नेमकी कुठून येत होती हे कोडे खुद्द दिलीपकुमारलाही सुटले असेल कि नाही कुणास ठाऊक ?

मग पुन्हा कधीतरी गंगा जमुना (ह्यावरूनच पुढे सलीम जावेदचा दिवार आला ) पाहिला आणि मग मधुमती दोघेही अभिनयात ढग होते अंदाज न येणारे पण पाऊसगच्च  ! नया दौर , राम और श्याम , लीडर ! माझी दिलीपकुमारची यादी इथे संपते बैराग वैग्रे पाहिले पण पॅशन मिसिंग वाटली . 

१९९२ ला अडा हॉ का बा ना सु ना लिहिताना कामत्रिकोणासाठी दिलीपकुमार ,  सायरा व अस्मा हा त्रिकोण निवडला आणि डोकं गरगरवणारे अनेक तपशील उपलब्ध झाले मग मी दिलीपकुमार एक व्यक्ती म्हणून विचार करणे सोडून दिले जो माणूस आपल्या मित्राच्या बायकोशी रोमान्स करतो आणि नंतर तिला वाऱ्यावर सोडतो त्याला माझ्या एथिक्समध्ये जागा नाही साहजिकच व्यक्ती म्हणून दिलीपकुमारला जागा मिळणे बंद झाले मात्र एक अभिनेता म्हणून असलेला त्यांच्याविषयीचा आदर कधीच कमी झाला नाही पॅशनेट ऍक्टिंग कशी करायची ह्याची दिलीपकुमार म्हणजे चालतेबोलते विद्यापीठ होते दुर्देवाने ह्या विद्यापीठाचे धर्मेंद्र , राजेंद्रकुमार , मनोजकुमार असे अनेक विद्यार्थी सुपरस्टार झाले तरी दिलीपकुमारची पॅशन ह्या सर्वांच्यात मिसिंग होती आणि नकलेत ती मग कितीही चांगली असो पॅशन ओतता येत नाही हे सिद्ध झाले सुदैवाने ह्यापैकी धर्मेंद्रने आपली अभिनयशैली बदलून हीमॅन केली आणि तो वाचला नाहीतर राजेंद्रकुमारसारखा तोही अशोभनीय झाला असता 

पुढे ह्या विद्यापीठाला समांतर रोमँटिक विद्यापीठ राजेश खन्नाने उभे केले आणि दिलीपकुमार स्कूल काही काळ मागे पडले पण पुढे अभिताभ बच्चनच्या रूपाने दिलीपकुमार विथ पॅशन विद्यापीठ पुन्हा नूतनीकरणासकट उगवले आणि त्याने दिलीपकुमारची दुसरी इनिंग प्रमोट केली पुढे शाहरुख खानने दिलीपकुमार विथ राजेश खन्ना ह्यांचा समतोल साधून ऍक्टिंगमधला तिसरा रोमँटिसिझम आणला जो आजच्या पिढीत रणवीरसिंग पुढे न्हेतोय 

माझा ना अल्ल्हाहवर  विश्वास आहे ना जन्नतवर ! त्यामुळे अलविदा ऍक्टर ऑफ पॅशन ! जहाँ रहो पॅशनमे रहो ! 

श्रीधर तिळवे नाईक 



Friday, June 4, 2021

 माझी पर्सनल होमिओपॅथी गेली श्रीधर तिळवे नाईक 

मिलिंद पोतदार ह्या माझ्या जिवलग मित्रांच्यापैकी एक ! त्याने माझ्या आयुष्यात अनेक गोष्टीबाबत कि रोल पार पाडला . कोल्हापुरात त्याच्या जेव्हढ्या ओळखी होत्या तेव्हढ्या क्वचित कुणाच्या असतील एक दिवस त्यानेच त्याला माहित असलेल्या एका डॉक्टर विषयी बोलायला सुरवात केली डॉक्टरचे नाव होते डॉ अविनाश देसाई ! मिलिन्दनेच आमची मिटिंग घडवली . त्यांचा दवाखाना हुतात्मा पार्कच्या उजव्या साईडला उद्यमनगरात होता मी गेलो तेव्हाही पेशन्ट होते 

माझी वेळ येताच  मी डॉक्टरांना भेटलो . पाऊणे सहा फूट उंची सावळा रंग डोक्याचे केस थोडे उडालेले , धारदार नाक असलेले व्यक्तिमत्व पण एकदम साधे आपण डॉक्टर असल्याचा कसलाही आव नाही . एक भविष्यातज्ञ आणि एक डॉक्टर ह्यांची ही भेट होती आणि आश्चर्यकारकरित्या त्यांना फ्यूचरॉलॉजीविषयी माहिती होती मी माझ्या आजोबांच्याप्रमाणे कुंडली किंवा हात फक्त कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी वापरतो बाकी सगळा अध्यात्मिक कारभार हे मी त्यांना पहिल्या भेटीतच सांगून टाकले मात्र हे जमले नाही तर फ्यूचरॉलॉजीच्या सर्व तंत्रांना वापरतो हेही बोलून गेलो त्यांनीही डॉक्टरांसाठी अंतःप्रेरणा फार महत्वाची असते असं सांगितलं पुढे मग होमिओपॅथी आणि फ्यूचरॉलॉजी ह्यावर जुजबी चर्चा झाली मी उठलो मात्र आम्हा दोघांच्यात पहिल्याच भेटीत बॉण्ड तयार झाला 

मी जिच्यासाठी भेटलो होतो त्या माझ्या बहिणीचे (उजूचे )प्रॉब्लेम त्यांनी अक्षरश : महिनाभरात सोडवले पुढेही माझ्या घरातल्या अनेकांचे आजार त्यांनी ठीक केले ते उपचारांच्या इंटिग्रेटेड असण्यावर विश्वास ठेवणारे होते आणि त्यांची बायको आयुर्वेद कॉलेजात गोल्ड मेडलिस्ट होती साहजिकच कधीकधी आयुर्वेदाचा वापरही ते करत त्यांचे काही ऍलोपॅथिक डॉक्टर चांगले मित्र होते आणि ऍलोपॅथिक ट्रीटमेंट गरजेची असली कि ते त्यांच्याकडे पाठवत तर ऍलोपॅथीला ठीक करायला न जमलेले काही पेशंट त्यांनी होमिओपॅथीद्वारा ठीक केले होते होमिओपॅथी तळव्यातल्या वाहीन्यांच्यावर उत्कृष्ट उपचार करते हे मी त्यांच्याकडे अनेकदा साक्षात पाहिले स्त्रियांच्या एमसी नीट करण्यात तर ते मास्टर होते मात्र ताप वैग्रे आला कि ते स्वतःच क्रोसीन घ्या म्हणायचे आमच्या उपचारांनी ताप लगेच बरा होत नाही असे ते स्वतःच म्हणत मात्र दीर्घकाळ सर्दी किंवा कायमस्वरूपी सर्दी किंवा सायनसचा आजार बरा करण्यात त्यांना महारत होती डॉक्टरांनी कधीही पैश्याचा पाठलाग केला नाही एकतर ते श्रीमंत घरातून आले होते आणि आतून ते कुठेतरी कलन्दर होते त्यामुळेच एखाद्या पेशन्टकडे पैसे नसले तरी ते उपचार करत पैसे दुय्यम असल्याने त्यांनी कधीही आपला कट ठेवला नाही त्यांची प्रॅक्टिस ही एक शुद्ध प्रॅक्टिस होती त्यांच्याकडे स्वतःचे आजार बरे करू न शकलेल्या काही ऍलोपॅथिक डॉक्टरांचीही उठबस असे पण त्यांनाही ते फार चार्ज करत नसत 

माझ्यामुळे पुढे मिलिंद गुर्जर व मग नंतर अशी एक चेन जी मिलिंद पोतदारमुळे सुरु झाली होती त्यांच्याकडे कार्यान्वित झाली आमच्यातल्या अनेकांचे आजार त्यांनी ठीक केले माझ्या कवितेवर त्यांचे प्रेम होते आणि माझी एक कविता त्यांनी काहीकाळ आपल्या क्लिनिकच्या भिंतीवर लावली होती

देसाईंचं होमिओपॅथीवर निष्ठावान प्रेम होतं आणि तिच्यातल्या अद्ययावत अपडेट्स ते ठेवत तिच्या एलिमेंट थेरीविषयी त्यांची स्वतःची मते होती माझी मुंबईतील एक डॉक्टर मैत्रीण प्रफुल्ल विजयकरांनी मांडलेल्या नव्या सिद्धांताचा त्यावेळी हिरिरीने पुरस्कार करी डॉक्टर त्या सिद्धांतांना काही बाबतीत सपोर्ट करत तर काहीवेळा विरोध मात्र युरोपात अडकून पडलेल्या होमिओपॅथीला  विजयकरांनी दिलेल्या भारतीयत्वावर त्यांचाही विश्वास होता माझी मैत्रीण विजयकारांना क्रांतिकारी माने ते मात्र त्यांना मान्य न्हवते 

व्यक्तिगत पातळीवर त्यांना डॉक्टर असूनही आपल्या मराठा जातीचा सॉलिड अभिमान होता बायकोबाबत ते पारंपारीक होते तिला स्वतंत्र प्रॅक्टिस करायला त्यांनी अधिक वाव द्यायला होता आणि त्यावरून त्यांच्याशी माझा एकदा कडक वाद झाला होता वहिनी उत्कृष्ट डॉकटर होत्याच पण अव्वल दर्जाच्या कुक होत्या मी मुंबईतून कोल्हापुरात गेलो कि डॉक्टरांच्या घरी किमान एकदा तरी जाणे कम्पल्सरी होते आणि प्रत्येकवेळी किमान एकदा तरी डॉक्टरांच्या घरी जेवायला थांबायला लागे 

अपवादात्मकवेळा मी त्याच्या मुंबईतील पेशण्टना औषधेही पोचवत असे डॉक्टरांचे माझ्या घरावर प्रेम इतके कि कधीकधी स्वतः औषधे घेऊन स्वारी घरी येई त्यांची एक स्कुटर होती त्यावरून ते कोल्हापुरभर फिरत पुढे केवळ स्टेट्स म्हणून त्यांनी फोर व्हिलर घेतली खरी पण स्कुटर हेच त्यांचे पहिले प्रेम होते 

त्यांच्याबाबतीत माझे बरोबर न ठरावे असे प्रेडिक्शन म्हणजे तुमचा मुलगा विश्रांत परदेशात सेटल होणार खुद्द माझाही ह्यावर विश्वास न्हवता पण जे दिसले ते बोलणे भाग होते कारण विक्रांत देसाई चक्क कर्नल होता दुर्देवाने माझा फ्लॅश खरा झाला आणि डॉक्टरांची परवड सुरु झाली ते वरून कितीही कठोर वागत असले तरी मुलांबाबत ते हळवे होते म्हातारपणी तो जवळ नसणे त्यांना व्याकुळ करणारे होते . 

आमच्या दोघांच्या एकमेकांवरच्या विश्वासाची कसोटी पाहणारा प्रसंग आला तो माझ्या आईच्याबाबतीत्त ! मी मनाई करूनही उजू गावाला आईकडे रहायला गेली आणि पूर्ण वॉर्निंग देऊनही उजूने चायनीज टाईल्स केवळ छान चकाचक दिसतात म्हणून घराला घातल्या आणि मग जे अपेक्षित होते तेच घडले ह्या टाईल्स फक्त दिसायला बऱ्या पण चालायला घसरगुंडी ! आई त्या टाइल्सवरून घसरून पडली आणि पुढे गोव्यातल्या एका डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे तिच्या पायाला प्रॉब्लेम झाला मी देसाई डॉक्टरांशी बोललो डॉक्टर म्हणाले आईला कोल्हापुरात पाठव पुढचं सगळं मी बघतो आई कोल्हापूरला आली चेकप झाला आणि ऍलोपॅथिक डॉक्टरांनी गँगरीन झाल्याचे कन्फर्म केले फक्त देसाई डॉक्टरच असे होते जे ठामपणे सांगत होते हे गँगरीन नाहीये आणि ऍलोपॅथिक डॉक्टर्स  हे गँगरीन आहे आपण पाय कापूया नाहीतर हे शरीरभर पसरेल म्हणत होते प्रश्न होता निर्णय कुणी घ्यायचा ? डॉक्टर म्हणाले राजा काढा तुमचा इंतजाम आणि बघा काय फ्लॅश येतो का ? माझ्या संपूर्ण आयुष्यात मी फ्लॅशची इतकी डेस्परेट होऊन कधीच वाट पाहिली नसेल सुदैवाने तो आला आणि मी आईचं ऑपरेशन करायचं नाही असा निर्णय घेतला हा एक वादग्रस्त निर्णय होता आणि माझ्या ऍलोपॅथिक डॉक्टरमित्रांच्या मते मी आईला मृत्यूकडे ढकलत होतो माझा देसाई डॉक्टरांच्यावर व स्वतःच्या निर्णयावर विश्वास होता तर डॉक्टरांचा माझ्यावर मी आईला पुन्हा गावी न्हेले देसाईंची ट्रीटमेंट सुरु झाली आणि काही महिन्यांनी पायाचा हा भाग आपोआपच गळून पडला 

काही वर्षांपूर्वी आमच्या नात्याची परीक्षा खुद्द डॉक्टारांच्याबाबतच झाली मृत्यू समोर होता आणि ऑपेरेशन यशस्वी होण्याचे ५० टक्के चान्स होते साहजिकच देसाईंचा फोन आला कोल्हापुरात ये तू निर्णय घेईस्तोवर मी ऑपरेशन टेबलवर जाणार नाही मी गेलो आणि निर्णय घेतला म्हणालो ,"जावा बिनधास्त ! ओप्रेशननंतरही तुम्ही काही वर्षे जगणार"

डॉक्टर ७५ वर्षे जगले 

माझ्या ह्या डॉक्टर कम मित्राला माझी आदरांजली 

हज़ारों साल नर्गिस अपनी बे-नूरी पे रोती है 

बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदा-वर पैदा ( इक्बाल )


डॉक्टर अविनाश आनंदराव देसाई होमिओपॅथीतील नर्गिस होते 

.

श्रीधर तिळवे नाईक 








Sunday, January 26, 2020

मी आयुष्यात जी काही पथ्ये पाळतो त्यातील एक म्हणजे ज्या विषयावर काम करायचं ठरवलंय त्यावर काम करणे वर्तमान काळ कायमच तुमचे प्रोजेक्ट डिस्टर्ब् करत असतो अशावेळी अजिबात विचलित न होता आपल्या प्रोजेक्टवर काम करणे हे मला आवश्यक वाटतं कोल्हापुरात असतांना वैचारिक पातळीवर बाबासाहेब आंबेडकर गांधी आणि मार्क्स ह्यांच्यावर मला लिखाण करणे आवश्यक वाटले ते मी केलं (त्यातूनच परिवर्तनवाद का कोसळला चा प्रपंच झाला ) ह्या काळातील माझा लेखनप्रपंच हा प्रामुख्याने कविता कथा आणि नाटक ह्यांच्यावर केंद्रित होता कोल्हापूर शहर एक्स्प्लोर करणे हे काम मी नेटाने केले स्थानिक संस्कृती ही ह्या काळात मला महत्वाची वाटत होती आणि तिच्यावर पडणारे मार्गी ताणही !

१९८८ ते १९९५ हा काळ मी जरी चौथ्या नवतेची चळवळ चालवत होतो तरी नाटकात पीएचडी करत होतो ह्या काळात मी जे लिहिले त्याचीच व्याख्याने सद्या मुंबई विद्यापीठात देतो सगळी चिन्हकी व सगळे इजम पूर्वी माहित असले तरी ह्या काळात ते अकादमिकली कोळून प्यायलो ह्याच काळात अडा हॉ का बा ना सु ना लिहिली कारण फावला वेळ मुबलक होता चौथ्या नवतेची समीक्षा , सौष्ठव व चॅनेल सिरींजमधल्या कविता कंटिन्यू राहिल्या मुंबईत दाखल झालेला आउटसायडर चमकत राहिला

बांधकाम चालू आहे वर १९९६ ला केस झाली आणि आयुष्य बदलले धर्म नावाची आणखी एक महाकादंबरी लिहिली चौथ्या नवतेची समीक्षा , सौष्ठव व कविता कंटिन्यू राहिल्या २००२ नंतर अर्थ ही महाकादंबरी लिहायला घेतली जेएनयू मध्ये व्याख्यान दिले आणि त्याचा विस्तार म्हणून २००५ ते २०१० हा कालखंड मी इतिहासाला दिला चौथ्या नवतेची समीक्षा , सौष्ठव व चॅनेल सिरींजमधल्या कविता कंटिन्यू राहिल्या

जोशी कि कांबळे ही फिल्म माझ्या आयुष्यातील आणखी एक टर्निंग पॉईंट तिच्यामुळे फिल्म इंडस्ट्री फुल्ल टाइम झाली नेट सिरीजमधल्या कविता ह्या बदलामुळे सुरु झाल्या नाटक आणि फिल्म्स ह्यांची संख्या वाढली ह्या काळात हातात घेतलेली मोक्ष ही कादंबरी काही पूर्ण झाली नाही राहुल सरवटे विदेशात गेल्याने पुढे फेसबुक आल्याने व इतर काही कारणांनीं सौष्ठव बंद केले

२००४ नंतर पुन्हा आयुष्याने पलटी मारली अपघात झाला हल्ले झाले शारीरिक फिटनेसची वाट लागली कवितांची निर्वाण सिरीज इथूनच सुरु झाली फेसबुकवर प्रचंड ऍक्टिव्ह झालो कारण शारीरिक लांब पल्ल्याच्या हालचालींना आलेली मर्यादा मोक्ष कादंबरी लिहायला पुन्हा घेतली पण पूर्ण होईना नाटकांवरच्या व्याख्यानांचा परिणाम म्हणून नवी नाटके लिहिली मुख्य लक्ष अध्यात्मिक लिखाणाकडे लागले मोदींच्यामुळे इतिहासातील हिंदुत्व पुन्हा न्याहाळणे सुरु झाले काही भागांचे मराठी भाषांतर केले क्वचित समकालीन आयाम दिला

यांतल्या प्रत्येक कालखंडात ज्यावर फोकस आहे त्यावरच लिखाण केले वर्तमानाला प्रतिक्रिया कवितेतून येतातच वेगळी गद्य प्रतिक्रिया प्रत्येकवेळी का द्यावी ? ह्यापुढे माझे सर्व लक्ष्य हे मोक्षिक लिखाणावर केंद्रित असणार आहे त्यामुळे कधी न्हवे ते माझ्या कवितांचा वेग आता मंदावलाय जगाचा प्रपंच सांभाळायला नितीन वाघ स्वप्नील शेळके प्रणव सखदेव पासून ह्रिषीकेश गुप्तेपर्यंत अनेक नवे लेखक समर्थ असतांना आमच्यासारख्या म्हाताऱ्यांचे आता काय काम असाही एक विचार आहेच



Friday, December 27, 2019

तुमने अच्छा लिखा था ग़ालिब मगर
तुम्हारे मरनेके बाद वो अच्छा लगा
श्रीधर तिलवे नाईक 

Friday, March 1, 2019

किशोरला मी डाय हार्ड रोमँटिक कवी म्हणून ओळखतो आम्ही चौघांच्या कविता नावाचा प्रोग्राम एकत्र करायला लागलो तेव्हा किशोर रोमँटिक दासू आधुनिक प्रकाश होळकर देशी आणि मी चौथी नवता अशा मराठीतील चारी महत्वाच्या नवता आम्ही सादर करत असू आम्हा चौघांचेही हे पिंड होते आणि एकमेकांच्या पिंडांना आदर व सन्मान देत आम्ही हा कार्यक्रम सादर करत असू स्वतःच्या भावनांच्यात ठाय मांडून बसलेल्या किशोर कदमांच्या कविता आणि स्वतः किशोर ह्यांच्यात द्वैत नाही अत्यंत हळवा आणि ओव्हरसेन्सिटिव्ह असणारा माझा हा मित्र तशाच कविता लिहितो आणि प्रामाणिकपणे लिहितो पण अलीकडे झालेला महत्वाचा बदल म्हणजे तो अलीकडे टाळ्यांची अपेक्षा करत नाही तो स्वतःसाठी लिहितो दुसरा बदल म्हणजे अलीकडे त्याने फक्त स्वतःत ठाय मांडणे सोडले आहे तो भवतालच्या अवकाशाविषयी सचेत झाला आहे तो व्यक्ती म्हणूनही सचेत होताच पण आता त्याच्या कवितेत हे आढळते आहे आणि हा बदल उत्तम आहे 

Wednesday, February 27, 2019

माझ्या वैचारिक लिखाणाबाबत आत्ताचा श्रीधर तिळवे काय विचार करतोय असा प्रश्न सारखा येतोय एका अर्थानं तो जिवन्त नाहीये शरीर आहे हे शरीर जे लिहितंय ते अध्यात्मिक आहे मी ते येऊ देतो 

Tuesday, February 26, 2019

मी युद्धाचा कट्टर विरोधक असलो तरी जर समोरचा प्रचंड हिंसक असेल तर
१ सुरक्षणासाठी केलेले संरक्षण
२ आक्रमण झाल्यावर अधिक आक्रमण होऊ नये म्हणून दक्षतेसाठी केलेले अधिकचे आक्रमण
हे नैतिक मानतो
भारतीय सेनेचे म्हणूनच अभिनंदन 

Thursday, February 21, 2019

नामवरसिंह गेले . मराठीत बेडेकर आणि हिंदीत नामवर हे दोन मार्क्सवादी समीक्षक असे होते ज्यांच्याबद्दल भय , आदर आणि हे काय म्हणतात/ किंवा म्हणून गेलेत म्हणून  उत्सुकता असायची /होती बेडेकर आधीच्या पिढीचे असल्याने फार आधी गेले(१९७३)  खुद्द मार्क्सवाद्यांनीच त्यांची पत्रास फारशी ठेवली नाही मग नॉन मार्क्सवादी काय पत्रास ठेवणार त्यामुळं त्यांचा मार्क्सवादी वारसा कोणी मराठीत नीट चालवला नाही अपवाद कदाचित शरद नावरे असावेत पण त्यांनी चौफेर लिखाण न केल्याने ते कोल्हापूरच्या वर्तुळापुरते सीमित आहेत शिरवाडकर वैग्रे ठीकठाक त्यामुळे मार्क्सवाद्यांचा साहित्यातला आवाज ऐकायला नामवारांच्याशिवाय पर्याय राहिला नाही

नामवरांच्या सुदैवाने  त्यांच्यावेळी  नेमका गजानन माधव मुक्तिबोध हा अद्भुत प्रतिभाशाली कवी चक्क मार्क्सवादी होता आणि त्याच्यामुळे हिंदीतला देशीवाद अधिक सशक्तपणे व काहीसा बिनधास्तपणे डावा झाला मराठीतला डावेपणा मात्र कायमच काँग्रेसवादी(गांधीवादी ) आणि आंबेडकरवादी परिघाच्या आत घुटमळत राहिला त्यामुळे नारायण सुर्वेंच्या नंतर मराठीत सशक्त डावी कविता झाली नाही अपवाद माझा मित्र दिलीप धोंडो कुलकर्णी सुहास एकसंबेकर किरण खेबुडकर गणेश विसपुते व अर्थात सतीश काळसेकर त्याउलट डाव्या आंबेडकरवादाने नामदेव ढसाळसारखा अभूतपूर्व कवी जन्माला घातल्याने आणि त्याला पूरक केशव मेश्राम , यशवंत मनोहर , प्रकाश जाधव त्र्यंबक सपकाळे अरुण काळे महेंद्र भवरे भुजंग मेश्राम असे एकापेक्षा एक कवी निर्माण झाल्याने आणि पुढे दया पवारांच्या दलित आत्मकथनाने सारे वळणच बदलल्याने मराठी डावेपणा हा हळूहळू आंबेडकरवादीच झाला  ह्यात भर पडली ती शरद पाटलांच्या माफुआवादाने ! मार्क्स फुले आंबेडकर ह्यांना एकत्र कसे घेऊन जायचे ह्याचे उत्कृष्ट मॉडेलच शरद पाटलांनी सादर केल्याने मराठीत शुद्ध मार्क्सवाद्यांची गरजच सम्पली . पुढे कांचा  इल्लय्याने मार्क्स आणि आंबेडकर ह्यांना एकत्र न्हेण्याची गरज मांडली तेव्हा ती नॉनमराठी लोकांना थोर वाटली तरी मराठी लोकांना ती शरद पाटलांच्यामुळे आधीच माहिती होती हिंदीत मात्र आंबेडकरवादाचा प्रभाव फार उशिरा पडायला लागल्याने तिथली साठोत्तरी डावी कविता अधिक सशक्त निपजली आणि नामवरांनी तिला आवश्यक असलेली समीक्षिय बॅकग्राउंड व्यवस्थित पुरवली डिकलोनायझेशनचे मार्क्सवादी आर्थिक विश्लेषण त्यांना उत्कृष्ट जमले पण त्यांच्या परखडपणामुळे आणि ते ज्या जेएनयू त शिकवत होते त्याच्या डाव्या वर्तुळामुळे त्यांना हळूहळू मठाधीशाचे स्वरूप प्राप्त झाले काँग्रेस त्यांच्यामागे उभी राहिली कारण शेवटी ती जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी होती आणि डाव्याना उत्तेजन देण्याची आणि त्याचबरोबर मॅनेजही करण्याची ती उत्कृष्ट सोय होती

गजानन माधव मुक्तिबोधांना हिंदी कवितेच्या केंद्रस्थानी आणण्यात त्यांचा प्रचंड वाटा होता आणि निर्मल वर्माच्या कथेलाही त्यांनीच महत्व प्राप्त करून दिले आपल्याकडे विंदा करंदीकर हे डावे पण प्रभावी कवी होते पण नेहरूंचे मॉडेल प्रमोट करणारे असल्याने काँग्रेसचा प्रभाव वाढला त्यातच सुर्वे चांगले कवी असले तरी त्यांच्याकडे गजानन मुक्तिबोधांच्या टोलेजन्ग प्रतिभेची वानवा होती त्यामुळे मराठीत नामवरांना कोणी समांतर समीक्षक दिसत नाही

नामवरांचा  जन्म बनारसला झाला होता आणि काशीच्या पांडित्यगिरीचे अवशेष त्यांच्यात जोरदारपणे शाबूत होते   राहुल सांकृत्यायन हे डावे ऋषी वाटायचे आणि ते डावे पंडित ! साहजिकच ते कालिदासाचा टीकाकार मल्लिनाथ आपला कुळपुरुष असल्यासारखे बोलायचे आणि शास्त्रार्थ मनापासून करायचे आणि त्यासाठी आवश्यक असणारी तल्लख बुद्धी , धाडस , वादविवादपटुता आणि एन्सायक्लोपीडिक डाटा त्यांच्याजवळ भरपूर होता शेवटी ते हजारीप्रसाद व्दिवेदींचें शिष्य होते अमर्त्य सेनांची शब्दावली वापरायची तर आर्गुमॅन्टिव्ह इंडियन !

कविताके नये प्रतिमान (१९६८)ह्या ग्रंथाने त्यांची ही डावी पंडितीगिरी चालू झाली मूल्यकेंद्री साहित्याचा आग्रह त्यांनी जोरदारपणे लावून धरला जे जे अस्तित्वात आहे त्याची टीका झाली पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि साहित्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना मान्य होते आणि वेळ आली तेव्हा साहित्याची स्वायत्तता त्यांनी लावून धरली  मार्क्स आणि साहित्याची स्वायत्तता ह्या दोन गोष्टी थेरॉटिकली एकत्र जात नसल्या तरी भांडवलशाही अर्थव्यवस्थेत स्वतःचे म्हणणे मांडण्यासाठी कलेची स्वायत्तता आवश्यक असल्याने तिचा पुरस्कार केल्याशिवाय पर्याय राहात नाही असे मला वाटते हे तसेच आहे जसे मुस्लिम एखाद्या  राष्ट्रात अल्पसंख्याक असले कि सेक्युलर असतात . त्यामुळे मार्क्सवाद्यांना समजली नाही तरी मी नामवरांची अडचण ओळखून होतो

मी कोल्हापुरात असतांना त्यांच्या समीक्षिय विधानांना कधी निरमा कधी निर्मला (हा कोल्हापूरचा वॊशिंग पॉवडरचा स्थानिक ब्रँड होता जिथे मी बालपणी प्लास्टिक पॅकिंग शिकलो होतो  ) म्हणायचो माझा मित्र राजकुमार यादव हा हिंदीचा विद्यार्थी असल्याने आमच्यात नामवरांना धरून काही वादही होत त्यांचे चांगले विधान असले कि निरमा व खराब विधान असले कि निर्मला असे आमचे चाले नामवरांनी दोन्ही प्रकारची विधाने करत स्वतःकडे लक्ष्य राहील ह्याची काळजी घेतली

दुसरी परंपराकी खोज नंतर नामवरांनी लिखित असं काही काम केलं नाही बहुधा ओरलचा शोध घेता घेता तेच ओरलच्या इतक्या प्रेमात पडले कि त्यांनी लिखिताकडे पाठ फिरवली बहुतांशी पंडित भारतात  शेवटी व्याख्याते होतात त्यांचेही असेच काहीतरी झाले असावे .

कम्म्युनिस्ट असल्याची किंमत त्यांनी आयुष्यभर चुकवली प्राध्यापकीय दोन जॉब त्यांना सोडावे लागले (एकदा बनारस तर एकदा सागर ) सीपीआय च्या जनयुगाचे ते काही काळ संपादकही होते आणि कम्युनिस्ट पक्षातर्फे एक निवडणूक लढून ते हरले होते टेन्शनला नव्या कवितेचे प्रमुख लक्षण मानणारी त्यांची समीक्षा स्वतःच्या जीवनातही नानाविध टेन्शनस  पाळून होती बहुदा त्यांनीच संरचनावाद साहित्याच्या अभ्यासक्रमात प्रथम आणला


मार्क्सवाद्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्यांच्या वैचारिकतेत अनलिमिटेड हृदय नाही आणि आत्मा तर बिलकुलच नाही परिणामी एक रुक्ष पण शास्त्र व शस्त्र हातात धरणारी IDEOLOGY असे त्याचे स्वरूप राहते
आंबेडकरांनी बुद्ध स्वीकारून त्याला अनलिमिटेड हृदय देण्याचा प्रयत्न केला अनेक मार्क्सवाद्यांना आजही हे कळलेलं नाही नामवरांची गोची हीच होती कि संवेदनशीलतेमुळे त्यांच्याकडे हृदय होते आणि मार्क्सवादाच्या चौकटीत ह्या हृदयाचे काय करायचे हे त्यांना शेवटपर्यंत कळले नाही मला वाटते ही केवळ त्यांचीच नाही तर त्यांच्या अख्ख्या पिढीचीच शोकांतिका आहे

नामवरांच्या बरोबर ही पिढीही गेली . नामवरांचे जाणे हा त्या पिढीचा अस्त आहे .
त्यांच्या स्मृतीला माझा सलाम !

श्रीधर तिळवे नाईक














Wednesday, February 20, 2019

रुडॉल्फ रुडी गेला त्याच्या माझ्या कॉमन मित्रांनी मला किंवा इतर कुणाला कळवायचीही तसदी घेतली नाही कारण तो झीच्या त्या टॉप पोझिशनवर न्हवता ज्यासाठी लोक त्याच्याभवती गोळा होत . तो लवकर जाणार ह्याची कल्पना सर्वच जवळच्या मित्रांना होती पण इतक्या लवकर असेही वाटले न्हवते

रुडीची माझी ओळख माझ्या कन्नड मित्रांनी करून दिली होती मराठी साहित्यात मी जरी मराठी माणूस असलो तरी बॉलिवूडमध्ये माझी ओळख एक तुळु  कन्नडीग अशी असल्याने रुडी माझ्या जवळ चटकन आला रुडी कन्नड ख्रिश्चन असल्याने त्याची जीवनशैली ही ख्रिश्चन आणि साऊथ इंडियन कन्नड अशा दोन संस्कृतींनी युक्त होती आणि दोन्ही संस्कृतींचा तो अभिमानी होता त्यातच त्याचे काही नातेवाईक आस्ट्रेलियात सेटल झाल्याने ऑस्ट्रेलियन ख्रिश्चनिटी हा त्याच्या आस्थेचा विषय होता त्याचा धार्मिक गुरुही ऑस्ट्रेलियन ख्रिश्चन परंपरेतून आलेला होता ऑस्ट्रेलियात एक वेगळी ख्रिश्चनिटी जन्माला येत आहे ह्याविषयी आमच्यात एकमत होते

प्रत्यक्ष व्यवहारात मात्र तो प्रॅक्टिकल होता किंबहुना "श्रीधरअण्णा थोडा प्रॅक्टिकल बनना  "अशी भुणभुण माझ्यामागे लावणारे जे लोक होते त्यात तो एक होता मोक्षावर विश्वास नसल्याने माझा संन्यास त्याला अनाकलनीय होता त्याच्या दृष्टीने कयामत सत्य होती त्यामुळे मी मोक्ष नावाच्या भ्रमाच्या मागे न लागता करियरच्या मागे लागावे अशी त्याची इच्छा होती

त्याने स्वतःचे करिअर झी पासून सुरु केले होते आणि झीच्या आरंभीच्या लोकांपैकी तो एक पायोनियर होता झी नेटवर्क्स नेमके कसे उभे होत गेले ह्याचा तो चालता बोलता इतिहास होता आपल्या बॉसवर त्याचे गाढ प्रेम होते आणि भारतातलं पहिलं खाजगी चॅनेल उभं करण्यात आपलाही खारीचा वाटा आहे ह्याचा त्याला सार्थ अभिमान होता . खाजगी चॅनेल्सच्या मालिकांचे प्रॉडक्शन डिझाईन करण्याची भारतीय पद्धत त्याने तयार केली ज्यात भारतीयांचा आळस , भ्रष्टाचार आणि कामचुकारपणा गृहीत धरण्यात आला होता झीचा पहिला ग्रेट सेलिब्रिटी प्रोड्युसर जो एकेकाळी एकता कपूर एव्हढाच प्रसिद्ध होता तो माझा एकेकाळचा  दोस्त असल्याने मला दुसरी बाजूही समजत होती पण पहिली कम्पनी ही अशीच उभी राहत असल्याने ह्याला पर्याय नाही हेही कळत होते पुढे होम टीव्हीने अत्यंत निर्माताकेंद्री दयाळू स्ट्रक्चर आणले तर त्याचा एका वर्षात कचरा झाला . त्यामुळे रूडीला नावं ठेवणारे लोक सरळ झाले .

पैसा त्याचा वीक पॉईंट होता पण तो कसा हाताळावा हे मात्र त्याला कळत न्हवते पुढे जेव्हा मला तो हे सगळं आपल्या फॅमिलीच्या सुरक्षिततेसाठी करतोय हे लक्ष्यात आलं तेव्हा त्याच्या ह्या वीक पॉइंटला मी माफ केलं त्याला जन्मापासून डायबेटीस होता आणि तो अतिउच्च होता त्यामुळे आपण कधीही मरू शकतो अशी त्याला भीती होती आपल्यामागे आपल्या कुटुंबाचं सगळं नीट व्हावं म्हणून तो धडपडत होता त्याचं  आपल्या बायकोवर प्रेम होतं आणि ते शेवटपर्यंत होतं तिच्यासाठी त्यानं काही गोष्टी सोडल्या किंबहुना शेवटची काही वर्षे तो फॅमिलीसाठीच जिवन्त राहण्याची धडपड करत होता साहजिकच तो बायकोला बिझनेस शिकवत होता जे आमच्या मित्रांना खटकायला लागलं . मी भांडणात उभा रहात नाही सरळ बाहेर पडतो . मोक्ष मिळालेला नसतांना लोकांना तृष्णांचा अंत कर असं कोणत्या तोंडानं सांगणार बरं सगळी भांडणं ही तृष्णांची आसक्त्यांची भांडणं असतात त्यामुळे दोन्ही पार्ट्यांच्या तृष्णा मला साफ दिसत होत्या

आणि मग मला अपघात झाला मी बेडरिडन तो हायर डायबेटिक त्यामुळं भेटी दुर्मिळ झाल्या आणि  तो डायबेटिसमुळं अकस्मात गेला त्याच्या बायकोचा ३० दिवसाचा शोक हा त्यांच्यातल्या नात्याविषयी बरंच काही सांगणारा होता . परवा ती पहिल्यांदा नीट झोपली आणि मित्र निवांत झाले

रुडीला मी नेहमी म्हणायचो ," रुडी ,   तुझी वाट कयामतीची  माझी मोक्षाची त्यामुळे आपण मरण्यापूर्वी भेटणं शक्य नाही "    त्यावर तो हसायचा .

नियतीनं हे बोलणं खरं केलं . आमची शेवटची भेट झालीच नाही .     

श्रीधर तिळवे नाईक




Wednesday, February 13, 2019

विष्णू सूर्या वाघ गेला . तो विष्णू होता सूर्य होता आणि वाघही होता . विष्णू होता कारण गोवन परम्परा रोमँटिक आणि सुमधुर भाषेत कशी मांडायची हे त्याला नीट माहित होते आणि तिचा वापर स्वतःच्या भल्यासाठी कसा करायचा हेही त्याला पॉलिटिकली नीट माहित होते तो सूर्य होता कारण सगळ्या काव्यग्रहांना स्वतःभोवती कसे फिरवायचे हे त्याला माहित होते त्याच्या भाषेचा प्रकाश त्याला नीट माहित होता गोव्याचा माहोलच असा आहे कि तुम्ही रोमँटिक आपसूकच होता मात्र हा रोमँटिक माहोल सामाजिक करणारे जे काही कवी होते त्यातील तो एक होता माझे दोन मित्र दैनिक गोमंतकाचे  संपादक झाले श्रीराम पचिंद्रे आणि विष्णू . विष्णूने गोमंतकाला एक चेहरा दिला  त्याचे अमोघ वक्तृत्व त्याला शेवटी राजकारणात घेऊन आले तिथेही   तो गोव्यातील बहुजनवादाचा वाघ म्हणून वावरला  .

तो माझा वैचारिक शत्रू होता आणि आम्हा उभयतांना हे प्रेमळ शत्रुत्व मान्य होते त्याचे मगोप सोडणे मला कधीच आवडले नाही पण त्याच्याकडे त्याची कारणे होती पुढे त्याने भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिथे तो इलेक्शन जिंकलाही पण त्या जिंकण्यातही एक अस्वस्थता होती किंबहुना अस्वस्थता आणि चंचलता त्याचा स्थायीभाव होती कि काय असे वाटावे इतक्या वेगाने त्याचे स्टान्स काहीवेळा बदलत त्यामुळेच मगोप , शिवसेना , काँग्रेस आणि भाजप अशा चारही पक्षात त्याची फेरी झाली

रोमँटिक माणसाचे सारे गुणदोष त्याच्यात होते आणि विलक्षण आवेगात जगण्याचा झेलझपाटाही त्याच्या तुकारामावरच्या तुका अभंग अभंग नाटकाने जो त्याकाळी वाद निर्माण झाला होता तेव्हा मी सौष्ठवमधून संपादकीय लिहून त्याला जाहीर पाठिंबा दिला होता मात्र तसाच पाठिंबा मी त्याच्या कवितेला द्यावा ही त्याची अपेक्षा मी कधीच पूर्ण केली नाही त्याने गोव्यात भरवलेल्या काव्यहोत्राला  मी ठाम भाषेत नकार दिल्याने तो माझ्यावर चांगलाच उखडला होता पण माझा नाईलाज होता आमच्यातल्या वैचारिक मतभेदांनी आमच्या मैत्रीचा बळी घेऊ नये म्हणून मी जागरूक असे आणि गोव्यात गेलो कि शक्यतो कॉन्टक्ट करी पण त्याच्या दृष्टीने मी च्यू असल्याने हळूहळू आमचे नाते विरत गेले

त्याच्या सुदिरसुक्तातील फरक ह्या कवितेवरून  झालेला वाद तर अनावश्यक होता शूद्रांच्या पॉईंट ऑफ व्हू ने मांडलेली ही कविता एव्हढी वादग्रस्त होईल असे कुणालाच वाटले न्हवते गोव्याच्या बदलत चाललेल्या चेहऱ्याची ती नांदी आहे

आज तो गेलाय तर याज्ञवल्कावरून आम्ही दोघांनी घातलेले वाद आठवतायत त्याचा बोलण्याचा धबधबा आठवतोय त्याच्या स्वभावातील राजकारणात राहूनही त्याने जपलेली आर्तता आठवतीये त्याचा बिनधास्त पणा आठवतोय तो गेले काही महिने आजारी होता मात्र त्यातूनही वाचून परतला होता त्यामुळे सर्व काही कदाचित ठीक होईल असं वाटत असतानाच तो अनपेक्षितपणे गेला

एका तडफेचा अंत असा व्हायला नको होता

गुड बाय विष्णू

श्रीधर तिळवे नाईक 

Monday, January 28, 2019

जॉर्ज फर्नांडिस गेले . बिगरकाँग्रेसवादाचा लोहियानंतरचा मुख्य चेहरा गेला . काँग्रेसचं काय करायचं हे न कळलेला एक रशरशीत समाजवाद गेला .
एका ब्रिटिशसमर्थक सरंजामवादी ख्रिश्चन फॅमिलीत जन्मलेले  आणि पंचम जॉर्जच्या प्रेमापोटी आईनं ठेवलेल्या जॉर्ज ह्या नावाला पूर्ण विसंगत आचरण करणारे हे वादळ जन्मजातच समाजवादी होतं . त्यामुळेच प्रीस्टचं प्रशिक्षण घ्यायला गेलेल्या कुमारवयीन जॉर्जला सर्वात प्रथम खटकली ती चर्चमधील आचरणातील विषमता ! भोजनाच्या विषम वागणुकीला विरोध करून जॉर्ज बाहेर पडले ते थेट मुंबईत दाखल व्हायला वकील झालो तर वडिलांचे खटले लढवायला लागतील म्हणून त्याला नकार देत ! घराला नकार , चर्चला नकार ही जॉर्जियन नकारवादाची घंटा पुढे काँग्रेसला नकार , आणीबाणीला नकार अशी व्यापक होत गेली काही माणसे ही कायम विरोधी बाकावर बसलेली असतात जॉर्ज फर्नांडिस हे त्यातील एक !

लोहियांनी बिगरकाँग्रेसवाद मांडला पण त्याचा तात्विक पाया कच्चा होता मुळात काँग्रेसचं समाजवादी असेल तर तुम्ही तिला समाजवादाच्या आधारे विरोध करणार कसा ? असे विरोधासाठी विरोध फार काळ टिकत नाहीत आणि ते टिकलेही नाहीत काँग्रेसला हरवण्याची क्षमता फक्त दोनच आईडियालॉजीत होती

१ साम्यवाद कारण त्यांच्याकडे एकपक्षीय राजवटीचा विकल्प होता आणि तो लोकशाही नाकारू शकत होता
२ हिंदुत्ववाद  कारण त्याचा राष्ट्रवादच पूर्णपणे वेगळा होता शिवाय तो भांडवलवादी होता

ह्यात बिगरकाँग्रेसवादी समाजवाद्यांची गोची होणं अटळ होतं ती लोहियांची झाली तशी जॉर्ज फर्नांडिसांचीही झाली अशावेळी आमचा शर्ट तुमच्या शर्टापेक्षा अधिक स्वच्छ आहे हे सर्फ एक्सल स्टायलीत पटवावे लागते आणि भ्रष्टाचारविरोधी लढे अधिक तीव्र करून समोरच्याला हरवावे लागते अण्णा हजारेंनी हे पुढे करून दाखवले पण त्याआधी ते जयप्रकाश नारायणांनी आणिबाणीविरोधी आंदोलनात करून दाखवले स्वच्छतावादी आंदोलनाची मक्तेदारी भारतीय जनतेनं ही गांधीवाद्यांना दिलेली असल्याने अशा स्टायलीतल्या समाजवादी आंदोलनांना भारतीय जनता पाठिंबा देत नाही परिणामी विनोबा भावेचें सर्वोदयवादी भूदान जेपींचे सर्वोदयवादी आणिबाणीविरोधी आणि अण्णा हजारेंचे सर्वोदयवादी लोकपालवादी अशी गांधीवादी आंदोलने  काहीकाळ स्वच्छतेने चमकतात आणि पुन्हा भारतीय राजकारणात येऊन मळतात  भारतात अशा आंदोलनांचा अंतिम फायदा हा कायमच जनसंघाला  व हिंदुत्ववादाला झाला आहे .


भारतात गांधीवादाला यशस्वी व्हायचं असेल तर गांधीवादाने हिंदुत्ववादाला ठाम नकार दिला पाहिजे अशी माझी मांडणी १९८५ पासून मी मांडत आलो आहे पण तिला प्रतिसाद नाही हिंदुत्ववाद हा प्रथम गांधीवाद्यांचा फायदा घेतो आणि मग त्या त्या गांधीवाद्याचं करेक्टर अस्ससिनॅशन करून त्या त्या आंदोलनाने निर्माण केलेली बिगरकाँग्रेसी व्याप्ती व्यापतो गांधी , विनोबा भावे , जयप्रकाश नारायण आणि अलीकडे अण्णा हजारे ह्या सर्वांच्या बाबत हे घडलं आहे जॉर्ज फर्नांडिसांनी आणिबाणीविरोधात भाग घेतला तेव्हा हेच घडलं आणि अलीकडे किरण बेदी जश्या भाजप मध्ये जाऊन बसल्या तसे जॉर्ज फर्नांडिस भाजपच्या झोळीत जाऊन बसले जेपींच्या संपूर्ण क्रांतीने लालूप्रसाद यादव व मुलायमसिंग यादव  जन्माला घातले अण्णांच्या आंदोलनाने केजरीवाल !


जॉर्ज फर्नांडिसांचे असे भाजपबरोबर  जाऊन बसणे अनेकांना आवडले नाही पण  बिगरकाँग्रेसवादी राजकारणाची ही अटळ परिणीती होती व आहे . माझं स्वतःचं स्पष्ट मत असं आहे कि लोहियांनी काँग्रेसमध्ये जाऊन बसायला हवं होतं जे काही किरकोळ मतभेद होते ते काँग्रेसांतर्गत मांडता आले असते निदान लालू प्रसाद यादवांच्या सारखी सरंजामी भ्रष्टाचारी भूतं तरी भारतीय जनतेला झेलावी लागली नसती आणि समाजवादी कोटाची अशी व्ही आय पी अंडरवेअर झाली नसती . ज्याला काँग्रेसबरोबर जायाचे नाही तो अंतिमतः भाजपच्या झोळीत जाऊन बसतो किंवा फुटकळ युत्यांचे आणि प्रतियुत्यांचे राजकारण करत बसतो . फर्नांडिस हे उत्तरार्धात असे झाले . ही अपरिहार्यता होती कि अगतिकता होती हे सांगणे कठीण आहे .


ह्याचा अर्थ फर्नांडिसांचे आयुष्य वाया गेले का ? तर नाही त्यांच्यामुळे पाच मौलिक गोष्टी भारताला मिळाल्या

१ मुंबई म्युनसिपालटीत मराठीची सक्ती ही फर्नांडिसांच्या मुळेच झाली कन्नड लोकांनी कायमच देशी भाषांचा आग्रह लावून धरला आहे तमिळमध्ये पेरीयारनी तामिळ लोकांना तामिळ भाषेचा आग्रह शिकवला होता फर्नांडिसांनी मराठी लोकांना मराठीचा आग्रह कसा लावून धरायचा ते शिकवलं हा आग्रह लोहियांच्या समाजवादी देशीवादातून आला होता

 २ कोंकण रेल्वे पूर्ण करणे कोकण रेल्वेची कल्पना मधू दंडवतेँच्या नंतर कुणी लावून धरली असेल तर ती  जॉर्ज फर्नांडिसांनी ! त्यांच्यामुळेच कोकण रेल्वेची योजना तडीला गेली

३ कारगिल युद्ध जिंकणे

४ चायना हा भारताचा मुख्य शत्रू आहे पाकिस्तान न्हवे ही डिफेन्स लाईन मांडणाऱ्यात फर्नांडिस अग्रभागी होते आम्हा साउथवाल्यांना हा धोखा सतत जाणवतो कारण हिंद महासागर आणि बंगालच्या उपसागरात हिंडणारी चायनीज जहाज त्यामुळं फर्नांडिसांच्या ह्या डिफेन्स लाइनचं मला आश्चर्य वाटत नाही 

५ आय बी एम आणि कोला सारख्या मल्टिनॅशनल कम्पन्यांना तुम्ही राष्ट्रीय कायद्याच्या वर नाही हे आपल्या कृतीतून दाखवून देणारे फर्नांडिस हे कदाचित पहिले समाजवादी असावेत  त्यांच्यामुळेच ह्या दबावाची सुरवात झाली आणि आजही तो टिकून आहे

फर्नांडिस हे हिंदुत्ववाद्यांच्या बरोबर राहिले असले तरी हिंदुत्ववादी झाले नाहीत रशियाच्या कोलॅप्समुळे जगभरातील समाजवादी चळवळ सैरभैर झाली फर्नांडिस त्याला अपवाद न्हवते

त्यांच्यामुळे एक समाजवादी अंकुश  जन्माला आला ज्यामुळे त्यांना सुरवातीला बंदसम्राट ही पदवीही मिळाली आज त्या समाजवादी अंकुशाचा अस्त झाला मला ज्या काही मोजक्या समाजवाद्यांच्या बद्दल प्रेम आहे त्यातील ते एक होते त्यांना माझा कडक शेवटचा सॅल्यूट !

श्रीधर तिळवे नाईक 



















Sunday, January 27, 2019

चिन्हकी प्रास्ताविक

नितीन वाघ हा आमचा मित्र फार आग्रह करू लागल्याने बासनात गुंडाळून ठेवलेली चिन्हकी बाहेर काढतोय १९८९ ला नाटकावर पीचडी करायला मुंबई विद्यापीठात ऍडमिशन घेतलं आणि माझ्या गाईडनी सर्वात पहिले जे काही प्रश्न निवडले त्यात मेथोडॉलॉजी कोणती असा प्रश्न होता आणि मी दिलेले उत्तर होतं संरचनावाद आणि उत्तरसंरचनावाद ! साहजिकच त्या अंगाने नोट्स काढणं सुरु झालं त्याचच एक पुस्तक होईल असा ऐवज झाला दुर्दैवानं माझ्यावर जी केस झाली त्याने सगळी चक्र उलटी फिरली असो पण जे काम केले होते त्याचा एक फायदा झाला तो म्हणजे थिएटर अकादमीत व्याख्यान देण्यासाठी मला मेहनत करावी लागली नाही कारण थिसीस डोक्यात पक्का होता चिन्हमीमांसेच्या नोट्स मात्र बऱ्यापैकी शाबूत होत्या त्याच दुरुस्त करून इथं देतोय खरेतर ह्या काढायच्या होत्या छापील स्वरूपात अडाहॉकाबानासुना नंतर आगामी म्हणून तशी त्या पुस्तकात  नोंदही होती पण अडाहॉकाबानासुनात घातलेले पैसेही निघाले नाहीत आणि प्लॅन बारगळला माझे सर्वच साहित्य पडून राहिले आणि मराठीतील एक अनावश्यक लेखक हे बिरुद माथी लागले असो

खरेतर ह्या चिन्हकीचा उपयोग काय असाच प्रश्न मला पडलेला असतो जिथे गंगाधर पाटलांचीच पत्रास मराठीनं ठेवली नाही तिथं माझ्यासारख्या ह्या क्षेत्रात अकादमीक बैठक नसलेल्या भुरट्या असणाऱ्या माणसाची लायकी ते काय ?

चिन्हे ही आपली त्वचा आहे कि मेंदू हा आजच्या युगाचा खरा सवाल आहे मिडीयम मेसेज देतं कि मेसेज मिडीयम निर्माण करतो ? चिन्ह आपण बनवतो कि चिन्ह आपल्याला बनवतात ? आपण चिन्हांचा फक्त बनाव आहोत काय ? अस्तित्व नावाची गोष्ट खरोखर असते का कि ती चिन्हांनी तयार केलेली थाप आहे ? चिन्ह सत्यात असतात कि सत्य चिन्हात असतात ? चिन्ह विचलित झाल्यावर सत्य  विचलित होते काय ? आपण आपल्या आयुष्यातील सर्वच सत्ये मीडियाकडून भाड्याने घेतो काय ? पृथ्वी ही फक्त लोकेशन असून आपण तिचे फक्त युनिट मेंबर आहोत का ? राष्ट्रे म्हणजे शेवटी प्रॉडक्शन हाउसेस का ?भारत राजश्री प्रॉडक्शन हाऊस आहे काय ? श्रीमंताकडची चिन्हेही श्रीमंत असतात काय आणि गरिबाघरची गरीब ? बाळासाहेब ठाकरे चिन्ह कि माणूस कि एखादी व्यक्ती हयात असे तोवर माणूस आणि नंतर चिन्ह ? बॉम्बेचे नाव मुंबई ठेवले तर खरोखर काय होणार ? नामांतराच्या चळवळी ह्या फक्त चिन्हांतराच्या चळवळी आहेत का ? मोक्ष हा मीडियाच्याविरुद्धचा शेवटचा डिफेन्स आहे का ? सिविल डिसॉबिडियन्सच्या धर्तीवर मीडिया डिसोबिनियन्स चळवळ उभा करता येणे शक्य आहे का ? ज्यांना टेकनॉलॉजी कळत नाही तेच नैतिकतेच्या आणि धर्माच्या चर्चा अधिक करतात काय ? चिन्ह हे बैलगाडीचे चाक आहे कि अख्खी बैलगाडी आहे कि बैल आहे ? रहस्यांचा काळाबाजार गॉसीप्स निर्माण करतो काय ? मीडियापासून जो आपली रहस्य वाचवतो तो पॉलिटिशियन अशी व्याख्या करता येईल का ? न्यायव्यवस्था चिन्हव्यवस्था वाचते काय ? गरजा इन्व्हेन्शन्स स्पॉन्सर करतात कि इन्व्हेन्शन्स गरजा तयार करतात ? कार ही गॉसिप्सची बेडरूम असेल तर बेडरूम शरीरातल्या सेक्सकारची ड्रायवर आहे का ? मेंदू टीव्हीत सकाळी अंघोळ का करतो ? जाहिरात कंपन्या जाहिरातीसाठी रोज नवा प्रोडक्ट शोधतात कि प्रोडक्ट स्वतःसाठी जाहिरात कम्पन्या शोधतात ? संस्कृतीत घर महत्वाचे कि रस्ते ? धर्माचे सांस्कृतिक योगदान हा फुगा कोणी सोडला कसा सोडला आणि उडणारे त्या फुग्याला घट्ट कसे धरून ठेवतात ? फुगे फुटू न देता त्यांना घट्ट धरून ठेवण्याची युक्ती भारतीयांना नेमकी कशी साधते ? अर्थशास्त्र आज असते तर राजकारण का मग कालचे असते आणि कधी कधी प्राचीन काळचे ? इतिहास दंतकथा रिप्ले करत असेल तर परंपरा कशी फॉरवर्ड होणार ? इनपुट आणि आउटपुट ह्यांच्यात फरक का पडतो ? मी बोलतो तेव्हा माणूस असतो कि चिन्ह असतो कि चिन्हमाणूस असतो ? चिन्हमाणूस किंगडम ऍनिमेलियात मोडतो कि नाही कि त्याच्यासाठी प्राणिशास्त्रात वेगळे किंग्डम निर्माण करावे लागेल ?

हे माझ्या युगाचे प्रश्न आहेत आणि त्यांची चर्चा ही चिन्ह ह्या मूलभूत गोष्टीवर अवलंबून आहे आणि ह्या चिन्हांची सांगोपांग मीमांसा आणि चर्चा म्हणजे चिन्हकी

गर्रमागरमी भडका निर्माण करण्यासाठी नसते तर बॅटरी रिचार्ज करण्यासाठी असते

दोन चिन्हांच्या दरम्यान नेहमीच एक मिस्सीन्ग लिंक असते म्हणूनच संहिता खुल्या राहतात हीही संहिता अपवाद नसणारच त्यामुळे तिने निर्माण केलेले प्रश्न महत्वाचे ! तुम्ही विचाराल कि उत्तरे माहित नसतांना पुस्तक लिहायचेच कशाला ? तर मी प्रश्न विचारतो

मी प्रश्न विचारतो कारण फक्त प्रश्नच कन्विन्सिंगली विचारता येतात उत्तरे नेहमी चाचरत येत असतात आणि जी उत्तरे चाचरत येत नाहीत ती चुकीची असतात 

असो वाघांच्या आग्रहाखातर ही अत्यंत क्लिष्ट असलेली गोष्ट बाहेर काढतोय . ह्याचे पुस्तक निघाले तर ते कोणाला अर्पण करायचे हे मला स्पष्ट होते पुस्तक निघणे  आता शक्य नाही म्हणून अर्पणपत्रिका इथेच देतोय

प्रिय गंगाधर पाटील सर
मराठीत तुम्ही सुरु केलेलं चिन्हमीमांसेचं  मार्गीवादी बांधकाम
आजही माझ्या प्रेमाचा विषय आहे

मी तुमचा विध्यार्थी नाही ह्याची मला कायमच हळहळ वाटली
पण कधीकधी प्रत्यक्ष द्रोणाचार्यांपेक्षा
चिन्हीय मातीचा द्रोणाचार्य हा अधिक परवडतो
कारण त्याला जात नसते वर्ण नसतो
आणि मुख्य म्हणजे तो अंगठा मागत नाही

सआदर तुम्हालाच
अंगठा शाबूत ठेऊन

श्रीधर

(क्रमशः )

Monday, August 20, 2018

ऐंशोत्तर कालखंड आणि माझी गझल

प्रत्येक कवी त्याच्या कालखंडात आणि अवकाशखंडात लिहीत असतो अपवाद काही अतिशहाणे अतिमहान रोमँटिक कवी ते काहीतरी कालातीत आणि अवकाशातित लिहीत असतात अनेकदा एखादा फॉर्म एखाद्या कालखंडात आपल्याला ग्रासून टाकत असतो आणि नंतर त्याची पकड ढिली होत जाते गझलेबाबत माझे असे झाले आहे अर्थात काही लोक आयुष्यभर एकच फॉर्म मुख्य फॉर्म म्हणून वापरतात आणि अनुषंगिक फॉर्म अपवादात्मक वापरत राहतात अपवादात्मक वेळा असेही होते कि एखाद्या कविला एखादे वृत्त मुख्य फॉर्म वाटते म्हणजे मर्ढेकरांना ओवी अभंग हे फॉर्म आणि नंतर पादाकुलक हे वृत्त मुख्य वाटलेले दिसते

आम्ही ज्या कालखंडात लिहायला सुरवात केली त्या कालखंडात मुक्तछंद हाच फॉर्म मुख्य फॉर्म म्हणून प्रचलित झाला होता आणि जणू ह्याला टक्कर द्यायला म्हणून गझल अवतरली हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील संगीताचे व गीतसंस्कृतीचे ह्या काळात इतके अधःपतन झाले होते कि मध्यमजन व बहुजन संस्कृती ह्या काळात गझलेकडे वळली आणि त्या प्रभावाखाली आमच्यासारखे नवागतही ! हा कालखंड गुलाम अली जगजितसिंग मेहंदी हसन ह्यांनी गजबजून गेला होता आणि त्यांनी जनमानसाची चांगल्या गीतकारीची भूक भागवायला सुरवात केली होती अगदी कॉलेजमध्येही ह्या काळात बॉलीवूड म्युझिक इतकीच चर्चा गझलांच्या आलबम्सची असायची नवीन कुणाची कॅसेट आली कि उड्या पडायच्या नव्वदनंतर ए आर रेहमानने हा माहोल बदलला आणि लोक पुन्हा बॉलीवूड म्युझिककडे वळले आज अवस्था अशी आहे कि भारतात लोकसंगीतात व मध्यमजन संगीतात  एक कालखंड गझलेने व्यापला होता ह्यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल इतके पबमय आपण झालो आहोत

साहजिकच ऐंशोत्तरी कालखंडातील अनेक कवी ह्या काळात गझल लिहिताना दिसतात अगदी दशकांच्या कवितील अशोक बागवे हा सुद्धा गझलेकडे वळलेला दिसतो साहजिकच ह्या काळावर सुरेश भटांचा ठसा उमटणे अटळ होते अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले आमच्या कोल्हापूरच्या कवी ग्रुपमधील श्रीराम पचिंद्रे आणि नीता भिसे सुरेश भटांचे शिष्य झाले मी आणि राजकुमार यादव हिंदी कविता प्रचंड वाचत असल्याने आमच्यात भटांच्यापेक्षा नीरज , दुष्यन्तकुमार आणि प्रकाश पंडितांनी हिंदीत आणलेल्या उर्दू शायरांची चर्चा अधिक होती मला त्या काळातील माझ्या समकालीन लोकांच्यातील इलाही जमादार , म भा चव्हाण , प्रदीप निफाडकर ह्यांच्यातही थोडा रस होता तो नीता भिसेमुळे ! ती ह्यांच्यावर खूप पॉझिटिव्ह चर्चा करायची पुढे किशोर कदमच्या गझलाही मला जबरदस्त आवडायला लागल्या होत्या त्याला खाजगीत तू गझल सोडू नकोस हे मी कित्येकदा सांगितले आहे त्याने सातत्याने गझल लिहिली असती तर मराठीत सानेकर सौमित्र अशी जोडगळीच दिसली असती असो

आज जेव्हा ह्या कालखंडाकडे मी बघतो तेव्हा मला एकच प्रश्न पडतो तो म्हणजे आम्ही सर्वांनी ह्या १९८० ते १९८७ ह्या कालखंडाला आपल्या गझलेत न्याय दिला का ?माझे समकालीन गझलकार पुढील कालखंडातही गझल मुख्य फॉर्म म्हणून हाताळताना दिसतात पण त्यांच्या त्या त्या  कालखन्डातल्या गझला त्या त्या  कालखंडाला न्याय देतात काय ?

गझलेवर रोमँटिसिझम कायमच दबाव टाकून आहे अगदी सानेकरांसारखा गझलकारही ह्यातून सुटलेला दिसत नाही मग इतरांची तर गोष्टच सोडा त्यामुळे भावनाबंबाळपणा हे गझलेचे मुख्य भागधेय आहे कि काय असाही प्रश्न पडतो १९९० नंतर जिला आंबेडकरवादी गझल म्हणता येईल अशी गझल आली पण तिलाही भावनाबंबाळतेला छेद देता आलेला नाही असे दिसते मला स्वतःला बुद्धी भाव आणि कल्पना ह्या तिन्ही आयामांविषयी सारखेच अगत्य आहे नुसता भावनाबंबाळपणा जितका गझलेला घातक तितकाच नुसता बुद्धिबम्बाळपणा आणि कल्पनाबंबाळपणाही घातक ! मी स्वतः भावप्रधान , बुद्धिप्रधान आणि कल्पनाप्रधान असे तिन्ही प्रकारचे शेर लिहित होतो

उदाहरणार्थ ह्या सगळ्या कालखंडात अचानक भारतात व एकंदरच आशियात धर्माने कमबॅक केले पण आपण ह्या कालखंडात सेक्युलॅरिझमच्या आधुनिक चिपळ्या वाजवण्याखेरीज काय केले? वास्तविक पारंपरिक धर्माविरुद्ध थेट लढणं ह्या काळात आवश्यक होतं ही लढाई आपण लढलो का आपल्या डोळ्यादेखत भाजप मोठा होत गेला आपणापैकी किती जणांनी त्याची बाजू घेतली किंवा त्याला ठाम विरोध केला ? काळ रामाकडे आणि इस्लामिक राजवटीकडे सरकत असताना आपण विठ्ठलाच्या पायरीत नको तितके अडकून पडलो नाही काय ?मी माझ्या गझलांतून पारंपरिक धर्मांना कडक विरोध केला आहे आणि ठामपणे ईश्वर नाकारला आहे त्यामुळे मी हे म्हणू शकतो शाहबानो प्रकरणामुळे इस्लाम कट्टरतावाद समोरच अवतरत असताना आपण इस्लामला प्रश्नच विचारले नाहीत जे विचारणे गझलेतून सहज शक्य होते  माझ्या मराठी विशेषतः हिंदी गझलेतून मी असे प्रश्न विचारलेले आहेत म्हणून हे सांगतोय


उदाहरणार्थ
जग फाट्यावर मारता आले पाहिजे 
समाजाबाहेर वावरता आले पाहिजे 

ये फाडून पडदे म्हणू देत त्यांना

''पाहून पुरुष तुला बावरता आले पाहिजे ''  

किंवा 

ना दुःख आहे ना तुष्टी आहे 
मी नाही फक्त समष्टी आहे

ज्यांना गणपतीसारखे स्व विसर्जित करता आले

 ते सांगतात कि आज त्यांची संकष्टी आहे 

किंवा 

थोडे वेगळे थोडे चूकीचे अन बाकीचे रुटीन आहे 
इथे तिथे प्लेसलेले अवयव वेढणारी एकच स्कीन आहे 

कयामतदिवशी त्या अल्लाहशी माझी डेट जर फिक्स आहे 
कशास लांबड लांबवलेली आणि कोण मारते पीन आहे 

किंवा 

नही जाऊंगा हज  करने तेरे काबामें  मेरे दोस्त 
वहाँ के पत्थर मे खुदा है तो यहाँ के पत्थर मे खुदा नही है ?

उसके मर्जी के बगैर यहाँ पेड़ का पत्ता भी नही हिलता 
कुरानके पत्तेमे खुदा है तो आगमके किताबमे खुदा नहीं है ?

तू क्या समझेगा मेरी इबादत तू तो  मगन है ढकोसलो मे 
तेरी इबादत मे खुदा है और मेरी इबादत में खुदा नही है ?

मै नही पहनुँगा कोई बुरखा कोई हिजाब मेरी औरतको 
तेरी औरतमे खुदा है और मेरी औरतमे खुदा नहीं है ?

वो कोनसी है जगह जहाँमें जिस जगहमे खुदा नहीं है ?
तेरी हस्तीमे खुदा है मौजूद और मेरी वजूदमे खुदा नही है

तेरा पैगम्बर आखरी होगा मेरा पैगम्बर आखरी नही
तेरे कलके पैगम्बरमे खुदा है मेरे आजके पैगम्बरमे खुदा नही है ?


किंवा 
हर शख्स यहाँ अपनी शख्सीयत ढूँढ रहा है 
    अन्दरसे खोखला है  तो बाहर ढूँढ रहा है 

  जिन्दगी खुद यहाँ बिना मकसद चल रही है 
     इन्सानही उसके  चलनेका  मकसद ढूंढ रहा है 

 उसने कहाँ एक पेड़ भेजा उसने पूरा जंगल भेजा 
     तू फर्नीचरवाला है सरफेस ढूँढ़ रहा है 

 पयम्बरकी कोशीश थी  इन्सानियतको चेहरा मिले 
    और तू है कि मेरे हिजाबमे इस्लाम ढूँढ़ रहा है 

 मैं  सिर्फ खुदाकी  हूँ और किसीकी हूँ नही 
    तू क्यूँ शरीयतमें   मेरी इबादत ढूँढ़ रहा है 

. खुदा है थोड़ेही किसी किताबमें समां जायेगा  
   वो किताब के बाहर मुन्तजीर और तू किताबमे इंतजार कर रहा हैं

किंवा 
एका रावणवाद्याची गझल

मी उभा रावणाच्या बाजूने आहे 
रामायणात लिहिले जे  ते सर्व खोटे  आहे 

शूपर्णखा  खरोखरची प्रेमात होती 
प्रेम  कळणाऱ्यांनी  नाक कापले आहे 

रामाचा कोठे सीतेवरती विश्वास होता 
ती ढळणार नाही रावणाने  जाणले आहे 

हारले त्यांची सभ्यता वाईट होत जाते 
जे जिंकले आहे त्यांचे सर्व चांगले आहे 

तुम्ही जाळा  रावण लोकांच्या डोळ्यादेखत 
रामभक्तांनी नेहमीच लोकांस गंडवले आहे 

हारलो आहे तरी पुन्हा उभा राहीन मी 
जरी माझे अद्याप रक्त मेलेले  आहे 

वर्णण्यवस्था स्थिर करून राम मेला 
जे वर्णण्यवस्थेविरुध्द ते रामाविरुध्द ठाकले आहे 

 किंवा 

ये हिन्दू मुस्लिमोंके झगड़े मेरी समझमे नहीं आते 
ये दंगाफसाद और लफड़े मेरी समझमे नहीं आते 

तेरी किताब खुदाने पैदा की तो मेरी क्यां शैतानने की ?
किताबको लेकर हुए बखेड़े मेरी समझमे नहीं आते 

तू और मैं दंगा नही चाहते फिर दंगा चाहता हैं कौन 
तलवारके नोंकपे झमेले खड़े मेरी समझमे नहीं आते 

हम सब एकही खुदाके बन्दे हैं और  कुछ नहीं 
बाकी  दावे बड़े बड़े  मेरी समझमे नहीं आते 

किसने लिखा क्यूँ लिखा '' जाओ मजहबकेलिये मुफ्त मरो ''
एक किताबकेलिये जो हैं लड़े मेरी समझमे नहीं आते 

ईसाई ज्यु बौद्ध हिन्दू सब तो तुम्हारेलिये काफिर थे 
वे क्यूँ आगे गये  तुम पिछड़े मेरी समझमे नहीं आते 

किंवा 
खूबसूरतसा दिलासा देगा
वोभी आखिरमे धोखा देगा

किसके बहकावेमें फँसा तू
खुद उलझा वो क्या सुलझा देगा

उसे सचका पता नहीं
झूठोँका सिलसिला देगा

खुदाने तुझे क्या दिया
और ये फ़रिश्ताभी क्या देगा

जो अभी कुछ कर पाया हो
वो क्या क़यामतमें  सजा देगा
किंवा 
मैंने जो कुछभी कर्म किया उसका तुभी हिस्सेदार हैं 
या फिर तक़दीर तूने ना लिखी और मैं गुनाहगार हैं 

मुझे नहीं आना हैं तेरे आरपारके ढकोसलेमे 
तुंही अगर आर हैं तो तूही मेरा पार हैं 

या तो हर कोई प्रॉफेट हैं या कोईभी यहाँ प्रॉफेट नहीं 
तू बन्दोमे क्यूँ फर्क करेगा गर हर बन्दा तेरा व्यापार हैं 

 क्यूँ जाऊ किसी किताबके पास क्यूँ सुनु मैं किसी पंडितकी 
जहाँ जाऊ वहाँ तू गाईड आखिर तेरा सारा सँसार हैं 

मैं नहीं मानता कोई शरीयत मैं नही मानता कोई बादशाह 
जहाँ जाऊ वहाँ तेरा किंगडम जो भी हैं तेरा कारोबार हैं 

श्रीधऱने  तो ईश्वरके अलावा किसी चीजको माना नहीँ 
फिर कैसे वो काफिर हुआ  फिर कैसे वो गुनाहगार हैं 
किंवा 
 इंसानपे भरोसा करनेकेसीवा तेरे पास कोई चारा नहीं 
यकीन कर तू इस जमींपे कोई  अब रहता खुदा नहीं 

असो 

१९ व्या शतकात दाग अथवा गालिब जेवढे  क्रांतिकारक होते  तेवढेही आपण झालो नाही मग आपण गमज्या कशाच्या मारतोय ? सुफियानामुळे इस्लाम सौम्य होईल ही मध्ययुगीन आशाच आपण अडाणीपणाने गिरवत बसलो नाही काय ? कवींची एक सामाजिक जबाबदारी असते असे मी मानतो ती जबाबदारी कुणी लादलेली असत नाही तर त्याच्या संवेदनशीलतेची ती अपरिहार्य परिणीती असते आपण ही जबाबदारी निभावली काय ?

जातीवाद  हाही ह्या कालखंडात पोलिटिकल व्होटिंग बँकेच्या परिणामस्वरूपी अवतरला पुढे मंडल आयोगामुळे ह्या कालखंडानंतर तो मुख्य झाला ऎशोत्तर वा  नव्वोदत्तर गझलेत तो कितपत आला ? आपण फार भाबडे तर झालेलो नाही ना ? कि कवी म्हणून आपण साफ साफ च्यु आहोत ?

गझलेत कालखंडाचा विचारच होत नाहीये म्हणून मी माझे म्हणणे इथे मांडतोय गझलेची समीक्षा हीही अनेकदा रोमँटिसिझमपुढे दम तोडते हा माझा अनुभव आहे म्हणून हे लिहितो आहे बाकी ज्याची त्याची मर्जी ज्याची त्याची गझल !

श्रीधर तिळवे नाईक