Tuesday, August 8, 2017

बांधकाम चालू आहे ह्या कवितेला प्रकाशित होऊन २१ वर्षे होतायत असे सुधीर देवरे ह्यांनी लक्ष्यात आणून दिले त्याबद्दल प्रथम त्यांचे आभार मानतो
 ह्या कवितेने त्यावेळी  भरपूर वाद निर्माण केला
ह्या कवितेमुळे मी काय कमवले तर चौथी नवता लोकांच्यात काही प्रमाणात पोहचली अभिधाचे नाव झाले . मंगेश बनसोड , अभिजित देशपांडे , महेश म्हात्रे ह्यांच्याशी असलेली मैत्री आधिक घट्ट झाली , दिलीप चित्रे , आदिल जसावाला अ . शहा , संदेश भंडारे एस कापूसकर  ह्यांच्याशी तात्पुरता वैयक्तिक परिचय झाला . मला धर्म ही कादंबरी सुचली आणि बांधकाम चालू आहे हा काव्यसंग्रह निर्माण झाला
मी काय गमावले तर ज्ञ ला मी गमावले आणि माझ्या पाठीत  काही सुरे जमा झाले ते अलीकडे सर्वच गळून पडल्याने गळून पडले हेमंत दिवटेशी असलेली घनदाट मैत्री तुटली स्मृती दिवटे सारखी मानलेली बहीण कायमची दूर गेली माझ्या पी एच डी चा प्रबंध पाण्यात गेला आणि पाच वर्षाची मेहनतही ! काही कविता मिळाल्या पण काही कविता कायमच्या नाहीश्या झाल्या. अडा हॉ कॉ बा ना सु ना प्रकाशित करण्याबाबतचा माझा उत्साह पूर्ण मावळला , साहित्यक्षेत्रात काही लोकांनी अस्पृश्याचा दर्जा कायमस्वरूपी दिला आणि अभिधाशी माझे असलेले नाते पातळ झाले आणि सौष्ठव पुन्हा सुरु करावे लागले

ह्याचा माझ्या साधनेला मात्र प्रचंड फायदा झाला मुख्य म्हणजे तंत्र मार्गातून ज्ञ गेल्याने कायमचा मुक्त झालो आणि काही माणसांच्यामुळे ओशो हा माणूस किती बंडलबाज होता  ते कळले एक साधक म्हणून त्यामुळे ह्या कवितेचा मी ऋणी आहे

काही लोकांच्या आणि मित्रांच्या खास आग्रहावरून  ही  एकेकाळी गाजलेली कविता इथे  देतो आहे ह्या कवितेला प्रकाशित होऊन ह्या ऑगस्टला  २१ वर्षे होतायत त्यानिमित्ताने 

 बांधकाम चालू आहे श्रीधर तिळवे नाईक    (उत्तरार्ध)
।। १।।
बांधकाम चालू आहे 

चालू आहे बांधकाम 
सकाम आणि निष्काम 
आता सर्वत्र शिरा आणि धमन्या 
उथळ रक्ताचा बोथट  खळखळाट - हृदयाचा अभाव 

सर्वत्र संगणकांचे फिरते कीबोर्ड 
हातांच्या बदल्या प्रोग्रॅमचे सरकते कायापालट 

अंतिम काही नाही 
स्थिर काही नाही 
सत्य काही नाही 

केवळ बदलती मयभया आणि तिच्या उठाबश्या 

बदलाची शिक्षा सोसत बिल्डिंगांची मोड्यूलेशन्स 
काम संपताच फेकून दिलेल्या डिस्पोजेबल रिव्होल्यूशन्स 

माणसं झाडात जातात 
झाडं माणसात नाहीत 
अशी ही प्रगतीची एकतर्फी वाहतूक 
मुसाफिरा 
हे सारं वगळून तू कुठं जाणार निर्हेतूक 

सर्वत्र माणसांचे अमानुष आरसे 
सर्वत्र पडणारे तुझेच प्रतिबिंब   

।। ।।
तू नव्हतास होती मयसभा
तू आहेस आहे मयसभा
तू नसशील असेल मयसभा

तिच्या बदलत्या अंगात मृत्यूचा संभोग
तिच्या चंचल ढंगात चिन्हांचा कायापालट
तिच्या सरकत्या लेहंग्यात आयुष्याची खसखस

तू तर केवळ भटकभवाना व्हायरस

मुंगीइतकेही नाही स्टेबल  तुझे टाईमटेबल 
उंदराइतकेही सेटल नाही तुझे बीळ


नश्वर लॅबोरेटरीजना चकवा देत
कितीकाळ राहशील नॉनप्रायोगिक
कुठे बांधशील सूक्ष्म घर तुझे
त्यांचे मायक्रोस्कोपिक उन्हं टाळून

मुसाफिरा ,
तू म्हणजे
मायसभेचा अनंत बांधकामात
मोड्युलर भिंतीला होणारी सेल्युलर लघवी
चंचल आणि लाघवी
लवचिक आणि चकवी

।। ।।
विरचित कर अहंकार
मायसभेच्या  अनियमित फैलावात
भरून घे एक श्वास
शांतपणे मरून जा

आपटू नकोस भिंतीवर हात
वाजणार नाही बांधकामातून कसलीच टाळी
नेसवू नकोस गतीला तुझी त्वचा
मोबाईल स्तनांना पुरणार नाही तिची काचोळी

उत्क्रांतीचे हरवलेले दुधाचे दात
शोधू नकोस आत

फक्त
जे सतत फिरतं आहे
ते वाहतं ठेव
आणि
देहाएवढा श्वास घेऊन
जा मरून उडी मारून

अर्थाच्या पलीकडे
अर्थाच्या अलीकडून

।। ।।

ही कुठली  आदिककथा तुझ्या टीव्ही स्क्रीनवर?
हे कुठले अँटिक कावळे तुझ्या घराच्या अन्टेनावर?

कोण राम कोण सीता
कोण कृष्ण कुठली गीता

कोणी पाठवले भूतकाळ तुझ्या व्हिज्युअल वॉशिंगमशीनमध्ये
कोणी वाळत घातले अँटिक चेहरे तुझ्या दोरीवर हँगर लावून


मुसाफिरा
म्युटेशन आणि इव्होल्यूशन
यांना पार करून पोहचतात
इतिहासाच्या कायनेटिक होंडा वर्तमानात

पोटॅन्शियल गोंडा घोळवत
घालतात गंडा
स्मृतिखंडाच्या संगणकीय मनात

त्यातून जो पसारा वाचतो
त्यात असते फॅन्टसीचे सॉस
मॅजिकचे बटर
आणि प्रत्येक क्षणी सिरियलचे सँडविच संपवत
देत जातो आपण सांस्कृतिक ढेकर

।। ।।

प्रत्येक बाई असते पोटॅन्शियल आई
प्रत्येक मुल असते वाट चुकलेला कंडोम

संभोगातील आनंद झाले स्वीच ऑफ
की पुनरुत्पादनाचे स्विच होतात ऑन

फ्रिजनंतरही उरतो अंगात बोअरडमचा शिळा रगाडा
फॅननंतरही उरतो गर्भाशयात वांझपणाचा संपृक्त उकाडा
टीव्हीनंतरही उरतो डोळ्यात अमूर्ततेचा गूढ डार्कनेस
टेपरेकॉर्डरनंतरही उरतात कानात रिकाम्या कॅसेट्स कॉर्डलेस

जेव्हा सारेच फर्निचर होते स्थिर
तेव्हा चेंज म्हणून प्रसवले जाते गतिशील मूल

रेंज बघून आखला जातो बाळंपणाचा एपिसोड

फिल घेत आईपणाचा
सांडले जाते थ्रिल
आणि एकेक सील खोलत
वाढवले जातात तपशील

म्हणूनच मुसाफिरा 

कोणत्याही हॉस्पिटलात
बाईच्या गर्भाशयात राहू नकोस उभा
काहीच जन्माला घालणारा
जप तुझ्या सवतासुभा

।। ।।

मुलांनो,
टीव्हीमध्येच मांडा तुम्ही आता तुमचे गोकुळ
कम्प्युटरमध्येच सांडा तुमच्या ह्या बाळलिलांचे कूळ

खेळणी म्हणून आणा
डायनॉसॉर आणि रिडल्स
मशिनगन आणि नूडल्स

नेटप्रॅक्टिस करा घरातल्या डासांबरोबर
रॅकेटसारख्या पेला गुडनाईटच्या कॉईल्स
आतापासूनच घाला बॉडीत पेनकिलरच्या टाईल्स

आणि
किलर  इंस्टिंक्ट  जोपासत
सुरक्षित ठेवा तुमच्या कुंड्या

तुमच्या मांड्या ऑटोमॅटिक होवोत
तुमची वाढ ऑटोमॅटिक घडो

।। ।।

शिस्नाच्या  नळात वीर्याचा सप्लाय
कुठली  म्युनिसिपालटी सोडते कोणास ठाऊक ?

मेन्स्ट्रुएशन  सायकलमध्ये संभोगाच्या बायसिकल्स
कुठली टीम चालवते कुणास ठाऊक ?

पोरपोरी एकमेकांस पाहतात
एकमेकांत वाहतात

मुसाफिर
वैश्विक ब्लुफिल्मच्या
अर्धनारीनटेश्वर पोझमध्ये
नारी निळी
की नटेश्वर निळा ?

सर्वत्र गोंधळ  सावळा
निस्तरू नकोस

एकमेकांवर हल्ले
एकमेकांवर डल्ले
एकमेकांचे गल्ले
एकमेकांत

शरीरापासून सुरुवात शरीरामध्ये शेवट
संभोगानंतर उरतात एकमेकांविरुद्धचे कट

रक्ताची हॉट कॉफी होते
रक्तात कोल्ड ड्रिंक
कंडोमच्या पिंकदाणीत
वीर्याची नपुंसक पिंक

।। ।।
मुसाफिरा
कुठेही न्हे तुझ्या आयुष्याच्या पालख्या
मल्टीनॅशनल्स सुसज्जच आहेत
सर्वत्रच दुर्गेसारख्या

सर्वत्र त्यांचीच कंस्ट्रक्शन्स
सर्वत्र त्यांचाच इंस्ट्रक्शन्स
त्यांच्या एकेका कमर्शिअलचे
तुझ्याच गळ्याभोवती कॉन्सेन्ट्रेशन

त्यांना तुझा देह हवा

ओठ हवेत लिपस्टिकसाठी
त्वचा हवी साबणाकरता
मनगट हवे घड्याळासाठी
पाय हवेत बुटाकरिता
अंग हवे कपड्यासाठी
डोळे हवेत टिव्हीकरता
नाक हवे परफ्युमसाठी 
कान हवेत  कॅसेटकरता

तूच त्यांचा कर्तासवरता

दे हफ्त्याहफ्त्याने त्यांना तुझा देह

टोचून घे त्यांच्या उत्पादनाचे ग्लुकोज तुझ्या देहात
आजारी पडशील तेव्हा
फीड कर त्यांच्या पिल्स तुझ्या देहाला
आणि आरोग्याची फ्लॉपी 
बडवत रहा
हॉस्पिटलच्या कम्प्युटरमध्ये

हफ्ताहफ्त्याने स्वतःचा बळी दे
हफ्ताहफ्त्याने नाहीसा हो

।। ।।
ईश्वर असेल अगर नसेल
ईश्वराच्याच शोधात इथले पवित्रे
शिर्डीला लाभते नवसाचे मंदिर
पंढरपूरच्या टाळक्यावरून  जेव्हा उडून जातात पत्रे

विठ्ठलाला रिप्लेस करतो साईबाबांचा चमत्कार
रुक्मिणीची सीट होते कॅन्सल काळात
कित्येक  तुकाराम उडून  जातात म्हातारीसारखे
कित्तेक ज्ञानेश्वर गायब होतात तृष्णांच्या बोळात

भक्तांच्या दिंड्या नवसात चमकतात
पालख्यांच्या मोबव्हिलरमध्ये नवे किलर मिरवतात
विठ्ठल ब्लॅक रुक्मिणी व्हाईट
इस्टमनकलर भक्तीमध्ये ब्लॅक अँड व्हाईट वैकुंठ जिरवतात

।। १० ।।
कुठून उगवत राहते ही क्रियांची क्रिएटिव्हिटी
प्रत्येक ऍक्शनला कशी प्राप्त होते स्वतःची आयडेंटिटी

विज्ञान आणि कला
आयडेंटिकल ट्वीन्स मध्ये  फिल्मी फारकत
पॉलिटिकल व्हिलनला पॉवरची बरकत

एकेक हरकत उत्पादन
एकेक कसरत वितरण

मार्केटच्या चढउतारावर तुझे हायकिंग अवलंबून
इम्पोर्ट एक्सपोर्ट बॅलन्सेसवर तुझे सायलेन्स विसंबून

काहीही निर्माण कर
काहीही जन्मास घाल
तुझ्या एकेक निर्मितीला
खाऊन टाकेल इथली पाल

।। ११ ।।
तू कोण आहेस
तू आलास कोठून
तू जाणार कोठे

विश्व काय आहे
विश्व आले कोठून
विश्व जाणार कोठे

समाज काय आहे
समाज आला कोठून
समाज जाणार कोठे

सारेच व्हर्टिकल प्रश्न आता लॅटरल
सारीच आर्टिफॅक्टस आता नॅचरल

ईश्वर नाही
ईश्वराखाली अवतार नाही
अवताराखाली ग्रंथ नाही
ग्रंथाखाली पुरोहित नाही

मालक नाही
मालकाखाली मॅनेजर नाही
मॅनेजरखाली सुपरवाईजर नाही
सुपरवाईजरखाली वर्कर नाही

सारेच पिरॅमिड आता ट्रान्सवाईज हॉटेली सेवा
सारीच शिखरे आता ऑटोमॅनेज्ड मैदानी मेवा

कसा टिकणार तुझ्या केंद्रशोधक हायकिंगचा चाव
सर्वातच जॉगिंग आणि सपाटीमध्ये धाव

सारेच नॉलेज शूट करणाऱ्या काळात
कशी टाळणार तू सिनेमॅटिक गन
कसे टाळणार ऑटोमॅटिक ज्ञानाचे स्फोट
ज्ञानाचे तरंग आणि ज्ञानाचे कण

तू एक कविता लिहितोस
एक झाड नाहीसे होते
तू एक पुस्तक छापून घेतोस
एक अरण्य गायब होते

तुझ्याही ज्ञानाची गोळी त्याच्या छातीत
ज्या गोळ्यांनी पडलाय निसर्ग उताणा
कुणाच्या नावाने ठोकणार बोंब
कुणाच्या नावाने करणार ठणाणा

ज्ञानाआधी ज्ञान
ज्ञानामध्ये ज्ञान
ज्ञानानंतर ज्ञान

स्फोटावरती चिन्हांच्या मुकाट्याने हो तू स्वार
कुणाचा कुठे कंट्रोल नाही ह्या चक्राला ना केंद्र ना आकार

फक्त फिल्मात फिरत राह शोधू नको कशाचाच उगम
मृत्यूचा शॉट येईपर्यंत आनंदित ठेव तुझा दम

।। १२ ।।
सायकल स्कुटर बुलेट होंडा
बंदूक पिस्तूल स्टेनगन मशिनगन
फौंटन बॉल जॉटर जेटर
मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेकट्रोनिक सॉफ्टवेअर

झिगझॅग  रेषेत उडणारे वैज्ञानिक ससे
शर्यत सोसत धावणारे मेंदूचे कासव

सर्वत्र अगणित साउंडट्रॅकसचा मळा
आणि तुझ्याजवळ तुझा एकुलता एक गळा

मुसाफिरा,
कशा साधशील कोकीळवेळा
ह्या पोस्टइंडस्ट्रियल वसंतात

ह्या फांदीवर बहर त्या फांदीवर पानगळती
ह्या पानामध्ये रॉक त्या पानात शास्त्रीय संगीत

कुठल्याही झाडावर कुठलेही ऋतू कितीही ऋतू कसेही ऋतू

शरीराच्या  हवामानाचे बदलते अंदाज
आणि
सर्वत्र वाजणारा पाण्याचा सिंथेसाईजर

समुद्रात केले जातील मॅनेज पावसाळे
तिथे तुझ्या आसवांना कसली येईल किंमत

HO च्याच परिभाषेत पाणी आणि बर्फ
वाफ आणि  बिसलरी
तिथे तुझ्या बासरीत कसे वाजेल दुःख
कोण जाईल मुळाशी

साऱ्याच बुध्यांच्या तळाशी आता केवळ वेटिंगरूम
ट्रेनचे टाईमटेबल वाचण्यासाठी तिसऱ्या डोळ्यात एक झूम

।। १३ ।।

गावातून शहरात आलास
शहरातून महानगरात
विखुरला देशादेशात
फांद्याफांद्यानी पसरलास

आकाशात टांगलेला हा उलटा अश्वत्थ
ह्या पारंबीवर रशियाचा उपग्रह
त्या पारंबीवर फ्रान्सचा
इथे सूर अमेरिकेचा
तिथे सूर जर्मनीचा

सुरपारब्यांचा हा अब्स्ट्रॅक्ट खेळ
प्रक्षेपणांचा हा फॉर्मलेस मेळ

कुठे सापडतील मुळे
तुझ्या ह्या वेताळी अवताराला
जिथे सारेच अमूर्त आहे
तिथे कसा येशील तू आकाराला

विक्रम साजऱ्या करणाऱ्या शेकडो गोष्टी तुझ्याजवळ
आणि तुला वाहून न्हेणारे हे वैज्ञानिक शतक
आध्यात्माचा राजहंस कधीचाच अडून गेलेला
तुझ्या काळजात उरलेले कलेचे बदक

तुझ्या साऱ्याच प्रश्नांची कम्प्युटराईज्ड उत्तरे
आणि उडून गेलेली तुझ्या गोष्टीतील अत्तरे

मुसाफिरा
गोष्टी संपून गेल्यावर
काढून घेतली जाईल तुझ्या वेताळपंचविशीची स्पॉन्सरशीप
आणि
लटकत राहशील तू प्रेताप्रमाणे ह्या आसमंती अश्वत्थाला
नव्या टाइमस्लॉटच्या प्रतिक्षेत सीप सीप सीप

।। १४ ।।
शॉवरमधून कोसळतो जो रिमझिम पाऊस
त्या पावसाळ्याचे मान आंघोळीनंतर आभार
गॅससिलेंडरमधून उगवतो जो अग्नीचा आशीर्वाद
त्या आगीला दे पोट भरून धन्यवाद
वायूचे अवयव जो मॅनेज करतो फॅन
त्या फॅनला जोडून घे आयुष्याचे श्वास

हे धातू हे लाकूड ह्या विटा हे कागद
हे सारेच पृथ्वीचे बदलणारे अभिनय
ह्या साऱ्यांनाच कर अवयव जोडून नमस्कार

हा टीव्ही हे कपडे हा फोन हे स्लीपर
ह्या साऱ्याच आकाशाच्या मूलभूत पाठराखणी
माहेर मानून त्यांना हो अंगभूत कृतज्ञ

चार भिंतीत घेत राहा पंचकमहाभूतांचा गुहागर फील
डायनिंग टेबलभवती गोळा कर तात्पुरत्या टोळीचे डिस्पोजेबल सभासद
कॅसेटच्या फिरतीवर थिरकत ठेव आदिवासी नाच

औद्योगिक अन्न संपेपर्यंत
प्रोजेक्टमध्ये कर काम
आणि गरज संपली की जा निघून

ह्या कंपनीतून त्या कंपनीत
ह्या डिपार्टमेंटमधून त्या डिपार्टमेंटमध्ये
ह्या शहरातून त्या शहरात
ह्या घरातून त्या घरात

मुसाफिरा
जिथे अवघी पृथ्वी फिरता रंगमंच आहे
तिथे तुला कोण देईल स्थिर भूमिका स्थिर संवाद

ह्या नाटकाला ना नायक
ना खलनायक
सारेच एकमेकांच्या भूमिकेत साहाय्यक
सारेच माहित नसलेल्या रोलचे लेखक

एकमेकास अनोळखी
एकमेकाला पूरक

।। १५ ।।
उजव्या हातात रम आणि व्हिस्की
डाव्या हातात हातभट्टी आणि उचकी

उजव्या जिभेत केक आणि वेफर
डाव्या जिभेत झुणका आणि भाकर

उजव्या हातात न्यूयॉर्क आणि सिंगापूर
डाव्या हातात शिर्डी आणि पंढरपूर

उजव्या मेंदूत कॉनव्हेंट आणि बी सी डी
डाव्या मेंदूत मराठी आणि

मुसाफिरा
परस्परविरोधात आता कोण करेल उठाव
कोण माजवेल बंड

दोन्ही हातांचा एकमेकांस अल्कोहोलिक शेकहॅण्ड
दोन्ही जिभांचा लागणारा एकमेकांस टाळा

दोन्ही पायात चाललेली तीन पायांची शर्यत
दोन्ही मेंदूत बौद्धिक संभोगाचे अद्वैत 

परस्परांना पडलेले परस्परांचे विळखे
परस्परांचे परस्परांत आळोखे आणि पिळोखे

मुसाफिरा
ह्या अद्वैती  आसमंतास
कोण मांडेल वर्ग
कोण सांडेल चळवळी
कोण करेल निग्रह

सर्वत्र आता एकच ग्रह

तेव्हा दे सोडून तुझा क्रांतीचा आग्रह

स्वतःमध्ये झाडू मारून
स्वतःपुरता स्वच्छ हो

समोर एक आरसा ठेव
स्वतःपुरता चेहरा जप
आरशामध्ये मांड देव
स्वतःमध्ये कर तप

।। १६ ।।
कलोनियल केशवसूत नॉनकलोनियल पुशि., ना. धों
ओझोनथराच्या भोकात धाड यांचे सर्व रोमॅन्टिक स्वर्ग
कलोनियल मर्ढेकर नॉनकलोनियल नेटिविस्ट
गार्बेजमध्ये फेकून दे यांचे पृथ्वीनर्काचे नेटवर्क

गांडीला पाय लावून पळून गेलेला ***
आणि कंडोम वाटत फिरणारी संभोगसुलभ ***

रिकाम्या झालेल्या विटेवर आता
कसा टेकेल तुझा ग्लोबल माथा
इंद्रायणीच्या नॉनरेसिडेन्शियल पाण्यावर
कशी तरंगती ठेवशील तुझी गाथा

कम्प्युटरमधील व्हायरससारखी तुझी ही कविता
तिला ना बाप ना आई
ना गणगोत ना पुण्याई

कुठेतरी फ्लॉपी  वाजते आणि ती जन्म घेते
कुठेतरी हालचाल होते आणि ती मरुन जाते

मुसाफिरा
आध्यात्मिक करमणुकीचा हा डिस्पोजेबल अवतार
करून धारण हो निर्विकार

।। १७ ।।
खंडाखंडात फुटला होतास
 पृथ्वीमध्ये एकसंध झालास

पृथ्वीमध्ये फोडला गेलास
मॅटरमध्ये एकसंध झालास

मॅटरमध्ये फोडला गेलास
मूलद्रव्यात वाटला गेलास

एटममध्ये सांधला गेलास
पार्टिकल्समध्ये वाटला गेलास

पार्टिकल्समध्ये संशयित झालास
तरंगामध्ये त्रिशंकू झालास
दोन्हीमध्ये एब्सर्ड झालास
अन आता 
क्वार्क्समध्ये पुन्हा एकसंध झालास

मुसाफिरा
कसे ऍडजस्ट करशील तुझ्या जिज्ञासेचे ओठ
कसे ऍडजस्ट करशील संभोगासाठी तुझ्या लॅबचे आसन
प्रत्येक क्षणी सरड्याचा बदलत रंग
प्रत्येक क्षणी सरड्याचे बदलणारे कुंपण

।। १८ ।।

शहरामागून पालथलीस शहरे
नोकऱ्यामागून नोकऱ्या
संसारामागून उलथलेस संसार
छोकऱ्यामागून छोकऱ्या

कित्येक आयुष्याच्या फोडल्यास खापऱ्या
कित्येकदा स्वतःचेच पाहिलेस खून
जेव्हा खुनाचे आरोप आले
झालास फरारी तेव्हा स्वतःतून

अंगावर आलेत कित्येक चार्जेस
कित्येक चार्जेस काढून घेतले गेले
मृत्यूच्या ठाण्यात झालास जिवंत
आयुष्यात तुझ्याच आयुष्य मेले

कित्येक कपडे आले आणि गेले
कित्येकदा साक्षात देह बदललास
कैकदा त्वचा आल्टर रफ़ू केल्यास
कैकदा प्लॅस्टिक सर्जरीने त्वचाच पालटल्यास

मुसाफिरा
एका अंड्यातून किती कोंबड्या उजवल्यास
मुसाफिरा
एका पेशीतून किती टेस्टट्यूबबेबीज प्रसवल्यास

।। १९ ।।
तीन तास सिनेमा भाड्याने घे
तीन तास टाईम पास कर
एक शरीर प्रेम बुचकळून टाक
एक शरीर एनर्जी पास कर
हजार फूट एसेलवर्ल्ड भाड्याने घे
हजार फूट स्पेस पास कर

जिथे आयुष्यच अवघे रिळासारखे होते पास
तिथे कोण तुला देईल स्थिरस्थावर विश्रांती
उपग्रहांच्या रहाटगाडग्यात कसा फिक्स राहील
तुझ्या करमणुकीचा दोर
कशी थांबवशील ही आयुष्याची भ्रमंती

तू एका ट्रेनमधून दुसऱ्या ट्रेनमध्ये
दुसऱ्या ट्रेनमधून पुन्हा तिसऱ्या
अनुभवत सर्वत्र डिस्पोजेबल गर्दी
शूट करत प्रत्येक स्टेशनवर नवे चेहरे नव्या टपऱ्या

हे विश्वच जिथे टपोरी अनरिवायंडेबल फिल्मसारखे
तिथे तुझ्या डोळ्यांचा  कॅमेरा
टिपणार तरी काय
जपणार तरी काय

मुसाफिरा
प्रत्येक शॉटगणिक जिथे तुझा रोल बदलतो
तिथे तुझ्या अस्तित्वात
स्थिरावणार तरी काय
आणि टिकणार तरी काय

।। २० ।।

नातलग येतायत
नाती वाहतायेत
मित्र येतायत
मैत्री वाहतायेत
लोक येतायत
समाज वाहतायेत

ह्या टेलिफोनमधून त्या टेलीफोनमध्ये
ह्या पेजरमधून त्या पेजरमध्ये
ह्या मोबाईलमधून त्या मोबाईलमध्ये
ह्या फॅक्समधून त्या फॅक्समध्ये
ह्या इमेलमधून त्या इमेलमध्ये

साऱ्याच रक्तसंबंधांच्या ह्या इलेकट्रोनिक शिरा
इलेकट्रोनिक धमन्या
प्रत्येकवेळी ते स्पीकर
आणि तू नेहमीच रिसिव्हर एन्डला

मुसाफिरा
पसर तुझ्या इंद्रियांचा सॉफ्टवेअर पदर
स्वीकार त्यांच्या मनाच्या इंडिव्हिज्युअल संहिता

त्यांनी कम्युनिकेट केलेल्या आकांतानी
निमूटपणे सजव तुझा एकांत 

चिन्हांचा स्फोट होईपर्यंत 
हाताळत राहा आयुष्याचा बॉम्ब 

आणि तुझी वेळ आली 
की मुकाट्याने स्फोटात वाजत 
नाहीसा हो कम्युनिकेशनमधून 

कम्युनिकेशनच्या पलीकडे 
कम्युनिकेशनच्या अलीकडून 

।। २१ ।।
कधी घेशील मिती ओलांडून अनंताकडे ट्रान्सक्वांटम  उडी 
कधी भोगशील मृत्यू सांताचा  घेऊन सांतातच खोलवर बुडी 

सर्वत्र इंटरनेटचे घनदाट जाळे 
आणि तू उपग्रहासारखा गुरुत्वाकर्षणाला लटकलेला 

तुझ्या प्रत्येक साधनेत तृष्णांचे मेसेज 
तुझ्या प्रत्येक स्वातंत्र्यात आळशीपणाचा प्रोग्राम 
समाधीच्या प्रत्येक क्षणात मारली गेलेली मोबाईल पाचर 
आणि शरीरात दरवळणारी संभोगाची  शुगरकोटेड ग्यानबाजी मेख 

मुसाफिरा 
गोडधोड सणासाठी पुन्हा पुन्हा जन्मत राहा 
मुसाफिरा 
बांधकामाचा डायबेटिस होऊन पुन्हा पुन्हा नाहीसा हो 

।। २२ ।।
तुझी एन्ट्री नव्हती तुझ्या हाती 
तुझी एक्झिट  नाही तुझ्या हाती 

फक्त फिरणे हीच तुझी गती 
फक्त जगणे हीच तुझी नियती 

मुसाफिरा 
फिर क्लॉकवाईज 
वा भटक अँटीक्लॉकवाईज 
जग स्पेसवाईज 
वा हालचाल अँटीस्पेसवाईज 

नाही ऐकणार तुझे कान कधी साउंडप्रूफ सिम्फनीचा अनहद 
नाही उतरवणार तुझ्या त्वचा कधी ट्रान्सटचेबल इंटरकोर्सची हळद 

नाही शूट करणार तुझे  डोळे कधी ट्रान्सव्हिज्युअल  असणेपण केवल अन शुद्ध 
नाही खाणार तुझी जीभ कधी निर्वाणाची डेथडिश सुबुद्ध अन प्रबूंद्ध 

नाही हुंगणार तुझे नाक कधी पृथ्वीचे सुगंधीत फुल सगुण 
नाही होणार तुझे शरीर कधी विश्वाचे निर्गुण क्रियेटीव्ह हस्तमैथुन 

तू फक्त बांधकाम करशील 
इथून तिथे तिथून इथे 
तू फक्त हालचाल करशील 
आतून बाहेर बाहेरून आत 

मुसाफिरा 
तेव्हा थांबव आता तुझ्या  शरीराचे दोन काटे 
दोरा पार होईपर्यंत सांभाळ हि नीडल 
आणि फिडल वाजवत कर्मांची शरीरातून गायब हो 

मुसाफिरा 
तू नव्हतास तेव्हाही मयसभा होती 
मुसाफिरा 
तू नसशील तेव्हाही मयसभा असेल 

श्रीधर तिळवे नाईक 

(प्रथम प्रकाशन अभिधा  ऑगस्ट  १९९६   . व्ही .प्रकाशन वर्ष २००४  पॉप्युलर प्रकाशन  ह्या चॅनेल सिरींजमधील पहिल्या  प्रकाशित काव्यसंग्रहातून )

Thursday, July 13, 2017

कवीता  कालातित नसतात कवीही कालातित नसतात  आपल्या कविता ही शब्दांची किरकोळ डिक्शनरी आहे मित्रांनो पण हे कळायलाही  कालातित व्हावं लागतं 

Wednesday, June 28, 2017

माझ्या आयुष्यातील स्त्रियांनी नेहमीच त्यांच्यावर लिहिलेल्या कविता प्रकाशित करण्यासंदर्भात माझ्याकडून वचने मागितली आणि मी ती दिली आणि पाळलीही . उज्वला उर्फ उजू ह्याला अपवाद नाही . तिच्यावर थेटपणे लिहिलेल्या कविता तिच्या हयातीत मी प्रकाशित करणार नाही हे माझे वचन होते आणि ते मी पाळले ज्या कविता थेट तिच्यावर न्हवत्या त्या मात्र मी छापल्या ज्ञ बाबतही तिची चाळिशी होत नाही तोवर मी थेट कविता प्रकाशित करणार नाही असे वचन दिले होते ते मी पाळले . तिनेही हयातभर असेच वचन मागितले होते पण ते पाळायला मी ठाम नकार दिला होता आणि तडजोड चाळीशीवर झाली होती . भारतीय समाजाचा स्त्रियांबाबतचा दृष्टिकोन बघता ही वचने  सहज आणि स्वाभाविक होती . मी इथे उजूवरच्या कविता क्रोनोलॉजिकली देतोय कारण बहीण भावाची रिलेशनशिप कशी सुरु होत कुठवर कशी पोहचली  हे स्पष्ट कळावे . हा नात्याचा उपसा गुंतागुंतीचा आहे आणि त्याकडे कसे पाहायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे . ह्या प्रश्नात डोकावण्याची माझी इच्छा नाही .
श्रीधर तिळवे नाईक


Thursday, June 8, 2017

उजूवरच्या किंवा उजूमुळे आलेल्या कविता - श्रीधर तिळवे नाईक

एका आनंदी मुलीची कविता श्रीधर तिळवे नाईक 

तिच्या आसपास आनंद आहे

घर आनंद दुकान आनंद
भाऊ आनंद आई आनंद
बंधू आनंद भगिनी आनंद
मांजर आनंद कुत्रा आनंद
जैन गल्ली आनंद आझाद चौक आनंद
कॉमर्स कॉलेज आनंद मैत्रिणी आनंद

आणि ती ह्या आनंदात
गाणी गुणगुणत आनंदात चाललीये

तिने कांदा कापताच
त्यातून आनंदाच्या  चकत्या बाहेर येतायत

तिने बटाटा उकडताच
त्यातून गलेलठ चेहऱ्याचा आनंद उगवतोय

तिने नळ चालू करताच
त्यातून आनंदाचे पाणी खि खि करत बादलीत कोसळतय

तिने पंजाबी घालताच
आनंद तिच्या ओढणीत आनंदाची ओढ फड्फडवतोय

ती मुळापासून फळापर्यंत
आनंदाने कच्च भरलेली आहे
आणि आनंद तिचा बॉयफ्रेंड असल्यासारखा
सर्वत्र तिच्या सोबत आहे

दिशा तिच्या आनंदाने आनंदीत होतायत
माती तिच्या आनंदाने हिरवीगार होतीये

तिची ही आनंदमूर्ती सगळ्यांच्या  कौतूकाचा विषय आहे

''उजू ना चालता बोलता आनंद आहे
कायम हसरी ''

जो तो तिच्या आनंदांना
आनंदाने टाळी देतोय
आणि टाळीतूनही आनंदाचा आवाज येतोय

मुलगी आनंदाने चाललीये
आणि झाडे रोज तिच्या आनंदात वाकून
तिला आनंदीत करणारी
नवी नवी फुले देतायत

ती सुगंधामुळे आनंदी आहे
कि आनंदामुळे सुगंधित आहे
हे मात्र
तिच्या आनंदाने तयार झालेला अत्तरात
इतकी वर्षे बसूनही
मला कळत नाहीये
***


उंचीचा कॉम्प्लेक्स आलेल्या मुलीची कविता 
कायम आनंदी असणाऱ्या मुलीला
अचानक कुणीतरी तिच्या बुटक्या उंचीचा
कॉम्प्लेक्स दिलाय
आणि तिचा  आनंदी असलेला चेहरा
झऱ्यासारखा आटत चाललाय

तिच्या देहातील आनंदाने पाणी
जे जाईल तिथ कारंजा निर्माण करायचं
आणि नद्या ऍडजस्ट करून घायचं
अचानक धरण बांधल्यासारख स्तब्ध झालय

हातावरील नशीब प्रथमच बुटकं झालंय
आणि फुटपट्ट्यांनी प्रथमच तिच्या आयुष्यात
एन्ट्री घेतलीये

फूटपट्ट्यांची जाणीवही नसणारे तिचे आभाळ
अचानक खाली आलंय तारकासकट
आणि त्यातील ढग
कोरडे आहेत कि भरलेले
हे तिच्या कोवळ्या पावसाळ्यांना कळत नाहीये

कायम आनंदी असणाऱ्या मुलीच्या श्वासातील वारा
कुणीतरी काढून घेतलाय उंचीच्या नावाने
आणि ती नवे नवे फॅन लावत
आपला सहन न होणाऱ्या बुटकेपणाला
गारवा पोहचवतीये

तिला अचानक अशी बुटकी कुणी केली ?

समाजाने ?
नशिबाने ?
कि तुलना करणाऱ्या मानसिकतेने ?

तिच्या गालातले गुलाब
आता नेहरूंचे राहिलेले नाहीत
ते काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याच्या
पायाखालचे पाचोळा बनतायत

ती इतरांच्या उंचीशी तुलना करत
स्वतःला अधिकाधिक बुटकी करत चाललीये
आणि हसत हसत तिच्या नजरेला नजर भिडवणारी झाडं
अचानक उंच होऊन
तिला कायमची दिसेनाशी होतायत
***
नाक अपरं असल्याचा कॉम्प्लेक्स आलेल्या मुलीस श्रीधर तिळवे नाईक 


बर्फाळ प्रदेशात कोंडून ठेवल्यासारखा
तुझा चेहरा का ?
का सारखी सारखी आज आरश्यात चेहरा पाहतियेस
आणि नाकाचे शेवट ओढतीयेस ?

''मी नकटी आहे का राजू ?''
''कोण म्हणालं ''
तू ओल्या आवाजात कोरडेपणा ओढत नाव सांगतियेस
आणि मी बायकांच्या सौन्दर्यस्पर्धेचा चाकू
तुझ्या नाकात घुसलेला स्पष्ट पाहतोय

नाक सरळ असल्याने स्वभाव सरळ होतो का

श्वास तर सर्वच नाकात फिल्टर होतात

मग सरळ नाकाचे लोक सुंदर
हे कोण ठरवतं ?




तुझं नाक नकटं नाही अपरं आहे
आणि जगातलं प्रत्येक फूल अपऱ्या नाकाचं असतं

सरळ नाकाची फुले कधी पाहिली आहेस का ?



अपरं नाक पुन्हा पुन्हा आरश्यात पाहतंय
जणू सरळ नाकांच्या प्रदेशात ते उपरं आहे



मला कळत नाहीये
तुला कसं समजवावं ?

तुझ्या नाकातले केस अकाली पांढरे झाल्यासारखे
आणि तुझे श्वास अकारण
नाकात खुरटंत खुरटत

डोळ्यात खिन्नता  सुकलेल्या फुलासारखी

तुझे आयुष्याचे झाड वाढ चुकवत चाल्लंय
आणि मी तुझा भाऊ
त्या झाडाच्या आटत चाललेल्या सावलीत
काळवंडतोय




नाकात अनेक विदेशी शरीरं अडकतात
आणि मेकुड बनतात

तुला दिले गेलेले टॉन्ट
मेकुड वा मळ का बनत नाहीत

त्या त्या इंद्रियाला  मिळालेले टॉन्ट्स
त्या त्या इंद्रियाला थांबवता आले असते
तर हा मेंदू किती सुखी झाला असता



उपाय उपाय उपाय



मी फोटोवाल्याला विचारतोय
''मुमताजचे फोटो आहेत का ?'

मी खाटेवर खिडकीत न्हाणीत मुमताज ठेवतोय

तू मुमताज पाहात हुरळतीयेस
आणि तुझे डोळे टॉन्टमधून निखळत
सुंदर बनतायत



काळ्या रंगाचा कॉम्प्लेक्स असलेली तुझी मैत्रीण अलका
तुला विचारतीये
'' माझी आवडती हिरॉईन रेखा तुझी कोण ''
तू नाकावर हात ठेवून म्हणतीयेस ,'' मुमताज ''


तुझ्या आयुष्याचे झाड अचानक अपऱ्या फांद्यांनी 'डोलतंय
आणि आख्या जैन गल्लीचा सरळ रस्ता स्वतःचा शेंडा कापून
अपऱ्या नाकाने
मुमताजमय झालाय

***

परिवर्तन श्रीधर तिळवे नाईक 
केवड्याला गंध सुटलाय
आणि केवडा दुःखी कि
त्याला फळं येत नाहीत

फणस आतून रसाळतोय
आणि दुःखी कि त्याला फुलं येत नाहीत

विडा तोंड रंगवतोय
तरीही दुःख कि विडाच्या वेलाला
 ना फुले ना फळे

तू ह्यातील कोण आहेस
केवडा, फणस कि विड्याचा वेल ?

मी विचारतोय
आणि अचानक तुझी उंची वाढतीये
नाक भूमिती शिकवतय
आणि तुझ्या चांगुलपणाचा गंध शहरभर पसरून
त्याचा चाफा झालाय

मी गर्वाने नाक पिळतोय
***

उजू आणि रुखसाना ह्यांच्यातील  संवाद श्रीधर तिळवे नाईक
गोव्यातले वाघ  गेले कुठे
जिवंत नाहीत तर मेले कुठे

नरकाचा का दाखवतोस फोटो
मी अजून पाप केले कुठे

मी बाजारात नागडी उभी
कबीर कुठे आणि शेले कुठे

मयखाना आहे कि मेला पुरुष आहे
बायकांच्या वाट्याचे पेले कुठे

मला जगण्याचीच परमिशन नाही
आत्महत्या मिळेल असे ठेले कुठे
***

लग्न न ठरण्याऱ्या मुलीची कविता श्रीधर तिळवे नाईक 


क्षण एक पुरे लग्नाचा
मग वर्षाव पडो मरणाचा

तुझ्या डोळ्यात तो लग्नव्याकुळ क्षण
आणि प्रतिक्षेचे फुलपाखरू

अधूनमधून लग्न नकोच असा उदास करणारा आविर्भाव

प्रेमाची मुक्ती कुणाला नकोय
पण समाजाने प्रेम पॅकेज डीलमध्ये बांधून त्याला पुष्पगुच्छ लटकावलाय

खरेतर तुला लव्हमॅरेजसाठी फुल्ल सपोर्ट आहे
पण प्रेम हा एक असा स्पोर्ट आहे
जो खेळायला दुसरा वफादार आणि फिदा लागतो

तू त्या गेमच्या बाहेर फेकली गेलेली आहेस
तुझा पूर्णविराम अल्पविराम व्हावा आणि
कपाळावर कुंकू चढून तुला समाजमान्य  पूर्णविराम मिळावा म्हणून
आम्ही लग्नाची भाषा सुरु केलीये

ही इंडियन डिप्लोमसी आहे
जी वादळांना कैद करून
त्यांची झुळूक बनवते



जखमा कुणाला होत नाहीत ?
मालमपट्ट्या मिळतात ते भाग्यवान

हँगरवर फक्त कपडे चढत नाहीत
बाईची अब्रूही चढते

कपाटात फक्त दागिने लॉक होत नाहीत
स्वाभिमानही लॉक होतो

लग्न म्हणजे अनंत कुलपांच्या चाव्या शोधत जाणे

तू बोलतीयेस
मी ऐकतोय


एकीकडे माझ्या भाषणांनां  कवितांना बक्षिसं मिळत चाललेत
दुसरीकडे तुला स्थळं भेटत चाललेत
मी बक्षिसं गटारात सोडत चाललोय
तुला मात्र स्थळं गटारात सोडता येत नाहीयेत

नकार बक्षिसांच्यापेक्षा आधिक खोलवर जातायत
तुझा तजेला वाळत चाललाय

तू एक अशी मुलगी बनत चाल्लीयेस
जी वाळलेल्या बागेत राहतिये



झोपेचं झाड नाहीसं झालंय
रात्रीचे खडे खडक बनतायंत
पक्ष्यांच्या खांद्यांना बंदुका लटकतायत

आपण सर्वच एका अश्या शिशिरात उभे आहोत
जिथे फक्त एक फुल ऋतू बदलणार आहे

आपण वहिवाटीच्या वाळवंटात वाट पाहतोय
आणि येणारी स्थळं आपले डोळे फोडत
घोड्यावर बसून नाहीशी होतायत


चॅनेल : एलसेट्रा

कोल्हापूर सोडताना - उजूचा निरोप घेताना


निघताना
पावलांना काय सल्ला द्यावा ?

सोडताना
हातांना कुठली गोष्ट सांगावी ?

ह्या शहरात मी अखेरचा मावळताना
तू विचारतीयेस प्रश्न
आणि मी
मेटॅलीक मुंबईतील उगवाई
ही उत्तर असल्याच्या थाटात
मुंबईविषयी बोलतोय

बॉबेत बॉम्ब पण मिळतात आंबे पण
माणसे पण मिळतात मशीनपण
करीअर मिळते कॅशिअरपण

तू फक्त माझ्या गालावरून हात फिरवतीयेस

तुझे अश्रू तुझा खळ्ळ दातासारखे
साधक असलो तरी आधी तुझा भाऊ आहे

रक्तात ओला झालोय
आणि हृदयाला शिंका येतायत

मायग्रेशन कधीच विसर्जन नसते
पण सर्जन असते ?

मुंबईचा माझ्या  साधनेला फायदा काय?

घरची जबाबदारी नीट सांभाळता आली
कि साधनाही नीट करता येईल
ही वासना
कि आशा ?



माझ्या साधनेमुळे घराची वाताहत झाली
कि वाताहतीमुळे माझी साधना सुधारली
कधीच कळायचे नाही

बुद्धाचे काय
राजवाडा असला
कि त्याचा त्याग करणे फार सोपे
कारण पाठीमागे सर्व आलबेल ह्याची खात्री
पण घर बुडत असताना
घराचा त्याग करणे
अतिशय अवघड

मी घर सोडून चाललोय
पण घरातील माणसे नाही हे तुला ठाऊकाय

आयुष्यभर त्यांनाच तर साधनेचा आरसा बनवत
स्वतःचा चेहरा दुरुस्त करत राहिलो

माझा समतोल
तुला कळलाय
पण तो फळेल की नाही
हे तुला माहीत नाही - मलाही

जाणाऱ्याचा हातात गुलाब द्यावेत
पण तू देतीयेस पाणी आणि हास्य

मी निघतोय
तुझ्या चेहऱ्यामधून
आणि माझ्या आसपासचे आरसे - चेहरा दाखवण्याऐवजी
फक्त पारा दाखवतायत
***

उजूची राजूला  उद्देशून स्वगते १ 
एकमेकाला पाण्यात पाहणारे भाऊ
एकमेकावर आग रोखणारे भाऊ

जुळे जन्मले तेव्हा एकमेकात होते
जगात आल्यावर भुंकणारे भाऊ

ते आले तेव्हा वाटले महामर्द आले
आता एकमेकालाच घाबरवणारे भाऊ

बालपणात एकमेकात सोबत धावणारे
एकमेकाचे पाय आता जाळणारे भाऊ

ह्या दोघीच्यांत राजू मीच एकटी आहे
जगण्याचा मध्य एकटा करणारे भाऊ
***
उजूची राजूला  उद्देशून स्वगते  २ 
गावात कसली नोकरी आणि गावात कसला आलाय  इनकम
मेलेल्या हातांनी दोन्ही अस्तित्वाचा वाजवायचा ड्रम

हे सुशेगाद  गाव  इथे सर्व काही हळुवार चालते
एका हातात झाड ह्याच्या  एका हातात फेणी रम

तू तिकडे मुंबईत बरा इथे बाजार ओसाडीचा
जिथे पिकते तिथे नासते मुंबईत विकते हाच क्रम

नातेवाईक आसपास आहेत एवढाच फक्त इथे दिलासा
बाकी मुंबईपेक्षा गावात उभे टोलेजंग   लक्ष भ्रम

मीही सगळं सांभाळतीये तूही सगळं संभाळतोयस
सांभाळासांभाळीत आयुष्याची कधीतरी सापडेल सम
***

चॅनेल : एलसेट्रा 
तुझ्या सावलीत देह वेचला
तू माझ्या सिनेमा खराखुर्रा केला

लाटांनी समुद्र मोजण्याची विद्या
मी तुझ्याकडून शिकलो
पाण्याला पाणी म्हणून आदर द्यायला
तू शिकवले

आयुष्याचे कित्तेक पावसाळे पाहूनही
जिच्या वाट्याला पिण्याचा साधा ग्लास आला नाही
अशी तू

लोकांनी फक्त ग्लास फोडले
आणि त्याची बिले तू भरलीस

लोकांनी तुझ्या आयुष्यापासून काचा  बनवल्या
आणि त्या विंडोसीटसाठी वापरल्या

कायमच रक्तबंबाळ जगणारी तू
जखमांची तुला इतकी सवय होती की
कि त्यांच्याविना तुझा देह अपुरा वाटायला लागला

एखाद्या बाईने आयुष्य किती सोसावे  ?

कागदातून तू चालत गेलीस
आणि त्या कागदांच्या बागा बनल्या
पण  तुझ्या नशीबी
प्रेमाचा साधा गुलाब कुणी खोवला नाही

आभाळ वाळत चाललंय रक्तात
आणि तुझा ढग सुटता  सुटत नाही

पुनर्जन्माविषयी तू विचारलेले प्रश्न
तू ह्या जन्मात किती दुःखी आहेस
तेच दर्शवत होते

दर्शनशास्त्रे मी ही कोळून प्यायलो
पण तुझ्या बाबतीत मात्र त्यांचा कोळसा झाला

दुःखे कधी  सावत्र नसतात
आणि सुख कधी सख्खे नसते

बुद्धाची कमळे देखील तुझ्या आयुष्यात
फक्त सूकून जाताना पाहिली
आणि त्या सुकलेल्या कमळांना
ब्रम्हकमळाचे रूप देण्याचा
तुझा खटाटोपही पाहिला

तू काम्पुटर शिकलीस
आणि तरीही
प्रामाणीक प्रेम शोधणारी
प्रेमव्रता राहिलीस

तुझ्या बुद्धिमत्तेचे वैभव
ह्या व्यवस्थेत नासून  गेले तरी
मिळालेल्या अन्न पगारात
तू शौर्य गाजवलेस

सगळ्या अवघड जगण्यातही
जगणे सोपे करणारी तुझी तपश्चर्या
ए बये
मला दे

तुझ्याशिवाय सगळे अल्लाह अपुरे आहे
मशीदीही अपुऱ्या आहेत
इबादत अपूर्ण आहे

माझा ह्या  वृक्षात फळ
आणि फळांचे दिवे लाव
***

























मला दोन सख्ख्या बहिणी  बायजी (सुमंगला )आणि उजू (उज्वला ) .बायजी माझी जणू दुसरी आईच  तर  उजू माझी सर्वात बेस्ट फ्रेंड संन्याशाच्या आयुष्यात  प्रेयस्याच्या पेक्षा त्याच्या आईबहिणी  जवळच्या होणे  अटळ  ! मृत्यू हा खरेतर आनंदाचा क्षण  ! जीर्ण झालेले शरीर फेकून नवे शरीर शोधण्याचा  !  पण तरीही ह्या क्षणात आनंदाने बुद्धाच्या मृत्यूनंतर म्हंटले तसे   ते सुंदर शरीर  गेल्याचे  दुःख  आहेच आणि आमची उजू तर  छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद शोधणारी अगदी मृत्यूपूर्वीही चार तास आधी बायजीला '' सकारात्मक रहा '' असं सांगणारी  . तिचे शेवटचे शब्द पूर्ण सकारात्मक ! तर शरीर गेले आणि तिच्यावर वेळोवेळी लिहिलेल्या कविता उरल्या . त्या देतोय . एका अर्थानं तीच तेरावं मी कविता टाकून करतोय म्हणा ना ! तिलाही हे असं आवडलं असतं .

Monday, April 3, 2017

किशोरीताई गेल्या परंपरेची आधुनिक तान आणि डौलदार ताणाबाणा गेला श्रुतींची राणी गेली जिच्या मूडी असण्याचाही दंतकथा झाल्या ती लिजेंड गेली जयपूर घराण्याचे नगर ओसाड झाले स्वतःचं घराणं शाबूत ठेवून इतर घराण्यांचे जीन्स स्वतःत रुजवण्याचे अभूतपूर्व कौशल्य गेले संगीतावरची अजोड श्रद्धा गेली , श्रद्धांजली !
श्रीधर तिळवे नाईक 

Saturday, January 28, 2017

चॅनेल निर्वस्तु हा चॅनेल सिरींजमधला माझा कव्हीशिवायचा सर्वात जुना कवितासंग्रह !१९८७ सालापासून मी पूर्ण निर्वस्तुवादी अश्या काही कविता लिहिल्या आणि त्यातील आकाराने लहान असलेल्या काही कविता सौष्ठवच्या फेंब्रू १९९३ च्या पहिल्या अंकात आणि  नंतर अभिधाच्या चौथी नवता विशेषांकात टाकल्या . प्रतिसृष्टीने आणि मार्केटने घडवून आणलेल्या क्रयवस्तूकरणाविरुद्ध बंड करणे आणि क्रियावादाची स्थापना करणे असे काहीतरी त्यावेळी मला अभिप्रेत असावे . एका तरुणाची बौद्धिक वादळे ह्या काव्यात दिसतात . बौद्धिक वादळांचे स्थापत्य मला का उभे करावेसे वाटले हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे असो . ह्यात शब्दशिल्पे नाहीत कि प्रतिमांचा कल्पनाविलास नाही . लॉजिकल इमॅजिनेशन असे काहीतरी त्याचे स्वरूप आहे . ह्या कविता कविताच न्हवेत असे मला सर्वांनी त्यावेळी सांगितले होतेच अपवाद अभिजित देशपांडे ह्यांचा . तरीही त्या टाकतोय कारण दिलेले वचन !
श्रीधर तिळवे नाईक

१२३४५६७८९१०